Reflection for the Fourth Sunday in Ordinary Time (30/01/2022) By: Br. Brijal Lopes.
सामान्यकाळातील चौथा रविवार
दिनांक: ३०/०१/२०२२
पहिले
वाचन: यिर्मया १:४-५,१७-१९.
दुसरे
वाचन: १ करिंथ. १२:३१-१३:१३.
शुभवर्तमान: लुक ४:२१-३०.
प्रस्तावना:
आज ख्रिस्तसभा सामान्य
काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणा सर्वांना परमेश्वराच्या हाकेला होकार
देऊन, त्याद्वारे सुवार्तेची घोषणा प्रबळतेने व
निर्भीडपणे करण्यासाठी पाचारण करीत आहे. प्रत्येक व्यक्तीला देवाने एक मिशन कार्य दिलेले आहे, व ते कार्य करण्यासाठी योग्य
ते सामर्थ्य व शक्ती देव त्यांना पुरवतो. त्याच सोबत देव त्यांच्या बरोबर वस्ती करतो.
आजच्या
पहिल्या वाचनात आपणास यिर्मयाला झालेले पाचारण व त्याची देवाने त्याच्या कार्याकरीता केलेली
निवड ह्या विषयी सांगत आहे. एक निर्भीड व देवाच्या
कार्यासाठी झटण्यासाठी व देवाच्या प्रजेला देवाकडे
आणण्यासाठी व खऱ्या देवाची आराधना करण्यासाठी जी प्रसंगे
त्याच्यासमोर येणार आहेत ह्याबद्दल आपणास सांगण्यात
आले आहे.
आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास
प्रीती विषयी सांगत आहे. आपल्या जीवनात प्रीती, आशा व विश्वास ह्यांना अनन्य
साधारण महत्व आहे. पण ह्या सर्वापेक्षा प्रीती ह्या शब्दाला
किती महत्त्व आहे व त्याचे मानवी जीवनात असलेले स्थान ह्याविषयी संत पौल आपणास बोध करीत आहे.
आजच्या
शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपणासमोर संदेष्ट्याला होणाऱ्या छळाविषयी व लोकांनी केलेल्या मानहानी विषयी सांगत
आहे. देवाच्या कार्यात
संदेष्ट्यांची पार्श्वभूमी
कशी असावी ह्याविषयी सांगण्यात
आले आहे. तर मग त्याच देवाची घोषणा जगभर पसरविण्यासाठी आपणास परमेश्वराचे सामर्थ्य
व शक्ती लाभावी म्हणून आपण ह्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.
मनन
चिंतन:
ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधु-भगिनींनो. आज आपण सामान्य काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या ह्या उपासनेत आपण
ख्रिस्ताच्या कार्यामध्ये आलेले प्रसंग (चांगले किंवा वाईट), व त्या प्रसंगांना ख्रिस्ताने दिलेले आवाहन या विषयावर आपण मनन चिंतन करणार आहोत. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती ही
देवाच्या विशिष्ट
कार्यासाठी निवडलेली आहे. प्रत्येक क्षण, वेळ हा आपणास देवाने दिलेल्या कार्याविषयी व त्याच्या
सुवार्ता प्रचाराकासाठी कसा उपयोग करावा ह्या संदर्भात आपणास आजची उपासना सांगता आहे.
जीवन एक आवाहन आहे. प्रत्येक व्यक्ती ही जीवनातील
असलेल्या प्रत्येक संकटांना तोंड देत पुढे जात असते. असाच प्रसंग आपण ख्रिस्ताच्या जीवनात
अनुभवत आहोत. ख्रिस्ताची शिकवणूक ही सभास्थानातील काही लोकांना आवडनारी नव्हती, काही लोकांना तर त्याच्या
शिकवणीतून काहीतरी घेऊन आपल्या जीवनपरिवर्तनासाठी काहीतरी करावे यासाठी प्रयत्न न
करता; “हा सुताराचा मुलगा ना? हा योसेफाचा मुलगा ना?” अशा
गोष्टीवर विचार विनिमय करून योग्य ती (शिकण्याची व त्याद्वारे सुंदर जीवन जगण्याची) संधी गमावून बसले होते. ख्रिस्ताची शिकवण ही फक्त जे समाजात
राहूनसुद्धा ज्यांना समाजात मान नव्हता व जे अस्वीकारणीय लोक होते
अशांणाच ख्रिस्ताची
शिकवण आवडली होती. त्या प्रमाणे ते देवशब्दाला मान देत होते.
प्रभू येशूचे मिशन कार्यात गरिबांना फार
मोठे प्राधान्य
होते. येशूच्या
मिशन कार्याचा मुख्य मुद्दा म्हणजे गोरगरीब व सर्वसामान्य लोकांना देवशब्द घोषवून त्यांना स्वर्गराज्याची
महती पटवून देण्याचा आहे. सर्व लोकांना सामावून घेऊन एकत्र वाटचाल करून
स्वर्गराज्याची घोषणा करण्यासाठी येशूने सर्व प्रकारच्या लोकांना प्राधान्य दिले होते. यहुदी लोकांना ख्रिस्ताची
शिकवण आवडली. त्याच्या कार्याविषयी आश्चर्य व्यक्त केले. पण, एक संदेष्टा व तारणारा म्हणून
त्याचा त्यांनी स्वीकार केला नाही. यहुदी नसलेल्या लोकांना
ख्रिस्ताने आपल्या कार्यात समाविष्ट करून घेतले. त्यामुळे यहुदी लोक ख्रिस्ताचे
विरोधी बनले आणि ख्रिस्ताचा घात करण्यास पाहू लागले.
आपणही आपल्या
जीवनात ख्रिस्ताच्या कार्याला होकार देऊन व त्याच्या मार्गावर चालून स्वर्गराज्याची
घोषणा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या करत असतो का?
की, ह्या कार्यात वाईट लोकं किंवा प्रसंगे आपल्या आड येतात म्हणून सोडून देतो का? देवाचे कार्य न रोखता सदोदित आपण पुढे जात राहावे यासाठी ख्रिस्त आपणास सांगत
आहे, पाचारण करीत
आहे. येशू आपणास सोबत
देत असतो. तो आपला पाठीराखा
आहे. आणि म्हणूनच त्याच्यासारखे
धैर्यवान व प्रबळ इच्छा मनात बाळगून, ख्रिस्तासारखे कार्य करण्यास एक संदेष्टा होऊन, कार्य करण्याची इच्छा मनात
असली पाहिजे.
परमेश्वराचे
वचन हे आपणांस समाजामध्ये जागृतता निर्माण करण्यासाठी व त्याद्वारे येणाऱ्या
प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी, सज्ज राहण्यासाठी सांगत आहे. इतिहासाकडे आपण जर बघितले किंवा आजच्या वर्तमानकाळात जी
लोक सत्याच्या बाजूने लढत आहेत, व जी लोकं सत्य पसरविण्यासाठी झटत आहेत, अशा सर्वांना अपमानास्पद व
तिरस्काराच्या मार्गाने जावं लागतं. त्यांचा कोणीच स्विकार करीत नाहीत. पण अशी लोकं परमेश्वराच्या शब्दाला होकार, परमेश्वराच्या
कार्याला आलिंगन देतात व कोणत्याही प्रकारच्या संघर्षाला तोंड देण्यास तयार असतात. कारण त्याची
आशा व विश्वास हा परमेश्वरामध्ये आहे. ख्रिस्ताने आपल्याला प्रत्येक संकटाला व पंच
प्रसंगाला धीराने तोंड दिले. आपल्याच लोकांनी केलेली अवहेलना त्यांनी मनात
ठेवली नाही तर, सर्वांना देवाच्या प्रेमाने व दयेने बघितले व
कार्याला न थांबता आपले कार्य त्याने सुरुचं ठेवले.
सामाजिक
जीवनात कार्य करत असताना, आपल्या लोकांकडून आपली
अवहेलना होत असते. आपल्या पदरी निराशा पडलेली असते. परंतू आपणा सर्वांना ख्रिस्ताने दिलेल्या ह्या उदाहरणाद्वारे व
त्याच्या शिकवणीद्वारे द्वेषाची भिंत नष्ट करून, तिरस्काराची भाषा न करता क्षमेद्वारे व ख्रिस्ताच्या प्रेमाद्वारे एकमेकांना
पाहून कार्य पुढे सुरू ठेवायचे आहे. या सर्व येणाऱ्या पेच प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी
व देवाचे कार्य अबाधित ठेवण्यासाठी आपणा सर्वांचा परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानात प्रार्थना
करूया.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे परमेश्वरा दयाकर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.”
१. आपले परमाचार्य पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स, बिशप्स, व देऊलमातेच्या कार्यात नेतृत्व करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेल्या कार्याद्वारे व ख्रिस्ताचा आदर्श समोर ठेवून, देवाच्या प्रजेला योग्य मार्ग दाखवून, त्यांना ख्रिस्ताकडे आणण्यासाठी पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रार्थना करूया.
२. जे भाविक समाजिक, आर्थिक व शिक्षणाच्या बाबतीत परिवर्तन करण्यासाठी झटत आहेत. पर्यावरण व निसर्गाच्या सर्व हक्कासाठी जे प्रयत्नशील आहेत. अशा सर्वांना परमेश्वराचे सहकार्य लाभावे, शासनाकडून योग्य ती मदत मिळावी, सर्व लोकांमध्ये शांतता व एकात्मता निर्माण व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जगभर पसरत असलेल्या कोविड-१९ पासून आपणा सर्वांचं देवाने रक्षण करावं. डॉक्टर्स व नर्सेस ह्यांच्या प्रयत्नांना परमेश्वराने यश द्यावे. जे शास्त्रज्ञ योग्य त्या औषधाचे संशोधन करत आहेत त्यांना पवित्र आत्म्याने मार्गदर्शन करावे. मानवाच्या मूलभूत हक्कासाठी झटणारे सर्व सरकारी व खाजगी कर्मचाऱ्यांना कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. शिक्षक, सैनिक, शेतकरी व इतर सर्व सेवक नेत्यांना त्यांच्या कार्यात परमेश्वराने यश द्यावे त्याद्वारे देवाची, समाजाची योग्य ती प्रगती व्हावी. सर्व अडीअडचणींवर मात करण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. सर्व राजकीय नेत्यांनी देशाचे हित पाहून लोकांच्या कार्यासाठी व त्यांच्या विकासासाठी झटावे, त्याचप्रमाणे देशात शांतता व सुव्यवस्था नांदावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, आणि सामाजिक गरजासाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment