Reflection for the Homily of Mary Mother of God (1/1/2024) by Fr. Glen Fernandes.
दिनांक: १/१/२०२४.
पहिले वाचन: गणना ६:२२-२७
दुसरे वाचन: गलतीकरांस पत्र ४:४-७
शुभवर्तमान: लूक २:१६-२१
देवमातेचा सण नवीन वर्ष
“परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुला शांती देवो.”
प्रस्तावना:
आज आपण नवीन वर्षाला सुरुवात करत आहोत. देऊळमाता वर्षाचा पहिलाच
दिवस पवित्र मरियेला समर्पित करून त्या देवमातेचा सण साजरा करीत आहे. आजची तिनही वाचने आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळवून तोच आशिर्वाद एकमेकांना
देण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आजचे पहिले वाचन गणना ह्या पुस्तकातून घेतलेले आहे.
नवीन वर्ष सुरु करत असताना दैवी आशीर्वाद ऐकून संकल्प करण्यास हे वाचन आपणास
आमंत्रित करीत आहे. आजचे स्तोत्र देवाच्या आशीर्वादाची याचना करते. दुसऱ्या आजच्या वाचनात, संत पौल गलतीकरांना देवाच्या
पुत्राची आठवण करून देतो. मारियेमुळे आणि तिच्याद्वारे देवपुत्र आम्हामध्ये एक
झाला. आणि त्यामुळे आपण सर्व देवपित्याची लेकरं बनू शकलो.
आजच्या शुभवर्तमानात मेंढपाळ सर्व शेजाऱ्यांना येशूच्या
जन्माची सुवार्ता कशी पसरवली, व सर्व ठिकाणी
प्रभूच्या येण्याची बातमी पसरली हे ऐकत आहोत.
पवित्र माता मरिया हे देवमाता आहे.
त्याचप्रमाणे ती आपणा सर्वांचीही माता आहे. तिच्या मध्यस्थीने आजच्या
मिस्साबलीदानात आपण विशेष करून हे वर्ष प्रत्येकाला सुखा-समाधानाचे, समृद्धीचे, आनंदाचे आणि एकेमकांवर परमेश्वराची
दया आणि काकळूत दाखविण्याचे जावो म्हणून प्रार्थना करूया.
बोधकथा:
एका शाळेतील, एक कॅथलिक मुलगा विद्यापीठाच्या प्राध्यापकाला पवित्र माता मारियेबद्दल सांगत होता. त्या
मुलाच्या गळ्यातील पवित्र रोझरी पाहून त्या प्राध्यापकाने त्या मुलाची खिल्ली उडवली आणि म्हटले, "पण तिच्या आणि माझ्या आईमध्ये काही फरक नाही. सर्व माता
तर समान असतात "
मुलाने उत्तर दिले:
"तुम्ही म्हणता तेच खरं आहे, आईमध्ये काही फरक नाही. परंतु मुलांमध्ये खूप फरक आहे." मारिया माता हि
सर्वांपेक्षा निराळी व वेगळी आहे, कारण तिचा पुत्र हा आपणा सर्वांपेक्षा वेगळा आहे. तिचा मान, सन्मान, हा तिला तिच्या मुलामुळे प्राप्त झाला आहे. त्यामुळे जेव्हा आपण तिचा सन्मान करतो
तेव्हा आपण देवाला गौरव देतो. मरियेचे पवित्र शास्त्रातील शेवटचे शब्द हे आहेत कि, तो (माझा पुत्र) जो म्हणतो ते तुम्ही करा. आपल्या
प्रभूच्या इच्छेप्रमाणे आपण जीवन जगावे म्हणून ह्या नव्या वर्षी आपण मरियामातेच्या
साहाय्याने संकल्प करूया.
मनन चिंतन:
भारतीय संस्कृतीत आदरणीय
व्यक्तींना वाकून नमस्कार करण्याची, आणि त्यांचा चरणस्पर्श करून त्यांचा आशीर्वाद मागण्याची सुंदर परंपरा आहे. आपण
जेव्हा कोणाला आशीर्वाद देतो, उदाहरणार्थ, “सुखी रहा”, असे म्हणून, तेव्हा आपण फार तर केवळ एक सदिच्छा व्यक्त करत असतो. कारण
दुसऱ्यांच्या भविष्यावर आपला काहीही अधिकार नसतो, आपल्या हातात काहीही नसते. म्हणून
खरा आशीर्वाद मागायचा तो सर्वसमर्थ परमेश्वराचा.
पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, परमेश्वराचा आशीर्वाद कसा मागायचा
हे स्वतः परमेश्वरानेच मोशेला शिकवले आणि त्यासाठी कोणत्या शब्दांत प्रार्थना
करायची तेही सांगितले. (गणना ६:२४-२६) ती प्रार्थना अशी आहेः
“परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो;
“परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो;
“परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुला शांती देवो.”
परमेश्वराच्या आशीर्वादात त्याचे संरक्षण सामावलेले आहे.
अनेकदा आपण मोठ्या संकटात किंवा अतिशय विपरीत परिस्थितीत सापडलेले असतो, ज्यातून सुटकेचा मार्ग दिसत नाही.
अशा वेळी परमेश्वर आपल्या पुढे जाऊन आपला मार्ग मोकळा करून देतो. तो आपल्या पाठीशी
उभा राहतो. तो आपल्या बरोबर चालतो. तो आपल्याला शक्ती पुरवतो.
परमेश्वराला कोणीही पाहिलेले नाही. त्याचा चेहरा किती तेजस्वी असेल ह्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण त्याचा मुखप्रकाश आपल्यावर पडला तर त्यात आपण उजळून निघू हे नक्की. परमेश्वराचा आशीर्वाद कृपेने भरलेला असतो. आपल्याला परमेश्वराची कृपा प्राप्त झाली तर मग आपल्याला काय उणे पडणार? त्याची कृपा आपल्यासाठी सर्व प्रकारे पुरेशी आहे. परमेश्वराला पापाचा तिटकारा असला तरी तो पाप करणाऱ्या माणसाकडे प्रीतीने, प्रसन्नमुखाने पाहण्यास तयार असतो. त्याने प्रसन्न व्हावे म्हणून आपल्याला सतत पुण्य कमवायची गरज नाही. त्याला हवे आहे ते फक्त आपले पश्चात्तापी हृदय. परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो तेव्हा आपल्याला शांती मिळते. आजच्या जीवनात आपण सर्वत्र अशांती अनुभवतो. कलह, भांडणे, अविश्वास, द्वेष, नैराश्य, ह्या सर्वांनी जणू जग भरलेले आहे. कधी कधी वाटते की, जीवन जगणे म्हणजे एक रिकामी खटपट आहे, सगळे व्यर्थ आहे. म्हणून परमेश्वराकडे मागायची ती शांती. आणि ती त्याच्याकडून मिळते.
देऊळमाता वर्षाचा पहिलाच दिवस पवित्र मरियेला समर्पित करून
त्या देवमातेचा सण साजरा करीत आहे. वास्तविकता , मारिया हि देवमाता आहे हा सण फार
प्राचीन आह.
हा सण पूर्वी 11 ऑक्टोबर रोजी साजरा
केला जात असे.
आजचा सण ह्या प्रश्नाचं उत्तर देते कि, "कॅथोलिक भाविक पवित्रमेरीचा सन्मान
का करतात?" अनेक वेळेला आपले इतर बांधव आपणास विचारत असतात कि कॅथलिक मारियेची पूजा का करतात ? आणि तिला देवाच्या बरोबरीचे का
करतात?
आपण मारियामातेचा
सन्मान का करतो हे समजून घेण्यासाठी आणि चर्च आणि संस्थांना तिच्या नावावर
का ठेवतो हे त्यांना अनेकवेळेला समजत नाही. सत्य हे आहे की,
आपण कॅथोलिक,
मारिया मातेची
पूजा करत नाही जसे आपण देवाची पूजा करतो. आपण
तिचा आदर करतो, तिचा सन्मान करतो, तिच्यावर प्रेम करतो आणि तिच्या मध्यस्थीने प्रार्थना करतो.
देऊळमाता वर्षाचा पहिलाच दिवस
पवित्र मरियेला समर्पित करून त्या देवमातेचा सण साजरा करीत आहे. अनेकांना हा प्रश्न पडू शकतो कि मारिया हि देवाची माता
कशी काय असू शकते.? जर देवाने सर्व काही निर्माण केलं, व आपण म्हणत असू कि मरिया हि
देवमाता आहे ह्यचा अर्थ ती देवापेक्षा श्रेष्ठ आहे का? प्रिय मित्रानो, हा सण म्हणजे मारिया माता हे
देवाची माता, म्हणजे तिच्या श्रेष्ठतेचा नाही.
हा सण , तिचा पुत्र, हा खरोखर पुर्णतः देव आहे ह्याची
शाश्वती देणारा सण आहे. ख्रिस्ती धर्मचा उगम होत असताना, येशू कोण आहे, हे समजून घेत असताना अनेक अशे
विचारप्रवाह उदयास आले. काही म्हणत होते कि येशू हा पूर्णपणे मनुष्य आहे, काही म्हणत होते कि तो फक्त काही
वेळा मनुष्य तर काही वेळा देव आहे. त्यामळे ई.स ४३१ साली एफसस येथे झालेल्या
परिषदेत ठरवण्यात आले कि पवित्र मरीयेला
थियोटोकोस म्हटले पाहिजे , हा एक ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ "देव वाहक"
(जिने देवाला जन्म दिला.) प्रभू येशू हा
ज्या अर्थी पूर्णपणे देव आहे, त्याअर्थी मारिया हि देवाची माता आहे. म्हणून हा सण म्हणजे
प्रभू येशू देव असल्याची केलेले प्रकटीकरण होय .
नववर्ष हे आशीर्वादच वर्ष. आज आपण
नव्या वर्षाला सुरुवात करत आहोत. हे वर्ष आपणाला आशीर्वादाच वर्ष जावं म्हणून
ख्रिस्तसभेने देवाचा आशीर्वाद म्हणून देवमाता, मरिया माता दिलेली आहे. तिच्या मध्यस्तीने तिचा पुत्र स्वर्गांतून उतरलेली
जिवंत भाकर तुमचं कुटुंब, आयुष्य, उद्योग धंदे आणि तुमचे सर्वस्व आशीर्वादित करो म्हणून ह्या
नववर्षाच्या पहिल्या दिवशी स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ‘हे
देवा, ह्या
नव्या वर्षात आम्हांला आशीर्वादित कर’.
१. . ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ बंधूभगिनी जे
ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात, त्यांची श्रद्धा बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी
बळकट करावी म्हणून आपणा प्रार्थना करूया.
२. जे तरुण-तरुणी देवापासून दूर जाऊन अंधारात भरकटत आहेत, त्यांना प्रभूच्या प्रकाशात
मार्गक्रमण करावे व जागतिक मोह सोडून प्रभूच्या प्रेमाकडे वळावे म्हणून आपण
प्रार्थना करूया.
३. आपल्या देशातील सर्व नेत्यांवर व अधिका-यांवर परमेश्वराचा
आशिर्वाद असावा, त्यांना सत्याने आणि न्यायाने
राज्यकारभार करण्यास परमेश्वराने मदत करावी तसेच सर्व वाईट वृत्तींपासून
त्यांना दूर ठेवून चांगल्या मार्गावर चालण्यास सहकार्य लाभावे म्हणून आपण
प्रार्थना करूया.
४. आपल्या धर्मग्रामात जे दु:खीत, पिडीत आहेत, तसेच जे असाध्य आजाराने पछाडलेले आहेत त्यांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा व नवजीवनाची वात त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा
प्रभूचरणी मांडूया.