Thursday, 27 August 2020

 

Reflections for the 22nd Sunday in Ordinary Time (30/08/2020) by Dn. Godfrey Rodriques





साध्या काळातील बाविसावा रविवार

दिनांक: ३०/०८/२०२०

पहिले वाचन: यिर्मया २०:७-९

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १२:१-२ 

शुभवर्तमान: मत्तय १६:२१-२७

 




आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे

प्रस्तावना:

आज आपण साध्या काळातील बाविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना स्वतःचा त्याग करून, स्वतःचा वधस्तंभ उचलून ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास आपणा प्रत्येकास आमंत्रित करीत आहे.

आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यिर्मया आपल्याला जाणीव करून देत आहे की, देवाची सुवार्ता पसरविताना आपणा प्रत्येकाला दुःखाला सामोरे जावे लागेल. तर आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणा प्रत्येकास स्वतःच्या शरीराचा जिवंत यज्ञ म्हणून समर्पित करण्यास व सदैव देवाचा गौरव करण्यास बोलावत आहे. त्याचप्रमाणे आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांना स्वतःचा त्याग करून आपल्या दुःखाचा व निराशेचा वधस्तंभ उचलून ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास बोलावत आहे.

ह्यास्तव आजची उपासना आपणा प्रत्येकास आपल्या दैनंदिन जीवनात निराश व हताश न होता दुःखावर मात करण्यास, दैवी दयेचा अनुभव घेण्यास, व ख्रिस्ताची सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचवण्यास आमंत्रण देत आहे.


 पहिले वाचन: यिर्मया २०:७-९

यिर्मया शोक करत सांगतो की, “हे परमेश्वरा, तू मला फसविले आणि मी फसलो” (२०:७). यिर्मया परमेश्वराविरूद्ध बोलतो, कारण त्याला स्वतःच्या फसवणुकीची जाणीव होत होती व आपण परमेश्वरापेक्षा प्रबळ नाही म्हणून तो शोक करत होता. फसवणूक हा शब्द बायबल मध्ये १ राजे २२ ह्या पुस्तकात वापरला आहे व त्याद्वारे परमेश्वराने आहाबचा नाश केला. जर यिर्मयाची श्रद्धा दृढ नसती, तर यिर्मयाला सुद्धा कठीण परिस्थितीतून जावे लागले असते आणि जर असे झाले असते, तर त्याच्यामध्ये काही आश्चर्य नसते कारण लोकांना व दुसऱ्या संदेष्ट्यांना यिर्मयाने केलेल्या चुकीची जाणीव होती (१७:१४-१८). तरीसुद्धा यिर्मयाची श्रद्धा व त्याचा परमेश्वरावर असलेला विश्वास भक्कम होता व परमेश्वराने ह्या दु:खदायक समयी यिर्मयाचा हाथ सोडला नाही. मी म्हणालो, मी त्याचे नाव काढणार नाही, यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही, तेव्हा माझ्या हाडांत कोंडलेला अग्नी जळत आहे असे माझ्या हृदयाला झाले; मी स्वतःला आवरितां आवरितां थकलो, पण मला ते साधेना” (२०:९).


दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १२:१-२

नवीन जीवितक्रम: आपली शरीरे जिवंत, पवित्र देवाला समर्पित करा”, संत पौल हे आवाहन प्रत्येक ख्रिस्ती लोकांपुढे ठेवत आहे, कारण आपली शरीरे पवित्र आत्म्याची मंदिरे आहेत तसेच पवित्र आत्म्याची कार्ये वाहण्याची साधने सुद्धा आहेत, म्हणूनच आपण आपली शरीरे देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी कारण ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे व परमेश्वराची खरी आराधना आहे. स्वत:चे शरीर परमेश्वराला अर्पण करणे हिच खरी आराधना आहे. पुढे संत पौल लोकांस याचना करून सांगतो की तुम्ही युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नविकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ दया.

 

शुभवर्तमान: मत्तय १६:२१-२२

मत्तयलिखित शुभवर्तमानात दोन बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.  पहिली बाब म्हणजे येशू ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थानआणि दुसरी आत्मत्यागाचे आमंत्रण.

येशू ख्रिस्त शिष्यांना आपले दु:खसहन व पुनरुत्थानाविषयी सांगत आहे. परंतू हे मात्र शिष्यांना समजत नाही. येशूचे बोलणे ऐकून पेत्राला मोठा धक्काच बसतो. पेत्राने ख्रिस्ताच्या बोलण्याचा विरोध करून म्हणाला, प्रभुजी, आपणावर दय असो, असे आपल्याला होणारच नाही. येशूने पेत्राला सांगितले की, “सैताना, माझ्यापुढून निघून जा; तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, तर माणसाच्या गोष्टीकडे आहे” (मत्तय १६:२२). 

ख्रिस्त आपला वधस्तंभ उचलून घेऊन जाणार होता. शिष्यांनी सुध्दा आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावे अशी येशूची इच्छा होती. स्वत:ची इच्छा व ध्येय यांचा त्याग करून देवाची इच्छा मान्य करणे हे सोपे नसते. परंतू, येशू शिष्यांना त्यांच्या त्यागाद्वारे त्यांना मोबदला मिळेल असे आश्वासन देतो. देवाच्या इच्छेप्रमाणे न करता जो जगातील गोष्टी मिळविण्याच्या मागे लागतो तो सर्वच गमावून बसतो. म्हणून सैतानाच्या विचारांचा त्याग करून ख्रिस्ताच्या इच्छा अनुसरणे योग्य आहे.

 

मनन चिंतन:

आपल्या जीवनाचे आकाश हे सदैव निळे असते असे नाही, तर कधीकधी वेदनेच्या, यातनेच्या ढगांनी झाकले जाते. आपल्या आयुष्याच्या पाऊल वाटा सदैव फुलांनी सजवलेल्या असतात असे नाही, तर त्यावर कधीकधी संकटाचे आणि दुःखाचे काटे-कुटे आणि संशयाचे व निराशेचे दगड-धोंडे पसरलेले असतातच. आपले आयुष्य आपल्या जीवनाच्या ओंजळीत नेहमी सुखाचाच वर्षाव करीत नाही, त्या सुखाच्या धांन्यात कधीकधी दुःखाचे खडेही असतात.

अशाप्रकारे सुखानंतर दुःख व दुःखानंतर सुख हा जणू आपल्या जीवनाचा क्रम बनत असतो. आणि अशा ह्या सुख-दुःखाच्या जीवनात सुखात आपण हर्ष करतो, दुःखात आपण खचून जातो, आणि ते सहाजिकच आहे; परंतु ख्रिस्त आज आपणास जाणीव करून देत आहे की, दुःखात खितपत न पडता, दु:खांना आपला आधारस्तंभ बनवा, दुःखांना आपल्या विषयाचे साधन बनवा, कारण जेव्हा आपण दुःखांना सामोरे जातो, तेव्हाच आपण धाडसी बनत असतो आणि आपली दुःखेच आपणाला आपल्या धाडसीपणाची जाणीव करून देत असतात. इतकेच नव्हे, तर जीवन सर्वकाही संपून गेलेले असे वाटते, तेव्हा तीच वेळ असते काहीतरी नवीन घडण्याची, काहीतरी नाविण्य घडवून आणण्याची. ख्रिस्ताच्या त्या क्रुसावरील  मरणानेच पुनरुत्थानाची पहाट शक्य झाली, शुक्रवारच्या त्या दुःखदायक क्लेशामुळेच रविवारचे पुनरुत्थान अधिक सुखमय बनले. अशाप्रकारे सुखानंतर दुख व दुःखानंतर सुख हे सहाजिकच आहे.

आजच्या पहिल्या वाचनात यिर्मया संदेष्टा हा अतिशय हताश झाला होता, तरीसुद्धा त्याच्या देवावरील दृढ विश्वासाने दुःखावर मात करत देवाची सुवार्ता तो पसरवत गेला. दुःखामुळेच जणूकाही तो धाडसी बनला. सर्व तेव्हाच शक्य झाले, जेव्हा तो दुःखांना सामोरे गेला. त्याचप्रमाणे आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल रोमकरांस आवर्जून सांगत आहे की, पुनरुत्थानाशिवाय आपली ख्रिस्तावरील श्रद्धा व्यर्थ आहे. यास्तव पुनरुत्थानासाठी गरज आहे, ती मरणाची, दुःखांना सामोरे जाण्याची म्हणून दुःखांना घाबरून न जाता त्यांना सामोरे जाण्यास संत पौल रोमकराबरोबर आज आपणाला सुद्धा आवर्जून सांगत आहे. आजच्या शुभमवर्तमानात सुद्धा येशू ख्रिस्त आपल्याला अशाच प्रकारचा आदेश करत आहे. येशू शिष्यांना स्वतःचा त्याग करून आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे असे सांगत आहे. कारण ख्रिस्तला ठाऊक होते की, माझ्या दुःखसहनाने व मरणानेच पुनरुत्थान शक्य आहे. ख्रिस्ताला ठाऊक होते की दुःखानंतर लाभलेले सुख हे अतिशय आनंददायक असते. त्याचप्रमाणे शुभवर्तमानाच्या दुसऱ्या टप्प्यात ख्रिस्त आत्मत्याग करण्यास आमंत्रित करीत आहे. ख्रिस्त जाणीव करून देतो की, जो कोणी दुःखांना घाबरून दूर पळतो, तो शरीराचे चोचले पुरवतो व जो कोणी दुःखांना सामोरे जातो तो अनंत काळाच्या सुखास पात्र ठरतो. म्हणूनच ख्रिस्त त्याच्या शिष्यांना व आज आपणा प्रत्येकाला खचित सांगतो की, माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल, तर त्याने  स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. यास्तव स्वर्गीय व अनंत काळाच्या सुखात सहभागी व्हावे.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

आपला प्रतिसाद : हे प्रभू दया करून आमची प्रार्थना ऐक.

१. आपल्या धर्माची धुरा वाहणारे आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्या सर्वाना देव राज्याची मुल्ये आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे जगजाहीर करता यावी व त्यासाठी त्यांना परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपण आपल्या कुटुंबातील व मित्र परिवारातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने व सहनशीलतेने समजून घ्यावे व एक आदर्श ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या परिसरातील अनेक तरुण-तरुणींना पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. सर्व पालकांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावेत, त्यांना देव राज्याविषयी शिकवण द्यावी स्वतः परमेश्वराच्या वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे वागून, मुलांपुढे चांगला आदर्श ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपण आपल्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्सनर्सेसव इतर सेवक सेविका ह्यांनी आपले जीव धोक्यात घालून रोग्यांची सेवा करत आहेत. त्यांना परमेश्वराचा विपुल असा आशीर्वाद व त्यांच्या कुटुंबीयांवर सुद्धा यावातसेच सर्व धोक्यांपासून त्यांचे संरक्षण व्हावेम्हणून आपण प्रार्थना करूया.

६. आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.

 




No comments:

Post a Comment