Thursday 21 December 2023

 



Reflection for the Homily of Christmas Day (25/12/2023) by 

Fr. Suhas Pereira.


नाताळचा सण

दिनांक: २५-१२-२०२३

पहिले वाचन: यशया:५२:७-१०

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र:१:१-६

शुभवर्तमान: योहान:१:१-१८


प्रस्तावना

आज आपण नाताळचा सण साजरा करतो. देव मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला त्या प्रसंगाची आठवण आपण आज खास रीतीने करतो. जेव्हा एखादं बाळ जन्माला येते, तेव्हा तो फक्त त्याच्या आई-वडिलांसाठीच एक आनंदाचा आणि खास क्षण नसतो. ज्या लोकांना जीवनाचं महत्व माहित असतं, ती लोकसुद्धा नवीन जीवनाच्या उदयामुळे, अस्तित्वामुळे आनंद करतात. या दिवसात आपण आनंद करतो, हर्षगीते गातो. कारण देव मनुष्य बनलेला आहे. देवपुत्राच्या जन्माद्वारे मानवी जीवनाला आणि मानवी जन्माला एक अलौकिक महत्व प्राप्त झालेलं आहे. नाताळच्या दिवशी आपण मेंढपाळांबरोबर या पृथ्वीवर जन्मलेल्या देवबाळाचा शोध घेऊ या. आपल्या पुत्राच्या जन्माद्वारे देवपित्याने या जगाला किती श्रेष्ठ वरदान दिलेलं आहे, हे मेंढपाळांप्रमाणे आपणसुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या मिस्साबलीत आपण आनंदाने सहभागी होऊया आणि प्रभू येशू ख्रिस्त जो या जगाचा प्रकाश बनून या जगात आला आणि या जगाचा अंधार नाहीसा केला त्याचे आपण गुणगान गाऊया.

मनन-चिंतन

                आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकलं: "शांती प्रस्थापित झाली आहे चांगुलपणा आला आहे. तारण झाले आहे. सियोन, तुमचा देव हाच राजा आहे.”  असे शुभवर्तमान घेऊन पर्वतावरून येणाऱ्याचे पाय किती मनोरम दिसतात". प्रभू येशूच्या जन्माच्या ५०० वर्षांपूर्वीची हि वेळ होती. येरुशलेमच्या मंदिराचा नाश झालेला होता; देवाची निवडलेली प्रजा इस्रायल जणू छिन्न-विच्छिन्न, निराश झालेली होती. त्या प्रजेचा एक भाग (एक समुदाय) अजून हद्दपारीत, बाबिलॉनमध्येच होता आणि घरी परतण्याच्या आशेने जगत होता. दुसरा भाग हा घरी होता, मात्र कठीण परिस्थितीत जीवन कंठत होता. अशा या दुःखद, दिशाहीन  आणि आशाहीन परिस्तितीत यशाच्या संदेष्टा त्याच्या शुभवार्तेची घोषणा करतो आणि नवजीवनाची आशा लोकांच्या जीवनात, त्यांच्या मनात जागृत करतो. संदेष्टा तारणाच्या, मुक्तीच्या दिवसाबद्दल बोलतो. तो म्हणतो कि परमेश्वर येरुशलेमात परत येईल आणि एक नवीन सुरुवात करील आणि तारण करील. हे देवाचं संदेष्ट्याद्वारे दिलेलं अभिवचन होतं. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच होती. लोकं बाबिलोनच्या हद्दपारीतून घरी परतले. परंतु नाश झालेल्या त्यांच्या गावाची, मंदिराची पुनर्बांधणी करणे सोपे नव्हते. गरिबी, उपासमार आणि राजकीय समस्या पुढील अनेक वर्षे त्यांच्या जीवनात ठाण मांडून बसल्या.

     नाताळच्या दिवशी आपण हे वाचन वाचतो तेव्हा आपण स्वाभाविकच प्रभू येशूचा विचार करतो. प्रभू येशू हा देवाकडून, स्वर्गातून सुवार्ता, शुभवार्ता घेऊन येणारा, तारण जाहीर करणारा आनंदाचा दूत आहे. त्यांच्याद्वारे देव मानवी जीवनात येऊन, मानवाचे तारण करतो. संत योहान प्रभू येशूबद्दल आपल्या शुभवर्तमानात सांगतो कि, "कोणाही मनुष्याने आतापर्यत देवाला कधी पाहिले नाही. परंतु एकमेव देव (येशू) जो बापाच्या उराशी आहे, तो पुत्राद्वारे आम्हांला प्रकट झाला आहे (, १८). परंतु तोच संत योहान आजच्या शुभवर्तमानात असेही सांगतो कि, "शब्द अगोदरच जगात होता. त्याच्याद्वारेच जग निर्माण झाले. परंतु जगाने त्याला ओळखले नाही. तो जगात आला, जे त्याचे स्वत:चे होते त्या लोकांकडे आला, परंतु त्याच्या स्वत:च्याच लोकांनी त्याला आपले मानले नाही (, १०-११). लोकांना शांती आणि सौख्याने भरलेल्या जीवनाची अशा होती. परंतु त्यांच्या आशेची पूर्तता झाली नाही. का? कारण त्यांनी त्या काळात प्रभू येशूचा स्वीकार केला नाही.

     आणि प्रभू येशूच्या काळातील ती परिस्थिती आजसुद्धा बदललेली नाही, आजसुद्धा तशीच आहे. त्या काळाप्रमाणे आजसुद्धा मानवजात विध्वंसाचा अनुभव घेत आहे, नाश पावत आहे. बॉम्बहल्ल्यात नष्ट झालेल्या आणि नष्ट होत चाललेल्या अनेक देशातील शहरांची, गावांची आपल्याला चांगलीच जाणीव आहे. दुःखाने भरलेल्या हृदयाने आपण युद्ध, दहशतवादी हल्ले आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या विध्वंसाकडे पाहतो. इतकंच नव्हे, आज मानवी जीवन आणि मानवी आत्मसुद्धा विध्वंसाचा, नाशाचा अनुभव घेत आहे. मानवी जीवन, मानवी आत्मा जणू तुटत चाललेला आहे. म्हणूनच शांती, चांगुलपणा आणि तारणाची शुभवार्ता सांगणारे आनंदी दूत आपल्या काळातसुद्धा, आजसुद्धा आले तर किती बरं झालं असतं. परंतु अशा या आनंदी दूतांचा आपल्या जगात, आपल्या समाजात आज स्वीकार केला जाईल काय, त्यांचं बोलणं, त्यांची तारणाची, शांतीची सुवार्ता आपलं जग ऐकेल का? हा प्रश्न आहे. कारण आपल्या जगाचा इतिहास आणि वर्तमान आपल्याला एक वेगळंच चित्र दाखवतात. मानवजातीच्या सुरुवातीपासूनच आपल्या जगात मत्सर, हेवा, मीपणा, अपयश, अशांती, अन्याय आहे. आज आपल्या जगात न्याय आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी खूप अनेक जण अनेक प्रयत्न करतात. आपण शांतीसाठी प्रार्थनासुद्धा करतो. परंतु तरीसुद्धा जगात शांती आणि न्याय प्रस्थापित होणे अशक्य आहे असे भासते. परंतु तरीसुद्धा नाताळचा सण आपल्याला, आपल्या समाजाला  नवीन आशा देऊ शकतो.

     नाताळच्या दिवशी आपण दैवी बालकाचा जन्म, म्हणजेच एका नवीन जीवनाची सुरुवात साजरी करतो. हा सण आपल्याला जणूकाही शांतीची सुरुवात कुठे होते, ते सांगतो. परमेश्वर आपल्या सामर्थ्याद्वारे जगाचं तारण करत नाही. तर परमेश्वर एका बाळाद्वारे नवीन सुरुवात करून या जगाला तारणाचे दान देतो. आपण आज जागतिकीकरण आणि समाजमाध्यमांबद्दल बोलतो. परंतु बेथलेहेम मधील गायीच्या गोठयात जन्मलेलं देवाचं बाळ आपल्याला आपल्या स्वतःमध्ये प्रवास करून हृदयात डोकावयास सांगतं आणि म्हणतं , कि आपण आपल्या स्वतःच्या दैनंदिन छोट्या जीवनात सुरुवात केली पाहिजे आणि आपल्या दुर्बलतेमध्ये मात्र दैवी बाळ आपल्याला सामर्थ्य देईल.

शुभवर्तमानकार लूक लिहितो कि प्रभू येशूचा जन्म कैसर औगुस्त ह्याच्या राज्यात झाला. या दैवी बालकाद्वारे देवाला जणूकाही कैसर औगुस्तला, जगातील सर्वात सामर्थ्यवान राजाला शांतीचा उगम आणि पाया कोण आहे हेच दर्शवून द्यावयाचे होते. लॅटिन भाषेत असं म्हटलं जातं: Concordia domi, foris pax "हृदयात सौहार्द, जगात शांती". याचा अर्थ असा कि, प्रथम आपल्या हृदयात, जीवनात, आपल्या घरात शांती आणि समन्वयाचा अनुभव घ्या, तेव्हाच आपल्याला आपल्या जगातसुद्धा शांतीचा अनुभव येईल. हा नाताळचा सण आपल्याला हेच सत्य शिकवू इच्छितो आणि आपल्याला शांती जगात शोधण्यापेक्षा आपल्या जीवनात, आपल्यामध्ये शोधण्याचं आणि अनुभवण्याचं आमंत्रण देतो. आपल्याला नाताळचा शांतीचा खरा संदेश कळावा आणि आपणसुद्धा आपल्या हृदयात आणि जीवनात शांतीचा अनुभव घ्यावा म्हणून आजच्या दिवशी खास प्रार्थना करू या.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: प्रभू आमचे तारण कर.

"आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभु आहे". या प्रभुदेवाच्या चरणी आपण आपल्या विनंत्या आणि गरजा वाहूया.


) नाताळचा सण साजरा करणाऱ्या आपण सर्वाना आणि सर्व जगाला या सणाद्वारे दैवी चांगुलपणाचा आणि सद्भावाचा अनुभव यावा आणि तोच अनुभव आपल्याद्वारे इतर लोकांनासुद्धा घेता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

) आपले परमगुरु पोप फ्रान्सिस, सर्व महागुरू, धर्मगुरू आणि व्रतस्थ बंधू-भगिनींनी नाताळच्या सणाद्वारे येणारी नवजीवनाच्या आशेची ज्योत ख्रिस्तीजनांच्या हृदयात तेवती राहण्यास प्रयत्न करावेत म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया.

) युद्धामुळे नष्ट होत चाललेल्या देशांनी आपला स्वार्थ बाजूला ठेवून नम्र व्हावे आणि एकमेकांना मैत्रीचा हात पुढे करून परस्पर शांती प्रस्थापित करण्यासाठी आणि आपल्या लोकांच्या भल्यासाठी पाऊले उचलावीत म्हणून त्यांच्यासाठी आपण खास प्रार्थना करू या.

) जी लोकं वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांनी, दुःखांनी, गरजांनी ग्रासलेली आहेत, अशांना इतर लोकांद्वारे, आम्हाद्वारे दैवी मदतीचा, दैवी दयेचा, प्रेमाचा आणि चांगुलपणाचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

) आपल्या सर्व मृत बंधू-भगिनींना परमेश्वरा ठायी चिरंतन शांतीचा उपभोग घेता यावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

 

 

हे प्रभू येशू ख्रिस्त, तुझ्या जन्माद्वारे तू आम्हाला आशेचा प्रकाश देतोस आणि तारणाच्या दिशेने आमची वाटचाल ठेवतोस. तुझे नाव सुवंदित असो, आता आणि सदा सर्वदा. आमेन


No comments:

Post a Comment