Thursday, 14 November 2019


Reflection for the Homily of 33rd SUNDAY IN ORDINARY TIME (17-11-2019) By Br. Lipton Patil









सामन्य काळातील तेहतिसावा रविवार





दिनांक: १७/ ११/२०१९
पहिले वाचन: मलाखी ४: १-२
दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र ३: ७-१२ 
शुभवर्तमान: लुक २१: ५-१९


“परमेश्वराचा दिवस येत आहे”

प्रस्तावना:  

          आजपासून आपण सामान्य काळातील तेहतिसाव्या रविवारात प्रधार्पण करत आहोत. आजच्या उपासनेद्वारे ख्रिस्तसभा  आपणाला सांगत आहे की, “परमेश्वराचा दिवस येत आहे.” अर्थात, परमेश्वर येत आहे; शेवटचा बोध देण्यासाठी व न्यायनिवाडा करण्यासाठी.
           मलाखी संदेष्ठा आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला सांगतो की; गर्विष्ठ व दुराचारी यांचा नाश होईल. परंतु जे परमेश्वराचे भय बाळगतात त्यांना प्रभूठायी आरोग्य प्राप्त होईल. थेस्सलनीकाकरांस दुसऱ्या पत्रात आपण ऐकत आहोत की; संत पॉल मनुष्याच्या शारिरीक किंबहुना, आर्थिक जीवनाविषयी मार्गदर्शन करीत आहे. तसेच आजच्या लुकलिखित शुभवर्तमानात येरुशलेमचा विध्वंस व युगाची समाप्ती याविषयी ख्रिस्त बोलत आहे. ख्रिस्ताच्या अश्या ह्या बोलण्यावरून आपणाला असे कळून येते की ख्रिस्त आपल्याला तत्पर राहण्यासाठी बोलावत आहे. माझ्या श्रद्धावंतांनो, आजच्या या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होत असताना, थोडावेळ शांत राहूया व पश्चातापी अं:तकरणाने क्षमा मागूया व भक्तिभावाने सहभागी होऊ या.

सम्यक विवरण:

पहिले वाचन : मलाखी ४:१-२

          संदेष्टा मलाखी परमेश्वर येत आहे याची घोषणा करत आहे. परमेश्वर आल्यावर गर्विष्ठ व सर्व दुराचारी लोकांचा नाश करील व त्यांना शिक्षेस पात्र ठरवणार आहे. परंतु जे लोक परमेश्वरावर विश्वास ठेवतील व त्याच्या सांगण्याप्रमाणे वागतील त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव होईल. ते लोक हर्षभरित राहतील.

दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र: ३:७-१२  

          संत पौल आपल्या जीवना द्वारे प्रभू येशूची सुवार्ता सांगत असे. विश्वासणाऱ्यांणी त्याच्या उपजीविकेची जबाबदारी घेणे योग्यच ठरले असते. पौलाने कोणावर भार टाकला नाही. इतरांना चांगले उदाहरण व्हावे म्हणून त्यांनी स्वतः रात्रदिवस श्रम व कष्ट केले. विश्वासणाऱ्यांणी आपल्या उपजीविकेसाठी व्यवसाय अगर नोकरी करावी व प्रभुजी सेवाही करावी; हा उत्तम कित्ता घालून दिला आहे. कोणाला काम करायची इच्छा नसेल, तर त्याने उपाशीच राहावे.

शुभवर्तमान: लुक २१:५-१९

           ते मंदिर अति भव्य होते. सुमारे १५ मीटर लांबीचे दगड एकावर एक ठेवून ते बांधलेले होते. सोन्याच्या साखळ्या व वेळी त्यांनी आतील भिंती सुशोभित केल्या होत्या. हे मंदिर त्या काळात एक मोठे आश्चर्य होते. असे असून चिऱ्यावर चिरा राहणार नाही; हे एकूण ऐकणाऱ्यांना मोठा धक्काच बसला. येशू ख्रिस्त खरे तेच सांगत होता. अशी त्यांची खात्री पटली आणि या गोष्टी केव्हा होतील हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला.
           या प्रश्नांचे उत्तर देताना प्रभू येशूने; जगाचा शेवट होईल, त्यापूर्वी काय घडेल तेही सांगितले. लढाया, भूकंप, भयानक रोगांची साथ व दुष्काळ या गोष्टी जगात प्रामुख्याने घडतील. स्वार्थी मानव आपल्या स्वार्थासाठी एकमेकांचा विध्वंस करताना आढळतील. जगात शांती नसल्यामुळे लोक शांतीच्या शोधात असतील व खोटी ख्रिस्त प्रकट होतील.

मनन चिंतन:

          असे म्हणतात की आपल्या कृत्यांमुळे  ज्याप्रमाणे निसर्गाचे चक्र आज बिघडलेले आहे. त्याचप्रमाणे आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्या जीवनाचे चक्र सुद्धा बिघडलेले आहे. 
 माझ्या ख्रिस्ती बांधवांनो, आज जगात अतिवृष्टी, चक्रीवादळ, भूकंप व हवामानात बदल इत्यादी गोष्टी घडत आहेत. अशा या गोष्टी घडत असताना, आपण म्हणत असतो की, जगाचा शेवट जवळ आला आहे, आपल्या कृतीमुळे परमेश्वर आपल्यावर कोपला आहे. असे नाना प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये थैमान घालत असतात. अशावेळी आपण खचून जातो की, खरोखरच जगाचा अंत होणार का?  या भीतीने आपण खूपच खचून जातो. आपणास प्रत्येकाला वाटते की, जे काही कमावले आहे. मग तो पैसा घर गाड्या संपत्ती व जमीन असो की नाव हे सर्वकाही नष्ट होईल. आपल्याला शारिरीक सुखाची भीती जास्त असते. शारिरीक सुख कसे मिळेल यावर आपण रात्रंदिवस श्रम करतो व अध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष करीत असतो.
           आजच्या तिन्ही वाचनांत आपण ऐकले आहे की,  ख्रिस्त पुन्हा येत आहे व सर्वांचा न्याय होणार आहे. हे सत्य आहे की, ख्रिस्त लवकर येऊन आपल्या प्रत्येकाचा न्याय करणार आहे. प्रत्येकाला आपल्या कार्याचा मोबदला न्यायाने मिळणार आहे. आपला न्याय आपल्या चांगल्या व वाईट कृतीने करणार आहे. जे लोक चांगले जीवन जगतात त्यांचा न्याय चांगल्या रीतीने होईल व जे दृष्ट कृत्य करतात त्यांचा न्याय त्यांच्या कृत्यानेच होईल.  ख्रिस्त आपल्या धनसंपत्ती ने न्याय करत नाही किंवा श्रम व गरीब यावरून न्याय करत नाही. तर  ख्रिस्त आपले अंतःकरण बघतो. आपले मन किती पवित्र व शुद्ध आहे यावरून आपला न्याय होईल. त्यासाठी संत पौल आपल्या मार्गदर्शन आपल्याला मार्गदर्शन करतो की,  आपण आपले जीवन कसे जगायचे.  जीवन जगत असताना आपण स्वतः जबाबदार असतो. आपण ख्रिस्ताची सुवार्ता सांगायला कमी पडू नये. आपल्या वागण्यातून आपण ख्रिस्त दुसऱ्यांना दिला पाहिजे. बायबल तत्त्वज्ञानाची व विज्ञानाची किंवा मोठी पुस्तके घेऊन ख्रिस्ताची सुवार्ता सांगितले पाहिजे असे काही नाही. सर्वकाही आपल्यामध्ये आहे. आपल्या स्मितहास्याने दुःखी चेहरे आपण आनंदित करू शकतो.  एकटे पडले आहेत अशांचे  साथीदार बनवून त्यांचा भार कमी करू शकतो. जे संत होऊन गेले त्यांनी काही महान गोष्टी नाही केल्या. तर छोट्या कृत्यातून, त्यांच्या छोट्या कार्यातून इतरांना ख्रिस्त दिला.  अस्सिकर संत फ्रान्सिसनी कृष्ठरोग्यांची सेवा केली.  तसेच पर्यावरणाची काळजी घेतली.  अशा प्रकारे त्यांनी ख्रिस्ताची माहिती  व प्रेम जगाला प्रकट केले. आपण सुद्धा या गोष्टी करू शकतो व जेव्हा ख्रिस्त येईल न्याय  करायला  तेव्हा आपला न्याय योग्य रीतीने होईल.   
          शुभवर्तमानात सांगितल्या प्रमाणे युगाची समाप्ती होणार आहे.  ही समाप्ती होण्याच्या  आधी काही चिन्हे दिली जातील.  ही चिन्हे आपण आज अनुभवत आहोत. परंतु ही चिन्हे पहात असताना खचून जाऊ नका. कारण ही चिन्हे आपल्यासमोर नवे आव्हान ठेवतात. आपल्याला जागृत करतात  अशासाठी की ख्रिस्त लवकर येत आहे व तो सर्वांचा न्याय निवाडा करणार आहे.  तर आपण आपल्या आध्यात्मिक जीवनाची तयारी केली पाहिजे. आपल्यामधील असलेला अहंकार, गर्विष्ठपणा, राग, मत्सर व क्रोध काढला पाहिजे. सर्वांची दयेने, प्रेमाने व करूणेने वागायला हवे.  आपण आपल्या दररोजच्या जीवनात दुसऱ्यांसाठी अडचण न होता; हे सर्व काही केल्याने प्रत्येकाचा न्याय चांगल्याने होणार व सर्वजण सर्वकालीन जीवनाचा आनंद घेतील व मेल्यानंतरही आपल्याला अनुभवता येईल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे ख्रिस्ता तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक”

१. ख्रिस्त सभेची अखंडितपणे सुवार्ता जगाला पोहोचविणारे पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स,बिशप्स, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ यांना सर्वांना ख्रिस्ताचे प्रेम, कृपा व दया मिळून ख्रिस्ताची सुवार्ता जगभर जोमाने पसरविता यावी  म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. देशात अत्याचार, काळाबाजार, अन्याय व वैराचार ह्यासारख्या गोष्टी घडत आहेत, त्यामुळे देशाची उन्नती होत नाही. अशा वेळी आपल्या राजकीय नेत्यांनी होत असलेल्या वाईट गोष्टीवर आवाज उठवून, देशाला योग्य दिशा द्यावी व देशाची चांगल्यारितीने वाटचाल व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आजच्या हवामान बदलामुळे कितीतरी लोकांचे नुकसान झाले आहे. काहीकांची घरे उध्वस्त झाली, तर शेतांची नासाडी झाली आहे. परमेश्वराने दया करून हे सर्व काही शांत करावे व लोकांना धीर द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आज युवक-युवती जीवनात योग्य साथीदार व नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना योग्य साथीदार व नोकरी मिळून त्यांचे जीवन आनंदित व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. जे लोक अतिशय आजारी आहेत, ज्यांची सेवा करायला कोणीही नाही. अशा सर्व लोकांना ख्रिस्ताचा करुणामय स्पर्श व्हावा व त्यांची आजारातून मुक्तता व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment