Thursday, 17 December 2020

                     Reflection for the 4th Sunday of Advent (20/12/2020) by Br. Pravin Bandya





आगमन काळातील चौथा रविवार

दिनांक: २०-१२-२०२० 

पहिले वाचन:  २ शमुवेल ७:१-५८ब-१२,१४अ,१६

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १६:२५-२७

शुभवर्तमान:  लुक १:२६-३८




प्रस्तावना:

 “पहा मी प्रभूची दासी आहे; आपण सांगितल्या प्रमाणे माझ्याठायी होवो” (लुक १:३८)

          आज आपण आगमन काळातील चौथ्या आठवडयात पदार्पण करीत आहोत आणि प्रकाशाचा दिवस म्हणजे ख्रिस्त जन्माचा दिवस अगदी जवळ येऊन ठेपला आहे. ज्या तारणाऱ्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो बाळ येशू, काही दिवसांत आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये जन्म घेणार आहे.

          आजची उपासना आपणास येशू ख्रिस्ताच्या सर्वकाळ टिकणाऱ्या राज्याविषयी सांगत आहे. परमेश्वर दावीद राज्याबरोबर करार करून सांगतो की, “तुझ्या पोटच्या वंशजास तुझ्यामागून स्थापून त्याचें राज्य स्थापीन”. आणि हेच आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये वाचतो की, देवदूत पवित्र मरियेकडे येऊन तिला येशू ख्रिस्ताविषयी सांगतो की तो थोर होईल व तो त्याचा पूर्वज दावीद ह्याच्या राज्यासनावर बसेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. प्रभू येशूचे राज्य हे अनंतकाळ टिकणारे राज्य आहे ह्यावर पवित्र मरीयेप्रमाणे माझा विश्वास आहे का?

          तारणाऱ्या बाळ येशूच्या जन्माची तयारी करिता असतांना त्याच्या योजना पूर्णत्वास आणण्यासाठी मी सिद्ध आहे का? पवित्र मरीयेप्रमाणे प्रभूच्या पाचारणाला होकार देण्यास माझी श्रद्धा मजबूत आहे का? कुमारी मरीयेप्रमाणे आपल्या जीवनात प्रभूच्या इच्छेला प्राधान्य देऊन आपण त्याला शरण जाऊया.

पहिले वाचन:  २ शमुवेल ७:१-५८ब-१२,१४अ,१६         

          आजच्या पहिल्या वाचनाचा परिच्छेद देवाने दाविदाला दिलेल्या वचना (करारा) विषयी आहे. दावीद राजाने केलेल्या मंदिराविषयीच्या प्रस्तावाला नाथान संदेष्टा मान्यता देतो. तथापि, परमेश्वर त्वरित ह्या गोष्टीला नकार देतो. कारण ते मंदिर देव स्वतः बांधणार होता. दावीद हा इस्त्राएलाचा महान राजा आहे आणि इतिहासातील सर्वात महान पुरुष म्हणून त्याची प्रतिष्ठा कायम आहे. ह्या योजना दाविदाच्या पुत्राला म्हणजे तारणाऱ्याला (येशू ख्रिस्ताला) पाठविण्याच्या देवाच्या योजनेच्या पूर्ततेवर अवलंबून आहेत. ज्या देवाच्या लोकांना नेहमी आवश्यक असणारी सुरक्षा व शांती मिळवून देतील.  

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १६:२५-२७

          आजच्या दुसऱ्या वाचनाच्या परिच्छेदात, संत पौल त्या गोष्टींबद्दल बोलतो, ज्या दीर्घ काळापासून गुप्त ठेवल्या गेल्या होत्या परंतु आता त्या प्रकट करण्यात आल्या आहेत. जे तो लिहित आहे ते रहस्य काय आहे? ह्या सामान्य उपयोगातील रहस्य एक गोपित किंवा कोडे आहे ज्याचे उत्तर अदयाप सापडलेले नाही, ज्याचे महत्व आताही लपलेले आहे. पौलच्या मते रहस्य म्हणजे देवाचे जग (विश्व) अंमलात आणण्यासाठी योजना होय. हे जगासाठी देवाच्या हेतूंचे प्रकटीकरण आहे, एका विशिष्ट क्षणापर्यंत लपलेले परंतु आता एक प्रकारचे मुक्त रहस्य बनले आहे. हीच सुरुवातीपासून देवाची योजना होती आणि आता ती येशूच्या जीवन, मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे प्रकट झाली आहे. ही योजना येशूच्या जीवनाद्वारे उघडेल. म्हणूनच, रहस्य प्रामुख्याने ख्रिस्तामध्ये असलेल्या देवाच्या तारण कार्याच्या संदर्भात आहे. 

शुभवर्तमान:  लुक १:२६-३८

          आजचे शुभवर्तमान येशूच्या जन्माची घोषणा करत आहे. संत लुक, येशूच्या जन्माची घोषणा, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्माच्या घोषणेनंतर लगेच करतो. संत मत्तयच्या  बालपणातील अहवालात, योसेफ ही महत्वाची व्यक्ती आहे. आणि  संत लुक पवित्र मरीयेवर लक्ष केंद्रित करतो की ती समाजातील सर्वात शक्तिहीन लोकांमध्ये आहे. शिवाय, तिचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी तिला पती किंवा मुल नाही. म्हणू जेव्हा देवदूत तिला अभिवादन करतो तेव्हा ती गोंधळात पडते. शेवटी जेव्हा देवदूत स्पष्ट करतो की मानवी कृती नव्हे तर दैवी शक्ती ह्या जन्माचं कारण असेल, तेव्हा ती आज्ञाधारक विश्वासाने प्रतिसाद देते. मरीयेला खात्री होती की परमेश्वर हे सर्व शक्य करेल. आणि म्हणून ती होकार देते.    

मनन चिंतन:

          देवाचे मार्ग माणसाचे मार्ग नाहीत. आजच्या वाचनात आपल्या सर्वांसाठी एक संदेश आहे. आपण योजना बनवतो, उच्च आध्यात्मिक आदर्शासह उत्कृष्ट योजना देखील आपण आखतो. परंतु काही कारणास्तव ते परमेश्वराला हवे नसते. दावीद राजाची परमेश्वरासाठी मंदिर बांधायची योजना उत्कृष्ट होती परंतु परमेश्वराला ते हव नव्हत. परमेश्वराने त्याला वचन दिले की, मी एक राज्य, एक वंश देईन, जे कायमचे टिकेल. ख्रिस्त, दाविदाचा वंशज, आता संपूर्ण ख्रिस्तसभेवर राज्य करत आहे.

          असे कित्येक धार्मिक पालक आहेत, जे आपल्या मुलांना प्रभूच्या मार्गावर चालण्यास उत्सुक करतात, परंतु त्यांना नंतर समजते की परमेश्वराची त्यांच्यासाठी धर्मगुरू किंवा धर्मभगिनी बनण्याची योजना नाही. देवाच्या योजना वेगळ्या आहेत परंतु त्या त्याने निराश पालकांना उघड केल्या नाहीत. अनेक वेळा आपण तरुण धर्मप्रचारकांना पाहिले आहे ज्यांनी भरपूर कष्ट करून दुसऱ्या देशाची भाषा, प्रथा आपल्या मेहनतीने शिकून देखील कधी कधी त्यांच्या आजारपणामुळे किंवा काही कारणास्तव त्यांना आपल्या देशात परतावे लागले; कारण ही देवाची योजना होती की त्यांनी आपल्या लोकांबरोबर कार्य करावे.

           पवित्र मरिया ही लग्न वयाची मुलगी होती. तिचे योसेफाशी लग्न होणार होते. परंतु जेव्हा देवदूत तिच्याकडे येऊन म्हणतो, “हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो. तू देवाच्या पुत्राची आई होणार, ज्याला इम्मॅनुएल असे म्हणतील.” तेव्हा तिच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील आणि म्हणूनच ती म्हणते, “हे कसे शक्य आहे कारण मला पुरुष ठाऊक नाही.” आपल्याला ही कथा लहानपणापासूनच परिचित आहे. परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. तो आपल्यासाठी प्रत्येक वेळेला योजना आखत असतो. यिर्मया संदेष्ट्याच्या पुस्तकातील २९:११अ मध्ये परमेश्वर म्हणतो, “तुम्हांविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प तुमच्या हिताचे आहेत, आणि अनिष्टाचे नाहीत.” म्हणू देवाच्या मनात आपल्यासाठी ज्या योजना आहेत त्या आपल्या चांगल्यासाठी आहेत.

          म्हणूनच आपण देवाने आपल्यासाठी जी योजना आखली आहे ती आनंदाने स्विकारुया. आपल्या दृष्टीने काय चांगले आहे आणि काय इतरांना अनुकूल आहे हे सर्व परमेश्वराला ठाऊक आहे. आज आपण परमेश्वरासमोर उभे राहण्यास आपली पात्रता आहे का, हे पाहण्यासाठी आपल्या अंतःकरणात डोकावून पाहण्यास ही योग्य संधी आहे. ह्या आठवडयात आपण नाताळ साजरा करणार आहोत. परमेश्वराने आपल्यासाठी काय केलं आणि काय करत आहे, हे गोठ्यातील बाळ आपल्याला आठवण करून देत आहे. त्याबद्दल, आपण काय करत आहोत? आपण ख्रिस्ताचे खरे अनुयायी बनून कृतज्ञता दाखवली आहे का? जर आपला उत्तर ‘नाही’ असेल, तर आपला मार्ग बदलण्याची आणि पुन्हा एकदा योग्य मार्गाकडे जाण्याची हीच वेळ आहे. परमेश्वर आज आपल्याला हेच विचारत आहे. तर आपले उत्तर, “पहा, हे प्रभू, तुझा नम्र आणि कृतज्ञ सेवक, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्याठायी होवो,”  असे असले पाहिजे. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू आमची हृदये तुझ्या स्वागतासाठी शुद्ध कर.

१. आपले परमगुरूस्वामीसर्व महागुरूधर्मगुरू व व्रतस्थ बंधूभगिनी यांनी परमेश्वराची ईच्छा शिरोभागी ठेऊन त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदारीत एकनिष्ठ राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपल्या धर्मग्रामातील प्रत्येक कुटुंबाने व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने या आगमनकाळात आपली हृदये प्रायश्चित संस्कार घेऊन शुद्ध करावीत व प्रभूस्वागतासाठी सज्ज असावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या विशेषतः कोरोनाच्या रोगाने पिडीत असलेल्या सर्व व्यक्तींना प्रभूच्या दैवी स्पर्शाचा सात्विक अनुभव यावा आणि त्यांना त्यांच्या वेदना सहन करण्यास शक्ती व सामर्थ्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. पिक भरपूर आहे परंतू कामकरी थोडेच आहेत’ म्हणून मरीयेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन अनेक तरुण तरुणींनी ईश्वराच्या हाकेला प्रतिसाद देऊन प्रभूमळ्यात सेवा करण्यास स्व-ईच्छेने पुढे यावेम्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आता थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिककौटुंबिक आणि सामाजिक गरजा प्रभूचरणी मांडूया. 




1 comment: