प्रायश्चित
काळातील पहिला रविवार
पहिले वाचन: उत्पती २:७-९; ३:१-७
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र: ५:१२-१९
शुभवर्तमान: मत्तय ४:१-११
“पश्चाताप करा व प्रभुकडे वळा.”
प्रस्तावना:
आज आपण प्रायश्चित (उपवास) काळातील पहिला रविवार साजरा करीत
आहोत. उपवास काळ म्हणजे प्रभूकडे येण्याचा काळ आणि त्यासाठी ख्रिस्तसभा आपल्याला
तीन गोष्टींचे पथ्य पाळण्यास सांगत आहे. ती पथ्ये म्हणजे प्रार्थना, उपवास आणि
दानधर्म, ज्याद्वारे आपण ऐहिक गोष्टींपासून वंचित राहून ख्रिस्ताजवळ येऊ.
आजच्या प्रभूशब्दावर मनन चिंतन केले तर; आपल्याला लक्षात येते
की, पापामुळे मनुष्य परमेश्वरापासून दूर केला. पण तो दुरावा ख्रिस्ताने आपल्या बलिदानाने
भरून काढला व मानवाला पुन्हा एकदा देवाजवळ आणले. आजच्या पहिल्या वाचनात आपण आदाम
आणि हव्वाने पाप करून परमेश्वराशी असलेले नाते तोडले ह्याचा वृत्तांत ऐकतो. तर
दुसऱ्या वाचनात हे तुटलेले नाते कशाप्रकारे जुळविले ह्याचे स्पष्टीकरण ऐकतो. पुढे शुभवर्तमानात
आपण ख्रिस्ताला झालेले मोह व त्यावर त्याने मिळविलेला विजय ह्याबद्दल ऐकतो.
आजच्या वाचनांचा सारांश असा आहे की, दैनंदिन जीवन जगत असताना
आपण अनेक मोहांना बळी पडतो. हे मोह आपल्याला पापांच्या विळख्यात अडकवतात व
देवापासून दूर घेऊन जातात. म्हणून त्यांना बळी न पडता परमेश्वराशी एकनिष्ठ राहावे
तसेच प्रार्थना, दानधर्म व उपवास ह्या
हत्यारांनी मोहावर विजय मिळवावा व त्यासाठी लागणारी कृपा आपण ह्या मिस्साबलीदानामध्ये
मागूया.
सम्यक
विवरण:
पहिले
वाचन: उत्पती
२:७-९; ३:१-७
आजच्या पहिल्या वाचनात आपण
मानवाची उत्पत्ती व त्याची पापाला बळी पडण्याची गोष्ट ऐकतो. ही गोष्ट शब्दशः सत्य
नसली, तरी त्यात दडलेला अर्थ मात्र खरा आहे. तो वेगवेगळ्या चिन्हाद्वारे
आपल्यासमोर प्रकट केला आहे. तो असा की, परमेश्वराने नर व नारी निर्माण केले,
म्हणजेच मानवास अस्तित्व दिले. सर्व चरांचरांवर त्यांना वर्चस्व दिले आणि
मोबदल्यात फक्त परमेश्वराशी आज्ञाधारकपणा व आदराची अपेक्षा केली. ह्या देणगीने
मानव गर्वाने फुगून गेला व देवासमान होण्याचा लोभ बाळगला. परमेश्वराच्या आज्ञेचा
भंग केला. ज्याद्वारे पापाने जगात प्रवेश केला. ज्याचा परिणाम असा की, सारी
मानवजात परमेश्वरापासून दूर गेली.
दुसरे
वाचन: रोमकरांस पत्र: ५:१२-१९
आजचे दुसरे वाचन आपल्याला ख्रिस्ताने मानवासाठी मिळविलेल्या तारणाबद्दल
बोध करत आहे. ख्रिस्ताने मिळविलेले तारण हे पापाने पसरविलेल्या नाशापेक्षा कितीतरी
पटीने मोठे आहे. म्हणून ख्रिस्ताच्या तारणदायी कृपेने फक्त आपण ह्या नाशापासून
वाचलेले नव्हे तर, त्याही पलिकडे त्याने आपल्याला परमेश्वराची मुले बनविली आहेत.
परमेश्वराला बाप किंवा आब्बा म्हणून हाक मारण्यास पात्र केले आहे. त्याद्वारे ख्रिस्ताबरोबर
सार्वकाळीक जीवनाचे वारसदार केले आहे.
शुभवर्तमान: मत्तय ४:१-११
आजचे शुभवर्तमान आपल्याला ख्रिस्ताला झालेल्या मोहाबद्दल
उपदेश करत आहे. ख्रिस्ताला झालेले मोह हे देवाच्या इच्छेप्रमाणे होते, जेणेकरून
सैतान ख्रिस्ताची परीक्षा घेईल व मोबदल्यात पराजित होईल. ख्रिस्ताला झालेले तीन
मोह हे कमजोर मानवी वृत्तीचे दर्शन घडवितात. जुन्याकरारापासून तर आजपर्यंत मानव पापाला
बळी पडला आहे. तरीसुद्धा ख्रिस्त स्वतःला ह्या मोहाच्या परीक्षेत झोकून देतो.
सैतान ख्रिस्ताच्या मानवी पैलूंचे परीक्षण करतो; पण ख्रिस्त त्यातून विजयी बाहेर
येतो. ह्याद्वारे आपल्याला आशा देतो की, मानवी वृत्ती कितीही कमजोर असली तरी
सैतानाच्या विळख्यात न सापडता त्याला धूडकारून लावण्याची शक्ती त्याच्यात आहे.
बोधकथा:
काही वर्षपूर्वी अमेरिका रेल्वेसाठी पूल बांधण्यात येत
होता. ह्या पुलाचे काम पूर्णत्वास आले तेव्हा एक रेलगाडी पूर्णपणे गाड्यांनी
भरलेली जिचे वजन दुप्पट होते अशी पुलावर आणून उभी आहे हे पाहून एका कामगाराने
बांधकाम करणाऱ्या माणसाला विचारले, “साहेब दुप्पट वजनाने भरलेली हि रेलगाडी
पुलाच्या मध्य्भागी ठेवून तुमचा पूल पाडण्याचा विचार आहे की काय?” त्यावर गवंडी म्हणाला,
“नाही, ही रेलगाडी उभी करून मी सिद्ध करू इच्छितो की, हा पूल एवढ वजन झेपून
घेण्याएवढा मजबूत आहे.”
मनन चिंतन:
आपण जीवनात येणारे मोह हे आपल्याला खाली पाडण्यासाठी नव्हे
किंवा विध्वंस करण्यासाठी नाही तर
त्याद्वारे आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात. आजच्या शुभवर्तमानात आपण ख्रिस्ताला
झालेले मोहाच्या वृत्तांत ऐकला. ख्रिस्ताला झालेले हे मोह त्याला पापांत
पडण्यासाठी नव्हे तर तो पापात पडू शकत नाही हे सिद्ध करण्यासाठी होते. ख्रिस्ताने
मोहावर विजय मिळविला आणि त्याद्वारे आपणाला दर्शविले की मोहाला बळी पडणे म्हणजे
पाप करणे. पाप आपल्याला परमेश्वरापासून दूर घेऊन जाते. म्हणून ख्रिस्ताने मोहाला
प्रतिकार करून पापात पडण्यास नकार दिला व त्याद्वारे त्याच्या पित्याच्या सहवासात
राहण्यास प्राधान्य दिले. उलट आदाम आणि एवेने परमेश्वराच्या सानिध्यात असूनही पाप
केले म्हणून आपण पाहतो की, त्यांना एदेन बागेतून म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यातून
पळवण्यात आले.
जर आपण
आजच्या पहिल्या वाचना वर आणि शुभवर्तमाना वर नजर टाकली तर आपल्या लक्षात येते की
दोन्ही वाचनात मोहाबद्दल वर्णन करण्यात आले आहे. पहिल्या वाचनात आदाम आणि हव्वा
ह्यांना झालेला मोह तर शुभवर्तमानात ख्रिस्ताला झालेला मोह पण त्या दोघांचा
मोहाकडे पाहण्याचा व ते हाताळण्याचा दृष्टीकोन परस्परविरोधी आहे. त्यांचा
दृष्टीकोन नम्रता गर्व ह्या पैलूतून उद्भवतो. आदाम आणि एवेकडे नजर फिरविली तर आपल्याला कळून चुकते की, ते गर्वाला मुकले. त्यांना देवासमान
व्हायचे होते. जेव्हा सैतानाने एवेला म्हटले की, ‘जर ह्या झाडाचं फळ तू खाल्लं तर तू देवासमान होशील’ तेव्हा ती गर्वाने भरली
व तिचे डोळे फिरले. लागलीच तिने फळ खाल्ले व आदामालासुद्धा
दिले. उलट येशूकडे पाहिले तर आपल्या लक्षात येते की, ख्रिस्ताने ‘नम्रता’ अंगिकारली. सैतानाला जाणीव
होती की, ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. तरीसुद्धा
ख्रिस्ताने हे सिद्ध करावं, त्याने आपल्या दैवी शक्तीचा वापर स्वतःला सिद्ध करण्यासाठी
करावा म्हणून सैतानाने त्याची परीक्षा घेतली, पण ख्रिस्त नम्र
राहिला. त्याने अहंकाराची छायासुद्धा स्वतःवर पडून घेतली
नाही. अशाप्रकारे त्याने मोहावर विजयी मिळविला.
अहंकार मनुष्याला अंध करतो. अहंकारामुळे
वास्तविकता पाहणे कठीण जाते. आदाम आणि हव्वेला परमेश्वराने फळ न खाण्याविषयी सक्त बंदी
घातली होती आणि जर ते फळ खाल्ले किंवा त्याला स्पर्श जरी केला तरी त्याचा परिणाम
मृत्यू हे काटेकोरपणे सांगितले होते. पण अहंकाराने त्यांना सैतानाचे शब्द खरे
दाखवून देवाच्या शब्दाचा विसर पाडला. सैतानाचा शब्द पाळल्याने ते स्वतःवर मृत्यू ओढून
शकतात हे ते विसरले. पण ख्रिस्ताने मात्र परमेश्वराच्या वचनास प्राधान्य दिले. तो नम्र
राहिला. म्हणून तो देवाचे वचन योग्यप्रकारे अमलात आणू शकला. उदाहरणार्थ; सैतानाने ख्रिस्तासमोर
देवाच्या वचनाचा उल्लेख केला, “तू जर देवाचा पुत्र असशील तर इथून उडी मार, कारण शास्त्रात
असे लिहिले आहे की, तुला काही होऊ नये म्हणून देव त्याच्या दूतांना पाठवील व
ते तुला झेलून धरतील.” पण ख्रिस्त नम्र होता. त्याला स्वतःची पात्रता
सिद्ध करायची गरज नव्हती. म्हणून त्याने लागलीच सैतानाचा हेतू ओळखला. सैतानाने जरे
शास्त्रलेख प्रकट करून स्वतःचा शहाणपणा प्रकट केला असला, तरी त्यात त्याचा
धूर्तपणा होता. हे ओळखून ख्रिस्ताने लागलीच त्याला योग्य उत्तर दिले की, “शास्त्रात असे सुद्धा लिहिले आहे की, परमेश्वर तुझा देव
ह्यास
परीक्षेत पाडू नकोस.” अशाप्रकारे ख्रिस्ताने सैतानाच्या शहाणपणास पराभूत केले.
आपले दैनंदिन जीवन जगत असताना आपण सुद्धा अनेक मोहांना बळी पडतो व कधी-कधी त्यांच्या आहारी जातो. ह्याचे कारण म्हणजे मोह आपल्याला वर-वरून चांगले दृश्य
दाखवतात. तात्पुरते समाधान देतात. पण त्यांच्यामागे
दडलेले जे कायमस्वरूपी वास्तव असते ते आपल्याला नंतर कळून चुकते. मोहाला शरण जाण्याने आपण
पाप आचरणात आणतो. ज्याचा
परिणाम असा की, परमेश्वराचे प्रेम हे ऐहिक सुखापेक्षा कमी आहे हे दर्शवतो. म्हणून ह्या
गोष्टीस बळी पडू नये, परमेश्वराचे
प्रेम हे जगापेक्षा अधिक मौल्यवान
आहे. हे ओळखण्यासाठी आपल्याला प्रायश्चित्तकाळ दिलेला
आहे. जेणेकरून आपण पापापासून दूर राहून
परमेश्वराच्या अधिक जवळ यावे.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद:
“हे प्रभू आम्हाला तुझ्याशी
एकनिष्ठ ठेव.”
१. ख्रिस्ताची शिकवण जगाला
देऊन त्याद्वारे जगाला ख्रिस्ताशी एकनिष्ठ करण्यास आपले पोप महाशय, सर्व धर्मगुरू,
धर्म भगिनी व प्रापंचिक सतत प्रयत्न करत असतात. हे कार्य चालू ठेवण्यास त्यांना
चांगले आरोग्य व योग्य ती कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आज आपल्या देशात
धर्माच्या नावाने कल्लोळ माजला आहे. सत्तेच्या नावाने हुकूमशाहीला जन्म घालण्याचा
प्रयत्न चालू आहे. अशा ह्या घटनांना काढून लावून, समता व बंधुता या मूल्यांना
प्राधान्य दिले जावे व त्याद्वारे देशाची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक पातळीवर प्रगती व्हावी म्हणून
आपण प्रार्थना करूया.
३. आज जगात वेगवेगळ्या
ठिकाणी विशेष करून चीनमध्ये ‘कोरोना’ नावाच्या जीवघेण्या रोगाने बरेचसे लोक ग्रासलेले
आहेत. या रोगापासून होणारा धोका टाळावा व
या रोगावर योग्य औषध लवकरात लवकर उपलब्ध करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळावे म्हणून
आपण प्रार्थना करूया.
४. उपवास काळ हा
परमेश्वराचे प्रेम सर्व गोष्टीहून महान आहे हे ओळखण्याचा काळ. ह्या काळात आपण पापा
पासून दूर रहावे व देवाजवळ यावे हयासाठी लागणारी कृपा आपणास मिळावी म्हणून आपण
प्रार्थना करूया.
५. थोडावेळ शांत राहून
आपल्या सामाजिक, कौटुंबिक, व वैयक्तिक
गरजांसाठी प्रार्थना करू या.