Wednesday, 19 August 2020

Reflections for the 21st Sunday in Ordinary Time (23/08/2020) by Fr. Michael Fernades






सामान्य काळातील एकविसावा रविवार

 

दिनांक: २३/०८/२०२०

पहिले वाचन: यशया २२:१९-२३

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ११:३३-३६

शुभवर्तमान: मत्तय १६:१३-२०

 



मी स्वतःला ओळखतो – मी कोण आहे?

 

प्रस्तावना:

आजची तिन्ही वाचने आपणास येशू ख्रिस्ताला ओळखण्यास आमंत्रण देत आहे. त्याला ओळखण्यास श्रद्धेची व विश्वासाची भरपूर गरज आहे. आपली अंतकरणं शुद्ध व निर्मळ ठेवण्यास आजची उपासना आपली आध्यात्मिक तयारी करत आहे.

आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टाद्वारे परमेश्वर आपल्याला देवाचे आदेश पाळण्यास व त्याच्या आज्ञेनुसार वागण्यास सांगत आहे. शेबनाला देव ताकीद देत आहे की, तुला सर्व महत्त्वाच्या पदावरून व कामावरून काढले जाईल. गर्विष्ठ जीवन जगला म्हणून तुला नवीन राजा सर्व चांगल्या गोष्टींपासून दूर ठेवील. सर्वकाही काढून घेऊन ते सर्व दुसऱ्याला दिले जाईल. 

आजच्या दुसऱ्या वाचनात आपल्याला सांगितले जात आहे की, देव महान व श्रेष्ठ आहे. त्याची बुद्धी विज्ञान हे आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे. आपण नम्र होऊन त्याच्या समोर नतमस्तक होऊन त्याचा गौरव करूया.

शुभवर्तमानात ख्रिस्त आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारत आहे, “मी तुमच्यासाठी कोण? मी तुमच्या जीवनात कोण आहे? मला तुमच्या जीवनात काय स्थान आहे? संकटात, दुःखात, सुखात, बरी पणात मला तुम्ही कोणती स्थान तुमच्या जीवनात देता? जर मी तुमचा प्रभू असेल, तर त्याप्रमाणे वागतात का? जर मी तुमचा राजा असेल तर एका विश्वास व प्रेमाळू प्रजेप्रमाणे वागता का?

आजच्या मिसा बलिदानात भाग घेत असताना, आपण परमेश्वराकडे आपल्या गर्विष्ठपणाची कबुली देऊया, त्याच प्रमाणे प्रभूला सांगूया की त्याची बुद्धी व ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे, तू सर्वस्व आहे, खरा देव, ईश्वर, प्रभू आहे. जीवनात फक्त त्यालाच स्थान देऊया.

 

सम्यक विवरण

पहिले वाचन: यशया २२:१९-२३

शेबनाला सर्व पदावर काढून दिले आहे. त्याच्या जागी नवीन राजा म्हणून एल्हे किम त्याची नेमणूक केली आहे. सर्वकाही हिरावून घेतली जाते, कारण तू नेहमी गर्विष्ट राहिला. नवीन राजाला सर्व काही बहाल केले जाईल. कारण देव त्याच्यावर खुश व प्रसन्न झाला आहे. येरुसलेम आणि जुदा यावर तू राज्य करील व त्याला पिता म्हणून संबोधण्यात येईल.  

 दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ११:३३-३६

देव ज्ञानी आहे. देव बुद्धिमान आहे. त्याला सर्व गोष्टीचं ज्ञान आहे. देव गर्विष्ठ नाही. तो सर्वशक्तिमान आहे, पण त्याबरोबर तू दयाळू व मायाळू आहे. त्याचे मन कोणाला माहित नाही. सर्व गोष्टीचा उगम व अस्तित्व देवापासून आहे.

 शुभवर्तमान: मत्तय १६:१३-२०

मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून ओळखतात? असा प्रश्न येशू ख्रिस्त शिष्याला विचारत आहे. शिष्य आपलं येशूवर असलेलं प्रेम अनेक उत्तरा द्वारे व्यक्त करत आहेत. तू योहान, एलिया व यिर्मया आहेस, असे लोक ओळखतात व म्हणतात. तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस असे पेत्राने सर्वांच्या वतीने उत्तर दिले.

 बोधकथा:

एक श्रीमंत भाऊ आपल्या एकुलत्या एका मुलाला प्रश्न विचारतो, ‘बाळा, मी तुझा कोण? माझ्यावर तुझं प्रेम आहे का? माझ्या बद्दल तुझं काय मत आहे?’ बापाला वाटले की, मुलगा त्यांच्याविषयी सकारात्मक उत्तर देईल, चांगले विचार व्यक्त करील. कारण त्याने मुलाला सर्व काही दिले होते. पण मुलाने बापाला आश्चर्याचा धक्का दिला, ते रडू लागले कारण मुलांनी म्हटले, ‘तुम्ही माझ्यासाठी कोणीही नाही. कारण तुम्ही मला संपत्ती, पैसा, शिक्षण, बँक बॅलन्स, गाडी इत्यादी दिले आहे; पण तुमचं प्रेम दिलं नाही. मला सर्वांची ओळख करून दिली, पण ख्रिस्ताची, बायबलची, साक्रामेंतची, ओळख करून दिली नाही. तुम्ही माझ्यासाठी कोणीच नाही, एका शुन्याप्रमाणे माझ्या जीवनात तुमचं अस्तित्व व ज्ञान, स्थान आहे.’

 मनन चिंतन:

ख्रिस्त आजच्या शुभ वर्तमानात आपल्या शिष्यांना असाच एक खरा प्रश्न विचारतात की, “मी कोण आहे? असे लोक आणि तुम्ही म्हणतात?” ख्रिस्ताने अनेक चांगले कार्य केले होते, चमत्कार व प्रवचने दिली होती. शिष्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी हे सर्व पाहिले व हृदयाने अनुभवलेले होते. त्यांना सुद्धा ख्रिस्ताने आशीर्वाद व कृपा देऊन एक नवीन जीवनाची भेट दिली होती. देवाच्या राज्याच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या होत्या. प्रीतीच्या, क्षमेच्या, आपुलकीच्या, सेवेच्या किल्ल्या ख्रिस्ताने दुसऱ्यांचे भले करण्यास त्यांना बहाल केल्या होत्या.

ख्रिस्त त्यांच्याबरोबर हिंडला, फिरला, जेवला तसेच देवाची व मनुष्याची ओळख त्यांना करून दिली. तीन वर्ष ख्रिस्ताने त्यांना प्रीती व सेवेबद्दल शिकविले. आता वेळ आली होती त्यांच्या अध्यात्मिक जीवनाच्या परीक्षेची. ख्रिस्ताकडून ह्या शिष्यांनी किती शिकून घेतले होते? त्यांचं येशूबद्दल काय मत होतं? जे काही ते ख्रिस्ताकडून शिकले होते, ती शुभवार्ता लोकांपर्यंत ते कशाप्रकारे पोहोचविणार होते. त्यांना खरोखर ख्रिस्ताची ओळख पटली होती का? इतर लोकांप्रमाणे ते फक्त त्याचे महान कार्य, चमत्कार बघण्यासाठी की, स्वतःला समाजात मान, सन्मान व ओळख मिळावी म्हणून ते येशूचा पाठलाग करत होते का? ख्रिस्ताला त्या सर्वांना जगात प्रेमाची व सेवेची सुवार्ता पसरविण्यास पाठवायचे होते. त्यांची खरोखर तयारी झाली आहे का? विश्वासात व श्रद्धेत त्यांची वाढ झाली आहे का? हे पाहण्यासाठी प्रभू येशू त्यांना हा स्वतःबद्दलचा प्रश्न विचारतो.

आपला वैयक्तिक ख्रिस्ताचा अनुभव काय आहे? ख्रिस्त आपला कोण? इतर लोकांचा अनुभव ठीक आहे, पण आपला अनुभव काय? ख्रिस्ताविषयी दुसरे काय म्हणतात किंवा बोलतात हे महत्त्वाचं नाही. परंतु आपले ख्रिस्ताबरोबरचे माझे वैयक्तिक संबंध सखोल आहेत का? जीवनात संकटे, वादळे, दुःखे व आजार येतात तेव्हा ख्रिस्त आपल्यासाठी जीवनदाता आहे का? आपल्याला कोणीही स्वीकारत नाही, सर्व नाकारतात तेव्हा ख्रिस्त आपल्यासाठी आश्रयदाता आहे का? या कोरोना संकटात ख्रिस्त आपल्या सर्वांचे रक्षण करील असा आपला विश्वास आहे का?

पेत्राने सर्व शिष्यांच्यावतीने उत्तर दिले, ते उत्तर विश्वासाचे, प्रीतीचे, आदराचे होते. तसेच एका मोठ्या आशेचे व अनुभवाचे होते. पेत्राने त्या उत्तराद्वारे दाखवून दिले की, होय, आम्ही तयार आहोत. अशाप्रकारे त्या उत्तराद्वारे त्याने ख्रिस्ताची प्रशंसा व स्तुति केली नाही, तर हे मान्य केले की ख्रिस्त खरा देव, जीवन देणारा जिवंत देवाचा पुत्र आहे. त्याच्याविना आपल्याला अस्तित्व नाही. ख्रिस्त प्रकाश देणारा जिवंत दिवा आहे.

अनेक पवित्र पुरुष व स्त्रिया यांना ख्रिस्ताचा मोठा अनुभव आला होता. तो अनुभव लोकांपर्यंत त्यांनी शब्दाने, कृतीद्वारे व जीवनाद्वारे पोहोचविला. तो त्यांचा एकमेव आणि वैयक्तिक अनुभव होता. आज ख्रिस्त एक मोठा व महत्त्वाचा प्रश्न विचारत आहे, ‘मी कोण?’ पेत्र व इतर शिष्य श्रद्धेत बळकट नव्हते, त्या सर्वांना ख्रिस्ताने स्वतःचे जीवन अनुभवण्यास अनेक अशा संध्या दिल्या होत्या. त्यांनी त्यांच्या पापांकडे नाही, तर हृदयाकडे पाहिले. आपले अंतकरण निर्मळ, शुद्ध व पवित्र असेल, तर तसाच अनुभव आपणा सर्वांना येईल. मग पेत्राप्रमाणे आपणसुद्धा संकटरूपी पाण्यावर चालणार, आणि जर जीवनात दुःखाने बुडू लागलो, तर ख्रिस्त आपल्याला त्याच्या पवित्र व बळकट हाताने वर काढणार आहे फक्त श्रद्धा व विश्वास ठेवण्याची गरज आहे.

ख्रिस्त आपल्याला त्याच्या प्रीतीने समजून व स्वीकारून घेतो, त्यामुळे ख्रिस्ताचा आपल्या जीवनात वैयक्तिक अनुभव असणे फार महत्वाचे आहे. त्याच्यावर विश्वास ठेवला तर, आपले देखील पेत्राप्रमाणे वाईट दिवस संपतील व एक सुंदर जीवनाला सुरुवात होईल. ख्रिस्ताने पेत्राला खडक केले, एक नवीन नाव, दिशा, आशा दिली. त्याचप्रमाणे आपले जीवन बदलून एक नवीन, पवित्र, व सुंदर पर्व आपल्या जीवनात तो सुरू करील.

पेत्राप्रमाणे, आपण ‘तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस’ हे उत्तर देऊन, ख्रिस्ताचे खरे शिष्य व अनुयायी होण्यास तयार आहोत का? आपण स्वतःला ख्रिस्ताच्या जो गरजू व गरीब लोकांमध्ये आहे तेथे त्याला ओखून त्याची सेवा करायला तयार आहोत का? त्याचा अनुभव घेऊन, तो लोकापर्यंत पोहोचविण्यास आणि त्याच्याशी एकरूप होण्यास आज ख्रिस्त आपणांस बोलावीत आहे.

 विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आची प्रार्थना ऐक.

१. आपले पोप, बिशप तसेच सर्व धार्मिक अधिकाऱ्यांनी देवाच्या वचनाचा नम्रपणे आणि प्रामाणिकपणे प्रचार करावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

 २. आपल्या जीवनात ख्रिस्ताला अधिक महत्व देऊन त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन गावागावात होणाऱ्या कार्यक्रमात सहभाग घेऊन समेट घडवून आणावा व एकीचा समाज निर्माण व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

 ३. हे प्रभू आम्ही सर्वजण महामारीत अडकलेले आहोत. आमच्या मनात अनेक शंका-कुशंका निर्माण होतात. आमच्या विश्वासाला तडा जाण्याची शंका नाकारता येत नाही. तुझ्या अधिकाधिक जवळ येऊन तुझ्यावरच आमची श्रद्धा वाढव हा वरदहस्त आम्ही तुझ्याकडे मागतो म्हणून आपण प्रार्थना करूया.

 ४. आमच्या स्वतःच्या गरजांसाठी विश्सेकरून ज्यांनी आपल्याला प्रार्थनेची विनंती केली आहे अशा सर्वांची  आपण आता आठवण करुया आणि त्यांना प्रभूचा आशीर्वाद लाभावा म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.

 ५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि व्ययक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.

2 comments: