Thursday, 31 March 2022

Reflection for the Fifth Sunday of Lent (03/04/2022) By: Fr. Baritan Nigrel.



प्रायश्चित काळातील पाचवा रविवार




दिनांक: ०३/०४/२०२२

पहिले वाचन: यशया ४३:१६-२१.

दुसरे वाचन: फिलीपौकरांस पत्र ३:८-१४.

शुभवर्तमान: योहान ८:१-११.

 


प्रस्तावना:

आज आपण उपवास काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला ‘भूतकाळाच्या गोष्टी न करता, वर्तमानकाळात राहून, भविष्यासाठी कार्य करायला हवे’, ह्याविषयी सांगत आहे. परमेश्वर दयेचा सागर आहे, तो आपल्या चुकांकडे न पाहता आपल्याला त्याची चांगली लेकरे बनावेत यासाठी आपल्याला कृपा देत असतो.

यशया संदेष्टा पहिल्या वाचनात, पुर्वीच्या गोष्टींकडे पाठ फिरवून नव्या गोष्टी स्वीकारण्यास आमंत्रित करीत आहे. दुसऱ्या वाचनात, संत पौल सांगतो की, मी मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून, पुढील गोष्टीकडे लक्ष लावले, ख्रिस्त येशूच्याठायी देवाने केलेले पाचारण आणि त्या संबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे धावलो. आजच्या योहानलिखीत शुभवर्तमानात आपण ऐकतो की, ‘येशू व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला दोषी ठरवित नाही, तर ह्यापुढे पाप करू नकोस असे सांगून जीवनाला नव्याने सुरुवात करण्यास संधी देत आहे.

आपला परमेश्वर हा क्षमाशील देव आहे. तो पापी माणसाचा नव्हे तर त्याने केलेल्या पापांचा द्वेष करतो. आपणही परमेश्वराच्या दयेचा आनंद घ्यावा व दुसऱ्यांच्या चुकांकडे लक्ष न देता उलट त्यांच्यातला चांगुलपणा शोधावा म्हणून ह्या मिस्साबलीदानात आपण प्रार्थना करूया.

 


मनन चिंतन:

प्रायश्चित काळातील पाचव्या रविवारी आजचे शुभवर्तमान आपल्याला दया आणि क्षमा याबद्दल शिकवण देत आहे. गेल्या रविवारी आपण लूकच्या शुभवर्तमानातून उधळ्या पुत्राचा दाखला ऐकला. आजच्या शुभवर्तमानात आपण बोधकथा किंवा दाखला ऐकत नाही; तर येशू ख्रिस्त, शास्त्री आणि परुशी आणि व्यभिचारात पकडलेली स्त्री यांच्यात झालेल्या चकमकीचा अहवाल ऐकतो.

परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. परमेश्वर सहनशील आणि प्रेमळ आहे. परमेश्वर प्रत्येक मनुष्याशी चांगला वागतो. तो त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर दया करतो. (स्तोत्र १४५:८-९). प्रभू येशू ख्रिस्त आज शास्त्री आणि परुशी व आपल्या प्रत्येकाला आठवण करून देतो की, आपला परमेश्वर हा दया व क्षमा करणारा प्रभू आहे. आपण कितीही मोठे पापी असलो तरीही तो आपल्या पापांची क्षमा करीतो.

तसं पाहिलं तर आपल्याला समजते की, इतर अनेक भावनांसारखी दया ही केवळ एक भावना नाही. दया ही करावी लागते, करून दाखवावी लागते. आपण दुसऱ्या व्यक्तीवर जसे अव्यक्त प्रेम करू शकतो तसे दयेचे नाही. प्रेम कोणाकडून मागून मिळवता येत नाही, पण दया मागता येते. एखाद्या अपराध्याला त्याच्या गुन्हाबद्दलची अंतिम शिक्षा न्यायालयाने सुनावली असली तरीही त्याला त्यावर दयेची याचिका सादर करता येते.

आजच्या शुभवर्तमानाच्या आधीच्या अध्यायात, येशू मंदिराच्या परिसरात शिकवण देत होता. त्याच्या शिकवणूकीमुळे आणि त्याच्या कृतीमुळे मुख्य याजक आणि परुशी घाबरून गेले होते म्हणून येशूला अटक करण्यासाठी ते शिपाई पाठवतात. तथापि, शिपाई येशूला अटक न करता परत येतात; कारण ते त्याच्या बोलण्याने प्रभावित झाले होते.

यापेक्षाही, गर्दीतील काही लोक येशू हाच मसीहा आहे अशी घोषणा करतात. मुख्य याजक आणि परुशी त्यांची योजना बदलतात. अटक करण्यापूर्वी, ते येशूला अडकवण्याच्या उद्देशाने प्रश्न उपस्थित करून येशूविरुद्ध आणखी पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करतात.

आजच्या शुभवर्तमानाची सुरुवात होते की, येशू पुन्हा मंदिराच्या परिसरात लोकांना शिकवण देत आहे. शास्त्री आणि परूशी व्यभिचारात अडकलेल्या एका स्त्रीला घेऊन येशूकडे येतात. त्यांनी येशूला सांगितले की, तिला त्यांनी व्यभिचार करत असताना रंगेहात धरले होते. त्यावेळी प्रचलित असलेल्या कायद्यानुसार तिच्यावर दगडमार केला जावा, असे ते म्हणाले. पण त्यांनी येशूला विचारले, “आपण काय म्हणता?”

येशूने आधी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, पण त्यांचे प्रश्न विचारणे काही थांबेना. शेवटी येशूने त्यांना म्हटले, “तुमच्यात जो कोणी निष्पाप असेल त्यानं तिच्यावर पहिला दगड टाकावा.” त्यानंतर येशू मधे पडला नाही. झाले हे की, तेथे जमलेले ते सगळे लोक एकामागून एक तेथून निघून गेले आणि ती बाई एकटीच राहिली. परिस्थिती निवळल्यावर येशूने तिला विचारले, “बाई, तुझ्यावर आरोप करणारे कुठे आहेत? तुला कुणी दोषी ठरवलं नाही का?” ती म्हणाली, “कुणी नाही, प्रभू.” त्यावर येशू तिला म्हणाला, “मीसुद्धा तुला दोषी ठरवत नाही.” त्याने तिला जाऊ दिले, पण म्हटले, “ह्यापुढं पाप करू नकोस.”

स्त्रीवर आरोप करणार्‍यांना, येशूने मोठा धडा शिकविला की, आपण कुणाचा न्याय करू शकत नाही. न्याय करणारा आपला परमेश्वर आहे (यशया ३३:२२). आपण सर्वजण पापी आहोत. म्हणून पापी या नात्याने, आपण इतरांच्या पापांचा न्याय करण्यास अयोग्य आहोत.

दुसरी गोष्ट म्हणजे, आपला परमेश्वर आपल्याला कधीच शिक्षा देत नाही. परुशी आणि शास्त्री यांना खात्री होती की, ते जे काही करीत आहेत ते बरोबर आहे. आणि त्या व्यभिचारी स्त्रीला माहित होते की, तिने चूक केली आहे. येशूला भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये सामर्थ्यवानपणे बदल घडून येतो. परुशी आणि शास्त्री ह्यांना येशूच्या शब्दांद्वारे समजले की, ते देखील त्या व्यभिचारी स्त्रीप्रमाणे पापी आहेत आणि ते परिपूर्ण नव्हते. ती व्यभिचारी स्त्री शिक्षा मिळण्याची अपेक्षा करीत होती; पण येशू ख्रिस्ताकडून तिने देवाची दया व देवाची क्षमा स्वीकारली. तिला प्रभूमध्ये एक नवीन जीवन मिळालं.

येशू ख्रिस्ताने त्या व्यभिचारी स्त्रीला दंड किंवा शिक्षा दिली नाही. तिच्यावर दया करून, तिच्या पापांची क्षमा केली. एक नवीन जीवन जगण्याची संधी दिली. आज येशू ख्रिस्त आपल्याला दयेचा धडा शिकवीत आहे. जसा आपला परमेश्वर आपल्यावर दया करीतो, तशी आपण इतरांवर दया करावी ही देवाची आपल्याकडून अपेक्षा आहे. जर आपण तसे केले नाही, तर तोही आपल्यावर दया करणार नाही. पण देवाच्या राज्याचा आणखी एक नियम आहे आणि जो प्रभू येशूने सांगितला आहे तो हा की, “जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया केली जाईल” (मत्तय ५:७).

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभो, आम्हांला तुझ्या दयेचे प्रतिक बनव.

१.     आपले परमचार्य, पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी व सर्व प्रापंचिक यांच्या कार्याद्वारे, येशू ख्रिस्ताच्या दयेची ओळख संपूर्ण जगाला मिळावी म्हणून प्रभूकडे आपण प्रार्थना करूया.

२.     ज्या विश्वासू लोकांनी कॅथोलिक संस्कार स्वीकारून देवाच्या कराराशी अतूट नाते जोडले आहे, अशांना आप-आपल्या कुटुंबात प्रेमाने व दयेने राहण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.     नवीन विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांनी एकमेकांना दिलेल्या वचनांचे पालन करून, एक दुसऱ्यांना समजून घेऊन एक चांगले ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.     आपल्या गावात, धर्मग्रामामध्ये व कुटुंबात जे लोक क्षमा करण्यास अशक्त आहेत, अशांना व इतरांना क्षमा करण्यास प्रभूकडून प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.     थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

Thursday, 24 March 2022

Reflection for the Fourth Sunday of Lent (27/03/2022) By: Fr. Benjamin Alphonso.


उपवास काळातील चौथा रविवार




दिनांक:२७/०३/२०२२

पहिले वाचन: यहोशवा ५:९-१२

दुसरे वाचन: २ करिंथ. ५:१७-२१

शुभवर्तमान: लुक १५:१-३, ११-३२

 


प्रस्तावना:

आज आपण प्रायश्चित्त काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. देवाच्या दयेचा, क्षमेचा व अस्सिम प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी आजची उपासना आपल्याला आमंत्रित करीत आहे. यहोशवाच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपणाला कळून येते की, इस्रायली लोकांनी जुनी जीवनपद्धती सोडून, नवीन जीवनाला प्रारंभ केला होता. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात सांगतो की, परमेश्वराने ख्रिस्ताद्वारे आपला स्वतःबरोबर समेट केला, जर कोणी ख्रिस्ताठायी असेल, तर तो नवीन उत्पत्ती आहे. तसेच आजच्या लुकलिखित शुभवर्तमानात उधळ्या पुत्राच्या दाखल्याबद्दल आपण ऐकणार आहोत.

आपण सुद्धा आपले जीवन उधळ्या पुत्राप्रमाणे जगून देवाच्या प्रेमापासून दूर गेलो आहोत, परंतु आज आपण देवाच्या प्रेमाचा स्विकार करण्याची ती वेळ आली आहे. उधळ्यापुत्राप्रमाणे जेव्हा आपण पश्चातापी अंत:करणाने परमेश्वराकडे धाव घेतो, तेव्हा तो दयाळू बाप आपला स्विकार करण्यास सतत तयार असतो. म्हणून पश्चातापी अंत:करणासाठी आजच्या पवित्र मिस्सालीदानात भक्तीने सहभागी होताना प्रार्थना करूया.

 


मनन चिंतन:

बापा मी रडतो, घरी परत येतो

पुत्र नव्हे तर चाकर तुझा

स्विकार कर माझा

देव दयाळू व क्षमा करणार आहे. जो कोणी देवाकडे पश्चातापी अंत:करणाने जातो देव त्या व्यक्तीला क्षमा करायला तयार असतो, ह्याची प्रचिती आजच्या तिन्ही वाचनामध्ये आपल्याला येते. असं म्हणतात की, लोकं नवीन तंत्रज्ञान शोधतात परंतु, देव नवीन हृदयाला शोधतो; लोकं चांगल्या पद्धतीच्या शोधात आहेत, तर देव चांगल्या लोकांच्या शोधात आहे.”

पाप व वाईट कृत्ये आपल्याला देवापासून दूर घेऊन जात असतात. परंतु तोच देव आपल्याला पुन्हा बोलावत असतो. माणसावर (देव) ईश्वराच्या करुणेचा वर्षाव होऊन जे लोकं देव पित्याच्या प्रीतीपासून, करूणेपासून व क्षमेपासून दूर गेले आहेत, अशा लोकांना पुन्हा दैवी करुणेचा, प्रीतीचा व क्षमेचा अनुभव यावा व तो अनुभव उधळ्या पुत्राचा दाखल्याद्वारे आपल्या समोर ठेवण्यात आलेला आहे. ह्या दाखल्यातून समजते की, प्रत्येकाला दैवी करुणेच्या स्पर्शाची गरज आहे. आपल्या प्रत्येकाचे जीवन उधळ्या पुत्रासारखे आहे. आपल्या वाईट वागणुकीमुळे, कृत्यामुळे व इतरांबरोबर चांगले संबंध नसल्यामुळे आपण दूर गेलो आहोत. पण, जेव्हा आपण हा दाखला वाचतो तेव्हा हा दाखला आपल्या समोर एक आवाहन ठेवत असतो, ते आहे मन परिवर्तन करण्याचे आवाहन. हा दाखला आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आणतो, शैतानाकडून ख्रिस्ताकडे आणतो, इतकेच नव्हे तर, चांगला पश्चाताप करावयास शिकवतो. खरा पश्चाताप करून आपण देवाकडे व शेजाऱ्याजवळ येतो. ह्या दाखल्यातून आपल्याला एक धडा शिकायला मिळतो की, ख्रिस्त हा प्रेमळ, दयाळू व क्षमाशील आहे. त्याचे प्रेम व त्याची माया ही अपार आहे.

ह्या दाखल्यात पित्याच्या प्रेमाविषयी वर्णिले आहे. देवाची माया कधीही उणी पडत नाही. आपल्या पापांसाठी देवाचा एकुलता एक पुत्र आम्हास तारावयास क्रुसावर मरण पावला. आपल्याला आपल्या पापांची क्षमा करून क्षमेचा धडा गिरवण्यास शिकवले आहे. आपण ह्या जगात ख्रिस्ताचे प्रेम द्यावयास आलो आहोत, म्हणूनच आपणामध्ये शास्त्री व पुरुशी लोकांची वृत्ती दिसायला नको.

 

बोधकथा:

अमळनेरच्या शाळेत सानेगुरुजी शिक्षक म्हणून काम करीत होते. ह्या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून सानेगुरुजी स्वतःच्या जेणामध्ये खाडे पाडून पैसे वाचवत. शाळेचे मुख्याध्यापक गोखले सरांना हे कळलं. ह्या गोष्टीचे खूप दुःख वाटले त्यांनी गुरुजींना आपल्या घरी रोज जेवण्यासाठी येण्यास सांगितले. एकदा साने गुरुजी गोखले सरांच्या घरी जेवले. दुसर्‍या दिवशी त्यांनी गोखले सरांना पत्र लिहून आपली त्यांच्या घरी जेवण्याची असमर्थता कळवली, जे सुग्रास अन्न आपल्या देशबांधवांना मिळणं अशक्य आहे ते मी खाऊ शकत नाही.” अस त्यांनी पत्रातून कळवलं. ते पत्र वाचून गोखले सरांचं जीवन बदललं. नेहमी सुटा-बुटात, ऐषो-आरामात, चैनीतल्या जीवनातून त्यांची मुक्तता झाली. त्यांनी आपल्या गरजा कमालीच्या कमी केल्या गोखले सरांनी स्वतंत्र चळवळीत भाग घेतला. त्यातच त्यांनी प्राणाहुती गेली.

छोट्या भावाने पश्चाताप करून त्याची चूक कबूल केली व तो आपल्या पित्याकडे परतला. त्याने आपल्या पित्याबरोबर समेट केला. दयाळू मनुष्य दुसऱ्या माणसाला क्षमा करून आपल्या जवळ घेत असतो. आपण स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करूया बापाला म्हणूया, हे पित्या मी तुझ्याकडे धावत येतो माझा स्विकार कर.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभो दया कर व आमची प्रार्थना ऐक.

१.    आपले परमगुरु पोप फ्रान्सिस, महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ यांनी, त्यांचावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात व लोकांना दैवी दयेचा अनुभव घेण्यास मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.    जे निराश होऊन देवापासून दूर गेले आहेत, त्यांना प्रभूने स्पर्श करावा व त्यांच्या जीवनात परिवर्तन व्हावे व त्यांनी परत एकदा प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.    आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमलेले आहेत, त्यांनी आपल्या विवेकबुद्धीला जागून, सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न व अडचणी सोडवाव्यात व देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.    आज जगात अनेक गरीब राष्ट्रांतील लोकांना तसेच आपल्या समाजात अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचा अन्याय व छळ सहन करावा लागत आहे; अशा सर्व लोकांना प्रभूने, त्यांच्यावर अन्याय व छळ करणाऱ्यांना क्षमा करण्यास प्रेरणा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.    येथे जमलेल्या भाविकांनी निस्वार्थीपणे जीवन जगून आपल्या जीवनात प्रार्थनेला प्राधान्य द्यावे व उदार मनाने आपल्या शेजाऱ्यांची सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

६.    आपल्या धर्मग्रामाच्या उन्नतीसाठी तसेच सामाजिक व वैयक्तिक हेतूंसाठी थोडा वेळ शांत राहून प्रार्थना करूया.