Reflection for the Third Sunday of Easter (01/05/2022) By: Br. Gilbert Fernandes.
पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार
दिनांक: ०१/०५/२०२२
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ५:२७-३२, ४०-४१
दुसरे वाचन: प्रकटीकरण ५:११-१४
शुभवर्तमान: योहान २१:१-१९
विषय: “प्रेमाचे पुनरुत्थान”
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो आज आपण पुनरुत्थान काळातील
तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमावर मनन-चिंतन करण्यास बोलावत आहे. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, प्रेषितांना येशूची सुवार्ता पसरविण्यासाठी बंदी घालण्यात येते. परंतु ते म्हणतात की, आम्हाला मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा प्रिय आहे. दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो की, स्वर्गात, पृथ्वीवर, पाताळात व सागरात प्रत्येक
सृष्टी, प्राणी, सर्व वस्तूजात परमेश्वराची
स्तुती गात आहेत. तर, शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांना तिसऱ्या वेळी
दर्शन देतो व पेत्राची मुख्य मेंढपाळ म्हणून नेमणूक करतो. शिष्यांना येशूच्या अनुपस्थितीत मासे मिळत नाहीत, परंतु जेव्हा येशूचे आगमन होते, तेव्हा ते भरपूर मासे पकडतात.
आपल्या जीवनात प्रभू येशू उपस्थित आहे का? आपल्या जीवनात बदल घडवण्यासाठी
व प्रभूचे आपल्या
जीवनात महत्त्व जाणण्यासाठी हर्षाने ह्या मिस्साबलीदानात सहभागी होऊया.
मनन चिंतन:
जर आपण भुतकाळात एखाद्या व्यक्तीला खूप
वाईट रीतीने दुःखावले असेल आणि अशा व्यक्तीला
आपण सामोरे जात असू, तर आपल्याला कसे वाटेल? आपण हसत चेहऱ्याने त्या व्यक्ति समोर जाऊ की, लाजेने जाऊ? पेत्र सुद्धा त्याच
स्थितीत आहे. जेव्हा प्रभूने त्याची भेट घेतली, तेव्हा त्याला प्रभूवरील त्याच्या अफाट प्रेमाबद्दलच्या
प्रश्नाचे उत्तर द्यावे लागले.
आपण ऐकतो की, जेव्हा शिष्य घाबरले होते आणि
त्यांनी स्वतःला वरच्या खोलीत कोंडून घेतले होते, तेव्हा ते केवळ यहुद्यांच्या भीतीमुळे नाही, तर त्यांच्या प्रभू आणि स्वामीला सोडण्याची त्यांना
लाज वाटली होती.
आजचे शुभवर्तमान काही प्रतीकात्मक स्थाने, शब्द, आणि कृतींनी भरलेले आहे. प्रेमाचे पुनरुत्थान ह्या विषयावर मनन चिंतन करताना आपण शुभवर्तमानातील काही गोष्टीवर लक्ष केंद्रित करूया.
“मी मासेमारीला जात आहे!”
आजच्या शुभवर्तमानात पेत्र, ‘मी मासेमारीला जात आहे!’ अशी आपली इच्छा व्यक्त करत आहे. आम्हाला माहित आहे की, मासेमारी हा पेत्र आणि जब्दीची दोन मुले यांचा
पूर्वीचा व्यवसाय होता. माणसे धरणारे
होण्याअगोदर ते मासे धरणारे होते. मासेमारीला जाणे म्हणजे
पूर्वीच्या जीवनशैलीकडे परत जाणे. कारण, ते हताश व निराश झाले होते. त्यांचा प्रभूवरील विश्वास नाहीसा झाला होता. ते प्रभू पासून दूर गेले होते.
“पण त्या रात्री त्यांनी काहीही पकडले नाही.”
जेव्हा आपण प्रभूच्या मार्गा ऐवजी आपल्या मार्गाचा अवलंब करतो, तेव्हा आपला मार्ग चुकतो. तेव्हा आपण परमेश्वरावर अवलंबून न राहता आपल्या सामर्थ्यावर अवलंबून असतो. तेव्हा आपण व्यर्थ परिश्रम करत असतो. रात्रभर त्यांनी
काहीही पकडलेले नाही. कारण, ते चुकीच्या ठिकाणी चुकीचे काम
करत होते, आणि प्रभू त्यांच्यासोबत नव्हता.
“येशू किनार्यावर दिसतो!”
परमेश्वराला आपल्या प्रत्येक धडपडीची जाणीव आहे, आणि अनेकदा तो आपल्या गरजेच्या वेळी आपल्याला
मदत करत असतो. जेव्हा त्यांच्या मानवी संघर्षाचा
शेवट होतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना दैवी साहाय्य
देण्यासाठी तिथे येतो. त्यांच्या आदल्या रात्रीची व्यथा जाणून घेतल्यानंतर, प्रभू येशू त्यांना बोटीच्या उजव्या बाजूला जाळे टाकण्याची सूचना करतो आणि ते भरपूर मासे पकडतात. त्याच क्षणी त्यांच्या लक्षात येते की, ते चुकीच्या ठिकाणी मासे पकडत होते.
“प्रभूबरोबर न्याहारी!”
किनाऱ्यावर उतरल्यावर शिष्यांनी कोळशाच्या आगीवर मासळी आणि भाकरी पाहिली. प्रभूने त्यांच्यासाठी नाश्ता
तयार केला होता. येथे आपण लक्षात
घेतले पाहिजे की, त्यांच्याकडे आधी खायला काहीच नव्हते, परंतु आता काहीतरी त्यांची वाट पाहत आहे. जेव्हा वाळवंटात लोकांकडे खाण्यासाठी काहीच नव्हते तेव्हा पाच भाकरी आणि दोन
मासळी यांचा चमत्कार करून येशूने त्यांना जेवू घातले होते. संत पौल म्हणतो की, “प्रभू आपल्या सर्व गरजा येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या
वैभवात असलेल्या संपत्तीनुसार पुरवील” (फिलीपौ. ४:१९).
“तुझं माझ्यावर यांपेक्षा जास्त
प्रेम आहे का?”
न्याहारी झाल्यावर प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला वरील प्रश्न विचारण्यासाठी बाजूला घेऊन जातो. आपण प्रभू येशू ख्रिस्त आणि पेत्र यांच्या डोळ्यातील
संपर्काची कल्पना करू शकतो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला तीन वेळा प्रश्न विचारतो तेव्हा तो अस्वस्थतेने उत्तर देतो. कारण, त्याने प्रभूला तीन वेळा नाकारले होते याची त्याला आठवण झाली असेल.
प्रेम म्हणजे केवळ बोलणे नव्हे तर, ते आपल्या कृतीतून दाखवणे होय. आपण येथे लक्षात घेतले पाहिजे
की, प्रत्येक वेळी जेव्हा पेत्र, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो!’ असे म्हणतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याला तीन कार्य देतो; ती म्हणजे माझी कोकरे चार, माझी मेंढरे पाळ, आणि माझी मेंढरे चार. यावरून आपल्याला समजते की, प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला केवळ क्षमा करत नाही तर, त्याला पुढील कार्यासाठी
नियुक्त करतो. आपला प्रभु भुतकाळातील कोणत्याही घटनांची पुनरावृत्ती करत नाही तर, त्याऐवजी तो भविष्यावर लक्ष
केंद्रित करतो.
“प्रेम उदभवू द्या!”
पुनरुत्थान झालेल्या प्रभूसोबतच्या आजच्या भेटीचा मुख्य मुद्दा म्हणजे प्रेमाची कथा. प्रेम किंवा प्रीती हे देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाच्या
केंद्रस्थानी आहे. आणि प्रेमाशिवाय देव नाही ज्याप्रमाणे, प्रेम देवाशिवाय अस्तित्वात नाही. कारण, ‘देव प्रेम आहे’(१ योहान ४:८).
माशांचा निष्फळ शोध घेतल्यानंतर पहाटे
प्रभू त्यांच्या शिष्यांना भेट देणे हे आमच्या गोंधळात आणि अर्थाच्या निष्फळ
शोधात देवाच्या प्रेमाची खोल अभिव्यक्ती आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या दुःखाच्या वेळी ज्यांनी त्याला सोडले त्यांच्यासाठी प्रेम आणि सलोख्याचा संदेश घेऊन येतो, आणि त्यांना गरम नाश्ता देऊन
तिथून निघुन जातो.
आमच्या आयुष्यातील सर्वात नाजूक क्षणी ज्यांनी
आम्हाला नाकारले आणि सोडून दिले, त्यांच्याशी आपण प्रेमाने
संपर्क साधतो का? आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान आम्हाला आमच्या
जीवनात आणि नातेसंबंधात प्रेम वाढविण्यास आणि प्रेमाचे राज्य निर्माण करण्यास आमंत्रण देत आहे. प्रेम हा केवळ पर्याय नाही, जो आपण घेऊ शकतो किंवा सोडू शकतो; तर ती एक आज्ञा आहे, जी आपण पाळलीच पाहिजे. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया की, मी प्रभूवर सर्वात जास्त प्रेम करतो किंवा करते का?
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे प्रेमळ देवा, आम्हाला तुझ्या प्रेमाचे साक्षीदार बनव.
१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले परमगुरूस्वामी, सर्व महागुरू, धर्मगुरू, व्रतस्थ बंधू-भगिनी व सर्व प्रापंचिक लोकांना देव राज्याची सुवार्ता पसरविण्यास कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या सर्व राज्यकर्त्यांनी आपल्या स्वार्थ, भ्रष्टाचार, व इतर सर्व वाईट मार्ग बाजूला ठेवून लोकांची निस्वार्थीपणे सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे लोक देवापासून दूर गेले आहेत, जे अन्य धर्माकडे वळले आहेत, व ज्यांचा देवावर विश्वास नाही, अशा लोकांवर पुनरुत्थित प्रभू येशूची कृपा यावी व त्यांनी पुनरुत्थित येशूवर विश्वास ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे लोक आजारी, दुःखी-कष्टी, व निराश आहेत, तसेच जे तरुण-तरुणी बेकार आहेत, अशा सर्वांना पुनरुत्थित प्रभू येशूने त्यांच्या अडचणीत सहाय्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक, आणि वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment