Friday, 7 August 2020


Reflections for the 19th Sunday in Ordinary Time (09/08/2020) by Fr. Wilson D’Souza




सामान्य काळातील एकोणिसावा रविवार

 

दिनांक: ०९/०८/२०२०

पहिले वाचन: १ राजे १९:९, ११-१३

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ९:१-५

शुभवर्तमान: मत्तय १४:२२-३३

 




देवाचा अनुभव

 

प्रस्तावना:

          आज आपण सामान्य काळातील एकोणिसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना ‘देवाच्या अनुभवाविषयी’ आपल्याला सांगत आहे. मानवाची निर्मिती करण्यामागे देवाचा एक विशेष हेतू होता; तो म्हणजे ‘मानवाने मानवाशी मानवा सम राहावे.’ ते करण्यासाठी साक्षात देवाच्या अनुभवाची गरज आहे. आजच्या देव स्तुतीत व देव शब्दाद्वारे आपल्याला तो अनुभव बहाल केला जात आहे. देवाचा आवाज ऐकण्यासाठी, त्याचा अनुभव घेण्यासाठी आपली अंतःकरणे तयार करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या पापांची आठवण करूया व देवाजवळ ख्रिस्ताद्वारे क्षमा याचना करूया.

 सम्यक विवरण:

पहिले वाचन: १ राजे १९:९, ११-१३

          साधू, संत, धार्मिक जन आपलं आयुष्य एकांतात घालवत असतात. देवाचा अनुभव घेण्यासाठी ते डोंगरावर, गुहेत एकांतात राहतात. एलिया संदेष्टाला परमेश्वराचा अनुभव गुहेत एकांतात झाला. परमेश्वराचा अनुभव त्याला मंद वाणीतून झाला आणि त्याने आपले मुख झग्याने झाकून घेतले. एलिया संदेष्टासारखा आपल्याला परमेश्वराचा अनुभव देव शब्दाद्वारे यावा म्हणून मनन चिंतनाने पहिले वाचन ऐकुया.

 दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ९:१-५

          देवाचा अनुभव प्रत्येकाला येत असतो. कारण ती देवाची देणगी आहे. परंतु, मानव त्या अनुभवास अपात्र ठरत असतो. त्याच कारण म्हणजे जगिक व ऐहिक सुखाकडे वाटचाल आनी ह्या गोष्टी आपल्याला ख्रिस्तापासून विभक्त करत असतात. कधी कधी आपले आप्तेष्टे, नातेवाईक आणि कुटुंब ह्याच्या वरील प्रेमामुळे आपण ख्रिस्ताच्या प्रेमापासून, सानिध्यापासून विभक्त होऊ शकतो, असे संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनात आपणांस सांगत आहे.

 शुभवर्तमान: मत्तय १४:२२-३३

पाच भाकऱ्या व दोन मासे ह्या चमत्काराने येशूने पाच हजार लोकांना तृप्त केले. लोकांचा निरोप घेऊन देवाशी संपूर्ण रात्र संवाद साधल्या नंतर देवानुभव घेतलेला येशू पाण्यावर चालून आपल्या शिष्याकडे येतो. येशू अशक्य व आजपर्यंत न झालेली गोष्ट करतो, त्यामुळे शिष्य भयभीत होतात; परंतु येशू त्यांना आश्वासन देतो, “भिऊ नका, धीर धरा, मी आहे.” येशू देव आहे व त्याचे समुद्रावर व पाण्यावर साम्राज्य आहे असे आपणांस सांगण्यात आलेले आहे. ज्यांना देवाचा अनुभव नसतो त्यांना पेत्रासारखा भ्याल्याचा ब बुडण्याचा अनुभव येत असतो, “प्रभुजी, आम्हाला वाचवा आणि आमचा विश्वास वाढवा.”

 बोधकथा:

ईश्वराशी आपण एकरूप झालो तर, ईश्वरही आपली मनापासून काळजी घेतो. साधू-संत ईश्वर भक्तीत प्रसिद्ध असतात. ते मनोभावे ईश्वराचे स्मरण करतात, प्राणीमात्रांना ईश्वर निर्मिती मानून त्यांची सेवा करतात. एकदा संत राबियाच्या घरी चोर घुसला, धन तर सापड;लेच नाही; पण दुसराच अनुभव चोराला आला. त्याला घरात एक चादर दिसली व ती घेवून लापता होण्याचा त्याने विचार केला. चादर घेऊन तो जात असताना त्याला एकाएकी चक्कर आली, डोळ्यांना अंधारी आली. डोळे चोळून पाहण्याचा प्रयत्न देखील केला, पण काय फायदा झाला नाही. 

ज्या वेळेला तो चादर आणण्यचा प्रयत्न करी, तेव्हा त्याला वाईट अनुभव येत असे. चादर खाली ठेवली की त्याला बरं वाटत असे. तो हैराण झाला आणि त्यांनी मंद वाणी ऐकली: “तू स्वतःला का अडचणीत टाकत आहेस. माझ्यामध्ये केवळ स्वतःच अस्तित्व नाही, तर ईश्वराचही. जेव्हा मी झोपतो तेव्हा तो जागा असतो.” चोराने तेथे निद्रिस्त असलेल्या संत राबियाचे चरण स्पर्श करून दर्शन घेतले व ती चादर तेथेच टाकून निघून गेला. 

मनन चिंतन:

देवाच्या दर्शनाला आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी गुहेत आणि पर्वताकडे गेलेला एलिया ह्याला परमेश्वराचा अनुभव आला. देवाचा अनुभव सोसाट्याच्या वाऱ्यात, भूमीकंपात, अग्नीत झाला नसून, मंद व शांत वाणीत झाला. आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचे एक ध्येय आहे आणि ते म्हणजेदेवाशी संवाद, त्याचा अनुभव व वाणी ऐकणे हा असतो आणि हे आपल्या दैनंदिन जीवनात घडत असते. 

देवाचे दर्शन झाल्यावर आणि देवाचा अनुभव घेतल्याने जीवन परिवर्तीत होत असते. मनुष्य देवा सारखा वागतो, बोलतो व चालतो. देवाचा अनुभव आलेला व्यक्ती आपल्या पूर्वीच्या जीवनात बदल करतो व नव जीवन जगण्यास लागतो. तो संत पौला प्रमाणे म्हणत असतो, “जगतो जीवन नव्हे मी माझे, ख्रिस्त जगत असे मम जीवनी.” (गलती २:२०) तो स्वतःसाठी मरतो, व दुसऱ्यासाठी जगतो आणि विशेष करून, त्याच जगणं हे जो त्याच्यासाठी मेला व पुन्हा उठविला गेला त्याच्यासाठी असतं. जर कोणी ख्रिस्ताठायी असेल, तर तो नवी उत्पत्ती होते व जुने लयास जाते. त्यासाठी, ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या ख्रिस्तामुळे व त्याच्या अनुभवामुळे हानिकारक वाटतात. त्या गोष्टींना आणि व्यक्तींना ते सहजपणे मुकतात व त्या केरकचरा अशा लेखतात. 

शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांना केवळ धीर व धैर्य देत नाही, तर तो खरोखर कोण आहे, हे दाखवून देतो. संपूर्ण रात्र देवाशी संवाद साधल्यानंतर तो समुद्राच्या पाण्यावरती चालू लागला. एकांतात येशूने देवाचे प्रेम अनुभवले. देव अनुभवासाठी प्रार्थनेची गरज आहे, पण त्यासाठी एकांतवासाची व एकटेपणाची गरज असते. आजच्या ह्या घाई-गर्दीच्या जगात एकांतीपणाचा अभाव दिसत आहे. सर्वत्र गोंगाट व आवाज कानी पडत आहे.

कोविड १९ ही देवाने दिलेली अनमोल संधी आहे, पण आपण भयभीत झालो आहोत, घाबरून गेलो आहोत. ज्या येशूने शिष्यांचे सांत्वन केले, तोच येशू आपल्या जीवनरूपी नावेमध्ये उपस्थित आहे. तो आपली ही जीवनाची नौकाकधीच बुडू देणार नाही, उलट अर्थी ह्या कोविड १९ मध्ये आपण त्याचा अनुभव घेऊया.ज्या प्रमाणे त्याने पेत्राला हात दिला, दिलासा दिला. तोच ख्रिस्त आपल्याला वाचवेल, सांभाळेल ह्या विश्वासाने त्याला साथ घालू या, त्याचा हात मागुया. होय प्रभुजी आम्हाला कोरोना पिडातून  आम्हाला वाचव.    

 विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.

 १. चर्चसाठी: आम्ही केवळ शब्दांनी ख्रिस्त सांगत नाही, तर ख्रिस्ताचे खरे शिष्य म्हणून जगू शकू. आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो.

 २. आध्यात्मिक वाढीसाठी: आत्मा आपल्याला आध्यात्मिक अभ्यासाची अंमलबजावणी करण्यास मदत करेल ज्यामुळे आपले ज्ञान आणि देवावरील प्रेम आणखी वाढेल जेणेकरून आपण देवाच्या दैनंदिन आमंत्रणांना उदारपणे प्रतिसाद देऊ शकू. आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो.

 ३. ख्रिस्ताच्या शरीरात एकता निर्माण करण्यासाठी: सर्व ख्रिस्ती लोक वाईट, दारिद्र्य आणि रोगाचा सामना करण्यास एकत्रितपणे कार्य करतील जेणेकरुन सुवार्तेची कृत्ये तसेच शब्दांमध्ये देखील ती प्रसिद्ध होईल. आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो.

 ४. कृपेसाठी अरुंद दरवाजाने प्रवेश करण्यासाठी: आत्मा क्षमा, करुणा, आत्म-संयम आणि सेवांच्या कृतींसह जीवन जगण्यास मार्गदर्शन करेल जेणेकरून आपले जीवन देवाचे राज्य प्रगट होईल. आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो.

 ५. वन्य अग्नि, पूर आणि इतर आपत्तींमुळे त्रस्त असलेल्या सर्वांसाठी: देव त्यांना सांत्वन देईल, त्यांना बरे करील आणि त्यांचे जीवन पुन्हा निर्माण करण्यासाठी संसाधनांकडे मार्गदर्शन करेल. आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो.

 ६. ज्यांना गरज आहे अशा सर्वांसाठी, हिंसाचाराचे बळी पडलेले, आजारी, मानसिक आजार असलेले: आपण ज्यांची नावे वेदीवर ठेवली आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो.

 ७. मरण पावलेल्या सर्व परदेशीय आणि प्रियजनांसाठी: देव त्यांच्या अनंतकाळच्या जीवनाच्या प्रवासात त्यांना मिठी मारेल. आम्ही विशेषत: आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो.

No comments:

Post a Comment