Wednesday 5 February 2020


Reflections for the homily of the Fifth Sunday In Ordinary Time (09/02/2020) by Br. Godfrey Rodriques.





सामान्य काळातील पाचवा रविवार
दिनांक: ९/२/२०२०
पहिले वाचन: यशया ५८: ७-१०
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र २: १-५
शुभवर्तमान: मत्तय ५: १३-१६


  


विषय: “तुम्ही जगाचे मिठ व प्रकाश आहात.”




प्रस्तावना:
          आज आपण सामान्य काळातील पाचव्या आठवड्यात पदार्पण करत आहोत. आजची उपासना आपणा प्रत्येकाला ख्रिस्ती ह्या नात्याने चांगल्या कर्माद्वारे, सेवेद्वारे व प्रार्थनेद्वारे समाजामध्ये रुची व सौंदर्य निर्माण करण्यास व देवाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी बोलावत आहे.
          आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपणास उपवासाचे महत्त्व पटवून देत आहे, तर आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरा बरोबर आपणा प्रत्येकास देवाच्या सामर्थ्यावर श्रद्धा ठेवण्यास बोलावत आहे. त्याचबरोबर आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना व आपणास मिठाची व प्रकाशाची उपमा देऊन मिठाचे व प्रकाशाचे गुणधर्म अंगी बाळगण्यास आव्हान करीत आहे.
          देवावरील आपला विश्वास दृढ होण्यास, त्याचबरोबर मिठाचे व प्रकाशाचे गुणधर्म अंगी बाळगण्यास लागणारी कृपा व आशीर्वाद आपणास मिळावा म्हणून ह्या मिस्साबलीदानात प्रार्थना करू या.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ५८: ७-१०
          यशया संदेष्टा हा समाजाची परीस्थिती पाहून भुकेल्यांस अन्न देण्यास व निराश्रीतांस निवारा देण्यास तसेच उपवास करून चांगली मुल्ये अंगी धारण करण्यास प्रोत्साहन देत आहे. त्याच्या प्रबोधनाने देवाचा गौरव आपल्या महत्कृत्यांच्या मार्गाने करण्यास व देवाचा प्रकाश सर्वत्र पसरविण्यास तो सांगत आहे.

दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र २:१-५
          संत पौल करिंथकरांस बजावून सांगतो की, ख्रिस्ताची सुवार्ता देवाचे सामर्थ्य प्रकट करते. त्याच्यावर आपल्या विश्वासाची उभारणी करा. करिंथमधील लोक सुशिक्षित व तत्वज्ञानी वक्त्यांना फार मानणारे होते. जो वक्ता आपल्या बोलण्याने त्यांच्या मनावर परिणाम करी त्याचे तत्त्वज्ञान ते स्विकारीत. म्हणून करिंथकरांनी केवळ देवाच्या सामर्थ्यावर व येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानावर विश्वास ठेवावा या हेतूने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पौलाने लोकांची देवाच्या विश्वासावर उभारणी केली, ह्याचे विवेचन केलेले आपणास दिसून येते.

शुभवर्तमान: मत्तय ५:१३-१६
          समाजात होत असलेल्या अन्यायाला आळा घालण्यासाठी व आपल्या विचारांचे आचरण करण्यासाठी ख्रिस्त त्याच्या शिष्यांना तसेच त्याचा उपदेश ऐकण्यास हजर असलेल्यांस सल्ला देत आहे. आपण कोण आहोत? हे पटवून देत असताना ‘तुम्ही मिठ व प्रकाश आहात.’ अशी उपमा देऊन, मिठाचे व प्रकाशाचे गुणधर्म अंगी बागळण्यास, व आचरणात आणण्यास ख्रिस्त उपदेश देत आहे, आणि आपल्याला सदैव सत्कर्म करण्यास प्रवृत्त करत आहे.

बोधकथा:
          मुंबईच्या एका चाळीत एक अख्रिस्ती गरीब बाई दररोज दूध विकण्यासाठी जात असे. दूध विकत असता ती खुप थकत असे. दूध विकता-विकता जेव्हा ती शेवटच्या घरात येत असे, तेव्हा त्या शेवटच्या घरातील ख्रिस्ती बाई तिला स्मित हास्य देऊन तिला पिण्यास पाणी देत असे. त्या बाईच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य पाहून व दिलेला पाणी पिऊन तिचा थकवा दूर होत असे. हे दररोज होत असे. कधी-कधी तर चाळीतील बाई त्या गरीब बाईला तांदूळ व डाळ सुद्धा देत असे. एके दिवशी त्या गरीब बाईने त्या ख्रिस्ती बाईला विचारले की, तुम्ही इतक्या प्रेमळ व चांगल्या का आहात? त्या प्रश्नाचे उत्तर न देता त्या ख्रिस्ती बाईने आत खोलीत जाऊन बायबलच्या नवीन कराराची एक प्रत आणून तिला देत म्हणाली, “मी न चुकता दररोज हे बायबल वाचते. यास्तव ह्या बायबल मध्ये जो ख्रिस्त आहे, तो मला इतका प्रेमळ बनवतो. इतक्यात त्या गरीब दूधवाल्या बाईने त्या ख्रिस्ती बाईस म्हटले, “मला देणार का तो ख्रिस्त? कारण जो ख्रिस्त तुम्हांला प्रेमळ बनवतो, तो त्या प्रेमाने माझ्या जीवनात आनंद भरत असतो. जणू माझे जीवन चविष्ट व सुखमय बनवत असतो.

मनन चिंतन:
          प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचे आद्य कर्तव्य म्हणजे; (देवाचे) ख्रिस्ताचे राज्य प्रस्थापित करणे होय. हे राज्य दया, क्षमा, प्रेम, करुणा व शांतीने भरलेले राज्य आहे. आपण जेव्हा ह्या आद्यकर्तव्याचे तंतोतंत पालन करतो, तेव्हा आपण खरे ख्रिस्ती म्हणून, खरे ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून जीवन जगत असतो. त्यातूनच आपण ख्रिस्ती आहोत ह्याची ओळख होत असते. दया, क्षमा, प्रेम, करुणा व शांती ह्या मूल्यांच्या आचरणाने आपण केवळ आपलेच नव्हे तर इतरांचे जीवन सुद्धा आनंदीत, सुखी-समाधानी करून प्रेमळ समाज निर्माण करू शकतो. ह्याची जाणीव ख्रिस्तास पूर्णपणे होती. ख्रिस्तास हे सुद्धा ठाऊक होते की, हे सर्व गुण आपल्या अंगी मूळताच आहेत म्हणून ह्या सर्व गुणांना मिठाची व प्रकाशाची उपमा देऊन उदाहरणाद्वारे व दाखल्याद्वारे आपणास देवाचे राज्य प्रस्थापित करण्यास म्हणजेच आपल्या आद्य कर्तव्यांचे पालन करण्यास ख्रिस्त बोलावत आहे.
          जर का पाच सेकंदांच्या हास्याने आपल छायाचित्र इतका छान येत असेल, तर विचार करा प्रत्येक क्षणाला आपण जर का हसत राहीलो, तर आपले जीवन व आपले आयुष्य किती सुंदर होईल. जर का छोटीशी मेणबत्ती अंधकाराला दूर सारू शकते, तर विचार करा आपल्या अं:तकरणात जो प्रकाश आहे, तो प्रकाश आपण जर का इतरांना दिला, तर त्यांचे जीवन किती सुखमय होऊ शकते. जर का चिमूटभर मीठ अन्नाची वा भोजनाची रुची वाढवत असेल, तर विचार करा, आपल्या अंगी असलेल्या मिठासारखे गुण इतरांसाठी वापरले, तर दुसऱ्यांचे जीवन किती चविष्ट बनू शकते. हे सर्व गुण मुळातच आपल्या अंगी असतात, गरज आहे ती फक्त त्या गुणांना ओळखून घेण्याची. म्हणूनच ख्रिस्त आज आपणास आवर्जून सांगत आहे की, आपल्या अंगी असलेल्या मिठाच्या गुणांची, चांगल्या मूल्यांची व चांगल्या विचारांची ओळख करून घेऊया. ते गुण, ती मुल्ये व ते विचार आचरणात आणू या. समाजामध्ये, मानवजातीमध्ये रुची व सौंदर्य निर्माण करून, स्वर्गराज्य प्रस्थापित करू या.
          ख्रिस्ताने शिकवलेली मुल्ये व शिकवण आपण जर का अंगीकारण्यास तयार नसाल, तर आपली ख्रिस्ती श्रद्धा व्यर्थ आहे. ख्रिस्ती म्हणून स्वतःची ओळख ढोंगीपणाची आहे. कारण ख्रिस्ताची मुल्ये आपले खरे ओळखपत्र आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे प्रभू तुझा प्रकाश जगभर पसरविण्यास आम्हांला सहाय्य कर.”
१. आपल्या ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशय, बिशप, कार्डीनल्स, धर्मगुरू, व्रतस्थ व सर्व प्रापंचिक ह्यांनी ख्रिस्ताची मुल्ये व खरी शिकवण संपूर्ण ख्रिस्ती सभेस द्यावी व लोकांचे जीवन चविष्ट तसेच प्रार्थनामय बनवावे म्हणून प्रार्थना करूया.
२. आज इथे हजर असलेल्या आपल्या प्रत्येकाला ख्रिस्ताच्या वचनांची व शिकवणुकीची खरी ओळख व्हावी तसेच आपण इतरांसाठी ख्रिस्ताचे खरे साक्षीदार बनावे म्हणून प्रार्थना करू या.
३. हे प्रभू तू म्हणतो, “पीक फार आहे, परंतु कामकरी थोडे आहेत.म्हणून तुझ्या मळ्यात काम करण्यासाठी अनेक तरुण-तरुणींनी स्व:खुशीने पुढे यावे व आई-वडिलांनी त्यांच्या ह्या निर्णयाला पाठींबा व प्रोत्साहन द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. पवित्र शास्त्राला अनुसरून देऊळमातेच्या शिकवणीप्रमाणे आम्ही खरे ख्रिस्ती जीवन जगावे. आई-वडिलांचा सन्मान, आजारी भाऊ-बहिणींची सेवा, शेजारप्रीती, रंजल्या गांजल्यांना मदत अशी सेवादायी कृत्ये आपल्या हातून घडावीत म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. जे कामा-धंद्याच्या शोधात आहेत, जे आजारी आहेत, व्यसनाधीन आहेत, ज्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे, ज्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात, जे अनाथ आहेत व ज्या जोडप्यांना लेकरे नाहीत, अशा सर्व लोकांना देवाने भरपूर असा आशीर्वाद द्यावा आणि सतत त्यांच्या पाठीशी राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा प्रभूसमोर ठेवूया.

No comments:

Post a Comment