Wednesday 20 December 2023

 



Reflection for the 4th Sunday of Advent (24/12/2023) by Br. Rakesh Ghavtya.




आगमन काळातील चौथा रविवार

दिनांक: २४-१२-२०२३ 

पहिले वाचन:  २ शमुवेल ७:१-५८ब-१२,१४अ,१६

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १६:२५-२७

शुभवर्तमान:  लुक १:२६-३८



प्रस्तावना:

आज आपण आगमन काळातील चौथा व शेवटचा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना येशू बाळाच्या आगमनासाठी आपली आध्यात्मिक तयारी सखोलपणे करण्यास पाचारण करत आहे.

आजच्या उपासनेचा विषय, पवित्र मरीयेने गाब्रिएल देवदूताला दिलेल्या प्रतिसादातून घेतला आहे आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो. या उद्गाराने पवित्र मरीयेने आपले सर्वस्व परमेश्वराला समर्पिले व ती परमेश्वराची झाली. थोडक्यात ती परमेश्वराला शरण गेली. पवित्र मरिया तारणप्राप्ती मिळवण्याचे महत्त्वाचे साधन बनली. तिच्या होकारामुळे तारणप्राप्तीचा मार्ग मोकळा झाला. अशा प्रकारे देवाचे मानवावरील व मानवाचे देवावरील नातेसंबंध जोडले जाऊन देवाने आपले प्रेम व्यक्त केले व आपली योजना प्रकट केली. आजही देव प्रत्येकासाठी अचूक अशी योजना आखतो.

आज आपण जगाच्या तारणाऱ्याच्या आगमनासाठी उत्सुक झालो असताना आम्ही-ही आपले सर्वस्व परमेश्वराला समर्पुया. तसेच आपल्या अंतकरणात येणाऱ्या तारणार्याला जागा तयार करूया म्हणजे आपल्याला देवाच्या प्रेमाचा व कृपा-आशीर्वादाचा अनुभव घेता येईल.


मनन चिंतन:

परमेश्वराची योजना, परमेश्वराचे मार्ग, परमेश्वराच्या कल्पना व संकल्पना मानवाच्या समजण्याच्या पलीकडच्या आहेत. परमेश्वराने संपूर्ण सृष्टी निर्मिली, मानवाला रचले व मानवाच्या जीवनात आपली योजना आखून घेतली. सुरुवातीपासून, परमेश्वराचा योजना आखण्याचा हाच उद्देश आहे कि, संपूर्ण मानवजातीचे पापांतून तारण व्हावे, मानवाला मुक्ती मिळावी व मानवाचे तारण संपूर्णपणे व्हावे. परमेश्वराने जसे ठरवले तसे घडले व आजही घडत आहे व यापुढे घडणार ह्यात तिळमात्र शंका नाही.

परंतु आज मानव कोणावर अवलंबून आहे; स्वतःवर की परमेश्वरावर? जर मनुष्य स्वतःवर अवलंबून असेल तर सहाजिकच तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगेल, स्वतःची योजना राबवील व त्याप्रमाणे जीवन जगेल. पण अशा परिस्थितीत मानव कधीही समाधानी राहणार नाही. उलट त्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागेल. परंतु जर मनुष्य परमेश्वरावर अवलंबून राहिला तर नक्कीच तो परमेश्वराची इच्छा महत्त्वाची समजून त्या इच्छेप्रमाणे जगे व देवाची योजना समजून त्यामध्ये सहकार्य दाखवणार. अशा प्रकारे त्याला खरे समाधान मिळून तो त्याचे सर्वस्व देवाला समर्पण करणार.

 परमेश्वरासमोर लीन झालेल्या प्रत्येक  व्यक्तीला परमेश्वर आशीर्वादाने भरतो. पवित्र मरीयेला परमेश्वराने कृपेने भरले. पवित्र मरीयेने देवाच्या इच्छेला होकार देऊन, देवाची योजना पार पाडण्यासाठी त्यामध्ये सहकार्य केले, म्हणून तिने तारणप्राप्तीमध्ये मोठी भूमिका बजावली असे दिसून येते. म्हणूनच आज पवित्र मरीयेला मान-बहुमान दिला जातो.

पहा मी प्रभुजी दासी आहे आपण सांगितल्याप्रमाणे मला हो या उद्गाराने पवित्र मरीयेने, परमेश्वराची दासी म्हणून स्वीकारले व ती देवाच्या तारणप्राप्तीच्या योजनेत सहभागी झाली. पवित्र मरीयेने सर्वस्वाचा त्याग केला व देवाच्या योजनेला प्रथम स्थान दिले.

आजच्या उपासनेद्वारे देवाचे वचन आपल्याला हेच सांगत आहे की, देवाने आपली योजना आपल्या सेवकांसाठी वेगवेगळ्या मार्गाने व वेगवेगळ्या व्यक्तीमार्फत प्रगट केली. त्यासाठी देवाने पुढाकार घेऊन आपल्या सेवकांसाठी योजना आखली.

पहिल्या वाचनात शामूवेलाच्या दुसऱ्या पुस्तकात आपण ऐकतो की, परमेश्वराने नाथान या संदेष्ट्याद्वारे दाविदासाठी आखलेली योजना प्रकट केली. परमेश्वराने दाविदाशी आपला करार नाथान मार्फत केला. जेव्हा दावीद राजाने नाथानासमोर मंदिर बांधण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा नाथान संदेष्ट्याने त्याला मान्यता दिली परंतु, परमेश्वराने त्यासाठी नकार दिला. कारण ते मंदिर परमेश्वर स्वतः बांधणार होता. या योजना दाविदाच्या पुत्राच्या म्हणजेच तारणार्याला पाठवण्याच्या परमेश्वराच्या योजनेच्या पुर्ततेवर अवलंबून आहेत.

दुसऱ्या वाचनात संत पौल रोमकरांस पत्रात असे नमूद करतो की, परमेश्वराने आपल्या संदेष्ट्याच्या लेखांच्याद्वारे आपली योजना सर्व राष्ट्रातील लोकांना प्रकट केली. तारणप्राप्तीचे जे रहस्य होते ते त्यांना प्रकट केले. अर्थात येशूच्या जीवन, मरण व पुनरुत्थानाने सर्वांचेच तारण होईल हे गुपीत असलेले रहस्य प्रकट केले.

शुभवर्तमानात आपण ऐकतो की, परमेश्वराने गाब्रिएल देवदूतामार्फत पवित्र मरीयेसाठी आखलेली योजना प्रकट केली. जेव्हा गाब्रिएल देवदूताने पवित्र मरीयेला अभिवादन केले तेव्हा ती गोंधळून गेली. परंतु देवदूताने तिला पुढे स्पष्ट करून सांगितलें की, जे तुझ्याबाबतीत घडणार आहे ते दैवी शक्तीने होय आणि मानवी कृतीने नव्हे, कारण देवाला सर्व काही शक्य आहे असे देवदूत म्हणाला. तेव्हा पवित्र मरीयेने ही देवाची योजना समजून देवाच्या हाकेला होकार देऊन तीने तयारी दाखवली.

आजसुद्धा परमेश्वर आपल्याला अनेक मार्गाने व वेगवेगळ्या व्यक्तीमार्फत आपल्यासाठी योजना आखत असतो. त्यासाठी आपण तत्पर असायला हवे. आम्ही देवाच्या योजनेत सहभाग घेऊन सहकार्य करावे म्हणजे आमची इच्छा नव्हे, तर देवाची इच्छा समजून आपले जीवन जगावे. माझ्या स्वतःच्या जीवनात मला असा अनुभव आला आहे कि, एका धर्मगुरु मार्फत मला परमेश्वराने आपली योजना प्रकट केली की, मी धर्मगुरू बनावे व देवाची आणि देवाच्या लोकांची सेवा करावी. आज मला देवाच्या योजनेत सहभाग घेताना व सहकार्य करताना मला समाधान वाटते. खरोखरच देवाने मला आज त्याच्या कृपा-आशीर्वादाने भरले आहे. आज देवाने इतके उपकार माझ्यावर केले आहेत की, मी या प्रेम देवाची परतफेड करू शकणार नाही.

तुमच्या सुद्धा जीवनात देवाने आपली योजना काही व्यक्तीमार्फत नक्कीच प्रकट केली असेल. थोडावेळ शांत राहून आठवण करा व देवाला त्याबद्दल धन्यवाद द्या.

आज आपण आपल्या तारणारा बाळ येशूच्या जन्माची तयारी करत असताना, त्याच्या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी सिद्ध राहुया. तसेच पवित्र मरीयेप्रमाणे स्वतःला लीन करून, आपले सर्वस्व देवाला समर्पून देवाच्या इच्छेला प्राधान्य देऊन, देवाला शरण जाऊया व देवाची योजना पार पडताना, त्यामध्ये योग्य सहभाग घेऊन सहकार्य करू या. म्हणजे आपल्याला देव त्याचे प्रतिफदेईल.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे परमेश्वरा, आम्हाला तुझे स्वागत करण्यास तयार कर.

१. आपले पोपमहाशय फ्रांसिस पहिले, सर्व महागुरु, धर्मगुरु व व्रतस्थ बंधू-भगिनी यांना देवाची योजना पार पाडताना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या प्रत्येक विकट परिस्थितीत त्यांना परमेश्वराचा पाठिंबा मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.


२. प्रत्येक धर्मग्रामातील सर्व भाविकानी या आगमन काळात योग्य प्रकारे प्रायश्चित संस्कार स्वीकारला आहे व काही जण अजून स्वीकारणार आहेत, त्या सर्वांनी बाळ येशूसाठी आपले अंतःकरण तयार करावे व त्यात योग्य ती जागा त्याला द्यावी म्हणून प्रार्थना करुया.


३. सर्व राजकीय व सामाजिक पुढार्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करावे व निस्वार्थी सेवेने व प्रेमाने लोकांच्या वेगवेगळ्या समस्या व गरजांना हातभार लावावा म्हणून आपण प्रार्थना करूया.


४. जी लग्न झालेली जोडपी  बाळाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांना परमेश्वराने स्पर्श करून बाळाची देणगी त्यांना द्यावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.


५. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या सर्व वैयक्तिक आणि सामुदायिक गरजांसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment