Wednesday, 23 December 2020

          Reflection for the Homily of Christmas Day (25/12/2020) by Br. Jeoff Patil





ख्रिसमस (सकाळची मिस्सा)

दिनांक: २५-१२-२०२०

पहिले वाचन: यशया:५२:७-१०

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र:१:१-६

शुभवर्तमान: योहान:१:१-१८



प्रस्तावना:

          आज आपण नाताळचा सण साजरा करत आहोत. आजची तिन्ही वाचने देवाने त्याच्या पुत्राद्वारे केलेल्या तारणाची घोषणा करतात. आनंद करा, उल्हासित व्हा कारण आज बाळ येशू जन्मलेला आहे. ह्या संदेशाची भविष्यवाणी यशया संदेष्टा आजच्या पहिल्या वाचानाद्वारे करत असताना सियोनातील लोकांना आनंदघोष करण्यास सांगत आहे. इब्री लोकांस पाठविलेल्या पत्रात संत पौल म्हणतो, पूर्वी देव संदेष्ट्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. पण आता तो आपल्या पुत्राद्वारे आपल्याशी बोलत आहे. आजच्या शुभवर्तमानाद्वारे संत योहान आपणास सांगतो की “शब्द” जो पूर्वी देवाबरोबर होता त्याने मानव रूप धारण करून जगाच्या तारणासाठी तो पृथ्वीवर आला आहे.

          आपण ह्या पवित्र मिस्साबलीदानात भाग घेत असताना बाळयेशूकडे आशीर्वाद व कृपा मागुया आणि त्याच्या प्रेमाचा, शांतीचा, दयेचा व क्षमेचा संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: यशया:५२:७-१०

          सियोनातील लोक जेव्हा गुलामगिरीत होते तेथे त्यांचे खूप छळ चाललेले होते. तेव्हा यशया संदेष्टा त्यांच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येतो. तो त्यांना ह्या प्रस्तुत उताऱ्याद्वारे प्रोत्साहन देतो. जी व्यक्ती आनंदाची बातमी आणते त्या व्यक्तीचे नेहमी स्वागत केले जाते. निवेदकाची आनंदाची बातमी हीच की तारण जवळ आलेले आहे, तो अगदी तुमच्या समोर आहे. ह्या जगात शांती अवतरली आहे.

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र:१:१-६

          देव प्राचीन काळी त्याच्या निवडलेल्या संदेष्टयाद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला व काळाची पूर्तता झाल्यावर त्याने आपला एकलुता एक पुत्र ह्या भूतलावर पाठवला. देवाचा पुत्र देवदुतांपेक्षा श्रेष्ठ गणला व देवाने त्याला सर्व गोष्टींचा वारस बनविला. येशूने ह्या पापी जगाचे तारण केले आहे. त्याने जगात शांतीचा व प्रेमाचा संदेश सर्व मानवजातीला दिला आहे.   

शुभवर्तमान: योहान:१:१-१८

          योहानाच्या शुभवर्तमानाची सुरुवात ही शब्दाने झालेली आहे. योहानाने शब्दाला खूप महत्त्व दिले आहे. हाच शब्द आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये वाचतो. ह्याचा अर्थ असा की, ‘शब्द’ हा वेळेच्या अगोदर होता. ग्रीक भाषेमध्ये शब्दाला ‘लोगोस’ अस म्हणतात. हा शब्द दैवी होता. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे. तो युगानुयुगापासून आहे. ह्या सगळ्यांसाठीच योहान म्हणतो, “प्रारंभी देव होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासह होता.” ख्रिस्त हा विश्वाच्या सुरुवातीपासून आहे. शब्द हा सृष्टीच्या अस्तित्वा अगोदर होता. सृष्टी देवाच्या शब्दाने निर्माण झाली म्हणून शब्द हा जीवनाचा उगम आहे. शब्दामध्ये व देवामध्ये खूप जवळीक आहे. त्यामुळे ‘शब्द’ अनंतकाळाचे देणारे जीवन आहे.

बोधकथा:

          एकेकाळी पर्शिया (इराण) देशात एक सुसज्ज, ज्ञानी व प्रेमळ राजा राज्य करीत होता. तो त्याच्या प्रजेवर खूप, अफाट असे प्रेम करीत होता. परंतु त्याला त्याच्या प्रजेच्या खऱ्याखुऱ्या अवस्था, परिस्थितीचा, समस्यांचा अनुभव नव्हता. म्हणून त्याने आपल्या प्रजेच्या समस्या, त्रास, दु:ख अनुभवण्यासाठी आपला वेश बदलून एका गरीब किंवा भिकाऱ्याच्या वेशात त्याने प्रजेला भेट देण्यास सुरुवात केली. विशेष करून राजा आपल्या राज्यातील गोरगरीब प्रजेला भेट देत होता.

          असाच भेट देत असतांना तो एका गरीब व्यक्तीच्या घरात भेटावयास गेला. त्याने त्या व्यक्तीबरोबर खडबडीत किंवा शिळ्या भाकरी, भिक मागून मिळालेले अन्न, कित्येक दिवसाचे उरलेलं अन्न त्या राजाने त्याच्याबरोबर खाऊन, त्याच्याशी दोन गोड, आनंदी, व दयाळूपणाचे शब्द बोलून त्याचा निरोप घेतला. तसाच परत एकेदिवशी त्याच व्यक्तीला पुन्हा भेट देण्यास राजा आला. परंतु ह्या वेळेस राजाने त्याची आपली खरीखुरी ओळख देत असताना त्याला म्हटले की, “मी तुमचा राजा आहे!” असे बोलून राजाने आपली ओळख दिली. ओळख दिल्या नंतर राजाला वाटले की, हा व्यक्ती आपल्या कडून काहीतरी बक्षीस किंवा भेटवस्तू मागणार, परंतु त्याने तसे केले नाही. उलट त्या गरीब व्यक्तीने राजाला जे म्हटले त्याने राजा आश्चर्य चकित झाला. त्या गरीब व्यक्तीने आपल्या राजाला सांगितले की, “तुम्ही तुमचा राजवाडा, तुमचा ऐशोआराम सोडून आमच्या अंधारमय, कनिष्ट जागेला भेट देण्यास आम्हामध्ये आलात. तुम्ही आमच्या बरोबर शिळ्या भाकरी खाल्ल्यात व आमच्या दु:खात सहभागी झालात, ह्या तुमच्या निस्वार्थी, आपलेपणाच्या स्वभावाणे आमच्या मनात, हृदयात आनंद आणला आहात. तुम्ही दुसऱ्यांना भेटवस्तु दिल्या असतील परंतु, मला तुम्ही तुम्हाला स्वतःला दिले, तेवढेच खूप मोलाची भेट मला ह्या जन्मात भेटली आहे हेच मला पुरे आहे!”

          नाताळचा हा खरा अर्थ आहे. देवाने आपल्याला सर्वात मोठी देणगी दिली आहे ती म्हणजे येशू ख्रिस्त. प्रेषित पौलाने ख्रिस्ताचा उल्लेख देवाची अवर्णनीय भेट असा केला आहे. 

मनन चिंतन:

          “परिपूर्ण झाला काळ आज जन्मला बाळ”

          आज आपण नाताळचा सण साजरा करीत आहोत. देवाचा पुत्र मानवरूप धारण करून आपल्यामध्ये आज आलेला आहे. येशूचा जन्म एक आठवण आहे की देव आपल्याला विसरला नाही. देवाने मानवजातीवर एवढी प्रीती केली की त्याने त्याचा एकलुता एक पुत्र ह्या भूतलावर पाठविला. देवाने आपल्या पवित्र पुत्राला मानवी स्वभाव दिला, जेणेकरून येशू ख्रिस्त आम्हांमध्ये राहील व आपल्या भावना समजून घेईल. देवाने आपल्यावर खूप प्रेम केले आहे.

          आपण देवाने केलेले सर्व उपकार विसरलेलो आहोत. त्याऐवजी आम्ही देवाचा अपमान केला आहे. आपल्या पापीवृत्तीमुळे आपण देवापासून दूर गेलो आहोत. वाईट कृतींमुळे मानवजात देवापासून दुरावली आहे. येशू ख्रिस्ताने शांतीचा संदेश ह्या भूतलावर आणला जेणेकरून आपल्यामध्ये शांतीचे वातावरण निर्माण होईल. परंतु ह्या शांतीचा नायनाट व भंग झाला आहे. जगामध्ये अशांतता निर्माण झाली आहे. महिलांवर होणारे अत्याचार, लुट, चोरी, बेरोजगारी, वस्तूंची महागाई, गरिबांचे हाल ह्या सर्व गोष्टीमुळे मनुष्य हा अशांत झाला आहे आणि मनुष्य शांतीच्या शोधात वाईट व अनैतिक गोष्टींकडे वळून आपले जीवन नष्ट करू लागला आहे. अशा भयंकर व बिकट परिस्थितीत येशू ख्रिस्त ह्या रम्य सकाळी त्याच्या जन्माच्या दिवशी आपल्याला बोलावत आहे व आपल्याला शांती देण्यास आपली आतुरतेने वाट पाहत आहे.

          येशू ख्रिस्त गव्हाणीमध्ये जन्मला पण आज हा येशू ख्रिस्त आपल्या हृदयामध्ये जन्मला पाहिजे तरच आपण येशू ख्रिस्ताची शांती इतरांना देऊ शकतो. नाताळ ही वेळ किंवा काळ नसून ती मनाची अवस्था असते. नाताळ साजरा करायचा असेल तर आपल्यामध्ये देवाचे प्रेम व शांती असणे गरजेचे आहे. “शोधिसी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी.” ह्या म्हणीप्रमाणे आपल्या हृदयात देवाला पाहूया आणि आपली हृदये गोरगरीबांसाठी व आजाऱ्यांसाठी उघडी करूया. एकमेकांना प्रेमाचा, शांतीचा, मायेचा व क्षमेचा संदेश ह्या नाताळच्या काळात देऊया व खऱ्या अर्थाने नाताळ साजरा करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना :

आपला प्रतिसाद: प्रभू आमचे तारण कर.

१. आपल्या ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले परमगुरु, महागुरू, धर्मबंधू-भगिनी व सर्व व्रतस्थ यांनी ख्रिस्ताच्या प्रेमाचा संदेश सर्वाना द्यावा व त्याच्या तारणासाठी त्यांना प्रभूकडे आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. जे कोणी ख्रिस्तापासून दुर गेले आहेत, पापाच्या आहारी जाऊन वाईट जीवन जगत आहेत त्यांना ख्रिस्ताच्या प्रेमाचा व दयेचा अनुभव यावा व त्यांनी ख्रिस्ता जवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. जे कोणी दुःखी, कष्टी आहेत व निरनिराळ्या कारणास्तव ख्रिस्त जयंती साजरी करू शकत नाहीत, त्यांनाही ख्रिस्ताचा प्रेमळ अनुभव यावा व ख्रिस्तजन्माने त्यांना त्यांच्या दुःखातून बाहेर पडण्यास मदत मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. आपले मिशनरी बंधू-भगिनी जे देशाच्या अनेक काना-कोपऱ्यात जाऊन प्रभूची सुवार्ता लोकांना देत आहेत, त्यांना बाळ येशूची कृपा व सामर्थ्य मिळावे व प्रभूची सुवार्ता सर्वाना अशीच त्यांनी द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपल्या समाजात अशी बरीच विवाहित लोक आहेत ज्यांना त्यांच्या प्रेमाचे फळ प्राप्त झालेले नाही. बाळ येशूची कृपा-दृष्टी त्यांच्यावर पडावी व त्यांना त्यांच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून बालकाचे दान मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रभू येशू कडे प्रार्थना करूया. 







No comments:

Post a Comment