Thursday, 20 February 2020


Reflections for the homily on Seventh Sunday In Ordinary Time (23/02/2020) by Dn. Rahul Rodrigues.





सामान्य काळातील सातवा रविवार
दिनांक: २३/०२/२०२०
पहिले वाचन: लेवीय १९: १-२,१७-१८
दुसरे वाचन: १ करिंथकरांस ३: १६-२३
शुभवर्तमान: मत्तय: ५: ३८- ४८



प्रस्तावना:
            आज आपण सामान्य काळातील सातवा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास शेजारीप्रिती व शत्रूप्रिती याविषयी शिकवण देत असून आपल्या स्वर्गीय पित्याप्रमाणे परिपूर्ण होण्यास आमंत्रण देत आहे.
            लेवीयच्या पहिल्या वाचनात परमेश्वर म्हणतो, की आपल्या शेजाऱ्यावर प्रिती करा व एक पावित्र्याचे जीवन जगा. तर दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस लिहिलेल्या पहिक्या पहिल्या पत्रात म्हणतो, आपले शरीर हे देवाचे पवित्र मंदिर आहे. पुढे शुभवर्तमानात पर्वतावरील प्रवचनात प्रभू येशू शेजारीप्रिती व शत्रूप्रिती याविषयी बोध करत आहे. तसेच आपल्या वैऱ्यावर प्रिती करावयास व जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगत आहे.
       आपणही येशू प्रमाणे प्रेम व क्षमा करण्यास शिकावे व पवित्र आत्म्याचे मंदिर बनून आपल्या पित्याप्रमाणे परिपूर्ण बनावे म्हणून लागणारी कृपा व शक्ती या पवित्र मिस्साबालीदानामध्ये मागूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: लेवीय १९: १-२,१७-१८
            मोशे इस्रायली जनतेस पावित्र्य व न्याय हयासंबंधीचे नियम सांगत आहे. इस्रायली जनतेने पावित्र्याचे व शुद्धतेचे जीवन जगले पाहिजे व हे जीवन जगण्यास खुद्द परमेश्वर स्वतःचे उदाहरण सादर करीत आहे. परमेश्वर म्हणतो, “तुम्ही पवित्र असावे कारण मी तुमचा परमेश्वर पवित्र आहे.”
         मोशेच्याकाळी तेथे अनेक जाती-जमातीचे लोक होते. त्यांचा एक नियम होता, कुणी आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा खून केला तर त्या व्यक्तीलाच नाही तर त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारले जात असे. नंतर त्यामध्ये नवीन नियम आला की, फक्त त्याच व्यक्तीला मारावे. इस्रायली लोकसुद्धा या नियमास अपवाद नव्हते. परंतु मोशेने त्यांना नवीन नियम किंवा शिकवण दिली. आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नको किंवा आपल्या भावाबद्दल कोणाचा दावा धरू नको. कारण सूड भावनेने पवित्रतेचे जीवन जगण्यास कठीण आहे. मोशे आपल्या लोकांस एक नवीन आज्ञा देत आहे. आपल्या शेजाऱ्यावर स्वतः प्रमाणे प्रेम करा. परमेश्वर आपल्या प्रजेस इतरांपेक्षा अलग बनण्यास सांगत आहे. जेणेकरून जेव्हा इतर लोक इस्रायली लोकांकडे पाहतील, त्यांच्यातील बदल अनुभवतील, तेव्हा ते आपले दगडाचे देव बाजूला सारून जिवंत देवाकडे परत येतील.

दुसरे वाचन: १ करिंथकरांस ३: १६-२३
          पौल करिंथकरांस पहिल्या पत्रात म्हणतो, परमेश्‍वराचे विचार हे माणसाच्या विचारापेक्षा अलग आहेत. जगाचे ज्ञान हे देवाच्या ठायी मूर्खपणा आहे. परंतु जे जगाच्या दृष्टिकोनातून मूर्खपणा आहे ते परमेश्वराच्या ठायी धूर्तपणा आहे. परमेश्वराच्या ज्ञानाप्रमाणे जो वागेल तोच स्वर्गराज्यास पात्र ठरेल. जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनांना अनुसरतो तेव्हा आपण परमेश्वराचे मंदिर बनतो. पवित्र आत्मा आपणामध्ये वास करतो. हा ज्ञानाचा आत्मा, शहाणपणाचा आत्मा आपणास परिपूर्ण बनवेल. पण आपण जर या पवित्र आत्म्याचा स्वीकार केला नाही, तर आपल्याच ज्ञानात अडकून राहू व आपला नाश होईल.

शुभवर्तमान: मत्तय: ५: ३८- ४८
           मत्तय लिखित शुभवर्तमानात येशू शेजारीप्रिती व शत्रूप्रिती कशी करावी हे सांगत आहे. ‘डोळ्या बद्दल डोळा किंवा जशास तसे’ हयाला न्यायाचा नियम म्हणतात. निरपराधी लोकांच्या संरक्षणासाठी व गुन्ह्यापेक्षा अधिक सुड उगवता येऊ नये म्हणून हे नियम होते. देवाच्या राज्यात असणाऱ्यांनी आपल्या हक्कासाठी धडपडण्याची आवश्यकता नाही. त्यांनी नम्र व निस्वार्थी राहावे. शांत रहावे, अन्याय सहन करावा असे आज प्रभू शिकवितो. जे आपल्या लोकांपैकी आहेत त्यांच्यावर प्रिती करा व जे इस्रायलचे शत्रू आहेत त्यांचा द्वेष करा. कारण या द्वेषाने देव आमच्या शत्रूंचा न्याय करतो असे परुशी शिकवीत. परंतु प्रभू येशूने असे शिकविले की, ‘जे आपले शत्रू आहेत त्यांच्यावर प्रीती करून त्यांच्यावरील देवाची प्रिती प्रकट करा कारण देव त्यांच्यावर प्रिती करतो.’

बोधकथा:
          एकदा एका तरुणाचा आपल्या गावात खूप अपमान झाला होता. ख्रिस्ती असल्यामुळे त्याला आपल्या धर्मगुरूकडे जाणे उचित वाटले. पण त्याने मनाशी ठरवले होते कि, ‘ज्यांनी माझा अपमान केला, त्यांचा बदला मी नक्कीच घेणार’. त्याने सगळी हकीकत धर्मगुरूंना सांगितली. ते त्या तरुणास म्हणाले, ‘मित्रा, प्रथम आपल्या घरी जा.तरुणाने उत्तर दिले, ‘मी कसा जाऊ घरी सुडाची भावना माझ्या अंत:करणात उफाळून येत आहे’. ‘त्यामुळेच तू आता घरी गेले पाहिजे, अपमान हा मातीसारखा असतो.धर्मगुरू म्हणाले. तरुणाने उत्तर दिले, ‘हो मला ठाऊक आहे. त्यामुळेच मला ती घाण साफ करायची आहे.शेवटी धर्मगुरु म्हणाले, ‘मित्रा, एक गोष्ट अजून लक्षात घे. माती जेव्हा सुकून जाते तेव्हा सहजपणे साफ होते.

मनन चिंतन:
“जेथे प्रेम दया शांती तेथे देवाची वस्ती.”
          आजच्या हया आधुनिक युगात दुसऱ्यावर रागावणे, चिडणे, एखाद्याचा तिरस्कार करणे फार सोपे झाले आहे. पण एखाद्यावर प्रेम करणे फार कठीण झाले आहे. परंतु आज ख्रिस्त आपल्याला एक नवीन आज्ञा देत आहे. तुमच्या शत्रूवर प्रेम करा व जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
            आजची तिन्ही वाचने आपण पडताळून पाहिली तर त्यामध्ये एक आपल्याला एक चड दिसून येते. पहिल्या वाचनात आपण ऐकले की, मोशे इस्राएली लोकांना परस्परावर प्रेम करण्यास सांगतो. सूड घेणे हा त्यांचा नियम होता व त्यांच्या त्या काळाची गरज होती. कारण त्यांना आपल्या कुटुंबाचे व आपल्या परिवाराचे संरक्षण करावे लागत असे. तरीही मोशे त्यांना परस्परावर प्रेम करण्यास व बंधू भावाने राहण्यास सांगत आहे.
          पुढे शुभवर्तमानात सुद्धा येशू आपल्याला आपल्या शत्रूवर प्रेम करावयास आज्ञा देत आहे. जसा आपला देव पवित्र व परिपूर्ण आहे त्याप्रमाणे बनण्यास तो आपल्याला आवाहन देत आहे. कारण देवाठायी आपण सर्वजण समान आहोत. देव सर्वांना समान लेखतो. तो सर्वांना सारखा पाऊस देतो.सर्वांना सारखाच सूर्यप्रकाश देतो. देव पापी व संत ह्यांत काही फरक करत नाही. मग जर देव आपल्या सर्वांना सारखे प्रेम देतो तर आपण ख्रिस्ती ह्या नात्याने सर्वांवर प्रेम करणे गरजेचे आहे. प्रेम हा ख्रिस्ती जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. ज्याच्या ठायी प्रेम नाही तो किंवा ती व्यक्ती ख्रिस्तीच नाही. कारण ख्रिस्त हा आपल्या प्रेमासाठी मनुष्य झाला व आपल्या प्रेमाखातीर मेला.
            संत पौल सुद्धा आज आपल्याला देवाचे पवित्र मंदिर बनण्याचे आमंत्रण देत आहे. बाप्तिस्म्या द्वारे व पवित्र पाण्याने आपण पवित्र झालो आहोत. परंतु ती पवित्रता टिकवणे व त्यात अधिक दृढ व सुदृढ बनणे गरजेचे आहे. मदर तेरेसा म्हणतात, “पवित्र जीवन जगणे हे फक्त थोड्या लोकांचे भाग्य नाही तर आपल्या सर्वांचेच काम आहे”. (“To be holy is not the privilege for some but duty for all” -Mother Theresa) जेव्हा आपण सर्वांवर प्रेम करून प्रेम भावनेने राहतो, आपल्या शत्रूवरही प्रेम करतो, तेव्हा आपण एक पवित्र जीवन जगत असतो. अर्थात आपल्या शत्रूवर प्रेम करणे व त्यांना क्षमा करणे इतके सोपे नाही. परंतु ख्रिस्ताने आपल्याला ते शिकविले आहे. क्रूसावरून येशूने आपल्या मारेकऱ्यांना क्षमा केली. जॉन पॉल दुसरे यांनी सुद्धा आपल्यावर गोळी झाडणार्‍या व्यक्तीला तुरुंगात जाऊन क्षमा केली. सिस्टर राणी मरिया ह्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा त्यांच्या वैर्‍यांना क्षमा केली.
           आज आपणापुढे असंख्य लोकांची उदाहरणे आहेत, जे ख्रिस्ता प्रमाणे जीवन जगले व ख्रिस्ताच्या शिकवणुकीवर आधारीत जीवन जगले. आज तोच ख्रिस्त आपल्यालाही बोलावत आहे. जेव्हा आपण प्रेमाचे, दयेचे, क्षमेचे व शांतीची जीवन जगतो, तेव्हा आपण पवित्र बनतो व पवित्र आत्म्याचे मंदिर बनत असतो. आपण जेव्हा इतरांना त्यांच्या पापांची किंवा वाईट कर्मांची क्षमा करतो तेव्हा परमेश्वर आपल्यालाही आपल्या पापांची क्षमा देत असतो. कारण आपण आमच्या बापा ह्या प्रार्थनेमध्ये म्हणतो, ‘जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे आम्हालाही आमच्या अपराधांची क्षमा कर’. तसेच आज आपल्याला आपल्या शत्रूसाठी प्रार्थना करण्यास सांगण्यात आले आहे. हया मिस्स्साबलीदानात आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया व आपल्या स्वतःसाठी सुद्धा प्रार्थना करूया कि, त्या क्रूसावरील ख्रिस्ताप्रमाणे आपल्याला सुद्धा क्षमा व प्रेम करण्यासाठी लागणारी कृपाशक्ती परमेश्वराने बहाल करावी.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: “हे प्रभू आम्हाला तुझ्यासारखे प्रेम व क्षमा करण्यास धैर्य दे.”
१. आपले पोप महाशय, बिशप, धर्मगुरू, धर्मबंधू व भगिनी ह्यांनी सतत ख्रिस्ताच्या प्रेमाची, क्षमेची शिकवण जगाला द्यावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. धर्मगुरू, राज्यकर्ते, कलाकार, अभिनेते, व प्रशासकीय अधिकारी ह्यांनी ख्रिस्ताच्या शांतीचे साधन बनावे व ख्रिस्ताचा प्रेमाचा संदेश आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे जगजाहीर करावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. आज जगभर लोकांच्या मनात जातीयतेचा वणवा पेटला आहे. एक-दुसऱ्या बद्दल तिरस्कार मनात बाळगला जात आहे. हा वणवा विझून त्यांच्या मनात प्रेम भावना वसावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. जे तरुण-तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत, त्यांना प्रभू प्रेमाचा स्पर्श होऊन येशू ख्रिस्त हाच खरा मार्ग, प्रकाश, व जीवन आहे हे सत्य त्यांनीस्वीकारावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. आपण आपली दैनंदिन जीवन जगत असताना ख्रिस्ताचे उदाहरण समोर ठेवून आपण आपल्या अपराध्यांना क्षमा करावी व ख्रिस्ती धर्माची क्षमेची शिकवण आपण अंगीकारावी म्हणून प्रार्थना करू या.
६. थोडा वेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक, व वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete