Reflection for the Third Sunday in Ordinary Time (23/01/2022)
By: Br. Brian Motheghar.
सामान्य काळातील तिसरा रविवार
दिनांक: २३/०१/२०२२
पहिले वाचन: नहेम्या ८:२-४अ, ५-६,
८-१०
दुसरे वाचन: १ कोरींथ १२:१२-३०
शुभवर्तमान: लुक १:१-४;४:१४-२१
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील तिसरा
रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला ख्रिस्ताद्वारे तारणाची सुवार्ता
प्राप्त झाली आहे ह्या विषयी सांगत आहे. हि सुवार्ता आपल्याला देवाची प्रिय लेकरे
बनवून त्याच्या राज्यासाठी आपण एकत्र काम करण्यासाठी सक्षम बनवत असते.
आजच्या पहिल्या वाचनात आपण वाचतो की, कशाप्रकारे लोकांनी त्यांचे ध्येय्य आणि
स्वातंत्र्य साध्य करण्यासाठी एकत्र काम केले आणि त्यानंतर नहेम्याने त्यांना
एकत्र केले आणि त्यांना पवित्र शास्त्रपाठ वाचून दाखवला आणि लोकांनी आपल्या माना
नम्र करून त्या देवाच्या शब्दाला मानवंदना दिली.
आजचे दुसरे वाचन हे संत पौलाचे करिंथकरांस लिहिलेले पत्र आहे. त्यात संत पौल करिंथकरांस
एकजुटीने राहण्यासाठी आणि ख्रिस्ताचे एक शरीर म्हणून एकत्र काम करण्यासाठी
प्रीत्साहित करीत आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती हा महत्वाचा
आहे असे मानणे गरजेचे आहे. एकमेकांबद्दल सलोखा, समंजसपणा, प्रामाणिकपणा, आणि
परस्पर आदर असणे आवश्यक आहे.
आजच्या शुभवर्तमानात संत लुक हा ख्रिस्ताविषयी घडलेल्या घटनांचा स्वतः शिक्कामोर्तब
करतो आणि त्यने लिहिलेला अहवाल हा ठोस आणि व्यवस्थित आहे असे सांगतो. तसेच आजच्या
शुभवर्तमानात ख्रिस्त आपल्या सुवर्तिक कार्याचे ध्येय्य प्रस्तापित करीत आहे हे
आढळून येते. यशया संदेष्ट्याने भाकीत केलेल्या देव राज्याची पुनरावृत्ती आजच्या
शुभवर्तमानात आपल्याला वाचावयास मिळते.
येशूची सुवार्ता आपल्याला अनेक अशा बंधनांतून मुक्त करत असते, म्हणून आजच्या
ह्या उपासनाविधीत भाग घेत असता आपण कोणत्या बंधनात बांधलो गेलो आहोत त्याचा विचार
करूया आणि त्या तारणदायी देव पुत्राकडे आपल्या नवीन जीवन जगण्यास प्रेरणा आणि
सहाय्य मागूया.
मनन चितन:
ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू आणि
भगिनींनो आजची उपासना आपल्याला अनेक अशा बंधनांतून मुक्त करून सक्षम बनवत आहे. आजचे
पहिले वाचन हे आपल्याला सांगते की, त्या दिवशी एज्रा ह्या याजकाने शास्त्रपाठ घेऊन
तो लोकांपुढे वाचून दाखवला आणि त्याचा लोकांनी नम्रतेने स्विकार केला. कारण,
त्याने जे काही वाचले होते ते लोकांना समजले होते. त्यांना त्यांच्या जीवनात देवाच्या
वचनांनी स्पर्श केला म्हणून ते रडू लागले होते. त्यांनी आपल्या पापांची कबुली केली.
कारण, त्यांना समजले होते की, त्यांच्या पूर्वजांनी देवाशी केलेला करार मोडला होता
आणि बेकायदेशीर बनले होते. आता त्यांनी एज्रा समक्ष त्या वचनांची पुनरावृत्ती केली
आणि उत्स्फुतेने देवाच्या शब्दाला दंडवत दिली.
बरोबर ५०० वर्षा नंतर त्याच दिवशी म्हणजे शब्बाथ दिवशी जेव्हा यहुदी आपल्या सभास्थानात
गेले असता प्रभू येशूने यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातील ६१:१-२ हा भाग उघडला आणि
वाचावयास सूरूवात केली. असे केले असता प्रभू येशूने त्यांना निशब्द केले आणि
त्यांना सांगितले की, “हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असतांना पूर्ण झाला आहे”(लुक
४:२१). हे सर्व त्याच्या प्रेषितीय कार्याविषयीचे होते. आणि हेच मिशन कार्य किंवा
प्रेषितीय कार्य देऊळमातेने ५ वेगवेगळ्या स्थरावर सुवर्तेच्याद्वारे प्रस्थापित
केले आहे:
१. दीनांस समुपदेशनाद्वारे (Counselling) सुवार्ता सांगणे- म्हणजेच मानसिकरित्या सक्षमीकरण
किंवा सबळता देणे.
२. बंधीवानांस आरोग्यदायी कार्याद्वारे सुटका – आध्यात्मिक सबळता.
३. आंधळ्यांना शिक्षणाद्वारे दृष्टी- बैद्धिक सक्षमीकरण.
४. जे ठेचले जातात त्यांना न्याय/ सुशासनाद्वारे मुक्त्तता
देणे- राजकीय सशक्तीकरण.
५. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची याजकाच्या आशीर्वादाने घोषणा
करणे (गणना ६:२२-२७)- आर्थिक सक्षमीकरण.
प्रत्येक याजकाने, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने, प्रत्येक धर्मग्रमाने ह्या
येशू ख्रिस्ताच्या ५ सुवर्तिक तत्वांना बिंबवून आपलेसे करून त्या प्रमाणे आपले जीवन
प्रभू कार्यासाठी समर्पित केले पाहिजे.
इस्त्रायल लोकांच्या जीवनात दु:खाचा डोंगर तेव्हाच आला जेव्हा त्यांनी याजक,
संदेष्टा आणि राजा ह्या तिहेरी अभिषेकाला हरवून बसले आणि आपल्या मर्जीप्रमाणे जीवन
जगू लागले. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, मलकीसदेक (उत्पती १४:१८), मोशे (निर्गम
३), याहोशवा (याहोशवा १), शमुवेल (१ शमुवेल ३), इत्यादी, ख्रिस्ता प्रमाणे ह्या तिहेरी
अभिषेकात त्यांनी संदेष्ट्याचे (शिक्षक आणि देवाचा दैवज्ञ) कार्य केले होते. उदा.
एलिशा हा १ राजे १७ आणि १९ प्रमाणे याजक म्हणून अभिषिक्त केला होता; की त्याच्याद्वारे
तो लोकांना आशिर्वाद देईल (गणना ६:२२-२७), आणि देवाला त्यांचे यज्ञ अर्पण करील (इब्री.
५:१-३), आणि १ शमुवेल १० नुसार राजा हा लोकांचा नेता/ प्रशासकीय प्रमुख म्हणून अभिषिक्त
केला जात असे.
शमुवेलानंतर येणाऱ्या राजांनी हा तिहेरी अभेषेक गमावला. उदा. शौल, दावीद, शलमोन,
आणि त्यानंतर इस्त्रायल राज्य विभागले गेले. त्यानंतर पुनर्स्थापनेची (यशया १:२६,
९:६) हि भाकिते आली, त्यात ख्रिस्ताच्या आगमना विषयी सांगण्यात आले. ख्रिस्त
म्हणजे अभिषिक्त केलेला- कारण तो हर्षरुपी तेलाने अभिषिक्त केलेला होता आणि
त्याच्याहून अधिक श्रेष्ठ असा कोणीही नाही (इब्री. १:९). आणि ‘प्रमुख याजक’ (इब्री.
३:१) म्हणून तो युगानुयुग राज्य करतो. आणि तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे
(प्रकटीकरण १७:१४).
आपण सर्व ख्रिस्ती ह्या नात्याने देऊळमातेच्या ह्या संस्कारांमध्ये अर्थपूर्ण रित्या
सहभागी होऊन ह्या तिहेरी अभिषेकात सहभागी होत असतो. उदा. स्नानसंस्कार, दृढीकरण, आणि
प्रायश्चित्त संस्कार ह्या मुले आपण संघटीत केले जातो. परमेश्वराचे वचन आपणाला
सांगते की, अभिषेकामुळे (त्याच्या वचनाद्वारे आणि संस्काराद्वारे) आपले ओझे आणि जू
नष्ट होईल (मत्तय ११:२८-३०).
देवाचे वचन हे आपल्या जीवनात, आपल्या धर्मग्रामामध्ये, आपल्या घरात पूर्णपणे समर्थन
केले पाहिजे, कारण आपण आजच्या पहिल्या वाचनात वाचतो की, ‘ते सकाळपासून ते
दुपारपर्यंत शास्त्रलेख वाचत होते’. आणि प्रभू येशूने हि तसेच केले, ‘त्याने त्यांना
बऱ्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ केले’ (मार्क ६:३४). आपण आपल्या धर्मग्रामाच्या सहाय्याने
इतराना शिक्षण, राजकीय ज्ञान, आर्थिकरित्या सक्षम बनवले पाहिजे त्यानुसार देऊळमातेचे
प्रेषितीय कार्य पूर्णत्वास येईल आणि त्या कार्यासाठी लागणारी मद्दत सुध्दा आपल्या
द्वारे होत जाईल. देवाच्या वचनाच्या सहाय्याने आपण बरेच असे प्रकल्प सिद्धीस नेऊ
शकतो.
आजच्या दुसऱ्या वाचनात आपल्याला पहावयास मिळते की, मंडळीत कित्येकांना वेगवेगळ्या
स्थरावर नेमले आहे. प्रेषित, संदेष्टे, शिक्षक – हे देऊळमातेच्या कारभारासाठी आणि
नेतृत्वासाठी वापरले जातात. उदा. महागुरूस्वामी आणि धर्मगुरु. अद्भुत कृत्ये
करणारे, निरोगी करणारे – ह्या भेटवस्तू प्रामुख्याने आपल्याला व्रतस्थांमध्ये आणि
सर्व सामान्य लोकांमध्ये पहावयास मिळतात. विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, विभिन्न
भाषा बोलणारे, मध्यस्थी करणारे हे सर्व प्रार्थनेचे योध्ये आहेत. आणि ह्याद्वारे
सर्व सामान्य लोकांचे सशक्तीकरण केले जाते.
सशक्तीकरण हे प्रभू येशूचे ह्या भूतळावरील मिशन होते. आणि ह्याचा आपल्याला
कधीही विसर पडू नये. २ पेत्र १:३-९ ह्या विषयी सर्व काही सांगते. सक्षमतेचे आठ स्तर
आहेत. १) विश्वास (आध्यात्मिक), २) सात्विकता (सामाजिक), ३) ज्ञान (बैद्धिक), ४)
इंद्रियदमन (नैतिक), ५) धीर (मानसिक), ६) सुभ्क्ती (धार्मिक), ७) बंधूप्रेम (राजकीय),
८) प्रीती (मानसिक-आध्यात्मिक) सशक्तीकरण होत असलेले आपल्याला पहावयास मिळते. आणि
ह्या गुणांमुळे आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ओळखीविषयी निष्क्रिय व निष्फळ
होणार नाहीत.
आजच्या शुभवर्तमानत “थियफील” हा एक ग्रीक भाषेतील शब्द वापरला गेला आहे आणि
त्याचा अर्थ हा “देवाचा प्रियकर किंवा शोधक” असा आहे. ऐतिहासिक दृष्ट्या हा शब्द
फक्त जे देवाचा शोध किंवा देवावर प्रेम करणाऱ्यांना वापरण्यात आला होता. त्यामुळे
आपण जे देवावर नित्तांत प्रेम करतो आणि त्याचा शोध करतो त्यांच्यासाठी हि आनंदाची
बातमी आहे. कारण देवाच्या वचनातील सामर्थ्य आपल्याला ख्रिस्ताच्या प्रतिमेशी जुळवून
घेते आणि आपल्यातील देवाची प्रतिमा अधिक स्पष्ट आणि उज्वल बनवते. तर मग ह्या मंगळदिनी
आपल्या तीन अभिषेकांची पुनरावृत्ती करूया आणि एक ख्रिस्ती ह्या नात्याने असक्षम
आहेत त्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.”
१. आमचे परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी
व सर्व कार्यकर्त्यांना परमेश्वराचा स्पर्श व्हावा व प्रभूच्या प्रेमशांतीचा संदेश
त्यांनी सर्वत्र पसरावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे तरुण-तरुणी देवापासून दूर जाऊन अंधारात भरकटत आहे, त्यांना प्रभूच्या प्रकाशात मार्गक्रमन करावे व जागतिक मोह सोडून प्रभूच्या
प्रेमाकडे वळावे म्हणून प्रार्थना करूंया.
३. जे लोक आजारी आहेत अशांना प्रभूचा प्रेमदायी स्पर्श व्हावा व त्यांना त्यांचा
आजार सहन करण्यास सहनशीलता व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.
आपल्या देशाच्या आर्थिक विकासासाठी कार्य करणारे आपले राजकीय पुढारी व
नेत्यांनी नम्रता हा गुण अंगी बाळगून देशाच्या हितासाठी कार्यरत रहावे व जनतेच्या
कल्याणासाठी निःस्वार्थीपणाने झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment