Thursday 7 December 2023

 



Reflection for the 2nd Sunday of Advent (10/12/2023) by Br. Benjamin Alphanso.



आगमन काळातील दुसरा रविवार

दिनांक१०/१२/२०२३

पहिले वाचन: यशया ४०:१-५,९-११

दुसरे वाचन: २ पेत्र ३:८-१४

शुभवर्तमान: मार्क १:१-८



प्रस्तावना

आज पवित्र देउळमाता आगमन काळातील दुसरा रविवार साजरा करत आहे. आजची तिन्ही वाचने आपल्याला येशूच्या दुसऱ्या येण्याच्या स्वागतासाठी तयार राहण्यास आमंत्रित करत आहे. आपण पश्चात्तापी अंतकरणाने आपलीं मनें, हृदये जीवन देवासाठी व देवाला स्वीकारण्यासाठी सज्ज ठेवली पाहिजेत. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा इस्रायल लोकांचे सांत्वन करतो. त्यांना पापापासून दूर राहून पश्चातापाचे जीवन जगण्यासाठी आमंत्रित करतो. तर दुसऱ्या वाचना संत पेत्र आपल्याला सांगतो की, जर मानवाला देवाची इच्छा पूर्ण करायची असेल तर पश्चात्तापाद्वारे त्याची सुटका व तारण करून घ्यावे. बाप्तिस्मा करणारा योहान ह्यांनी येशूच्या आगमनाची तयारी कशी करावी हे आजच्या मार्क लिखित शुभवर्तमानात सुचविले आहे. आगमन काळाच्या दुसऱ्या रविवारी येशू आपल्यामध्ये आगमन करत असताना पश्चात्तापी जीवन जगून जीवनाकडे सदा सकारात्मक दृष्टिकोनातून पाहाण्याची कृपा आपल्याला मिळावी म्हणून या मिस्साबलीदानात आज विशेष प्रार्थना करूया.


मनन चिंतन

सोरेंग केकेगार्ड नावाचा सुप्रसिद्ध तत्त्वज्ञानी होता. केकेगार्ड एक सुंदर अशी कथा सांगतात, ते म्हणतात एकदा एक लोकप्रिय सर्कस होता. तो सर्कस बघण्यासाठी लोकांची फार गर्दी असायची. त्या सर्कशीत असलेला विदूषक लोकांना फार आवडायचा. तो लोकांना खूप हसवायचा. एकदा सर्कस सुरु असताना सर्कशीच्या तंबूला मोठी आग लागली. ही गोष्ट विदूषकाला समजली व तो लोकांना ओरडून सांगू लागला कि, तंबूला आग लागली आहे बाहेर पडा पण लोक विदूषकाच्या ह्या बोलण्यावर फक्त हसत राहिले. कुणीहि विदूषकाचा संदेश (घोषणा) ऐकली नाही. तंबूची आग पसरत होती. ह्याचा परिणाम असं झाला कि, लोकं मध्ये राहिली व भरपूर लोकं बाहेर न पडता आल्याने जळून मरण पावली. ही गोष्ट आपल्या सर्वांच्या जीवनाशी जोडून आहे. देवाने इस्रायली जनतेसाठी आपल्या पुत्राच्या जगात येण्याचा संदेश पाठवला. परंतु हा संदेश लोकांने स्वीकारला नाही व आपल्या जीवनात ते व्यस्त राहिले म्हणून अनेक लोकांचा नायनाट झाला. जर आपण आपल्याला जो संदेश पवित्र लोकांद्वारे मिळत आहे तो स्वीकारला नाही तर आपलीही व्यथा अथवा परिस्थिती अगदी अशीच होऊ शकते.

यशया ह्या संदेष्ट्याद्वारे बंधीवासात असलेल्या इस्रायेल जनतेला देव एक नवीन संदेश देऊन त्यांना जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक जीवन म्हणजे नवीन जीवन जाण्यासाठी बोलावत आहे. ते नवीन जीवन ख्रिस्ताद्वारे मिळणार आहे. ते मिळण्यासाठी जीवनातील खाच-खळगे आणि वाकडेतिकडे मार्ग दूर सारून, नवीन पश्चात्तापमय जीवन जगायला सांगितले आहे. परमेश्वराची वाणी ऐकणे, त्याचे मार्ग सिद्ध करणे म्हणजे जीवनात बदल घडवून आणणे होय.

 नकारात्मक जीवन जगणारा मनुष्य दलदलीत पडत असतो पण सकारात्मक जीवन जगण्यासाठी डोंगर टेकडी सल होते. उच्चनीच जागा सपाट होते. सकारात्मक दृष्टिकोणातून जगणारा मनुष्य परमेश्वराचे वैभव पाहतो आणि दुसरा उच्च स्वराने सुवार्ता सांगतो. सकारात्मक दृष्टिकोणातून जगणारा मनुष्य देवाचे सांत्वनपर शब्द इतरापर्यंत पोहचतो. आजच्या दुसऱ्या वाचनात पेत्र आपणाला सांगतो की, पश्चात्तापाद्वारे सर्व मानवजातीचे तारण व सुटका व्हावी अशी देवाची इच्छा आहे. देवाची प्रीती येशूद्वारे महान आहे. तो सहनशील असून कोणत्याही नाशाची कल्पना करत नाही. उलट आधी पश्चात्तापाद्वारे आपल्याला तारण व मुक्तता मिळावी असे त्याला वाटते. आजच्या शुभवर्तमानात आपल्याला योहान बाप्तिस्ता कोण होता? त्याचे कार्य काय होते? हे समजते. त्याचे कार्य येशूची वाट तयार करण्याचे होते व येशू त्याच्यापेक्षा महान आहे हे सांगण्याचे होते.

आजच्या आगमन काळातील दुसऱ्या रविवारी प्रभू येण्यासाठी विलंब लावणार नाही, कुणाचा नाश होऊ नये व परमेश्वराच्या वचनांवर व पश्चात्तापावर विश्वास ठेवून पावित्र्याचंसुभक्तीची वर्तणूक करण्या सांगत आहे. योहान बाप्तिस्ता त्यागमय जीवन जगून, प्रभूच्या येण्याची तयारी करण्यास, जीवनातील पापांची खळगी भरून पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेऊन पवित्र जीवन जगण्यासाठी आमंत्रण देत आहे. जीवनात येणाऱ्या अडीअडचणीला तोंड देऊन दुःखाची दरी ऐल तीरावरून पेल तीरावर पार करण्यासाठी जो सकारात्मक दृष्टिकोन मानवाकडे असावा तो दृष्टिकोण ख्रिस्ताकडून आजच्या मिस्साबलीदानामध्ये मागुया.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद:  हे प्रभू, आमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदल.

१. हे सर्व समर्थ दयाळू परमेश्वरा आज आम्ही तुझ्याकडे आमचे परमगुरु पोप फ्रांसिस, आमचे सर्व महागुरू, धर्मगुरु, धर्मभगिनी, धर्मबंधू व सामान्यजन यांच्यासाठी प्रार्थना करतो की, त्यांचा जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक असावा तसेच सर्वांनी देवाच्या इच्छे प्राधान्य द्यावे म्हणून त्यांना सहाय्य कर.

२. हे प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्याकडे सर्व तरुण तरुणी, लहान मुले यांच्यासाठी प्रार्थना करतो, जिवना त्यांना योग्य मार्ग दाखव व त्यांचा विश्वास मजबूत कर

३. हे दयाळू परमेश्वरा, आम्ही जे लोक अडचणीत आहेत, आजारी आहे त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो त्यांना चांगले आरोग्य दे व त्यांना सहाय कर.

४. हे प्रेमळ परमेश्वरा आम्ही आज या देशासाठी प्रार्थना करतो, जेथे युद्ध, मारामाऱ्या, द्वेष, सूड प्रवृत्ती आहे तेथे शांती प्रस्थापित कर व तिथल्या नेत्यांना व लोकांना त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदल म्हणून आपण प्रार्थना करू या

५. वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment