Reflections for the homily on Ash Wednesday (26/02/2020) by Br. Brian
V. Motheghar.
राखेचा बुधवार
दिनांक:२६/०२/२०२०
पाहिले वाचन: योएल:२:१२-१८
दुसरे वाचन: २करिंथ: ५:२०-६:२
शुभवर्तमान: मत्तय: ६:१-६, १६-१८
विषय: “माती असशी मातीत मिळशी.”
प्रस्तावना:
आज आपण राखेचा बुधवार साजरा करीत आहोत. हा दिवस ख्रिस्तसभेत फार महत्वाचा मानला जातो. कारण आज संपूर्ण ख्रिस्तसभा प्रायश्चित्त काळास सुरुवात करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा योएल हा आपणास सांगत आहे की, “आपली वस्त्रे नव्हे तर आपली हृदये फाडा व परमेश्वर आपला देव ह्याच्याकडे वळा.” (योएल: २:१३) म्हणजेच आपल्या पापांचा पश्चाताप करून पापमुक्त रहा. तसेच आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस दुसऱ्या पत्रात सांगत आहे की, “आम्ही देवाच्या वतीने विनंती करतो
की, पापांपासून मुक्त व्हा, कारण पहा आताच ‘समय अनुकूल आहे’ व ‘तारणाचा दिवस आहे.’(२ करिंथ. ५:२०, ६:२) तसेच मत्तयलिखित
शुभवर्तमानात ख्रिस्त आपणास योग्य पश्चातापासाठी लागणारे प्रार्थना, उपवास, व दानधर्म कसे करावे ह्याविषयी
सांगण्यात आहे.
देवाने आपल्याला हे चाळीस दिवस त्याच्या सानिध्यात राहण्यासाठी व जास्तीत जास्त प्रार्थना, उपवास, दानधर्म व अनेक चांगली कार्ये करण्यासाठी दिले आहेत. त्यामुळे ह्या चाळीस दिवसांचा प्रारंभ आपण योग्यरितीने
करण्याचा प्रयत्न करू या व ह्या
प्रायश्चित्त काळात आपल्या पापांबद्दल योग्य प्रकारे प्रायश्चित्त करून देवाबरोबर
समेट घडवून आणण्यास लागणारी कृपा, आशीर्वाद, व शक्ती ह्या मिस्साबलिदानात प्रभू परमेश्वराकडे मागूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: योएल:२:१२-१८
संदेष्टा योएल ह्याने ख्रिस्तपूर्व ४०० कालखंडात हे
लेखन केलेले असावे. त्याच्या पुस्तकात अनेकदा मंदिराचा संदर्भ येतो, म्हणजेच मंदिराची पुनर्बांधणी
त्याकाळी पूर्ण झाली असावी. शासन करणारा ‘प्रभूचा दिवस’ उगवेल हि त्याच्या पुस्तकाची
मध्यवर्ती कल्पना आहे.
आजच्या वाचनात संदेष्ट्याने पश्चाताप करण्याचे आवाहन
दिव्य संदेशातून केले आहे. संदेष्ट्याने आरंभीच मेंढ्याच्या शिंगाची तुतारी फुंकून
सर्व उपासकांना मोठ्या उपवासासाठी पाचारण केले आहे. संदेष्टा लोकांना विलाप, शोक आणि उपवास करण्याचे त्रिविध
आवाहन करत आहे; ते सर्व
येथे या दिव्य पाचारणात एकवटले आहे. तसेच संदेष्ट्याने मनःपूर्वक पश्चाताप
करण्याचे अगत्य, स्पष्टपणे
सांगितले आहे. आध्यात्मिकता आत व बाहेर एकसारखी असावी हाच त्याचा आग्रह आहे.
योएलने ‘परत फिरा’ असे आवाहन केले आहे कारण आपला देव हा कृपाळू, प्रेमळ व कनवाळू आहे. यासाठी आपण सतत
देवाशी एकनिष्ठ असावे.
दुसरे वाचन: २ करिंथ.: ५:२०-६:२
संत पौल
आजच्या दुसऱ्या वाचनात आपणाला सांगत आहे की, “आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो.” (व.२०) ख्रिस्त वधस्तभावर जे देवपित्याचे कार्य पूर्ण करणार होता त्याच्या आधारे
त्याने शांतीची सुवार्ता गाजविली होती. ( इफिस.: २:१७) तीच सेवा पौलाने पुढे चालविली आहे. “देव आम्हांकडून विनवीत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने बोलावे आणि
देवाच्या सुवार्तेचे सत्य मांडावे.” (व. २०) यात सुवार्तेचा सारांश पौल आपल्याला सांगत आहे. (व. २१)
ख्रिस्ताचा वधस्तंभ देवाची प्रीती
जाहीर करतो. तसेच, ख्रिस्तानेही
प्रीती केली. (योहान
३:१६, १५:१३) आपला
तारणारा निष्पाप होता. त्याला पाप ठाऊक नव्हते व त्याच्या ठायी कपट नव्हते. (इब्री ४:१५, १ योहान ३:५) देवाने जगाचे पाप
त्याच्यावर ठेवले यात हेतू हा की, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाने ख्रिस्ताचे
नीतिमत्व द्यावे. (व. २१)
रोम ५:१७ ह्यात आपल्याला देवाने आपल्याला नितीमत्व कसे प्राप्त करून दिले आहे ह्याविषयी
सांगण्यात आले आहे. आपणाला हे नीतिमत्व मिळाले आहे का? असेल तर देवाचे आभार माना.
शुभवर्तमान: मत्तय ६:१-६, १६-१८
आपण ज्यांना (ख्रिस्ताला) खुश करण्यासाठी जगतो
त्यांच्याकडून प्रतिफळाची अपेक्षा करावी. आपले ख्रिस्ती जीवन कोणाला संतुष्ट
करण्यासाठी आहे? व. १ व २ ह्यात आपल्याला ह्याचा
सारांश दिला आहे. “तू दानधर्म करतोस तेव्हा.” (व.
२-४) परूशी जेव्हा दानधर्म करीत तेव्हा या कृत्यांना जास्तीत जास्त प्रसिद्धी कशी
मिळेल ते पाहत. (व. २) लोकांनी आपला गौरव करावा असे त्यांना मनातून
वाटत होते. प्रभू येशू त्यांना ढोंगी म्हणतो. त्यांचे हे धर्माचरण केवळ
स्वार्थासाठी होते. (व. २) “आपण दानधर्म करता तेव्हा त्याचा
गाजावाजा करू नका.” ते इतके गुप्त असावे की, तू ते
लवकरच विसरून जावे. (व. ३) तर मग, ते प्रतिफळ मनुष्य
नव्हेत, तर, देवपिता प्रतिफळ देईल. आपला देव
कोणाचा ऋणी नाही. नीति १९:१७ ह्यात आपल्याला देव आपली सत्कृत्ये कोणावर करावी ह्या
विषयी सांगण्यात आले आहे.
“जेव्हा तुम्ही प्रार्थना करता.”(व. ६)
सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना करण्यास परूश्यांना फार आवडे. आपण किती धार्मिक आहोत
असे पाहणाऱ्यांना वाटावे व त्यांनी आपले कौतुक करावे एवढाच त्यांचा उद्देश होता. आपण
लांबलचक प्रार्थना केली तर देव ती ऐकतो असे त्यांना वाटे. (व.
७) प्रार्थना
म्हणजे देवपित्याबरोबर एकांतात बोलणे. आपली प्रार्थना फक्त देवपित्याने ऐकण्यासाठी
असते. आपण त्याला आपल्या गरजांची आठवण करून देत नाही, (व.
८) तर स्वत:ला त्या गरजांची आठवण देऊन पित्यावर अवलंबून राहतो. (व.
६)
“तुम्ही उपास करता तेव्हा.” (व. १६) आपण
उपास करतो म्हणून फार धार्मिक आहोत असे परूशी मानत व तसे दाखविण्याचा प्रयत्नही
करीत. हेही ढोंग-नाटकच होते. दानधर्म व प्रार्थना याप्रमाणे उपास देवासाठी
गुप्तपणे करायचा होता. कशाचा तरी त्याग करून देवाच्या कार्यासाठी स्वत:ला वेगळे
करणे हा खरा उपास आहे. (व. १७, १८)
बोधकथा
फार पूर्वी एक राजा आपल्या कार्याद्वारे त्याच्या राज्यात बदल
घडवून आणत होता. त्याच्या देखरेखीत तो त्याच्या प्रजेला उत्तम असे जीवन व सुखसोई
देत होता. तो स्वतःहून आपल्या प्रजेकडे जाऊन त्यांच्या परिस्थितीची देखरेख करत असे.
एकेदिवशी तुरुंगात जाऊन त्याला त्याच्या राज्यातील तुरुंग्यांची पडताळणी करून
घ्यायची होती. यावर कारागृहातील अधिकारी आश्चर्यचकित झाला. परंतु राजाला कैद्यांची
परिस्थिती पाहायची होती. ठरलेल्या दिवशी तो राजा जसा कारागृहात जाऊ लागला, तसेच सर्व
कैदी त्याच्या जवळ येऊन विनवणी करू लागले, की, ‘आम्ही ते कार्य केले नाही. आम्ही
गुन्हा केला नाही. आम्ही निरपराधी आहे.’ असे विनवू लागले. परंतु एक मनुष्य एका
कोपऱ्यात आपले काम चालूच ठेवत होता. हे पाहून राजाला आश्चर्य वाटले. तेव्हा राजा
त्या कैद्याच्या जवळ येऊन त्याला प्रश्न केला. “तुला काहीही सांगायचे नाही
काय? तू इथे का आहेस?” त्यावर त्याने उत्तर दिले, “मी खून केला आहे सरकार.” राजाने
दुसरा प्रश्न विचारला, “तुला त्या गुन्ह्याचे वाईट वाटत नाही काय?” त्यावर तो
म्हणाला, “हो सरकार मला वाईट वाटते आणि मी त्या शिक्षेस पात्र आहे, म्हणून मी माझ्या
गुन्ह्याचा पश्चाताप करत आहे. मी माझ्या सदसद्विवेकबुद्धी पुर्वक पाप केले आहे,
ह्याचा मला पश्चाताप होत आहे. म्हणून मी तुमच्याकडे क्षमेची याचना करत नाही तर
त्या देवाकडे माझ्या पापांची कबुली करत आहे.”
बोध:
स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धी पुर्वक चूक करणे हे समजून घेणे
म्हणजेच सर्वात मोठी शिक्षा आपण आपल्या स्वतःला देऊ शकतो. हे आपल्याला आपल्या
अस्तित्वाच्या गाभाऱ्यातील स्रोताकडे परत जाण्यास भाग पाडते. देऊळमाता आपल्याला आज
हेच सांगते की स्वतःच्या जीवनाच्या गाभाऱ्यात जाऊन आपल्या पापांची क्षमा मागून या
पवित्र प्रायश्चितकाळात सहभागी व्हायला आपणाला आवाहन करत आहे.
मनन चिंतन:
आजपासून ख्रिस्तसभा आपल्याला नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी
आमंत्रण करीत आहे. प्रायश्चित्त काळ किंवा उपवास काळ हा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या
जीवनातील महत्वपूर्वक काळ आहे. ह्या काळात आपण आपल्या पापमय जीवनाचा त्याग करून,
ख्रिस्ताच्या अधिक जवळ येण्यास प्रयत्न करत असतो. आजच्या दिवशी आपल्या कपाळाला राख
लावली जाते. ही राख आपल्याला आपल्या वाईट कृत्यांची आठवण करून देते. ह्या राखेद्वारे
आपल्याला आवाहन केले जाते की, “वाईट मार्ग सोडून चांगल्या जीवनास सुरुवात करा!” “पश्चाताप
करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.” (मार्क १:१५) ह्या शब्दात आपले जीवन बदलण्यास
आवाहन दिले जाते.
राख हे पश्चातापाचे प्रतीक आहे. आपल्याला जुन्या करारात ह्याविषयी
काहिक उदाहरणे आढळून येतात. उदाहरणार्थ एस्तेर ४:१-३, इयोब २:८, ३०:१९, ४२:६, यशया
५८:५, ६१:३, यिर्मया ६:२६, २५:३५, दानियेल ९:३, योना ३:६, इत्यादी. आपणाला नव्या
करारात सुद्धा ह्याची उदाहरणे दिसून येतात, जेथे प्रभू येशू लोकांना बजावून सांगत
आहे की, कशाप्रकारे अविश्वासी लोकांनी पश्चाताप केला असता तर ते वाचले असते.
उदाहरणार्थ मत्तय११:२१, लुक १०:१३.
आज आपण गोणपाट व अंगाला राख ओढण्या ऐवजी कपाळाला राग लावतो.
ही राख फक्त देखावा नाही. तर आपल्याला आपल्या मानवी पापमुक्त जीवनाची आठवण करून
देत आहे. आजपासून आपण चाळीस दिवसांचा तप ठेवणार आहोत. हा तप कोणासाठी? कशासाठी? ह्याचा
आपण कधी विचार केला आहे का? प्रभू येशूने अरंण्यात चाळीस दिवस उपवास केला व
सैतानाच्या मोहाला बळी न पडता त्यावर विजयी झाला. आज आपणालासुद्धा हे चाळीस दिवस
सैतानी कृत्ये, विचार, शब्द, इत्यादी ह्यांच्यावर मात करण्यासाठी बोलावले आहे.
त्यासाठी आपल्याला ख्रिस्तसभा आपले जीवन अजून चांगल्या प्रकारे जगण्यासाठी व आपले
देवा बरोबरचे नाते, आपले इतरांबरोबरचे नाते, आपले निसर्गाबरोबरचे किंवा पर्यावरणा बरोबरचे
नाते व आपले आपल्या स्वतःबरोबरचे नाते अधिक मजबूत व दृढ करण्यासाठी आमंत्रण देत
आहे. हे करण्यासाठी आपल्याला आजच्या पवित्र शास्त्रात तीन मार्ग सुचवले आहेत. ते
म्हणजे प्रार्थना, उपवास आणि दानधर्म.
१. प्रार्थना: आजपासून ख्रिस्तसभा आपल्याला
आपल्या दैनंदिन जीवनातील जो थोडा वेळ आपण प्रार्थनेत घालत होतो, त्यात अधिक भर
करण्यास सांगत आहे. जेणेकरून आपले देवा बरोबरचे नाते अधिक दृढ व त्याच्या सहवासात अधिक वेळ
घालवण्यासाठी आमंत्रण देत आहे. प्रार्थनेत आपण फक्त मागत बसत नाहीत, तर, आपण
देवाबरोबर संवाद साधतो. असे म्हणतात की ‘जगातील सर्व पुस्तके आपण वाचतो, परंतु
बायबल असे एकमेव पुस्तक आहे जे आपल्याला वाचते’. म्हणजेच जे आपले जीवन वाचते, जे
आपले अंत:करण वाचते. जेव्हा आपण बायबल वाचतो तेव्हा देव आपल्याशी त्याच्या शब्दाद्वारे
नवजीवनाची गुरुकिल्ली देत असतो. आपल्याला नवीन मार्ग दाखवत असतो. ह्या
प्रायश्चित्त काळात देवाचा संदेश ऐकण्यास व त्याच्याशी योग्य संभाषण करण्यासाठी
आपल्याला बोलावण्यात आले आहे. प्रार्थनेमुळे आपण कोण आहोत? व देव कोण आहे? ह्याची
आपल्याला जाणीव होते. ह्याद्वारे आपण आपली आध्यात्मिक भूक भागवत असतो.
२. उपवास: उपवास हे पश्चातापाचे प्रतीक
आहे. पूर्वीच्याकाळी किंवा दुसरी वाँटीकन परिषदेपूर्वी ख्रिस्तसभेची अशी शिकवण
होती की, शरीर हे एक पाप आहे. त्याची काळजी करणे म्हणजे आपण पापास आमंत्रण देतो.
ही समज आजच्या आधुनिक युगात किंवा दुसऱ्या वाँटीकन परिषदेनंतर चुकीची समजली जाऊ
लागली किंवा त्यात सुधारणा करण्यात आली. कारण “आपले शरीर हे देवाचे मंदिर आहे.” (१
करिंथ३:१६, १७, ६:१९) त्यासाठी आजच्या आधुनिक जीवनात आपण आपल्या शरीराची काळजी
घेणे गरजेचे आहे. तर मग आपल्याला प्रश्न पडतो की आपण उपवास कशाचा करावा? कोणत्या
गोष्टींचा करावा?
आज आपल्याला नवीन समज दिली गेली आहे. ती म्हणजे आपण अन्नाचा
उपवास करावा; तो फक्त शरीराची जिझ होण्यासाठी नव्हे, तर गरीबांबरोबर आपले ऐक्य
साधण्यासाठी. आपण उपवास करावा तो म्हणजे आपल्या वाईट विचारांचा, वाईट कृत्यांचा, अपशब्दांचा,
सामाजिक माध्यमांचा (Social Media) दुसऱ्यांविषयींच्या क्रोधाचा, दुसऱ्याविषयींच्या
अफवांचा, इत्यादी. जेणेकरून आपले आपल्या देवा बरोबरचे, आपल्या शेजाऱ्या बरोबरचे,
आपल्या पर्यावरणा बरोबरचे व आपल्या स्वतःबरोबरचे नाते दृढ व्हावे म्हणून. ह्या
वाईट कृतीं पासून दूर राहण्यासाठी आपल्याला आमंत्रण केले आहे. जेणेकरून आपण
पास्काच्या (ईस्टरच्या) सोहळ्यास योग्य रीतीने सहभागी होता येईल व निर्मल हृदयाने
देवाच्या आशीर्वादाचा वर्षाव आपणावर होईल.
३. दानधर्म: दानधर्म करणे म्हणजे आपल्या विपुलतेतून
नव्हे तर, आपल्या कमताईतून, आपले आहे नाही त्यातून दान करणे. कारण असे म्हटले जाते
की, ‘दु:खापत होईपर्यंत देत राहा.’ किंवा असे सुद्धा म्हटले जाते की, ‘देणाऱ्याचा
देव होतो व राखणाऱ्याची राख होते.’ दानधर्माद्वारे आपण दुसऱ्यांचा विचार करतो. ह्या
दानधर्माद्वारे आपल्याला समजते की, सर्व संपत्तीवर फक्त देवाचा अधिकार आहे. आपण
फक्त त्याचे राखंदार आहोत. असिसिकार संत फ्रांसिस ह्यांच्या शांतीच्या प्रार्थनेत
आपण म्हणतो, “देण्यानेच आपल्याला मिळते व अनंतकाळीक आनंद प्राप्त होतो.”
म्हणून ह्या प्रायश्चितकाळात ह्या तीन मार्गांचा वापर करून
आपले जीवन देवसेवेसाठी समर्पित करूया, व पास्काच्या (ईस्टरच्या) सोहळ्यास आपले अंत:करण
व आपले नवीन जीवन तयार ठेवूया.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना:
प्रतिसाद: “हे प्रभू तुझ्याबरोबर आमचा
समेट घडवून आण.”
१. आपले पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू, व व्रतस्थ ह्या सर्वांना देवाने चांगले
शारीरिक व मानसिक आरोग्य प्रदान करावे, तसेच ह्या प्रायश्चित काळामध्ये त्यांनी
प्रार्थनेचे, उपवासाचे व दानधर्माचे महत्व आपल्या दैनंदिन जीवनाद्वारे लोकांना पटवून
दयावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे लोक देवापासून दूर गेले
आहेत त्यांना ह्या प्रायश्चित काळात देवाने स्पर्श करावा व त्यांनी देवाच्या
प्रेमाचा अनुभव घेऊन देवाजवळ परत यावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. ह्या प्रायश्चित काळात
प्रार्थना, उपवास व दानधर्माच्या मदतीने आपण आपल्या जीवनाला एक नवीन वळण द्यावे व
प्रभूची सुवार्ता आपल्या जीवनाद्वारे समाजात पसरावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ह्या प्रायश्चित काळाद्वारे प्रभूने
आपल्याला आपल्या पापांचा धिक्कार करून प्रभूकडे येण्याची एक अनमोल संधी दिली आहे.
ह्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन देवाबरोवर, इतरांबरोबर, पर्यावरणाबरोबर व स्वतःबरोबर
समेट घडवून आणण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. ज्या व्यक्ती बेरोजगार आहेत व नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना प्रभूच्या आशीर्वादाने
चांगली नोकरी मिळावी व त्यांचे जीवन सुखमय व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या
सामाजिक, कौटुंबिक व व्ययक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete