Reflections for the 15th Sunday in ordinary time (12/07/2020)
by
Br Brian Motheghar.
सामान्य
काळातील पंधरावा रविवार
दिनांक: १२/०७/२०२०
पहिले वाचन: यशया ५५:१०-११
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:१८-२३
शुभवर्तमान: मत्तय १३:१-२३
विषय: “ काही चांगल्या जमिनीत पडले, मग त्याचे कोठे शंभर पट,
कोठे साठ पट तर कोठे तीस पट असे पीक आले.”
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो, आजची उपासना
आपल्याला खरा ख्रिस्ती कोण? ह्याविषयी सांगत आहे. देवाचा
शब्द ऐकून तो आपल्या स्वतःच्या आचरणात आणतो व त्याद्वारे आपले जीवन प्रभू शब्दावर
उभारतो तो खरा ख्रिस्ती होय.
यशया ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपल्याला देवाचा शब्द
ह्याची तुलना पाऊस व बर्फ ह्या द्वारे करण्यात आली आहे. ज्याअर्थी पाऊस व बर्फ
जमिनीत पडून त्यातून पीक बाहेर काढते, त्याचअर्थी देवाचा
शब्द आपल्या जीवनात रुजून आपल्या जीवनातील खरा देवाचा अनुयायी कसा असतो ते दाखवून
देते. त्याचप्रमाणे दुसऱ्या वाचनात संत पौल रोमकरांस पत्र ह्यात सांगतो की,
देवाच्या शब्दाखातिर आपल्याला दुःख, क्लेश सोसावे लागतील. परंतू त्याच्यावर मात
करण्यासाठी व आपले सांत्वन करण्यासाठी पवित्र आत्म्याचे दान आपल्याला प्रदान करून
दिले आहे.
आजच्या शुभवर्तमानात
पेरणाऱ्याच्या दाखल्याद्वारे प्रभू येशू देवराज्याची घोषणा पहिल्यांदा दाखल्याद्वारे
करीत आहे असे आपल्याला दिसून येते. ज्याप्रमाणे सुपीक जमिनीवर बी पडते त्याचप्रमाणे
आपल्या जीवनातील खडकाळ, वाटेरी व काटेरी जागा साफ करण्यास व त्याजागी सुपीक जमीन
म्हणजेच; आपले जीवन प्रभू शब्दावर उभारण्यास देऊळ माता आपल्याला आवाहन करीत आहे.
म्हणून दैनंदिन जीवनात देव शब्दाला अग्रेसर स्थान देऊन, त्याच्यावर विश्वास ठेवून
आपल्या जीवनाद्वारे शंभरपट पीक उगवण्यास लागणारी कृपा आपण ह्या प्रभू विधीमध्ये
मागूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ५५:१०-११
या वाचनात
देवाच्या वचनाची तुलना पाऊस व बर्फ यांच्याबरोबर केलेली आहे. त्यांतून संथपणे, मूकपणे चाललेले कार्य सूचित होते. या कार्याने योग्य वेळी पृथ्वीचा चेहरा
मोहरा बदलला जातो. त्याचप्रमाणे देवाचे वचन हे त्याचे कार्य करण्यास आपणास योग्य वेळी
सामर्थ्य देत असते. या वाचनातून आपणास सांगण्यात येत आहे की, आपल्या विचारांपेक्षा देवाचे विचार अधिक सर्वत्र पोहोचणारे आणि अधिक समृध्द अर्थपूर्ण आहेत.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:१८-२३
या भागात पौलने
दुःख सोसणे आणि गौरव या विषयीचा उल्लेख केलेला आहे. ख्रिस्ती माणसाला या जगात
दुःखे सोसावी लागणार हे वास्तव पौलने स्पष्टपणे मांडले आहे. तथापि आमच्यामध्ये जे
गौरव प्रगट व्हायचे आहे त्यांच्या तुलनेत ही दुःखे, संकटे सर्व काही किरकोळ
आहे असे आपणास सांगण्यात आले आहे. तसेच पौल आपणास आठवण करून देत आहे की, आपणाला आत्मा हे प्रथमफळ मिळाले आहे आणि ह्या आत्म्याद्वारे आपणास ‘पुत्रपणाचा’ हक्क मिळालेला आहे.
शुभवर्तमान: मत्तय १३:१-२३
प्रभू येशू जी
सेवा करीत होता तिचे कोणते परिणाम होत होते हे दाखविण्यासाठी त्याने ‘पेरणाऱ्याचा
दाखला’ सांगितला. या दाखल्याद्वारे येशूने देवाच्या राज्याची
जाहीर घोषणा केली. या दाखल्यातील चार प्रसंग, दृष्या मधून प्रतिसाद मिळणे न मिळणे
हे संदेशावर नव्हे, तर श्रोत्यांच्या तत्पर ग्रहण शक्तीवरही अवलंबून आहे, असे सांगण्यात आले आहे.
चांगल्या जमिनीत
पडणारे बी उत्पादक होते. विरोध आणि अपुरा प्रतिसाद असला तरीही पिक येईल असे
आश्वासन येशूने यातून आपल्या शिष्यांना दिले आहे. पण चांगल्या जमिनीत देखील
उत्पादन क्षमता सर्वत्र सारखी नसते. त्यातही कमी अधिक फरक आहे. शंभरपट, साठपट आणि तीसपट पिक मिळते. म्हणजे शिष्य एकाच प्रवृत्तीचे नसतात.
देवाच्या राज्यामध्ये अतिसामान्यांना तसेच असामान्यांनाही स्थान आहे.
बोधकथा:
एकदा एक
श्रीमंत घराण्यातील बाई शहरातील एका संग्रहालयात प्रदर्शन पाहण्यास गेली असता
तिच्या निदर्शनास एक चित्र आले. तीने त्या संग्रहालयातील मार्गदर्शकाला विचारले की,
“बंधू हे चित्र काही आगळे-वेगळे आहे. त्या चित्रातील प्रतिमा ही थोडीशी उथळ व
उद्धट दिसण्यात येते!” त्यावर मार्गदर्शक त्या बाईला म्हणाला की, “मॅडम जे तुम्ही
चित्र म्हणून संबोधता तो प्रत्येक्षात आरसा आहे. व ती प्रतिमा तुमचीच आहे.”
मनन चिंतन:
होय माझ्या
प्रिय बंधु आणि भगिनींनो आपल्या जीवनात सुद्धा दाखला हा आरशा प्रमाणे काम करत असतो.
अर्थात आरशात ज्याप्रमाणे आपण आपली प्रतिमा शोधत असतो; त्याचप्रमाणे येशू
ख्रिस्ताने दिलेल्या दाखल्यात आपल्याला आपले स्वतःचे अंत:करण उघडकीस करण्यास मदत
मिळते. दाखला जो दोन हजार वर्षांपूर्वी सांगितला होता, तोच दाखला आज सुद्धा
आपल्याला आपल्या स्वतःचे अस्तित्व प्रस्थापित करते किंवा जशेच्या तशे दाखवून देत
असते.
आजच्या
उपासना विधीत ख्रिस्त सभा दाखल्याचा प्रारंभ पेरणाऱ्याचा दाखला ह्या द्वारे करत
आहे. हा दाखला आपण आपल्या दैनंदिन जीवनात कितीतरी वेळा ऐकला असेल किंवा वाचला असेल.
परंतू ह्या दाखल्याचा अर्थ आपल्याला प्रभू ख्रिस्ता मध्येच शोधता येतो. आज प्रभू
येशू ह्या दाखल्याद्वारे आपल्या समोर आपली चार प्रकारची वृत्ती किंवा चार प्रकारची
आपली देवशब्दाला दिलेली प्रतिक्रिया ह्या विषयी सांगत आहे. आपण आपल्या दैनंदिन
जीवनात प्रभू शब्दाला आपण प्रतिसाद कोणत्या प्रकारे देत असतो ह्याविषयी सांगण्यात
आले आहे. आपली चार प्रकारची वृत्ती ही चार प्रकारच्या जमिनीद्वारे आपल्याला व्यक्त
करण्यात आली आहे. चार प्रकारची प्रतिक्रिया ही चार प्रकारच्या जमिनीत पडलेल्या बी
प्रमाणे व त्यात झालेल्या बदलाव ह्या द्वारे दर्शविण्यात आली आहे.
जेव्हा आपण
प्रभू शब्द ऐकतो किंवा वाचत तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आपण ह्या चार
वृत्तीला बळी पडत असतो.
१) पहिली वृत्ती
किंवा प्रतिक्रिया ही वाटेवर पडलेल्या बी सारखी आहे. या वाटेवरची माती ही पाय
वाटेमुळे चालून-चालून ती टणक झालेली असते.
त्यामुळे त्याच्यावर पडलेले बी जमिनीच्या आत रुजत नाही किंवा ते जमिनीत मुरत नाही
त्यामुळे ते बी आकाशातील पाखरे येऊन खाऊन टाकतात. अशाच प्रकारे आपली वृत्ती असते
जेव्हा आपण आपल्या आनंदात असतो किंवा अतिशय दुःखात असतो तेव्हा आपण आपल्या
परमेश्वराचे अस्तित्व विसरून जातो. सैतान आपल्यावरती ताबा करून घेतो. उदाहरण द्यायचे
झाले तर आपण आजच्या वास्तविक परिस्थितीचे उदाहरण घेऊ शकतो. आपण घरात आहोत; पण घरात
आपण आपल्या देवाचा शब्द वाचतो का? की, आपण आपला देव चर्चमध्ये सोडून आलो आहोत?
घरात भांडण, तंटे, जिवाला घाबरून बसलो आहोत का? ह्या भांडण तंटे व भीतीमुळे
सैतानाने आपल्यावर किंवा आपल्या घरावर ताबा घेतला आहे का? ह्या महामारीच्या दिवसात
आपण देवाचा शब्द आपल्या जीवनात अंगीकारला आहे का? की, आता आपले मिस्साबालीदान नाही
म्हणून देवालापण आपण विसरून गेलो आहोत का? की आपण आपल्या घरात राहून आपल्या घराला
जिवंत चर्च किंवा जे चर्च आपण आहोत त्याचा अनुभव घेऊन आपल्या आजारी किंवा
कोरोनाच्या रोगाने ग्रासलेल्या बंधू भगिनींसाठी प्रार्थना केली आहे का? ह्या वेळेला
मला पहिल्या प्रकारची वृत्ती ही अशी की; कोणी एकाने विनोद केला पण तो कधीही कोणाला
समजला नाही. कारण त्यामध्ये खोली किंवा गंभीरता नव्हती. त्यामुळे आपल्या जीवनात
आपण संकटांना ओढून घेतले आहे का? आपला आपल्या देवावरील विश्वास हा पक्का आहे का? की, हा परीक आहे ते आपण आपल्या स्वतःला विचारणे गरजेचे आहे.
२) दुसऱ्या प्रकारची
वृत्ती ही खडकाळ जमिनीवर पडलेल्या बी सारखी आहे. ह्या प्रकारच्या वृत्तीत आपण देवशब्द
ऐकतो व तो थोड्याश्या मातीच्या थरामुळे त्याला अंकुर फुटतो; परंतु आपला विश्वास सखोल
नसल्या कारणामुळे त्या अंकुराचे रोपट्यात रुपांतर होत नाही. त्यामुळे ते उन्हामुळे
वाळून जाते. आपली सुद्धा अशीच वृत्ती व त्याच्यावर प्रतिक्रिया असते; जेव्हा
देवाची गरज असते तेव्हा कान उघडे करून त्याचे शब्द ऐकतो, परंतु जेव्हा गरज संपली
की; मी भला आणि माझं भल अशी वृत्ती असते. कारण आपण देव शब्दाच्या गाभाऱ्यात जाऊन
त्याच्या संदेशाचा अर्थ समजून घेत नाहीत. अर्थात कोठे एक प्रकारची नवीन चळवळ चालू
झाली की; त्याला एकदम उत्साहाने प्रतिसाद देतो. परंतू, तीच चळवळ कालांतराने
संपुष्टात येते. कारण, ती चळवळ अवघड झालेली असते. त्याच्यातले महत्व कमी-कमी होऊन
ते संपुष्टात येते. का? कारण, मला हाल-अपेष्टांना सामोरे जाण्यास भीती वाटते किंवा
मी त्यासाठी तयार नसतो किंवा नसते. कारण आपली समज इतक्यातच येऊन राहते की; मीच का सोसून
घेऊ? मीच का माझा जीव धोक्यात टाकू? असे अनेक प्रश्न आपल्यामध्ये उद्भवतात.
३) तिसरी वृत्ती व
प्रतिक्रिया ही अशाप्रकारे आहे की; आपण समाजात काही भलं करायला जातो परंतू, लोक
काय म्हणतील? ह्याचा विचार व चिंता आपल्या मनात घर करून बसतात. आपण आपल्या मधील
असलेल्या त्या नावीन्याच्या विकृतीला तिलांजली देतो. कारण, आपली वृत्ती ही मी करू
शकतो किंवा शकते वरून मी नाही करू शकत वर येऊन थांबते.
४) चौथी आणि सर्वात
महत्त्वाची वृत्ती व प्रतिक्रिया ही सुपीक जमिनी प्रमाणे आहे. कारण, याच्यातील
दगड-धोंडे, गवत, काटे इत्यादी बाजूला सारून ह्या मातीची चांगल्या प्रकारे मशागत
केलेली असते. म्हणजेच आपल्या आत मधील असलेल्या विचारांना व ऐकलेल्या देवशब्दाला
विश्वासाचा समर्थन किंवा आधार मिळालेला असतो. म्हणजेच आपण ऐकलेल्या देवशब्दाचा अर्थ
समजून घेऊन जीवनात काहीतरी धाडसीने करण्यास तयार असतो. कारण, आपल्याला माहीत
असते की; शेवटी विजय आपलाच आहे. म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो की; “तुमची सत्कर्मे
पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे.” (मत्तय ५:१६) त्यामुळे त्या
व्यक्तीचे मोळ फार मोलाचे असते. त्याच्याद्वारे देवराज्यासाठी पीक हे शंभरपट, साठपट,
आणि तीसपट ह्या दरम्यात उत्पन्न होते. हे फक्त शक्य आहे; जेव्हा आपण देवशब्द
आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात कोरून ठेवतो व त्याद्वारे आपण आपल्या मनात असलेल्या
दुसऱ्या विषयीचा गैरसमज दूर करतो, दुसऱ्याविषयीचा संशय दूर होतो, मोह, राग,
नकारात्मक विचार आपल्यापासून दूर करतो तेव्हा. हे सर्वकाही शक्य होते जेव्हा आपण देवशब्दाला
प्राधान्य देत असतो तेव्हाच.
अशाप्रकारे
प्रत्येक प्रकारची जमीन ही आपल्याला आपल्या जीवनातील आपली वृत्ती व त्याच्यावर
आपली प्रतिक्रिया काय असते हे दर्शवून देते. ज्याप्रमाणे आरसा आपल्याला आपली
प्रतिमा जशीच्या-तशी दाखवते; त्याचप्रमाणे हा दाखला सुद्धा आपल्या जीवनातील आपली
खरी प्रभूवरील श्रद्धा व खरा ख्रिस्ताचा अनुयायी कसा असतो हे स्पष्टपणे दर्शवते.
बहुतेक वेळा
आपण जमिनीवर लक्ष देतो व पेरणाऱ्याला विसरून जातो. ‘बी’ चे महत्व हे पेरणाऱ्या विना
अपुरे असते. पेरणारा हा देव आहे. परंतू त्याची वृत्ती ही मानव वृत्ती पलीकडे आहे.
वास्तविकता मानव हा फक्त सुपीक जमिनीत बी पेरणार. कारण, त्याला ठाउक आहे की;
आपल्याला पीक हे फक्त सुपीक जमिनीत भेटणार आहे. परंतू, देवाचे ज्ञान हे आपल्या
ज्ञानापेक्षा आगळे-वेगळे आहे. म्हणूनच तर, यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात परमेश्वर
म्हणतो, “कारण माझ्या कल्पना तुझ्या कल्पना नव्हेत, माझे मार्ग तुझे मार्ग नव्हेत.”
(यशया ५५:८) पेरणारा परमेश्वर हा उदार, निस्वार्थी, विपुल प्रमाणात देणारा आहे.
कारण, त्याची अपेक्षा एवढीच नसते की, ‘मी टाकलेल्या प्रत्येक जमिनीतून फक्त सुपीक
जमिनीतून पिक यावे.’ उलट त्याची अशी इच्छा आहे की, ‘मी टाकलेल्या प्रत्येक
जमिनीतून एकतरी रोपटे आले तर त्याच्यात त्याचा फार मोठा आनंद आहे.’ म्हणजेच त्याच्या
शब्दाद्वारे कोणा एकाचेतरी मनपरिवर्तन झाले म्हणजेच कोणी एक आपल्या वाईट वृत्ती
पासून वळून त्याच्याकडे वळले तर, देव राज्यात खूप मोठा आनंद उत्सव साजरा केला जातो.(लुक
१५:७, १०) अश्या प्रकारे आपल्या देवाची आगळी-वेगळी वृत्ती आपल्याला विचारसरणी
पलीकडे आहे. अश्याच प्रकारची वृत्ती आपल्यात सुद्धा निर्माण व्हावी व आपल्या परीने
शंभरपट, साठपट, आणि तीसपट पीक देण्याचा प्रयत्न करूया. आपण ज्या परिस्थितीत, ज्या
ठिकाणी आहोत; तिथे देवाची बाग ही पिकाने म्हणजेच आपल्या सत्कृत्याने भरभरीत
करण्यास पवित्र आत्म्याचे सामर्थ आपल्याला लाभावे म्हणून प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना:
प्रतिसाद:
“हे प्रभू तुझे राज्य ह्या जगात प्रस्थापित करण्यास व विपुल
प्रमाणात पिक आणण्यास आम्हांला सामर्थ कर.”
१. आज आपण आपल्या ख्रिस्त सभेसाठी
प्रार्थना करूया की, ह्या कोरोना विषाणूच्या वेळी आपण चर्चला
जात नाही. परंतु, देवाच्या अधिक समीप आहोत. देवाने आपले
परमगुरु फ्रान्सिस, कार्डिनल्स, महागुरू,
धर्मगुरू, तसेच सर्व श्रद्धावंतांना
आशीर्वादित करून, सुखी-समाधानी व नीरोगी ठेवावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण आपल्या वैद्यकीय क्षेत्रात
कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, व इतर सेवक
सेविका ह्यांनी आपले जीव धोक्यात घालून रोग्यांची सेवा करत आहेत. त्यांना
परमेश्वराचा विपुल असा आशीर्वाद व त्यांच्या कुटुंबीयांवर सुद्धा यावा, तसेच सर्व धोक्यांपासून त्यांचे संरक्षण व्हावे, म्हणून
आपण प्रार्थना करूया.
३. आपण आपल्या सार्वजनिक हितासाठी कार्य
करणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करुया की, विशेष म्हणजे पोलीस
अधिकारी, साफसफाई करणारे कामगार, रोजचा
आहार पुरवणारे सेवक-सेविका, इत्यादी ह्यांना परमेश्वर सदोदित
त्यांच्या बरोबर राहू दे, त्याचप्रमाणे आम्ही सर्वांनी
त्यांना सहकार्य करावे, उदार हस्ते मदत करण्याची सुबुद्धी
आम्हाला प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपण आपल्या राजकीय पुढाऱ्यांसाठी
प्रार्थना करूया की, या अडचणीच्या काळात विशेष म्हणजे कोरोना
सारख्या महामारीच्या काळात महत्त्वाचे निर्णय घेऊन लोकांचे संगोपन केले जावे,
गोरगरिबांना आसरा दिला जावा, व त्यांना आणि
त्यांच्या कुटुंबियांना सदोदित तुझ्या प्रेमाच्या मायेखाली ठेवावे म्हणून आपण
प्रार्थना करूया.
५. हे प्रभू आम्ही सर्वजण महामारीत
अडकलेले आहोत. आमच्या मनात अनेक शंका-कुशंका निर्माण होतात. आमच्या विश्वासाला तडा
जाण्याची शंका नाकारता येत नाही. तुझ्या अधिकाधिक जवळ येऊन तुझ्यावरच आमची श्रद्धा
वाढव हा वरदहस्त आम्ही तुझ्याकडे मागतो म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या
सामाजिक, कौटुंबिक आणि व्ययक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment