सर्व संत सोहळा
दिनांक: ०१/११/२०२०
पहिले वाचन: प्रकटीकरण ७:२-४, ९-१४
दुसरे वाचन: १ योहान ३:१-३
शुभवर्तमान: मत्तय ५:१-१२अ
प्रस्तावना:
आज ख्रिस्त सभा सामान्य
काळतील एकतिसावा रविवारी एक महत्त्वाचा सण साजरा करत आहे आणि तो सण म्हणजे सर्व
संतांचा सण. संतांच्या जीवनाद्वारे आपल्याला येशूकडे जाण्यासाठी
मार्ग मोकळा होत असतो आणि म्हणूनच ख्रिस्तसभा आज आपणास ही संधी प्राप्त करून देत आहे. पहिल्या
वाचनात आपणास सांगण्यात येत आहे की देवाने त्यांच्या लोकांची निवड करून त्यांना शुभ्र,
पावित्र्यचा झगा परिधान करण्यास दिला. तसेच दुसऱ्या
वाचनात आपणास आठवण करून देण्यात येत आहे की, आपण देवाची मुले आहोत आणि जसा ख्रिस्त
आहे तसेच आपण देखील आहोत. तर शुभवर्तमानद्वारे आपण आपल्या जिवनात
कश्याप्रकारे आनंद प्राप्त करू शकतो किंवा मिळवू शकतो ह्याचे शिक्षण येशू देत आहे.
जर आपण ही शिकवण अंगिकारली, तर आपण देखील त्या संतगणात सामिल होवु. ही शिकवण आपल्या जीवनात आपणांस पाळता यावी म्हणून लागणारी कृपा आणि शक्ती
ह्या मिस्साबलिदानात मागुया.
पहिले वाचन: प्रकटीकरण ७:२-४, ९-१४
पहिल्या वाचनात संत योहान
याने आपल्याला अखेरच्या दिवसातील देवाच्या लोकांचे दोन दृष्टांत सांगितले आहेत आणि
आपणास एकाच गोष्टीची आठवण करून देत आहे आणि ती म्हणजे देव आपल्या लोकांवर आपला क्रोध
आणत नाही, इज्राएल लोकांचा नाश होऊ नये म्हणून परमेश्वराने आपला देवदूत पाठवून त्यांचे
संरक्षण केले आणि तोच परमेश्वर आपला पुढे देखील बचाव करणार आहे याची शाश्वती हे
वाचन आपल्याला देते.
दुसरे वाचन: १ योहान ३:१-३
दुसऱ्या वाचनात योहान सांगत
आहे की ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाची मुले हे नाव देवाने दिलेले
आहे आणि यावरून आपल्याला देवाची प्रीती ही किती महान आहे व किती श्रेष्ठ आहे याची
प्रचिती होते. जेव्हा ख्रिस्त स्वतः प्रकट होईल, तेव्हा देवाची मुले बदलली जातील त्यांच
स्वरूप बदलेल. ख्रिस्ताला खुद्द पाहून हा बदल त्यांच्यात दिसून येईल याची महती आपल्याला
या ठिकाणी दाखवून देण्यात येत आहे.
शुभवर्तमान: मत्तय ५:१-१२अ
आजच्या शुभवर्तमानाला ‘डोंगरावरील
प्रवचन’ या नावाने देखील ओळखले जाते. आजच्या शुभवर्तमानाद्वारे
आपल्याला खरा आनंद काय आहे आणि कशात आहे हे संत मत्तय सांगत आहे. जर आपण ह्या सांगितलेल्या
गोष्टीचे पालन आपल्या जीवनात केले, तर आपल्याला अध्यात्मिक प्रतिफळे मिळणार आहेत.
आणि अश्या रीतीने आपण देवाशी अगदी जवळ जाऊ शकतो. संत मत्तयं येशू ख्रिस्ताने सांगितलेले आठ धन्यवाद या ठिकाणी नमूद करत आहे.
मनन चिंतन:
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्तसभा सर्व संतांचा सण साजरा करीत आहे. आजचा दिवस हा आनंदाचा आणि
सौभाग्याचा आहे. प्रत्येक पिढीने ख्रिस्तसभेला अनेक संत दिलेले आहेत. ज्याद्वारे
ख्रिस्तसभेमध्ये संतांची जणू आकाशगंगाच तयार झाली आहे. ख्रिस्तसभेच्या
नियमावलीनुसार संतांना the venerable आदरणीय, the
beatified परमानंदीय आणि the canonized संत
अश्या तीन विभागात मांडणी केली आहे, ज्याद्वारे आपल्याला ख्रिस्ती जीवन जगण्याचे
मार्गदर्शन लाभते. आपण सर्वजण परमेश्वराने बनवलेले नमुने आहोत. परंतु संत म्हणजे
परमेश्वराचे उत्कृष्ट अअसे नमुने आहेत. संत अगस्तीन म्हणतात, “to fall in Love with God is the greatest romance, to seek Him
is the greatest adventure and to find Him is the greatest achievement.” “देवावर प्रेम करणे म्हणजे सर्वोत्कृष्ट प्रणय होय, त्याला शोधणे म्हणजे सर्वोत्कृष्ट साहस आणि तो सापडणे म्हणजे सर्वात मोठे
यश होय.”
सर्व संतांमध्ये आपल्याला
देवाची एक वेगळीच झलक पहायला मिळते. एक वेगळी वृत्ती, एक वेगळं
धाडस, एक वेगळं साहस आणि जगावेगळा दृष्टिकोन अशा अनेक सद्गुणांची
जोपासना आपल्याला प्रत्येक संतांमध्ये जाणवते. प्रत्येक संत हा प्रभूच्या
प्रेमासाठी व्याकूळ असलेला आपल्याला जाणवते. प्रत्येक संताने आपले जीवन हे देवाच्या
प्रेमाखातर व्यक्त केले आहे. आज आपण फक्त त्याच संतांचा सण साजरा करीत नाही
ज्यांची नावे आपण वारंवार ऐकत असतो किंवा ज्यांची नावे ठळक अक्षरांमध्ये लिहिली
गेली आहेत. उदा. संत फ्रांसिस, संत अगस्तीन, संत मदर तेरेसा
संत गोन्सालो गार्सिया किंवा संत पोप जॉन पॉल दुसरे, परंतु
आपण सर्व संतांना आहुती वाहतो, ज्यांची नावे कुठेही नमूद केलेली नाहीत. परंतु ते
स्वर्गामध्ये परमेश्वराबरोबर जल्लोष करत आहेत. अशी कितीतरी माणसे होऊन गेली जे
आपलं जीवन परमेश्वराच्या नियमानुसार जगून इतरांसाठी व्यथित केलं. परंतु त्यांचं
नाव कुठेही नमूद करण्यात आलेले नाही. आपल्यातील शुद्धतेची जाणीव हेच ईश्वराचे रूप
आहे. याचा साक्षात्कार सगुणोपासतेतून, निरुगुणाकडे गेल्यावर संताना झाला. म्हणूनच
असे म्हटले आहे की, “संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे येथे”
म्हणजेच संताच्या संगतीने ईश्वरदर्शन होते. अखंड आनंदाची अवस्था म्हणजेच ईश्वर
दर्शन, आत्मज्ञान, ज्ञानदीप होय.
प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतलेले आजचे
पहिले वाचन आपणा सर्वांस सांगत आहे की, परमेश्वर हा प्रजेचा पाठिराखा आहे. कितीही
संकटं, दुःखे, कष्ट सोसावी लागली, तरी तो परमेश्वर आपल्यावर मरणाची वेळ आणू देणार नाही;
किंबहुना तो आपला तारक बनेल, आपले संरक्षण करेल आणि आपल्याला शुद्ध करून
एक नवीन जीवन देईल. ह्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आज आपणास सांगत
आहे की, जरी आज जगावर करोना विषाणूचे संकट उद्भवले असले, तरी भिऊ नका, विश्वासू रहा
कारण तुमचे तारण करावयास मी येईन. तुम्हाला नवजीवन मी देईन. मी
माझ्या देवदूतांना तुमच्यासाठी पाठविन.
त्याचप्रमाणे दुसऱ्या वाचनात संत योहान आपणास
‘आपण कोण आहोत?’ याची जाणीवकरून देत आहे. आपण सर्वजण ‘देवाची मुले’ आहोत
हीच आपली खरी ओळख आहे. परमेश्वराने आपल्या सर्वांना त्याची मुले म्हणून संबोधले आहे
आणि म्हणून आपल्या प्रत्येकाची एक नैतिक जबाबदारी आहे, ती म्हणजे देवाच्या वचनाचं पालन
करून ते अंगीकारणे आणि एक पवित्र जीवन जगून, संतासारखे धार्मिक
मार्गावर चालून दुसऱ्यांना दर्शवून देणे की, खरोखरच मी देवाचा पुत्र किंवा कन्या आहे.
‘भविष्यात आपले काय होईल याची आपणास कल्पना नाही’, असे आवाहन आपणासमोर
संत योहान पुढे ठेवत आहेत. कारण कोणाला मोजता येणार नाही असा
मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व लोकसभेसमोर उभा राहिलेला योहानाच्या दृष्टीस पडला. हा
मोठा लोकसमुदाय म्हणजेच आज सर्व "संतगण" देवाची लेकरे यांनी आपले कपडे कोकराच्या रक्तात घेऊन शुद्ध केले आहेत. याचा
अर्थ असा होतो की, ज्या लोकांनी आपल्या जीवनातील सर्व संकटावर मात करून विजय मिळवला
आहे, त्याच संताचा सण आज आपण साजरा करीत आहोत.
शुभवर्तमानदेखील आपणास हेच सांगत आहे की, रोजच्या
जीवनात परमेश्वराने दिलेल्या आज्ञा आपण पाळल्या आणि त्याच्या शिकवणुकीनुसार जर आपण
वागलो, तर नक्कीच आजच्या ह्या संतांच्या सणांमध्ये आपणही एक दिवस सहभागिता दर्शवू शकतो
आणि हीच अपेक्षा आज परमेश्वर आपणा सर्वांकडून ठेवत आहे. शेवटी ह्या उपासनेद्वारे आपल्याला
तीन गोष्टीची आठवण करून देण्यात येत आहे आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यास आजची उपासना
आवर्जून आपणास सांगत आहे:
१)
आपला परमेश्वर हा आपला पाठीराखा आहे. २) आपली देवाची मुले म्हणून गणती
झालेली आहे. ३) प्रत्येक जण संत होण्यासाठी योग्य व पात्र आहे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे परमेश्वरा दया करून तुझ्या
लोकांची प्रार्थना ऐक.
१.
आपले परमगुरु फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ यांना देवाचे
वचन अधिकारवाणीने सांगता यावे त्यासाठी त्यांनी चिंतन करावे म्हणून आपण प्रभू चरणी
प्रार्थना करूया.
२.
संतांचा आशीर्वाद आपल्या सर्वावर येऊन आपण आपले जीवन पवित्र,
शुद्ध, करून वाईट जीवन सोडावे म्हणून परमेश्वराकडे
विनवणी करूया.
३.
आपल्या पॅरिशमधील जे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, दुःखात आहेत,
जीवनाला कंटाळलेले आहेत अशा सर्व लोकांवर प्रभूचा आशीर्वाद यावा आणि त्यांना
लवकरात लवकर या सर्व त्रासातून मुक्तता मिळावी व नवीन जीवन जगण्याचा मार्ग दिसावा
म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया.
४.
आपल्या देशातील धार्मिक, राजकीय व सामाजिक प्रश्नावर सखोल चिंतन व्हावे
विधायक मार्ग शोधण्यासाठी सर्वस्तरावर चांगला सुसंवाद घडावा म्हणून आपण प्रभू चरणी
प्रार्थना करूया.
५.
आपण प्रत्येक जण देवाची मुले आहोत ह्याचे स्मरण करून आणि त्याप्रमाणे
सतत एक सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न आपल्याकडून व्हावा म्हणून आपल्या परमेश्वराकडे
प्रार्थना करूया.
६. आज संपूर्ण विश्वात ज्या लोकांना करोना विषाणूने पछाडलेले
आहे आणि त्यामुळे ते आजारी झालेले आहेत अशा सर्व लोकांना पवित्र आत्म्याचा स्पर्श व्हावा
व त्यांना लवकरात लवकर देवाच्या मध्यस्थीने बरे होता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment