Wednesday, 1 April 2020


Reflections for the Homily of Palm Sunday (5-04-2020)  By Fr. Wilson Gaikwad.



झावळ्यांचा रविवार



दिनांक: ०५/०४/२०२०
पहिले वाचन: यशया ५०:४-७
दुसरे वाचन: फिलिपिकरांस पत्र २:६-११
शुभवर्तमान: मत्तय २६:१४-२७:६६



प्रस्तावना :
“गाओ प्रभू को होसान्ना, दाऊद के पुत्र को होसान्ना
गगनमें गुंजे जयजयकार, धरती आनंद मानाये,
विनम्र होकार गाधहेपर स्वार है नात मेरा.”
          प्रिय बंधू आणि भगिनींनो आज झावळ्यांचा रविवार प्रायश्चित काळाचा कळस आहे. तसेच आज आपण पवित्र आठवड्याला सुरुवात करीत आहोत. झावळ्यांच्या राविवाराला दु:खसहन रविवार असेही संबोधले जाते. आजच्या वाचनामध्ये अनेक विरोधाभास दिसतात. पहिल्या वाचनात यशयाचे दु:ख, तिरस्कार पहावयास मिळतो. दुसऱ्या वाचनात नम्रतेचे आव्हान केले आहे. आणि अत्यंत आनंदमय वातावरणात ह्या सणाची सुरुवात होते. सकाळीच भाविक देवळाच्या बाहेर झावळ्या घेऊन उभे राहतात. त्या आशीर्वादित केल्यावर लोक जल्लोषाने होसान्ना गात देवळात प्रवेश करतात. असेच प्रभू ख्रिस्ताच्या बाबतीत घडले. येशू ख्रिस्त येरुसलेहेमाच्या देवळात प्रवेश करत असतांना, लोकांनी झावळ्या दाखवून, पायघड्या टाकून त्याचे स्वागत केले. परंतु निमिषातच आनंद विरळतो व वातावरण दु:खमय होते. खर तर लोकच आनंद देतात आणि दु:खही देतात. सत्कार करतात, नंतर फुत्कार करतात. हेच नाट्यमय दृश्य आज आपल्याला निदर्शनास येते. एकाक्षणी जयजयकार आणि दुसऱ्याक्षणी अपमान, विरोध, तिरस्कार. खरतर एकच दिवस प्रभूचा सन्मान केला, नंतर त्याला दु;खाच्या दरीत सोडून दिले. हाच आहे मानवाचा रंग आणि विरोधाभास. आजचा रविवार म्हणजे आनंद व दुःख यांचे मिश्रण. आनंद यासाठी की प्रभू येशूचा लोक जयजयकार करतात व दुःख ह्यासाठी की जयजयकार करणारे त्याला नाकारतात.
          आजच्या येशूच्या दु:खासहनात सहभागी होत असताना आपल्यातील दुर्गुणांना तिलांजली देऊन सदगुण अंगीकारुया व विनयशीलता, नम्रता, सहनशीलता हे धारण करूया आणि प्रभूच्या कृपेस पात्र होऊ या.  

सम्यक विवरण:
पहिले वाचन:  यशया ५०: ४-७.
          यशया आम्हांस नम्रतेचे व विनयशीलतेचे सुंदर उदाहरण सादर करतो. त्याचा अपमान- तिरस्कार होतो. पण तू निमूटपणे देवासाठी सहन करतो. कारण देवावर त्याची श्रद्धा व प्रेम होते. त्याचा छळ झाला, अपमान झाला; पण त्याने प्रतिकार केला नाही. याउलट त्याने सहनशीलता दाखवली.

दुसरे वाचन:  फिलीप करांस  पत्र २: ६-११  
          येथे संत पौल आम्हांस पाचारण करतो, ख्रिस्त  देव असून त्याने दास्यत्व स्विकारले. आम्हांसाठी रिक्त झाला, लीन झाला व आम्हांपुढे नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण ठेवले म्हणूनच देवाने त्याला अत्युच्च केले.

शुभवर्तमान: मत्तय २६: १४- २७: ६६.
          सुरुवातीलाच आपण त्याचा शिष्य यहूदा तीस रुपयाला येशूला विकतो. म्हणतात ना, “दाम करी काम, वेड्या दाम करी काम, पैशाची जादू लई न्यारी तान्ह्या पोराला त्याची हाव.” येशूचा घात होतो. हीच मानवाच्या जीवनाची विसंगती आहे. पैशासाठी आपलेच आपल्या जीवावर उठतात याची प्रचिती आजच्या दुःखसहनात आपण अनुभवतो.

मनन चिंतन:
“जया अंगी मोठेपण तया यातना कठीण”
           ह्या अभंगाच्या ओवी प्रमाणे झावळ्यांचा रविवार आम्हांस बोध करतो. कारण धार्मिक, अध्यात्मिक, समाज सेवक, संतगन (रक्तसाक्षी), जीवनात नेहमीच वेदना, घात, एकाकीपणा अनुभवयास येतात. दुसरे एक भजन आहे, “कोणी नसे कुणाचा बंधू सखा न आपुला, येतात संकटे ही सोडीती सात  आपला. खोटे हे नाते सगळे बंधू सखा ना आपुला!”
           खरंच समाजात भली माणसं देवभिरू, पवित्र जेव्हा लोकांना सन्मार्गावर, देव राज्याच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतात, समाज सेवेचे नेतृत्व करतात तेव्हा प्रथमत: लोक त्याचा उदो-उदो करतात, जयजयकार करतात. पण जेव्हा तोच भला माणूस संकटात सापडतो, समाजातील वरिष्ठ, धर्मपंडित त्याचा धिक्कार करतात, बहिष्कृत करतात तेव्हा हेच त्याच्या जवळचे जिवलग कार्यकर्ते, लोक त्याला एकाकी पडतात, सोडून जातात. मग त्या भल्या माणसाला स्वतःच्या वेदना, क्लेश व विस्कटलेल्या समाजाला सामोरे जावे लागते कोणाला किंबहुना त्याचे मित्र, सहकारी, आप्तेष्ट कुणीच त्याला साथ देत नाहीत. असेच काही प्रभू येशूच्या बाबतीत घडले आहे, त्याच्या दुखामध्ये त्याला कोणीही सात दिली नाही, त्याला एकाकी पाडले.
           प्रत्येक वर्षी पवित्र आठवडा आपण झावळ्याच्या रविवारी सुरू करतो. प्रथम प्रभू येशूचा येरुसलेमच्या मंदिराच्या प्रवेशाचा जल्लोष करतो. येथे ख्रिस्त राजासारखा घोडा न निवडता गाढवावर बसून मंदिरात प्रवेश करतो; हाच प्रभू येशूचा नम्रपणा आहे. लोक त्याच्यापुढे पायघड्या टाकतात जैतून (ऑलीव) झाडाच्या फांद्या उंचावून त्याचा जल्लोष करतात. स्तुति सुमने उधळतात. खरच कुणाला कल्पना पण नव्हती की, हे जल्लोष करणारे काही क्षणातच पलटवार करतात व त्याच प्रभू येशूला क्रुसी खिळा म्हणून ओरडतात. हाच मानवी जीवनाचा विरोधाभास आहे. अगोदर लोक हार घालतात, नंतर प्रतिकार करतात. त्यांचा पाठिंबा हा मतलबी आणि क्षणिक होता. खरतर प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हा मानवांच्या पापांसाठी क्रूस स्विकारला, रक्त सांडले, असहाय्य फटके सहन केले.
          ह्या पवित्र आठवड्यात ख्रिस्ताचे दुःख मरण हयावर मनन करतो. आपणांस अंतरी वेदना होतात पण ह्यालाच जीवन असे नाव आहे. लोक आपणांस उंचावतात पुन्हा खाली पडतात. पण ख्रिस्त आम्हांस बोध करतो; ह्यालाच जीवन म्हणतात. त्रासानंतर आनंद व मरणानंतर पुनरुत्थान आहे. म्हणून जीवनात खचून जाऊ नका, जीवन जगण्यास शिका. प्रभू ख्रीस्ताबरोबर चालत रहा, त्याचा आदर्श घ्या, कारण तोच मार्ग, सत्य, आणि जीवन आहे (योहान १४:६). चला तर गाऊया,
“राहो में कांटे अगर हो, रुकना नही, चलते जाना....”

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ‘हे दयावंत पिता आमची प्रार्थना ऐकून घे.’
१. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारेपोप महाशयबिशप्सकार्डीनल्ससर्व धर्मगुरु व व्रतस्त जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत आहेतह्या सर्वाना परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा व त्यांनी देवाचे कार्य अखंडित चालू ठेऊन एक उत्तम जीवनाचा धडा लोकांपर्यंत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करुया.    
२.  जे लोक देऊळ मातेपासून दुरावलेले आहेत त्यांनी जगाची पापे दूर करणाऱ्या देवाच्या कोकराला ओळखावे व ख्रिस्ताच्या प्रकाशात त्यांचे मनपरिवर्तन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.  हा पवित्र आठवडा चांगल्या रीतीने व्यतीत करावा व येशूच्या दुःखसहनात सहभागी होऊन दुसऱ्यांना येश्याच्या जवळ बोलावून घ्यावे म्हणून प्रार्थना करूया.
४.  जे लोक दुःखीकष्टी व आजारी आहेत त्यांना प्रभूच्या स्पर्शाने चांगले आरोग्य लाभावे व त्यांचे जीवन सुखी व समाधानी बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आज आपण सर्व करोनाग्रस्त लोकांसाठी प्रार्थना करूया की, प्रभू येशूच्या दुखासहनाद्वारे ते बरे व्हावेत, व प्रभुने त्यांना स्पर्श करावा व त्यांना पूर्ण बरे करावे.   
५.  आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment