Thursday, 13 February 2020


Reflection for the Homily of Sixth Sunday In Ordinary Time (16/02/2020) By Br. Lipton Patil 



सामान्य काळातील सहावा रविवार
दिनांक : १६/०२/२०२०
पहिले वाचन: बेनसिरा १५:१५-२०
दुसरे वाचन: १ करिंथकरांस २:६-१०
शुभवर्तमान: मत्तय ५:१७-३७




विषय: “जुने नियमशास्त्र व येशूची नवीन शिकवण.”
प्रस्तावना:
          आज आपण सामान्य काळातील सहाव्या आठवड्यात प्रवेश करीत आहोत. आजची उपासना जुने नियमशास्त्र व येशूची नवीन शिकवण ह्या विषयावर मनन चिंतन करायला आमंत्रण देत आहे. आजचे पहिले वाचन बेनसिराची बोधवचने मधून घेतलेले आहे. या वचनात मानवी स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला आहे. देवाने प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, परंतु ह्या आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग कशाप्रकारे करायचा हे मानवाकडे सोपवले आहे. दुसऱ्या वाचनात पौल करिंथकरांस पहिल्या पत्रात ख्रिस्ताच्या व जागतिक ज्ञानाची तुलना करतो. तर मत्तयलिखित शुभवर्तमानात खुद्द येशू ख्रिस्त जुन्या नियमशास्त्राबद्दल बोलून त्याची एक नवीन आज्ञा देत आहे. आपल्यामधील जे काही जुने आहे ते आपल्याला देवाकडे जाण्यास अडथळा आणतो; त्यावर मात करण्यासाठी आपल्याला परमेश्वराची कृपा, शक्ती व आशीर्वाद मिळून येशूच्या नवीन शिकवणीची भर आपल्यात पडावी म्हणून ह्या मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
 पहिले वाचन: बेनसिरा १५:१५-२०
          आजचे वाचन बेनसिराच्या पुस्तकातील मानवी स्वातंत्र्य व जबाबदारी ह्या विभागातील आहे. देव आपल्याला जगण्याचे स्वातंत्र्य देतो, तसेच जीवनात योग्य ती निवड करण्यास प्रवृत्त करतो. आपल्यासमोर अग्नी व पाणी, जीवन व मरण, चांगले व वाईट ठेवलेले आहे. ह्यातील आपण काय निवडावे ह्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. आपल्याला हे स्वातंत्र्य बहाल करून देव आपल्याला दुष्कृत्य करण्याची आज्ञा देत नाही, व तो पाप करण्याचा परवानाही देत नाही. तो फक्त आपल्याला पूर्णपणे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य देतो, कोणती बाजू निवडायची हे आपल्या हातात आहे.

दुसरे वाचन: १ करिंथकरांस २:६-१०
          आपण केवळ सुवार्ताच नव्हे तर, देवाबद्दलचं ज्ञानही देतो असे पौल म्हणतो. हे ज्ञान फक्त ज्ञानवंत लोकांना सांगितले जाते. पौलाच्या काळातील लोकांच्या स्तुतीस पात्र ठरलेले नामांकित वक्ते परिपक्व हा शब्द स्वतःसाठी वापरीत. आपल्या अनुयायांना तसेच आम्ही करतो असा त्यांचा दावा होता. त्यांना नगरांचे, राज्याचे भावी सत्ताधीश, अधिकारी व्हायचे होते. आपले ज्ञान कसे नाही ते सांगताना पौलाच्या मतामध्ये बहुधा हाच विचार असावा. त्याचे ज्ञान ह्या युगाचे तर नाहीच, पण ह्या नाहीशा होणाऱ्या जगातील सत्ताधीशांचेही ते ज्ञान नाही. मग हे ज्ञान काय आहे ते त्याने नेमकेपणे सांगितले आहे. ते देवाचे गुढ ज्ञान आहे, ते पूर्वी गुप्त ठेवले होते पण आता प्रगट केले आहे. ते काळाच्या आरंभापूर्वीच आमच्या गौरवा करिता नेमलेले होते.

शुभवर्तमान: मत्तय ५:१७-३७
          नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ यांची परिपूर्ती आपल्यामध्ये झाली असे येशूने सांगितले आहे. पूर्ण करणे म्हणजे शास्त्रलेखात ज्याचा-ज्याचा निर्देश केला आहे ते-ते प्रत्यक्षात उतरवणे, करणे आणि येशूने आता नेमके तेच केले आहे. पण नियमशास्त्राची परिपूर्ती झाल्याने ते रद्द झाले असे होत नाही; ते तसेच सर्वधा अधिकारसंपन्न उरते व राहते आणि शिष्यांनी त्याचा पूर्णतः आदर केला पाहिजे. तथापि येशूमध्ये नियमशास्त्राची परिपूर्ती झाल्याने आता शिष्यांच्या दृष्टीने त्यांच्या कार्यावर कोणता फरक पडतो हा प्रश्न उरतो. येथे खून करू नको, व्याभिचार करू नको, ह्या आज्ञांचे केवळ शब्दशः पालन करणे पुरेसे नाही. त्यातून मूळ समस्या सुटत नाही. ह्या बाह्य कृत्यांच्या मागे द्वेष व कामवासणा ह्या मूलभूत प्रवृत्ती अंत:करणात घर करून बसल्या आहेत. अंत:करण योग्य नसेल तर त्यातून पापांचे फळ बाहेर पडण्यापूर्वीच ते सुधारण्यासाठी कठोर कृती केली पाहिजे. अनुवाद २४:१-४ ह्या वचनांचा शब्दशः आधार घेऊन सूटपत्र देण्यास मान्यता दिली होती. मात्र त्यासाठी योग्य त्या नमुन्यात सूटपत्र लिहिणे आवश्यक होते. पण येशूने येथे विवाहाचा शाश्‍वतपणा हा देवाचा मूळ हेतू आहे असे पुन्हा एकदा सांगितलं आहे. (३३-३७) वेगवेगळ्या शपथा वाहणे व त्यांचा कमी अधिक प्रभाव वा महत्त्व वगैरेची बारीक चिकित्सा व चर्चा येशू बाजूस ठेवतो. त्याऐवजी साध्या सत्यतेचा आग्रह धरतो. खरेपणाने चालणाऱ्यावर शपथ, आणभाक अगदी अनावश्यक ठरतात. घटस्पोटाच्या मुद्याप्रमाणे येथे ही येशूने नियमशास्त्राचे विधिनियम देवाच्या मूळ उद्देशाला डावलणार नाहीत ह्याची खबरदारी घेतली आहे. ते नियम मानवाच्या पाणीपणाला आळा घालण्यासाठी योजिले होते. नैतिक मानदंडाची उभारणी नियमशास्त्रातील सोयी-सवलतीच्या आधारे नव्हे, तर देवाच्या विधायक हेतूवर झाली पाहिजे.

बोधकथा:
          कँथोलिक मुलांसाठी असलेल्या एका वसतिगृहा मध्ये (Boys Hostel) प्रविण नावाचा एक मुलगा राहत होता. प्रवीण मुलांना अश्लील पुस्तके वाचायला देत असे. किंबहुना वाईट अपशब्द व वाईट गोष्टी करायला प्रवृत्त करत असे. अशामुळे वसतीगृहामधील वातावरण बिघडून गेले होते. मुलांमध्ये एक-मेकाबद्दल आदरभाव राहिला नव्हता. मोठ्या लोकांशी व्यवस्थितपणे बोलत नसत. असे हे प्रकरण चालू असताना वसतिगृह प्रभारी (Hostel In charge) ह्यांना कळून चुकले की, ह्या कँथोलिक मुलांसाठी वस्तीगृहामध्ये काहीतरी वाईट घडत आहे. तेव्हा प्रभारीने प्रवीणला बोलावून सांगितले की, तू ह्या कँथोलिक मुलांसाठी वस्तीगृहामध्ये राहतोस, तू सुद्धा एक कँथोलिक मुलगा आहेस. हे जे काही तू करतोस ते योग्य नाही. अश्लील पुस्तके वाचायला देण्यापेक्षा मुलांना बायबल वाचायला सांग, अपशब्द शिकवण्यापेक्षा ख्रिस्ती धर्माची शिकवण दे, म्हणजे तू सुद्धा ख्रिस्ताच्या वचनांना आदर देणार व दुसरे सुद्धा आदर देणार. इतकेच नव्हे तर तू सुद्धा ख्रिस्ताची सुवार्ता दुसऱ्यांना देणार ज्याप्रमाणे धर्मगुरू व धर्मभगिनी करतात.

मनन चिंतन:
          माझ्या श्रद्धावंतांनो, असे म्हणतात की; आपले मन हे विचारांची एक बँक आहे. ह्या बँकेत जे आपण जमा करतो, तेच बँकेतून आपल्याला काढता येते. मनात सकारात्मक की नकारात्मक विचार भरायचे हे आपल्यावर अवलंबून असते. सकारात्मक विचार मातीच सोनं करतात; तर नकारात्मक विचार सोन्याची माती करून टाकतात. आज आपण आपल्या देशात बघतो, खूप काही नवीन-नवीन नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. जुने नियम रद्द करून नवीन नियम अमलात आणले जात आहेत. हे लोकांच्या कल्याणासाठी व हितासाठी केले जात आहे, असे म्हणतात. परंतु खरोखरच लोक ह्या नियमाबद्दल आनंदित आहेत का? ह्या नियमांतून लोकांचा काहीतरी उपयोग होतो का? अशाप्रकारचे विचार आपल्या मनात खेळ मांडतात. नवीन नियमांमुळे लोकांचे भले होते का? नाही. लोक दु:खी व निरागस झाले आहेत. कारण हे नियम जो माणूस काढतो, तो स्वतःच्या स्वार्थासाठी किंबहुना स्वतः मतलबी होऊन काढतो. आजच्या पहिल्या वाचनात सांगितल्याप्रमाणे मानवाला स्वातंत्र्य दिले आहे, परंतु ह्याचा अर्थ असा नाही की माणसाने आपल्या स्वातंत्र्याचा वापर कशाही प्रकारे करायचा. आपल्या स्वातंत्र्याने दुसऱ्यांचे हित झाले पाहिजे. जेव्हा आपण एखादा नियम काढतो, तेव्हा सर्वांचे कसे कल्याण होईल याचा विचार करून नियम काढले पाहिजेत. शाळेमध्ये नियम आहेत, ते मुलांच्या चांगल्यासाठी. रस्त्यावरती वाहन चालकांना नियम आहेत, जेणेकरून अपघात घडू नयेत. प्रत्येक शाखेमध्ये नियम आहेत. अशासाठी की, सर्वकाही व्यवस्थित व सुरळीत घडावं. मला जे वाटेल ते केल्यास नुकसान आपलेच होईल. शेवटी आपणच या सर्व गोष्टींना कारणीभूत ठरलो जातो.
          आज जर आपण ख्रिस्ताच्या शिकवणुकीकडे लक्ष दिले तर, आपल्याला खूप काही शिकता येते. ख्रिस्त सुद्धा नवीन शिकवणूक देतो. परंतु ख्रिस्ताची शिकवणूक कुणाला त्रासदायक नाही. त्यामुळे ख्रिस्ताला नवीन मोशे, नवीन शिकवणुकीचा मोशे म्हटले जाते. ख्रिस्त नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करीत नाही; परंतु त्यांच्या आधारावर आपल्याला नवीन शिकवणूक देतो, जेणेकरून आपले सर्वांचे जीवन सुखमय होईल. शास्त्री व परुषी हे जुन्या रीतीने चालून लोकांचा छळ करीत असत. शास्त्री व परुषी ह्यांना नियम व्यवस्थित समजले नव्हते. ख्रिस्त नियमांची योग्यरीत्या शिकवणूक देतो. शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे:
१. खून करू नकोस: आज आपण प्रत्येकजण खून करतो. चाकू, तरवार, बंदूक किंवा सुरा घेऊन नाही; तर आपल्या शब्दांनी, कृतीने, चेष्टा करून इतरांना जेव्हा आपण दुखवतो. सुऱ्याने खून केल्यास जखम लवकर भरून येते. परंतु आपल्या शब्दाने जेव्हा आपण इतरांना ठेच पोहोचवतो, किंवा इजा देतो ती इजा भरायला खूप वेळ लागतो. आज आपण आपल्या समाजात पाहत आहोत की कितीतरी लोकांचे एक-दुसऱ्यांबरोबर चांगले नाते नाही. सासु-सुनेबरोबर बोलत नाही. मुलगा आपल्या आई-वडिलांना तुच्छ लेखतो. भावा-भावामध्ये भांडण आहेत. खूप काही अशा गोष्टी घडत आहेत. असे संबंध असल्यास जेव्हा आपण प्रार्थना करतो, तेव्हा त्या प्रार्थनेला काही अर्थ उरत नाही. प्रार्थना करीत असताना आपली सर्वांची मने निर्मळ, स्वच्छ व पवित्र असली पाहिजेत. तरच आपली प्रार्थना देवाकडे पोहचली जाते.
२. व्याभिचार करू नकोस: आपले विचार हे नेहमी पवित्र असले पाहिजेत. देवाने पुरुष व स्त्री अशी आपली निर्मिती केली आहे. अशासाठी की आपण ख्रिस्ताचे कार्य पुढे नेऊ शकू. आपण समाजात बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी स्त्रियांवर अन्याय व अत्याचार होत आहेत. का? कारण शेवटी माणूस स्वतःच्या हितासाठी दुसऱ्यांचा वापर करतो. कामवासना, अनैतिक विचार, नको असलेल्या गोष्टी मानवाला देवापासून दूर घेऊन जातात. आज कुटुंबात भांडण होतात. कारण पती-पत्नी एक दुसऱ्यांबरोबर विश्वासाने राहत नाहीत. बाहेर दुसऱ्या बरोबर वाईट संबंध ठेवतात व आपल्या संसाराची माती करून टाकतात.
३. घटस्पोट: आज समाजात खूप घटस्पोट होत आहेत. देऊळमाता घटस्पोटासाठी मदत करीत नाही. कारण, लग्न हे स्वर्गात लागले जाते व पृथ्वीवर साकारले जाते. ख्रिस्त स्वतः लग्नामधील केंद्रबिंदू असतो. लहानशा गोष्टीवरुन भांडणं होऊन घटस्फोट घ्यायला लोकं धाव घेतात. भांडण, गैरसमज हा होत असतो. यावर आपण मार्ग काढला पाहिजे. एकत्र येऊन गैरसमज दूर करायला पाहिजे. तरच जीवन सुखमय होईल. शुल्लक गोष्टींबद्दल तक्रार करीत बसलो तर, आपण कधीच पुढे जाऊ शकणार नाहीत.
४. खोटी शपथ वाहू नको: असे म्हणतात की एक खोटे लपवायला आपणाला शंभरवेळा खोटे बोलावे लागते. आजच्या शुभवर्तमानात आपणाला संगितले गेले आहे की, कशाबद्दल ही शप्पथ वाहु नको. जे काही असेल ते बोलून टाका. खरे ते खरे. खोटे ते खोटे. थोडा वेळ थोडा त्रास होईल. परंतु हा त्रास कायमचा नसतो. आपले कार्य करीत असताना खूप लोक अपवाद आणतील, आपल्याला खोटे ठरवतील, परंतु घाबरून जायचे नाही; कारण खऱ्याचाच नेहमी विजय होत असतो.
          माझ्या श्रद्धावंतांनो आजची उपासना आपल्याला खूप काही शिकवीत आहे. जर आपण ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे चाललो तर, आपल्याला कधीच अडचण येणार नाही. त्याच्या शिकवणुकीला आदर द्या, म्हणजे तुमचे जीवन सुखमय व आनंदित होईल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.”
१. ख्रिस्ताची शिकवणूक जगाला देणारे आपले पोप साहेब, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू-धर्मभगिनी, मिशनरी व प्रापंचिक ह्यांच्यावर ख्रिस्ताचा नेहमी आशीर्वाद राहावा व ख्रिस्ताची शिकवणूक जगाला देण्याचे कार्य जोमाने चालू राहावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. कितीतरी लोक कोरोना व्हायरस व वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेले आहेत, अशा सर्व आजारी लोकांना परमेश्वराचा आरोग्यदायी स्पर्श होऊन त्यांची आजारातून सुटका व्हावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. आपल्या देशामध्ये खूप ठिकाणी लोकांवर अन्याय व अत्याचार होत आहेत, अशा कारणाने मानव स्वातंत्र्यपणे जीवन जगायला घाबरत आहे, हा सर्व अन्याय व अत्याचार संपुष्टात यावा व प्रत्येक नागरिकाला मुक्तपणे जीवन जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. लवकरच शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु होत आहेत त्यानां परमेश्वराने ज्ञान, सुबुद्धी व मानसिक क्षमता द्यावी, तसेच त्याना चांगले स्वास्थ मिळावे व चांगला अभ्यास करून चांगल्या गुणांनी त्यांना यश मिळावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. आपण आपल्या स्वतःसाठी पार्थना करू या, परमेश्वराच्या आज्ञेनुसार आपण आपले ख्रिस्ती जीवन इतरांच्या सेवेसाठी समर्पित करावे म्हणून प्रार्थना करू या.
६. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक, व व्ययक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.

No comments:

Post a Comment