आगमन काळातील दुसरा रविवार
दिनांक: ०६/१२/२०२०
पहिले वाचन: यशया ४०:१-५,९-११
दुसरे वाचन: २ पेत्र ३:८-१४
शुभवर्तमान: मार्क १:१-८
प्रस्तावना:
आज ख्रिस्तसभा आगमनकाळातील दुसरा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणा सर्वांना पश्चाताप करण्यासाठी व त्याद्वारे परिवर्तन घडवून पापाचे साम्राज्य संपुष्टात आणण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आज ख्रिस्त त्याच्या संदेष्टामार्फत आपणास आशा व दिलासा देत आहे. आपल्या प्रजेला देवाच्या स्वागतासाठी व त्याला स्वीकारण्यासाठी त्यांचे अंतकरण स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी देव आवाहन करीत आहे. परमेश्वर आपणास जीवन देणार आहे व ह्या नवजीवनासाठी आपण मनाची तयारी करणे ही खूप महत्वाचे आहे. त्यासाठी लागणारी कृपा व सामर्थ्य ह्या मिस्साबलिदानात मागुया.
सम्यक विवरण
पहिले वाचन: यशया
४०:१-५, ९-११
आजच्या पहिल्या वाचनात देव यशया संदेष्टाला निवडून देवाच्या प्रजेला सांत्वन करण्यासाठी व त्यांना धीर देण्यासाठी सांगतो. यशया संदेष्टाला परमेश्वर जबाबदारी देतो व त्याद्वारे त्याला त्या लोकांच्या मनामध्ये आशा निर्माण करून त्यांना परमेश्वराच्या सहवासात आणतो. पश्चाताप करून, पापी जीवनाचा तिरस्कार करून नवजीवनाचा लाभ घेण्यासाठी परमेश्वर आवाहन करत आहे.
दुसरे वाचन: २ पेत्र ३:
८-१४
आजच्या दुसऱ्या वाचनात संत पीटर त्याच्या दुसऱ्या पत्रात आपणास सांगत आहे की कशाप्रकारे लोक ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची वाट पाहत आहेत आणि त्यांना त्या घटकेसाठी संत पेत्र कशाप्रकारे सतर्क व सावध राहण्याचा इशारा देत आहे, हे आपणास सांगत आहे. पापांचा पश्चाताप करून जीवन परिवर्तन करण्याचा सल्ला आजच्या दुसऱ्या वाचनात आपणास देत आहे.
शुभवर्तमान: मार्क १:
१-८
जगाच्या तारणप्राप्तीसाठी व पापावर मात करून नवजीवन देण्यासाठी येशू ख्रिस्ताला ह्या मानवी जीवनात देह्धारण करून यायचे होते. त्यासाठी देव बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची प्रभूचा मार्ग सिद्ध करण्यासाठी व हताश झालेल्या लोकांमध्ये नवचैतन्य पसरविण्यासाठी निवड करतो. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने कशाप्रकारे लोकांमध्ये देवाच्या आगमनाची तयारी करून त्यांना पापापासून दूर राहण्यासाठी व पवित्र, निर्मळ जीवन जगण्यासाठी आवाहन करतो.
मनन चिंतन:
प्रत्येक मनुष्य
हा चांगल जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. पण पुष्कळ वेळा मनुष्य चुकीच्या जागेवर
चांगले जीवन शोधत असतो. चुकीच्या ठिकाणी फिरत असतो, परंतु त्याला ते सुंदर जीवन
मिळत नाही. अशी एक कथा आहे: एके दिवशी रमेश नावाचा मनुष्य काहीतरी शोधत होता.
त्याच क्षणाला त्याचा एक मित्र उमेश त्याला भेटला व आपल्या मित्राला पाहून त्याला विचारतो
की तुम्ही काय शोधता? लगेच त्याच्या मित्राने उत्तर दिले की माझी चावी हरवलेली
आहे, ती मी शोधतो. रमेशला मदत करण्याच्या हेतूने उमेशसुद्धा चावी शोधायला लागला
काहीवेळाने उमेशने रमेशला विचारले की तुझी चावी कोठे हरवली होती त्यावर रमेशने
उत्तर दिले की चावी माझ्या घरी हरवलेली होती त्यावर उमेश म्हणाला, मग तू इथे का
शोधतोस? त्यावर रमेश म्हणाला कारण इथे उजेड आहे, प्रकाश आहे. ख्रिस्ताठायी
जमलेल्या माझ्या प्रिय बंधुभगिनींनो जीवन चांगले ठेवायचे असेल तर आपणास ते जीवन
जेथून हरवले तेथे शोधायचे आहे व त्या जीवनाचा शोध आपणाला देवाकडून शोधायचा आहे.
कारण जेथे देव आहे तेथे नवे आकाश व नवी पृथ्वी आहे.
आजच्या
शुभवर्तमानात बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्याविषयी व त्याने ख्रिस्ताच्या
आगमनासाठी केलेली तयारी ह्याबद्दल सांगितले आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने
पश्चाताप व परिवर्तन करून नवे जीवन जगण्यासाठी आवाहन केले आहे. पापमार्ग, कुकर्म व
इतर वाईट मार्गाचा त्याग करून निस्वार्थी व निर्मळ जीवन जगून प्रभूच्या आगमनासाठी
व त्याला स्वीकारण्यासाठी आपण तयारी केली पाहिजे ती तयारी म्हणजे अंतकरणाची तयारी.
यशया संदेष्टाने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी जे भाकीत केले होते तेच जणू
आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकत आहोत ती म्हणजे घोषणा करण्याऱ्याची वाणी ऐकू येते की,
अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा. ह्या वाणीद्वारे बाप्तिस्मा करणारा योहान
देवाच्या प्रजेला परमेश्वराच तारण व त्याला स्वीकारण्यासाठी आपली अंतकरणे स्वच्छ व
निर्मळ ठेवून व त्याच्या स्वागतासाठी आपणास तयारीत राहण्याचा सल्ला देत आहे.
पापाच्या क्षमेसाठी पश्चाताप करून देवाच्या सानिध्यात येण्यासाठी आपणास संदेश देत
आहे. त्याच्या जीवनातून आपणास तीन महत्त्वाचे मुद्दे मिळत आहेत. एक म्हणजे
खात्रीपूर्वक, दुसरे म्हणजे धैर्यशील व तिसरे खूप महत्त्वाचे ते म्हणजे नम्रपणा. बाप्तिस्मा
करणाऱ्या योहानाने आपलं पाचारण मजबूत व प्रबळ बनवण्यासाठी त्याने खात्रीपूर्वक,
धैर्यशील व नम्रपणा ह्या तीन गोष्टी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
१. बाप्तिस्मा करणारा योहान: हा त्याच्या मिशनकार्यात खात्रीपूर्वक होता व तो देवाचा अग्रदूत होता.
त्याच्या वडिलांनी, जखऱ्याने गायलेल्या स्तुतीसुमनात ते म्हणतात की, “हे बाळका,
तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरिता तू
त्यांच्यापुढे चालशील ह्यासाठी की त्याचा लोकांस त्यांच्या पापाच्या क्षमेने
तारणाचा अनुभव द्यावा” (लुक १: ७६-७८). त्याला देवाच्या आगमनाची आशा होती.
२. संदेष्टाची भूमिका: बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची भूमिका ही संदेष्टासारखी होती. ती भूमिका
त्याने इतरांशी चांगले बोलून नाही किंवा दुसऱ्यांना आनंदी करून नाही तर एक कणखर व
देवाला व त्याच्या कार्याला निर्भीडपणे हातभार लावणारा संदेष्टा. परुशी व सदुकी जे
त्याचा संदेश स्वीकारत नव्हते व पश्चाताप करण्यास तयार नव्हते त्यांस त्याने
‘सापांची पिल्ले’ अशी उपमा दिली तर हेरोद राजाचे चुकीचे निर्णय धुडकावून
त्याच्याशी सामना करण्यास तो धजला नाही. नैतिक मुल्ये जोपासून व सत्यासाठी व
न्यायासाठी तो खंबीरपणे उभा राहिला.
३. सर्वात महत्त्वाचे
म्हणजे नम्रपणा: बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्या
जीवनात नम्रतेची स्वच्छ व सुंदर अशी उदाहरणे आपणास दिसून येत आहेत. “मी संदेष्टा
नाही आहे. मी एलिया नाही आहे. त्याच्या पायताणाचा बंद सोडण्यास मी योग्य नाही (योहान
२:२६).
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म हा देवाचा मार्ग तयार करण्यासाठी होता व
आपणास प्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी सांगत आहे. आपलं पाचारण हे सुर्वातिक असले
पाहिजे. आपण सुद्धा एक सुर्वातिक जीवन जगले पाहिजे. अनुकूल वातावरण निर्माण करून
प्रभूच्या स्वागतासाठी आपण सज्ज राहून व तयारीत राहून त्याला स्वीकारण्यासाठी
आपणास पाचारिले आहे. अज्ञानीपण, गैरसमज व अंधश्रद्धेचा काळोख बाजूला सारून सत्याचा
प्रकाश मानवतेला देण्यासाठी आपणास पाठविले आहे. पाप ही मृत्यूची सावली आहे.
त्यासाठी आपण लोकांना पश्चाताप व परिवर्तनासाठी आमंत्रित करून त्यांना देवाचरणी
आणून त्यांच जीवन प्रकाशाने व सत्याने बहरून आणण्यासाठी आपल्याला निवडलेले आहे.
व्यक्ती ही देवाने त्याच्या कार्यासाठी व सुर्वातेच्या प्रचारासाठी निवडलेली व
आमंत्रित केलेली आहे. आपण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाप्रमाणे आपल्या जीवनात असेच
धैर्याचे व नम्रपणाचे जीवन जगून आपल्या कृतीने, शब्दाने व विचाराने ख्रिस्ताला
लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण ह्या मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थाना :
प्रतिसाद: हे प्रभो,
तुझी सुर्वाता पसरविण्यास मला धीर व शक्ती दे.
१. वैश्विक ख्रिस्तसभेचा
कारभार पाहणारे आपले परमगुरु फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू,
धर्मबंधू व धर्मभगिनी यांना परमेश्वराचे
सहाय्य लाभावे व देवाच्या प्रजेला आध्यात्मिक सक्षम व प्रबळ बनविण्यासाठी कृपा व
सामर्थ्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. कोरोना व्हायरसमुळे जे लोक बाधित आहेत, जे
डॉक्टर्स व नर्सेस त्या आजारावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा सर्वांना
परमेश्वराने धीर व आधार द्यावा व ह्या आजारापासून मुक्तता व्हावी म्हणून आपण
प्रार्थना करूया.
३. या आजारामुळे जे लोक उपाशी आहेत, जे
बेरोजगार आहेत अशा सर्वांना योग्य ती मदत मिळावी त्यांना व त्यांच्या कुटुंबात सुख
व शांती पसरावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे परदेशी आहेत व जे कामानिमित्त स्थलांतरित
झालेले आहेत अशा सर्वांचे परमेश्वराने रक्षण करावे व त्यांना निरोगी स्वास्थ
लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. सर्व राजकीय नेत्यांनी ह्य परिस्थितीत
लोकांना योग्य ती मदत करून व देशाला व राज्याला योग्य दिशेने नेण्यास योग्य ती
पाऊले उचलण्यासाठी परमेश्वराचे सहकार्य लाभावे व ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी
कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक,
कौंटुंबिक व सामुहिक हेतुंसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment