Friday, 24 July 2020

Reflections for the 17th Sunday in Ordinary Time (26/07/2020) by Br Aaron Lobo





सामान्य काळातील सतरावा रविवार

दिनांक: २६/०७/२०२०
पहिले वाचन: १ राजे ३:५, ७-१
दुसरे वाचन: रोमकरां२स पत्र ८:२८-३०
शुभवर्तमान: मत्तय १३:४४-५२





स्वर्गाचे राज्य: जीवनातील खरी संपत्ती

प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील सतरावा रविवार साजरा करीत आहोत आजची उपासना जीवनाची खरी संपत्ती काय आहे? आणि ती मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे, ह्या विषयावर मनन चिंतन करण्यास बोलावत आहे.
पहिल्या वाचनात, शलमोन इतर गोष्टी पेक्षा, दैवी ज्ञानाला महत्त्व देतो आणि ती देवाने त्याला द्यावी अशी याचना करतो. त्याची प्रार्थना ऐकून देव प्रसन्न होतो आणि दैवी ज्ञानासोबत इतर संपत्तीसुद्धा त्याला बहाल करतो. दुसऱ्या वाचनात देव आपणा सर्वांना त्याच्या योजनेनुसार एक नवा जन्म घेण्यास आमंत्रण देत आहे. त्याच्या इच्छेनुसार चालल्यानेच आपल्याला खऱ्या गौरवाचा अनुभव प्राप्त होईल. आजच्या शुभवर्तमानात स्वर्ग राज्याविषयी येशू ख्रिस्त आपल्याला तीन दाखले सांगतो व जाहीर करतो की, स्वर्ग राज्य म्हणजे देवाच्या इच्छेनुसार चालणे हीच खरी संपत्ती आहे, तसेच ती प्राप्त करण्यास आपण काय केले पाहिजे हे सुद्धा स्पष्ट करून देतो.
हया मिसा बलिदानात भाग घेत असताना आपण देवाकडे त्याच्या इच्छेप्रमाणे चालण्यास तसेच जी योजना त्याने आपल्यासाठी ठरवली आहे, ती संपन्न व्हावी म्हणजेच स्वर्गाचे राज्य आपणास प्राप्त व्हावे, म्हणून देवाची विशेष कृपा आपणास लाभावी म्हणून आजच्या मिसा बलिदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: १ राजे ३:५, ७-१
इस्रायल देशाचा राजा असे नेमून आल्यावर, शलमोन आपला बाप दावीद याच्या पावलावर देवाच्या अनुशासनाप्रमाणे आणि धर्मशास्त्रानुसार चालण्याचा प्रयत्न करतो. राज्यकारभार सांभाळण्यासाठी संपत्ती किंवा स्वतःचे बळ किंवा बुद्धी याची नव्हे, तर देवाची कृपा त्याची दैविक बुद्धी याच्यावर अवलंबून राहण्याची गरज आहे, असे देवा समोर तो जाहीर करतो व ते त्याला मिळवुन देण्यास याचना करतो. प्रसन्न होऊन देव त्याला बुद्धी तर देतोच, पण त्याही पेक्षा संपत्ती आणि यशस्वी राजा बनण्याचे आशिष देतो.

दुसरे वाचन: रोमकरां२स पत्र ८:२८-३०
देवाने आपल्या योजनेनुसार, प्रत्येक विश्वासणऱ्याला म्हणजेच नवजन्म पावलेल्या व्यक्तीला बोलाविले आहे. आपल्यावर कठीण परिस्थिती येत राहतात, परंतु या सर्वांवर देवाचे नियंत्रण आहे; व तो कार्य करीत असतो. अशा प्रकारे देव त्याच्या योजना आपणा प्रत्येकाच्या जीवनात पूर्ण करीत असतो.

शुभवर्तमान: मत्तय १३:४४-५२
स्वर्गाचे राज्य काय आहे आणि त्याचे काय महत्त्व आहे हे आपल्याला देव तीन दाखल्याद्वारे स्पष्ट करून देतो. स्वर्गाचे राज्य हीच खरी संपत्ती आहे आणि ती प्राप्त करण्यासाठी सर्वकाही त्यागून देण्याची आपली तयारी असली पाहिजे.

बोधकथा:  
एका गावात एक श्रीमंत असा शेतकरी राहत होता. त्याची स्वतःची खूप मोठी शेती होती. तसेच फुलांचे फळांचे इत्यादी निरनिराळ्या प्रकारची झाडांच्या बागासुद्धा होत्या. आणि अशाप्रकारे हा शेतकरी आपल्या जीवनात असलेल्या संपत्तीमुळे खूप संतुष्ट होता.
एके दिवशी एक परराष्ट्रीय व्यक्ती त्या गावात येते, आणि त्याची भेट या शेतकऱ्याशी होते. बोलता-बोलता ती व्यक्ती त्या शेतकऱ्याला त्याच्या प्रवासाचे कारण सांगतो. हा मनुष्य हिर्‍यांच्या खाणीच्या शोधात निघाला होता. हिऱ्यांची काय किंमत आहे आणि ती सापडल्यावर माणूस कसा श्रीमंत होणार हे त्या परराष्ट्रीय व्यक्तीने ह्या शेतकऱ्यास सांगितले.
त्या माणसाचे बोलणे ऐकून शेतकरी सुद्धा विचार करायला लागतो काही क्षणा पूर्वी तो संतुष्ट होता, मात्र आता त्याच्या मनात चलबिचल आणि अस्वस्थपणा अनुभवायला सुरुवात होते. त्याची अधिक श्रीमंत होण्याच्या ह्या कल्पनेने तो शेतकरी आपली जमीन व शेत विकतो आणि हिऱ्याच्या शोधात निघून जातो. हिऱ्याच्याशोधात तो सगळे जग फिरतो परंतु त्याला हिरे सापडत नाहीत आणि शेवटी निराश होऊन आत्महत्या करतो.
काही दिवसानंतर ज्या व्यक्तीने त्या शेतकऱ्याकडून ती जमीन विकत घेतली होती, तो त्याच्या बगीच्यामध्ये असलेल्या एका छोट्याशा झऱ्याचे पाणी पिण्यास जातो. पाणी पीत असताना, त्याची नजर त्या झऱ्यात असलेल्या एका चमकदार धातूवर पडते. ते तो उचलतो आणि त्याला समजून येते की हा दगड काही साधारण दगड नव्हे, तर एक शुद्ध हिरा आहे. तसेच ज्या जमिनीवर तो उभा आहे, ती साधारण जमीन नसून त्या देशातील एक सर्वात मोठी हिऱ्याची खाण आहे. जर त्या शेतकऱ्यांने आपल्या स्वतःच्या जमिनीची मशागत केली असती, तर त्याला परदेशातून न जाता, स्वतःच्या देशात, स्व: भूमीवर अनंत व अपार संपत्ती सापडली असती.

मनन चिंतन:
खजिना म्हटल्यावर सोने, हिरे, मोती अशा निरनिराळ्या मौल्यवान वस्तूंची चित्र आपल्या मनात येतात. एखादी अधिक मूल्यवान असलेली वस्तू जी साधारणपणे आपल्याला आपल्या जीवनात भेटत नसते, अशा वस्तूंना आपण खजिना असे संबोधत असतो.
आजच्या शुभवर्तमानात सुद्धा प्रभू येशू, आपल्याला खजिनाच्या संदर्भात तीन दाखले सांगतो: पहिला दाखला एका शेतात लपवलेल्या खजिन्याबद्दल आहे, ज्या व्यक्तीला योगायोगाने किंवा अकस्मात ही संपत्ती सापडते, त्ती संपत्ती घेण्यासाठी तो मनुष्य आपली संपूर्ण संपत्ती विकतो आणि त्या पैशाने तो खजिना विकत घेतो. दुसऱ्या दाखल्यात येशू एका व्यापाऱ्याचे वर्णन करतो, जो आपले संपूर्ण आयुष्य सर्वात मौल्यवान मोती शोधण्याच्या शोधात खर्च करतो आणि जेव्हा त्याला तो मोती सापडतो, तेव्हा आपले सर्वस्व विकून त्या पैशाने तो मोती विकत घेतो. तिसऱ्या दाखल्यात प्रभू येशू स्वर्ग राज्याची तुलना किंवा स्वर्गाच्या राज्यातील लोकांची तुलना, एका जाळ्यात सापडलेल्या निरनिराळ्या मासळी बरोबर करतो. चांगली मासळी व वाईट मासळीचे विलगीकरण करून, चांगली मासळी ठेवण्यात येते व नको असलेली मासळी फेकून देण्यात येते.
अशा ह्या तीन दाखल्याद्वारे  येशू आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो, पहिले दोन दाखले आपल्यासमोर स्वर्गराज्याची खरी किंमत किंवा त्याचे खरे महत्त्व काय आहे हे दर्शवत आहे. शेतात लपविलेल्या खजिना अथवा तो अमूल्य मोती, हे दोन्ही स्वर्ग राज्याची प्रतिमात्मक चिन्ह आहेत. ज्याप्रमाणे खजिना शेतात लपविलेला आहे, त्याचप्रमाणे स्वर्गाचे राज्य सुद्धा ह्या जगात लपविलेले आहे, ते शोधण्यास मेहनत करावी लागते. ज्याप्रमाणे खजिना शोधणाऱ्याला खजिना सापडतो, त्याचप्रमाणे सत्य, दैवीक बुद्धी इत्यादी. दैविक देणग्या आपल्याला प्राप्त होत असतात.
जीवनाची  खरी संपत्ती ही पैसा, सोने, हिरे किंवा अन्य वस्तूमध्ये नसून, देवाच्या योजनेप्रमाणे जगण्यात आहे. जी त्याची इच्छा आहे, ती आपल्या जीवनात आपण जगळी पाहिजे. आर्थिक संपत्ती किंवा भौतिक संपत्ती आज आहे, पण उद्या नसणार; परंतु स्वर्ग राज्याची संपत्ती देवाने आपल्या सर्वांसाठी ठेवली आहे ती कधीही संपणार नाही
हे स्वर्गाचे राज्य, ज्याबद्दल प्रभू येशू आपणास सांगत आहे, ते आपल्या दैनंदिन जीवनात, दररोजच्या घडामोडीत सापडत असते. ते शोधण्यासाठी आपणास इतर कुठेही जाण्याची गरज नाही, गरज आहे ती फक्त डोळे उघडून पाहण्याची, अवती-भवती नजर फिरवण्याची.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.
१) ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे पोप फ्रान्सीस, कार्डिनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स, ब्रदर्स व इतर प्रापंचिक या सर्वांवर देवाचा विशेष आर्शिवाद यावा व त्यांना त्यांच्या या पवित्र कार्यात प्रभूचे मार्गदर्शन व कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) आपल्या देशात नेहमी शांती नांदत राहावी, द्वेष-मत्सर दूर व्हावा, सर्वांना समानतेचा हक्क व वागणूक मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) जगभरात अनेक लोक कोरोना व्हायरसने बाधित झालेले आहेतअशा सर्वांना परमेश्वराचा स्पर्श होऊन त्यांची ह्या रोगापासून मुक्तता व्हावी तसेच डॉक्टर्स, नर्सेस ज्या निस्वार्थी वृत्तीने ह्या रुग्णाची सेवा करतात त्यांना ही तुझा भरपूर आशीर्वाद लाभावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) युवकांना नोक-या मिळाव्यात, गरजवतांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, आजा-यांचा आजार दूर व्हावा, भटकलेल्यांना मार्ग सापडावा, व्यसनाधीन झालेल्यांची व्यसनातून मुक्कता व्हावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) यंदाच्या वर्षात भरपूर पाऊस मिळावा, शेतक-यांच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात व सर्वांनी शांतीने, प्रेमाने रहावे, म्हणून आपण प्रार्थना करूया. 

६) थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिककौटुंबिक व वयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.

No comments:

Post a Comment