Reflections for the
homily of the Seventh Sunday In Ordinary Time (19/02/2023) by Br. Reon Andrades.
सामान्य काळातील सातवा रविवार
पहिले वाचन: लेवीय १९: १-२,१७-१८
दुसरे वाचन: १ करिंथकरांस ३: १६-२३
शुभवर्तमान: मत्तय: ५: ३८- ४८
विषय: “तुम्ही
पवित्र असा, कारण मी प्रभू तुमचा देव पवित्र आहे.” (लेवी १९:२)
प्रस्तावना:
मनन चिंतन:
सामान्य
काळातील सातव्या रविवारी देवमाता आज आपल्या समोर प्रत्येकाच्या जीवना अनुरूप/सलग असलेला
ठळक मुद्दा आपल्यापुढे सादर करत आहे. आजच्या युगात पावित्र्याचे जीवन जगणे म्हणजे एक मोठे आव्हान
आहे. पहायला गेलं तर सर्वात जास्त घटस्फोटाचे कारण म्हणजे अनैतिक नातेसंबंध होय.
आज तरुण तरुणी, वैवाहिक लोक, जेष्ठ
नागरीक ह्या मोहाला बळी पडत आहेत. इतकेच नव्हे तर देऊळमातेला
सलग असलेले अनेक धर्मगुरू व धर्मभगिनी सुद्धा या मोहाच्या जाळयात गुरफटलेले आहेत.
आदल्या काळात धर्मगुरू म्हणजे सगळ्यांसाठी सगळेच होय कारण तेव्हा लोक अशिक्षित
होते म्हणून हे सर्व गुण एका धर्मगुरूमध्ये असणे गरजेचे होते. धर्मगुरु एक आध्यात्मिक गुरु, एक शिक्षक एक
चिकित्सक इत्यादि इत्यादि होय. परंतु आज लोकं शिक्षित आहेत त्यांचा सांभाळ ते स्वतः
करू शकता. त्यांना आज धर्मागुरुंमध्ये फक्त एकच गुण पाहावयाचा आहे तो म्हणजे
पवित्रमय जीवन जगणारा व्यक्ती जो आध्याद्त्माने
परिपूर्ण आहे. अनेकांना हे पावित्र्यमय जीवन जगणे एक मोठे आव्हान
आहे. आज वैवाहिक जीवन जगणारेसुद्धा एकाच व्यक्तीशी एकनिष्ठ
रहाण्यास कुठेतरी कमी पडत आहेत. संगणक, प्रसारमाध्यम व ब्रम्हणध्वनी (mobile) या सर्व गोष्टी एक अपवित्र जीवनाचे वाहक आहेत.
आजचे
पहिले वाचन आपणास बजावून सांगत आहे की जसा तुमचा देव पवित्र आहे तसे तुम्हिही
पवित्र बना. ह्यास्तव आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायला हवी व त्याचे पावित्र्य
राखायला हवे. दुसऱ्या वाचनात संत पौल बोध करून सांगतो की तुमचे
शरीर हे एक देवाचे मंदिर आहे, जर कोण या देवाच्या मंदिराला अपवित्र करील त्याचा
परमेश्वर नाश करील.
आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एक जगावेगळी शिकवण देत आहे. आजपर्यंत आपण आपल्या प्रियजनांवर प्रेम केले आहे. पण आज ख्रिस्त आपणास वैऱ्यावरही प्रेम करण्यास सांगत आहे. आजची सर्व वाचने आपल्याला इतरांवर प्रेम करण्यास प्रेरित करत आहेत. ज्या प्रमाणे परमेश्वर कोणाबरोबर भेदभाव करत नाही व त्याचा सूर्य व पाऊस सर्वावर एकसारखा पडतो, त्याचप्रमाणे आपलेही प्रेम हे निस्वार्थीपणाने कोणताही भेदभाव न करता केले पाहिजे. हे करण्यासाठी पवित्रतेची जोड असणे अगत्याचे आहे. ह्यास्तव प्रभु म्हणतो की, जसा तुमचा परमेश्वर पित्याचा चांगुलपणा अमर्यादित आहे तसा तुमचाही चांगुलपणा अमर्यादित असू द्या. जर का ह्या प्रेमाचा व पवित्रतेच्या मार्गावर वाटचाल केल्याने आपण खरे ख्रिस्तमय बनू शकू. आमेन.....
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: “हे प्रभू आम्हाला तुझ्यासारखे प्रेम व क्षमा करण्यास
धैर्य दे.”
१. आपले पोप महाशय, बिशप,
धर्मगुरू, धर्मबंधू व भगिनी ह्यांनी सतत
ख्रिस्ताच्या प्रेमाची, क्षमेची शिकवण जगाला द्यावी म्हणून
आपण प्रार्थना करू या.
२. धर्मगुरू, राज्यकर्ते,
कलाकार, अभिनेते, व
प्रशासकीय अधिकारी ह्यांनी ख्रिस्ताच्या शांतीचे साधन बनावे व ख्रिस्ताचा प्रेमाचा
संदेश आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे जगजाहीर करावा म्हणून आपण प्रार्थना करू
या.
३. आज जगभर
लोकांच्या मनात जातीयतेचा वणवा पेटला आहे. एक-दुसऱ्या बद्दल तिरस्कार मनात बाळगला
जात आहे. हा वणवा विझून त्यांच्या मनात प्रेम भावना वसावी म्हणून आपण प्रार्थना
करू या.
४. जे तरुण-तरुणी
देवापासून दूर गेलेले आहेत,
त्यांना प्रभू प्रेमाचा स्पर्श होऊन येशू ख्रिस्त हाच खरा मार्ग,
प्रकाश, व जीवन आहे हे सत्य त्यांनीस्वीकारावे
म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. आपण आपली
दैनंदिन जीवन जगत असताना ख्रिस्ताचे उदाहरण समोर ठेवून आपण आपल्या अपराध्यांना
क्षमा करावी व ख्रिस्ती धर्माची क्षमेची शिकवण आपण अंगीकारावी म्हणून प्रार्थना
करू या.
६. थोडा वेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक, व वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment