Friday, 14 August 2020

Reflections for the 20th Sunday in Ordinary Time (16/08/2020) by Fr. Wilson Gaikwad







सामान्य काळातील विसावा रविवार

 

दिनांक: १६/०८/२०२०

पहिले वाचन: यशया ५६:१, ६-७

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ११:१३-१५, २९-३२

शुभवर्तमान: मत्तय १५:२१-२८




‘परमेश्वर हा सर्वांचाच आहे, त्याच्या ठायी भेद नाही!’

 

प्रस्तावना:

आज सामान्य काळातील विसावा रविवार. आजच्या तिन्ही पवित्र वाचनांतून आम्हांस संदेश मिळतो की, “परमेश्वर हा सर्व विश्वाचा, पृथ्वीचा, मानवजातीचा उद्धारकर्ता व तारणकर्ता आहे. त्याच्या प्रेमाला, दातृत्वाला, सीमा व अंत नाही. एखाद्या वाहत्या झऱ्याप्रमाणे त्याची कृपा, प्रीती अविरत वाहत असते. म्हणूनच जो व्यक्ती देवाच्या सानिध्यात येतो, मग तिथे जात-पात धर्माचे बंधन नाही. त्या व्यक्तींना अथवा माणसांना देवाच्या करुणेचा, चमत्काराचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. "मनुष्य व देव यांतील एकमात्र विश्वास हा एकच दुवा आहे.” जेव्हा विश्वासाने आम्ही देवा सदणी व चरणी जातो, तेव्हा तो आम्हाला रिक्त हस्ते परतू देत नाही. त्याचा आशीर्वाद आम्हास मिळतो.

 पहिल्या वाचनात यशया सांगतो की, देवाच्या प्रेमापासून कोणीही वंचित नाही. कोणालाही वगळले नाही. दुसऱ्या वाचनात संत पौल आम्हांस आठवण करून देतो की, देवाच्या करूणेला अंत नाही, ती अटळ आहे. तसेच शुभवर्तमानात एक विधर्मी बाई प्रभू येशूच्या परीक्षेत पास होते, विश्वासास पात्र ठरते. आपण सुद्धा या पवित्र मिस्सात सहभागी होत असताना, श्रद्धेने त्याच्या पदकमली जाऊया व त्याच्या प्रेमाचा अनुभव घेऊ या.

 सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ५६:१, ६-७

येशूच्या संदेष्टा पहिल्या वाचनात परमेश्वराचे औदार्य प्रकट करतो व आमच्या निदर्शनास आणतो की, आपण न्याय बुद्धीने वागले पाहिजे; कारण आपला देव सर्वव्यापी, सर्वांना सामावून घेणारा आहे. त्याच्या ठायी जात-पात, धर्म या गोष्टींना थारा नाही व तु आम्हास आवर्जून सांगतो, “देवाचे मंदिर सर्व राष्ट्रांचे प्रार्थना घर होईल.” (यशया ५६:७)

 दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ११:१३-१५, २९-३२

संत पौल रोमकरांच्या पत्राद्वारे आम्हास ठामपणे सांगतो, “मी यहुदीतरांसाठी प्रेषित आहे. त्याची शिकवण आम्हास बोध करते की, जेव्हा आम्ही समेटाचे, बंधुत्वाचे जीवन जगतो भेदभाव न ठेवता सर्वांचा स्वीकार करतो, तेव्हा आम्ही मेलेल्यातुन जिवंत झाल्यासारखे आहोत.” म्हणूनच प्रभू येशू वर विश्वास ठेवला पाहिजे तो करुणामय आहे.

 शुभवर्तमान: मत्तय १५:२१-२८

शुभवर्तमानात संत मत्तय प्रभू येशू व विधर्मी स्त्री जेव्हा भेटतात, त्याच्यातील संभाषण चित्रीत करतो. येथे आम्ही बघतो की, प्रथम येशू तिला नाकारतो, पण जेव्हा ती सातत्याने, वारंवार प्रभू येशूला, मुलीला बरं करण्याची विनवणी करते, तेव्हा तिचा विश्वास व तिची तळमळ पाहून प्रभू येशू तिच्या मुलीला बरं करतो, नवजीवन देतो.

 मनन चिंतन:

एक दिवस स्वर्गामध्ये एक चौकस (curious) माणूस संत पेत्राला विचारतो, स्वर्गात किती हिंदू लोक आहेत? पेत्र उत्तर देतो एकही नाही. पुन्हा दुसरा प्रश्न विचारतो, किती मुस्लिम स्वर्गात आहेत? पेत्र उत्तर देतो एकही नाही. पुन्हा चौकस माणूस पेत्राला विचारतो की, तर मग स्वर्गात किती ख्रिस्ती लोक आहेत? पुन्हा तेच उत्तर, एकही नाही. शेवटी हा चौकस माणूस गोंधळून जातो व पेत्राला विचारतो. हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती कोणीही स्वर्गात नाही. मग स्वर्गात आहेत तरी कोण? पेत्र शांतपणे त्या चौकास माणसाला उत्तर देतो की, स्वर्ग ही कोणा एका पंथ, जात-पात, धर्म जहागिरी नाही. तर स्वर्ग हा सर्वांचा सर्वांसाठी आहे. स्वर्गात सर्व मनुष्यांचे स्वागत आहे. तेथे देवाच्या सानिध्यात राहून लोक सार्वकालिक आनंद अनुभवतात.

 होय, प्रिय बंधू भगिनींनो, शुभवर्तमानकार संत मत्तय मुद्दाम आम्हास जाणीव करून देतो, कारण आजचं शुभवर्तमान त्याचा स्व: अनुभव आहे. मत्तय यहुदी नव्हता, परदेशी होता. तो कर वसुली करणारा होता. त्यालासुद्धा मंदिरात येण्यास, प्रार्थना करण्यास बंदी होती. आपल्याच भाषेत सांगायचे झाले तर त्याला ‘बहिष्कृत’ केले होते. कारण कर वसुली करणाऱ्याचा द्वेष करत होते. अशा या मत्तयचा प्रभू येशू स्वीकार करतो. आजच्या शुभवर्तमानाद्वारे मत्तयला आवर्जून नमूद करायचे आहे, शुभवर्तमानातील बाई सुद्धा यहुदी नव्हती, ती विधर्मी होती. यहुदी लोक तिचा स्वीकार करु शकत नव्हते. असेच उदाहरण आपण योहानकृत शुभवर्तमानात बघतो. प्रभू येशूची शमरोनी स्त्री हिशी भेट याकोबाच्या विहीरीवर होते (योहान ४:४-२६). खरंच प्रभू येशू प्रेमाचा, दयेचा सागर आहे. तो सर्वांनाच स्वीकारतो, म्हणतात ना, “जिसका कोई नही, उसका खुदा है!”

 शुभवर्तमानात प्रथमतः थोडा कटू प्रसंग आहे. विधर्मी बाई प्रभू येशू कडे तिच्या मुलीला आरोग्य देण्यास विनवणी करते. ओरडून, कळकळीने, उच्चारते: ‘प्रभू येशू तू तारणारा आहेस, दाविदाचा पुत्र आहे. सुरुवातीला तिची मानहानी होते. प्रभू येशू तिला नकार देतो, अपमान करतो, अवहेलना करतो, दुर्लक्ष करतो सांगतो की, “मला फक्त इस्राएलाचा हरवलेल्या मेंढरासाठी पाठविले आहे (ओवी २४). मुलाची भाकर कुत्र्यापुढे टाकत नाही, पण ती बाई खूप मार्मिक उत्तर देते. होय प्रभू, “परंतु कुत्रीही, आपल्या धन्याच्या मेजाखाली पडलेले उष्टे चुर खातात” (ओवी २६). आणि ह्याच उत्तरावर खुश होऊन प्रभू येशू तिच्या मुलीला बरे करतो.

 खरंच आपला विश्वास भक्कम, दृढ असेल, तर येशु आपणास नक्कीच स्वीकारतो. तेथे भेदभाव नाही, कारण आम्ही सर्वच देवाची लेकरे आहोत. त्याच्या बागेतील विविध रंगाची, सुगंधाची फुले आहोत.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

आपला प्रतिसाद : हे प्रभू दया करून आमची प्रार्थना ऐक.

१) आपल्या धर्माची धुरा वाहणारे आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी, धर्मगुरू आणि धर्मभागिनी ह्या सर्वाना देव राज्यांची मुल्ये आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे जगजाहीर करता यावी व त्यासाठी त्यांना परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) आपण आपल्या कुटुंबातील व मित्र परिवारातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने व सहनशीलतेने समजून घ्यावे व एक आदर्श ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) जगभरात अनेक लोक कोरोना व्हायरसने बाधित झालेले आहेतअशा सर्वांना परमेश्वराचा स्पर्श होऊन त्यांची ह्या रोगापासून मुक्तता व्हावी तसेच डॉक्टर्स, नर्सेस ज्या निस्वार्थी वृत्तीने ह्या रुग्णाची सेवा करतात त्यांना ही तुझा भरपूर आशीर्वाद लाभावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या परिसरातील अनेक तरुण-तरुणींना पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment