Wednesday, 1 July 2020


 Reflections for the 14th Sunday in ordinary time (05/07/2020) by Br Suhas Ferrel.





सामान्य काळातील चौदावा रविवार

दिनांक: ०५/०७/२०२०
पहिले वाचन: जखऱ्या ९: ९-१०
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:९-११, १३
शुभ वर्तमान: मत्तय:११:२५-३०






माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन

प्रस्तावना:
          ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज देऊळ माता सामान्य काळातील चौदावा रविवार साजरा करीत असताना आपल्या सर्वांना नम्रता धारण करण्याचा उपदेश करत आहे. सुख्या कारवीसारखा गर्वाने फुगून उभा राहण्यापेक्षा, कोवळ्या बांबू सारखा नम्रतेने वागण्यास आज देऊळ माता आपणा सर्वांना उपदेश करत आहे
          आपला परमेश्वर जो स्वर्गामध्ये आहे, तो अत्यंत दयाळू व सौम्य आहे. त्याची कृपा आपल्या सर्वांवर नेहमी असते. त्याच्या अनंत कृपेमुळेच त्याने आपला एकुलता एक पुत्र ह्या जगामध्ये पाठविला. प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्या सर्वांच्या तारणासाठी या पृथ्वीवर अवतरला, तो अतिशय नम्र आणि लीन स्वभावाचा होता. देवाचा पुत्र असूनही, त्याने आपल्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे पृथ्वीवर मानवाचे रूप धारण केले आणि आपले संपूर्ण जीवन नम्रपणे आपल्या पित्याच्या आज्ञेमध्ये घालविले. आजच्या शुभवर्तमनात प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वर्गीय पित्याला धन्यवाद देत आपणा सर्वांना लहान बालकाप्रमाणे नम्र होण्यास आमंत्रण देत आहे.
          आपल्या सर्वांना लहान बालकाप्रमाणे नम्र होण्यासाठी, तसेच इतरांवर प्रेम करण्यासाठी विशेष कृपा लाभावी म्हणून ह्या मिसा बलिदानामध्ये प्रार्थना करूया.

पहिले वाचन: जखऱ्या ९: ९-१०
          आजच्या पहिल्या वाचनामध्ये संदेष्टा जखऱ्या जीवनाच्या भावी राज्याविषयी भाकित करीत आहे. सियोनाचा राजा हा मोठ्या हत्ती घोड्यावर नाही, तर गाढवावर बसून नम्रपणे पदार्पण करील. गाढव या प्राण्याविषयी पाहिलं तर त्याचा उपयोग ओझे वाहण्यासाठी केला जातो. त्याला कितीही ओझे लादले तरी नम्रपणे तो वाहत असतो. पूर्वीच्या काळी घोडे रथ तसेच इंद्रधनुष्य इत्यादी गोष्टी युद्धासाठी महत्त्वाच्या मानल्या जात होत्या, परंतु आपला येणारा राजा हा त्या सर्व गोष्टी नष्ट करील व राष्ट्रांमध्ये शांती प्रस्थापित करील.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:९-११, १३
          आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल, रोमकरांस लिहिलेल्या पत्रामध्ये परमेश्वराकडून मिळालेल्या पवित्र आत्म्याचे महत्व पटवून देत आहे. आपले शरीर हे पापामुळे मेले, तरीसुद्धा आपला आत्मा हा नीतिमत्वामुळे जिवंत राहतो. त्यामुळेच आपण आपल्या मिळालेल्या आत्म्याद्वारे नेहमी नितीमत्वाने जीवन जगले पाहिजे.

शुभवर्तमान: मत्तय:११:२५-३०
          आजच्या शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांना त्याच्याकडे बोलावीत आहे, “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.” आपल्या स्वर्गातील पित्याला धन्यवाद देत असताना, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याचे आभार मानत आहे. कारण त्याचे महान रहस्य त्यांनी बालकांना प्रकट केले आहे. कारण जर आपण लहान बालकाप्रमाणे वागलो नाही, तर आपणाला स्वर्ग राज्यात प्रवेश मिळणार नाही. 
          आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची दुःख, कष्ट अडीअडचणी येत असतात. प्रत्येकाची दुःख, समस्या हया वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. प्रत्येकाला वाटत असते की माझेच दुःख सर्वात मोठे आणि दुसऱ्यांची दुःख म्हणजे काहीच नाही. त्यामुळेच अनेकदा आपण आपल्या दुःखाचा डोंगर करून इतरांसमोर व्यक्त करत असतो. प्रात्यक्षिक रित्या पाहिलं, तर आज समाजातील प्रत्येक जण दुःखाने त्रासलेला आहे आणि प्रत्येक जण आपापल्या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. या दुःखातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांमध्ये बऱ्याचदा आपण देवापासून दूर जात असतो. बऱ्याचदा आपल्याला देवाचा विसर पडतो. आपण विसरत असतो, की दुःख, वेदना हया माणसाला आत्मिक व शारीरिकरीत्या मजबूत बनवण्यासाठी असतात. माणसाच्या जीवनामध्ये एखादे दुःख किंवा त्रास नसल्यास त्याचे जीवन हे अर्थहीन राहते. ज्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये वेंटिलेटरच्या रेषा ह्या खाली असताना माणसाच्या हृदयाची हालचाल कळत असते, अगदी त्याचप्रमाणे जीवनामध्ये सुखदुः खाची चढ-उतार असली म्हणजे माणूस जगतोय असे होय. 
          आपल्याला जेव्हा शरीराची इजा किंवा आजार होतो तेव्हा आपण वैद्याकडे धाव घेतो. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या आत्म्याला इजा होते तेव्हा आपण स्वर्गीय पित्याकडे धाव घेतली पाहिजे. कारण वैद्यचा वैद्य आणि डॉक्टरांचा डॉक्टर तोच आहे. आपल्या प्रत्येक दुःखामध्ये आपण देवाचा धावा केला पाहिजे कारण आपल्याला दुःखामध्ये तोच बळकट करत असतो. त्याच्याद्वारे आपण प्रत्येक दुःखावर मात करू शकतो. म्हणूनच आजच्या शुभवर्तमानमध्ये प्रभू येशू सांगत आहे, “अहो कष्ट व भारक्रांत जनहो, तुम्ही माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा दिइन.”

बोधकथा:
          एकदा एका रानामध्ये गवत आणि झेंडू चे झाड आजूबाजूला होते. गवत हे जमिनीवर पसरत पसरत वाढत होते, तर झेंडू उंच उंच. एक दिवस झेंडूच्या झाडाने गवताला म्हटले, “माझ्याकडे बघ मी कसा उंच वाढत आहे आणि तू बिनकामाचा नुसता जमिनीला धरून चिकटून वाढतोय. जीवनामध्ये माझ्यासारखा मोठा हो, नाहीतर दुसऱ्यांच्या पायाखाली तुडवण्याखेरीज काहीच कामाचा राहणार नाही. त्यावर गवताने काही न म्हणता चुपचाप राहण्यातच समजुतगिरी दाखवली. काही दिवसानंतर रानामध्ये सोसाट्याचा वारा सुटला आणि झेंडूचे झाड लागलीच खाली पडले, परंतु  गवताला कसलाही फरक पडला नाही. कारण ते जमिनीला धरून होते. थोड्याच वेळात झेंडूचे झाड उचलुन कचरा पेटीमध्ये फेकण्यात आले. कारण त्याने जमिनीवर विसंबून न राहता आकाशाला झेप घेण्याचे ठरविले होते, याउलट गवताने जमिनीवर विसावा घेतला होता. गवत हे लहान बालका प्रमाणे नम्र होते, त्यामुळे वादळ वाऱ्यामध्येही देवाची कृपा त्याच्यावर होती.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद हे प्रभू आम्हाला लहान बालकाप्रमाणे नम्र बनव.

१. आपल्या ख्रिस्तसभेचे पोप महाशय फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करत आहेत, त्यांना प्रभूचा आशीर्वाद मिळावा व त्यांनी परमेश्वराची सेवा खऱ्या अंतःकरणाने करून प्रभूची साक्ष संपूर्ण जगाला दयावी म्हणून आपण प्रार्थना करुया.

२. आपल्या देशात, समाजात अनेक लोक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजा ऐवजी स्वतःच्या स्वार्थास महत्व देत आहेत. त्यांना या स्वार्थी वृत्ती पासून दूर राहण्यास व समाज कल्याणाचा विचार करण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आपल्या धर्मग्रामात जे लोक वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले आहेत तसेच जगभरात अनेक लोक करोना व्हायरसने बाधित झालेले आहेत, अशा सर्वांना ह्या रोगापासून मुक्तता मिळावी त्यांना पुनरुत्थित प्रभू परमेश्वराच्या कृपेचा स्पर्श व्हावा आणि नवीन जीवनाची वाट त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. आपणास ह्या वर्षी चांगला पाउस मिळावा व आपल्या प्राथमिक गरजा भागवल्या जाव्यात म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.

५. थोडा वेळ शांत राहून आपल्या व्यक्तीक आणि सामाजिक गरजा ख्रिस्ता समोर मांडूया.   




No comments:

Post a Comment