Thursday, 13 January 2022

    Reflection for the Second Sunday in Ordinary Time (16/01/2022) By: Br. Suhas Ferrel.



सामान्य काळातील दुसरा रविवार 

दिनांक: १६/०१/२०२२

पहिले वाचन: यशया ६२:१-५

दुसरे वाचन: १ करिंथ. १२:४-११

शुभवर्तमान: योहान २:१-११

तो जे काही सांगेल ते करा

प्रस्तावना:

आजची उपासना आपल्याला आपला देवावरील असलेला विश्वास व श्रद्धा बळकट करण्यासाठी आमंत्रण करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये यशया संदेष्टा आपणा सर्वा बोध करीत आहे की, ज्याप्रमाणे एखादा युवक एखाद्या युवतीशी लग्न करून आनंदित होत असतो, अगदी त्याच प्रमाणे आपला देवही आपल्यावर आनंदित होईल.

आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल करिंथकरां पाठविलेल्या पत्रामध्ये म्हणतो की, ज्याप्रमाणे दाने अनेक आहेत परंतु, पवित्र आत्मा एकच आहे; अगदी त्याचप्रमाणे सेवा करण्याचे विभिन्न मार्ग आहेत परंतु, त्यासाठी लागणारी कृपा व शक्ती देणारा परमेश्वर मात्र एकच आहे. आपणा सर्वांना परमेश्वराने वेगवेगळ्या प्रकारच्या पवित्र आत्म्याच्या दानांने अभिषिक्त केले आहे.

आजच्या शुभवर्तमानामध्ये काना गावी घडलेल्या आलकित कृत्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण हे लोकांसमोर प्रात्यक्षित रीतीने समोर आले आहे. प्रभू येशूने केलेल्या चमत्कारामुळे त्याच्या शिष्यांचा विश्वास हा अगदी दृढ बनला. आजच्या ह्या मिस्साबलिदानामध्ये सहभागी होत असताना आपला प्रत्येकांचा देवावर असलेला विश्वास हा दृढ व्हावा व दिवसेंदिवस त्या विश्वासामध्ये वाढ व्हावी म्हणून विशेष प्रार्थना करूया.

 

मनन चिंतन:

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो चिन्हे ही आपल्या दररोजच्या जीवनामध्ये किंवा व्यवहारांमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आपण एखाद्या ठिकाणी प्रवासाला जात असताना रस्त्याच्या कडेला दर्शविलेल्या चिन्हाद्वारे आपल्याला योग्य अशी दिशा समजत असते. बहुतेकदा आपण चिन्ह आणि प्रति या दोन्ही गोष्टींमध्ये गोंधळात असतो. इंग्रजी भाषेमध्ये चिन्ह म्हणजे ‘Sign’ आणि प्रति म्हणजे ‘Symbol’. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा प्रतिक म्हणून उल्लेख करतो, त्याचा अर्थ प्रति हे जणूकाही संपूर्ण स्पष्टीकरण हे त्यामध्येच सामावलेलं असते. उदाहरणार्थ, तिरंगी रंगाचा झेंडा. नारंगी, पांढरा, आणि हिरवा आणि मध्ये अशोकचक्र’, जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपणासमोर भारत देश उभा राहतो. म्हणजेच ‘तिरंगी झेंडा हे भारत देशाचे प्रतिक आहे. परंतु, जेव्हा आपण एखाद्या चिन्हाचा उल्लेख करतो तेव्हा, आपल्या निदर्शनास येते की, चिन्हे हि स्वतःपुरता सीमित न राहता स्वतःच्या पलीकडे जाऊन काहीतरी संकेत देत असतात. उदाहरणार्थ, रस्त्याच्या कडेला लावलेल्या बाणाची दिशा जर ती सरळ असेल तर, सरळ जाणे, नाहीतर उजव्या किंवा डाव्या बाजूला वळणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच ते चिन्ह हे आपल्याला काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करीत असते.

प्रिय बंधु-भगिनींनो प्रभू येशूच्या मकृत्यांचे वर्णन हे चारही शुभवर्तमानामध्ये केलेले आपण वाचतो. परंतु, योहानाचे एकमात्र शुभवर्तमान असे आहे की, जे प्रभू येशूच्या मह कृत्यांचे वर्णन हे चमत्कार ह्या शब्दाद्वारे व्यथित न करता चिन्ह ह्या शब्दाद्वारे वर्णन करते. कारण, कदाचित योहानाला कल्पना होती की, येशूच्या काना गावी केलेल्या मह कृत्यांद्वारे येशू काहीतरी पलीकडे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. काही धर्मपंडितांच्या मते प्रभू येशूने केलेल्या चमत्काराद्वारे म्हणजेच पाण्याचे द्राक्षरसात रूपांतर करून प्रभू त्याच्या शेवटच्या क्षणाची पूर्व कल्पना करून देत आहे. जिथे तो आपल्या निवडलेल्या लोकांसमवेत सहभोजन घेईन आणि त्यावेळी भरपूर द्राक्षरस असेल म्हणजेच आनंदाचा कळस गाठला जाईल. हे जणूकाही पूर्वचिन्ह होते.

येशू ख्रिस्त हा स्वतः एक चिन्ह होता. त्याने ह्या भूतलावर येऊन मानवरूप धारण केले. तो स्वतः देव असून माणूस झाला. पूर्वीच्या काळी यहुदी लोकं चिन्हावर विश्वास ठेवत असत. म्हणूनच आपण योहानाच्या शुभवर्तमानामध्ये वाचतो की, जमाव प्रभू येशूला विचारत होते, प्रभुजी आपण आम्हाला कोणते चिन्ह दाखवणार आहात? जेणेकरून आम्हाला तुमच्यावर विश्वास बसेल. हे विचारण्याचे कारण म्हणजे, यहुदी लोकांनी येशूला पूर्णपणे ओळखले नव्हते. शास्त्री, परुशी हे अध्यात्मिकरित्या आंधळे झाले होते. आज आपल्यापैकी सुद्धा बहुतेकजण देवाकडे काही ना काही गोष्टींसाठी चमत्काराची अपेक्षा करत असतो. देवा मला चमत्कार दाखव म्हणजे मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. चमत्कार पाहिल्याशिवाय मी नमस्कार करणार नाही अशी आपली भावना असते. तर माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो आपण सुद्धा शास्त्री-परुश्यासारखे आहोत का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारूया.

आजच्या पहिल्या वाचनामध्ये शया संदेष्ट्याद्वारे आपणास सांगण्यात येते की, ज्याप्रमाणे वर आपल्या वधूशी आनंदित असतो, त्याचप्रमाणे आपला देवही आपल्याशी आनंदित असेल. परंतु, त्याच्यासाठी  आपणाला आपल्या देवाशी एकनिष्ठ राहण्याची गरज आहे. त्यासाठी लागणारी दाने ही आपल्याला पवित्र आत्म्याच्याद्वारे मिळत असतात. तेच आपण दुसऱ्या वाचनामध्ये वाचतो. हि दाने आपल्या प्रत्येकाला स्वतःसाठी नव्हे तर, सार्वजनिक हितासाठी दिली गेली आहेत.

जेव्हा मरियेने येशूला विनंती केली, तेव्हा येशू ज्याप्रमाणे आईशी बोलला हे थोडे विचित्र वाटते. परंतु, तो पित्याखेरीज कोणाचेही ऐकतो असा गैरसमज होऊ नये ह्याचा त्याचा स्पष्ट उद्देश होता. येशूने काना गावी आपल्या आईच्या शब्दाला ताबडतोब होकार दिला नाही परंतु नंतर तो होकार देतो व विनंती पूर्ण करतो. मरियेचा येशूवर विश्वास होता व येशूने मरियेचा विश्वास पाण्याचे रूपांतर द्राक्षरसात करून पूर्ण केला. येशूने अडचणीत असलेल्या लोकांना मदत केली. आपणही अनेक दाणांनी संपन्न आहोत. आपल्याला अवगत असलेल्या दानांचा वापर आपण नेहमी इतरांना मदत करण्यासाठी करावा म्हणून आजच्या ह्या शुभदिनी प्रार्थना करूया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.”

१.    आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी, व सर्व कार्यकर्त्यांना बाळ येशूचा स्पर्श व्हावा व प्रभूच्या प्रेमाचा संदेश त्यांनी सर्वत्र पसरावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.    कुटुंबातील संबंध प्रेमाचे व सलोख्याचे असून प्रत्येक कुटुंबामध्ये शांतीचे व एकीचे वातावरण नेहमी नांदावे म्हणून प्रार्थना करूया.

३.    आपल्या धर्मग्रामातील अनेक युवक-युवतींनी प्रभूच्या हाकेला होकार देऊन त्याच्या मळ्यामध्ये काम करण्यासाठी उस्तुकता दाखवावी म्हणून प्रार्थना करूया.

४.    जे दाम्पत्य अपत्यहीन आहेत त्यांना देवाच्या कृपेने माता-पिता होण्याचे भाग्य लाभावे म्हणून प्रार्थना करूया.

५.    पवित्र मरियेप्रमाणे आपला सर्वांचा देवावरील विश्वास बळकट व्हावा व देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी आपणा सर्वांना प्रेरणा व शक्ती लाभावी म्हणून प्रार्थना करूया.

६.    थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.



No comments:

Post a Comment