आगमन काळातील पहिला रविवार
दिनांक: २९-११-२०
पहिले वाचन: यशया
६३:१६ब-१७, १९ब, ६४:२ब-७
दुसरे वाचन: १
करिंथ १:३-९
शुभवर्तमान: मार्क
१३:३३-३७
“जागृत रहा”
प्रस्तावना:
आजपासून आपण आगमन काळाला सुरुवात करीत आहोत. आगमन काळ हा
प्रभू येशूच्या येण्याचा काळ. प्रभू येण्यासाठी आपल्याला जागृत, तयार, सज्ज
राहण्यासाठी हा काळ आवाहन करत आहे. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा हा यहुदी
लोकांच्या कल्याणासाठी देवाकडे बाप म्हणून हाक मारून विनवीत आहे. कारण पापांच्या
फासात अडकून यहुदी किंवा इस्त्रायली लोकांना देवाचा विसर पडला होता म्हणून
संदेष्टा लोकांच्या वतीने देवाला साकडं घालतो. दुसऱ्या वाचनात संत पौल करंथिकरांमध्ये
पडलेल्या वादास प्रतीउत्तर म्हणून पत्र लिहित असताना देवाच्या कृपेत त्यांना सर्व प्रकारच्या
सुखसोयी व आशीर्वाद मिळाले आहेत ह्याचे भान ठेवण्यास सांगत आहे. आजच्या मार्कलिखीत
शुभवर्तमानात प्रभू येशू आपणा सर्वांना छोटयाश्या परंतु महत्वपूर्ण दाखल्याद्वारे
जागृत राहण्यास सांगत आहे. कारण घराचा धनी कधी, कोणत्या घटकेस येणार हे कोणालाच
ठाऊक नाही. आजच्या उपासना विधीत सहभागी होत असताना आपण प्रभूच्या येण्यास तयार
आहोत का? त्याला आपल्या जीवनात, आपल्या हृदयात स्विकारण्यास तयार आहोत का? की अदयाप
पापांचा अंधकार, झोपाळूपणा आपल्याला सत्याच्या प्रकाशात येण्यास अडवत आहे का? हे
जाणून घेऊया व प्रकाशाला आपल्या जीवनात स्विकारण्यास तयार होऊया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ६३:१६ब-१७, १९ब, ६४:२ब-७
यशया संदेष्टा आपणास सांगत आहे की प्रभू देव हा आपला स्वर्गीय पिता आहे. कारण जेव्हा इस्राएल लोक हे बाबिलोनच्या बंदिवासात होते तेव्हा त्यांची सुटका करणारा हा प्रभू होता आणि हाच प्रभू आपल्या लोकांना वाचवण्यासाठी व त्यांचे जीवन चांगले बनवण्यासाठी इस्राएलात परत येणार होता.
यशया संदेष्टा धरणी कंप, आवाज, वारा, वादळ आणि अग्नी अशा नैसर्गिक बाबींचा उल्लेख करून प्रभूच्या येण्याचे संकेत देतो. इस्राएली लोकंसुद्धा अशा ह्या उल्लेखाने आनंदीत आहेत कारण धरणी कंप हा देवाची उपस्थिती दर्शवितो (निर्गम १९:१८). ह्याचा अर्थ असा की जेव्हा इस्राएल लोक देवाचा धावा करतील किंवा विलाप करतील तेव्हा प्रभू हा धरणी कंपाच्या रुपात त्यांच्या समोर प्रकट होईल. हे खरे आहे कारण यशया हा अध्याय ६४ मध्ये सांगतो की जो कोण प्रामाणिकपणाचे जीवन जगतो, देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो व त्याचा धावा करतो त्याच्याबरोबर देव नेहमी असतो.
दुसरे वाचन: १ करिंथ पत्र १:३-९
संत पौल करिंथकरास सांगतो की प्रभूद्वारे तुम्हांस खूप काही चांगली दाने भेटली आहेत. ह्या दानांचा चांगला वापर करा. कारण ही दाने तुम्हांला प्रभूच्या प्रेमामुळे भेटली आहेत. ही दाने तुम्हांस प्रभू येशू ख्रिस्त परत येईपर्यत आधार व शक्ती देणार कारण प्रभूचा आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर आहे.
शुभवर्तमान : मार्क १३:३३-३७
शुभवर्तमानात प्रभू येशू
आपणास सावध राहण्यास व सदैव तयारीत राहण्यास सांगत आहे. जागृत राहणे किंवा सावध
राहणे हा ख्रिस्ताचा एक महत्वाचा मुद्दा होता. कोणतीही गोष्ट ही सावध राहून किवा
जागृत राहून करणे महत्वाचे आहे. येशू ख्रिस्त नेहमी आपणास जागृत राहण्यास का सांगत
आहे? कुणासाठी जागृत राहावे? व कशासाठी जागृत राहावे?
ह्या सर्वांचे उत्तर फक्त येशू आहे. कारण येशू ख्रिस्त त्याच्या स्व:ताच्या
येण्याची वाट पाह्ण्यासाठी आपणा सर्वांना जागृत राहण्यास सांगत आहे.
सावध व जागृत कसे राहावे हे
स्पष्ट करण्यासाठी प्रभू एका घरधन्याचा दाखला देतो. हा घरधनी त्याचे घर
कामगाराच्या हातात सोपवून त्याच्या प्रवासाला निघतो. परंतु तो कधी परत येईल हे
कुणास ठाऊक नाही म्हणून त्याच्या कामगारांनी नेहमी सावध राहणे महत्वाचे होते.
येशू ख्रिस्ताने त्याच्या स्वर्गीय पित्याकडे जाण्याअगोदर शिष्यास व आपणा सर्वांना एक कामगीरी सोपवली. तो परत येणार व नक्कीच येणार हे त्याने स्वत:हा सांगितले. परंतु, तो कधी येणार हे आपणास त्याने कधीच सांगितले नाही (मत्तय १६:२७) का ? कारण आपण त्याचे स्वागत करण्यासाठी नेहमी जागृत व तत्पर असलो पाहिजे.
मनन चिंतन :
आगमन हा पवित्र काळ आहे ज्यामध्ये
ख्रिस्तसभा आपल्याला तयार राहण्यासाठी बोलावत आहे. ही तयारी आहे ख्रिस्तजयंती
साजरी करण्यासाठी. ख्रिस्ताचे पुनरागमन आपल्या जीवनात करण्यासाठी. ह्या पवित्र
काळात ख्रिस्तसभा आपल्याला बऱ्याचशा अशा सूचना देते, ज्यांद्वारे आपण सज्ज असलो
पाहिजेत किंवा तयार असलो पाहिजेत. जर आपण ह्या सूचना संपूर्ण हृदयाने, मनाने
पाळल्या तर आपण प्रभूच्या आगमनाला आपली तयारी दर्शवू व ख्रिस्तजयंती ही आपल्याला
अधिक भक्तिभावाने व जल्लोषाने साजरी करण्यास आनंद भेटेल.
इस्त्रायली
लोकांची अशी समज होती की देव परमेश्वर हा लवकरच येणार व त्यासाठी ते वाट पाहत
होते. तो कधी कोणत्या घटकेस येईल ह्याचे त्यांना भान नव्हते. त्यांनी प्रार्थनासुध्दा
केली की, परमेश्वराचे परत येणे हे लवकरच असावे नाहीतर त्यांच्यामधील संशय त्या
निवडलेल्या लोकांच्या विश्वासाचा नाश करून टाकील.
आपण ख्रिस्त युगात जीवन जगत आहोत व
आपल्याला अदभूत फायदा आहे की प्रभू परमेश्वर त्याच्या पुत्राच्या रूपाने
आपल्यामध्ये वस्ती करत आहे. ज्या परमेश्वराची इस्त्रायली प्रजा परत येण्याची वाट
पाहत आहेत तो प्रभू परमेश्वर ख्रिस्ताच्या रुपात आला आहे त्या सत्यावर त्यांचा
विश्वास नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने मानवी रुपात आपल्यामध्ये वस्ती केली व आपली
मानवता त्याच्या दैवतेत सामावून घेतली व आपल्याला दैवीपणाचा अनुभव बहाल केला आहे
आणि आपल्याला त्याच्या पित्याच्या प्रेमात दत्तक मुले व आपल्याला त्याच्या बंधूप्रेमात
समाविष्ट करून घेतलं आहे.
आपला ख्रिस्ती विश्वास आपल्याला शिकवतो की आपण परमेश्वराची निर्मिती आहोत
आणि त्याच्या पुत्राच्या देह धारणेने आपण दैविकतेने दत्तक घेतलेली मुले आहोत
ह्याचा अर्थ आहे, पवित्र त्रैक्यात सार्वकालीक जीवन व हे जीवन ख्रिस्ताने आपल्या
क्रूसावरील बलिदानाने मृत्यूवर मात करून जिंकून घेतले आहे आणि हे येशू ख्रिस्ताने आपल्याला
त्याच्या जीवनाद्वारे प्रकट केले आहे. त्याने आपल्याला जीवनाच्या संध्याकाळी
आनंदीत मरणाचे आश्वासन दिले आहे. परंतु ते पण एका अटीवर. ती अट अशी की आपण त्याची
आज्ञा पाळावी व त्याप्रमाणे आपले ख्रिस्ती जीवन जगावे.
आगमन काळातील चारही सप्ताह आपल्याला
ख्रिस्तसभा ह्या मुलभूत, वास्तविक, विश्वासिक, सत्याचे सातत्याने आठवण करून देत
असते की जेणेकरून आपल्याला ख्रिस्तजयंती साजरी करण्यास सहाय्य मिळेल व ख्रिस्ती जीवन
जगण्यास आपल्याला प्रोत्साहन मिळेल.
आजच्या उपासना विधीचा प्रमुख घटक किंवा गाभा असा आहे की, आपण ख्रिस्ताला स्विकारण्यास कितपत तयारी केली आहे. ख्रिस्त शुभवर्तमानात आपल्याला ‘जागृत रहा’ म्हणून सांगत आहे. मी मानसिकरित्या जागृत आहे परंतु मी आध्यात्मिकरित्या जागृत आहे का? मी ख्रिस्ताला भेटण्यास व त्याचा आशीर्वाद घेण्यास तयार आहे का? गेले कित्येक महिने मी उपासना विधीत सहभागी झालो नाही. पण आता मला संधी आहे, त्या संधीचा मी उपयोग करणार आहे का? की, मी ख्रिस्ताविना जीवन जगत आहे, तसेच जीवन जगणार? ह्या अशा अनेक प्रश्नांना सामोरे जाण्यास व त्याप्रमाणे आपले जीवन बदलण्यास प्रभू ख्रिस्ताची कृपा आपण ह्या उपासना विधी मध्ये मागुया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
आपला प्रतिसाद: हे प्रभू, तुझे स्वागत करण्यास आमचे अंतःकरण शुद्ध ठेव.
१. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप, बिशप्स, सर्व धर्मगुरू, व धर्म बंधू-भगिनी ह्यांना ख्रिस्त सभेने प्रभूची शुभवार्ता घोषविण्याची जबाबदारी सोपवली आहे. ती त्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पुढे चालू ठेवावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. प्रभू येशूच्या आगमनासाठी आम्ही सदैव तत्पर असावे, पापापासून
मुक्त राहून ख्रिस्ताच्या आगमनाचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यास पात्र ठरावे, म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करू या.
३. जी लोकं देऊळमाते पासून दुरावलेली आहेत व
पापांच्या अंधारात खितपत पडलेली आहेत, अशा लोकांना प्रभूच्या
जीवनदायी प्रकाशात येण्यास त्याची शक्ती व सामर्थ्य मिळावे आणि त्यांना आपल्या
अपराधांची जाणीव व्हावी, म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. ह्या आगमन काळाची सुरुवात करत असताना आपण सर्वांनी
ख्रिस्ताचे रूप गरीब, अपंग, लुळे, व बहिरे ह्या
सर्वांमध्ये पाहावे व त्यांना त्यांच्या दु:खात व संकटात मदत करावी, ह्यासाठी लागणारी कृपा परमेश्वर चरणी मागुया.
५. चैनबाजी, अहंकार किंवा आनंद म्हणजे
शाश्वत जीवन नाही, ह्याची जाणीव आम्हांला व्हावी व अशा
मोहापासून आम्ही दूर रहावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.
६. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक
गरजा प्रभूचरणी ठेऊया.