Reflections for the homily of the Sixth Sunday In Ordinary Time (12/02/2023) by Br. Rockson Dinis.
सामान्य काळातील सहावा रविवार
दिनांक : १२/०२/२०२३
पहिले वाचन: बेनसिरा १५:१५-२०
दुसरे वाचन: १ करिंथकरांस २:६-१०
शुभवर्तमान: मत्तय ५:१७-३७
“नियमशास्त्र किंवा संदेश्ट्याचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका; मी रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलो आहे”
प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील सहावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या उपासनेत आपण वचन, कायदा आणि आज्ञांवर लक्ष
केंद्रित करणार आहोत. आजचे पहिले वाचन
आपल्याला देवाच्या आज्ञांचे पालन करून जीवन निवडण्यास सांगते. दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला आठवण करून
देतो की देवाचे ज्ञान हे मनुष्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. तसेच
आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला सांगतो
की “नियमशास्त्र किंवा संदेश्ट्याचे ग्रंथ रद्द करावयास
मी आलो आहे असे समजू नका; मी रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलो आहे” याचे स्पष्टीकरण देत आहे. येशू
ह्या आठवड्यात आपल्याला, आपल्या आवडी – निवडी आणि
भावनांवर प्रभुत्व मिळविण्यासाठी बोलावतो. तसेच आपण प्रत्येकाने आपल्या अंतकरणाचा
आवाज ऐकला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे
ह्याची शिकवण देत आहे.
मनन चिंतन:
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज प्रभू येशू ख्रिस्त
आपल्याला आजच्या वाचनात नियमाचे महत्त्व सांगत आहे. नियम हे मानवी जीवनामध्ये
अत्यंत महत्त्वाचा पाठ शिकवत असतात.
कदाचित आपल्याला प्रश्न पडेल की खरोखरच नियमांची आपल्या जीवनात गरज आहे का? होय,
नियम हे भरपूर महत्त्वाचे आहेत. जुन्या करारात आपल्याला दिसून येते की देवाने
सुद्धा इस्रायेल लोकांना मोशेद्वारे दहा आज्ञा दिल्या, जेणेकरून इस्रायेल लोक देवाच्या आज्ञांचे पालन करून त्याच्या योजनेनुसार पवित्र जीवन जगू शकतील. देवाचे हे नियमशास्त्र मानवाला देवापासून दूर
नेणाऱ्या सैतानी प्रवृत्ती आणि वाईट मार्गा पासून
सावधानतेचा इशारा देत असतात,
जेणेकरून प्रत्येक व्यक्ती देवाच्या सहवासात टिकून राहील.
आजच्या शुभवर्तमानामध्ये
आपण ऐकतो की प्रभू येशू ख्रिस्त, जुन्या नियमशास्त्राची पूर्तता करतो. जुन्या नियमाला शुद्ध करतो आणि
माणसाला जुन्या नियमाच्या पलीकडे पाहण्यास शिकवितो. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो कि “नियमशास्त्र किंवा संदेश्ट्याचे ग्रंथ रद्द करावयास
मी आलो आहे असे समजू नका; मी रद्द करावयास नव्हे; तर पूर्ण करावयास आलो आहे.” आपण पाहतो की नव्या नियमशास्त्रात जुन्या करारातील आज्ञांची
पूर्णता करण्यात आलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त, जुने नितीनियम नष्ट किंवा तुच्छ मानित नाही, तर त्यांच्यामध्ये दडलेले सामर्थ्य/अर्थ प्रगट करून दाखवतो. त्याच्यातून
डोकावणारी नवीन आव्हाने आपल्यापुढे सादर करतो. ह्या विषयीचे चांगले असे उदाहरण
आपल्याला पहिल्या वाचनात ऐकावयास मिळते; देवाने मनुष्या समोर जीवन आणि मरण ठेवले आहे, तो जे पसंत करील, ते
त्याला दिले जाईल. जर मनुष्याने देवाच्या आज्ञा
आचरणात आणल्या तर सार्वकालीन जीवन त्याला प्राप्त
होईल. परंतु, जर का
त्यांनी त्या पाळल्या नाहीत, तर नाश व मरण हे खात्रीचे आहे ह्यामध्ये काही शंका नाही.
बायबलमधील संपूर्ण नियमशास्त्र, येशू ख्रिस्ताने केवळ एका आज्ञेमध्ये समाविष्ट केली आहेत, ती ही कि "जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा".
नव्या नियमशास्त्राला प्रीतीचे नियमशास्त्र किंवा मुक्तीचे नियमशास्त्र असेही
संबोधले जाते कारण, ते आपल्याला कायद्याचे शुल्क पालन करण्यापासून मुक्त करते, आणि
प्रीती-भावनेने
स्वातंत्र्याची जोड असलेले चांगले जीवन जगण्यास प्रोत्साहित करत असते. प्रीती
हाच शुभवर्तमानाचा मुख्य विषय/गाभा/ आत्मा
आहे. ही प्रीती (प्रेम) दिल्यानेही न संपणारी आहे, ती अनादी अनंत आहे. शेजार प्रीती आणि देव प्रीतीच्या
नियमांमध्ये नव्या नियमशास्त्राची पूर्तता सामावलेली आपल्याला दिसून येते. दहा
आज्ञाचा सारांश, संपूर्ण
नियमशास्त्र आणि व्यक्तीला विशिष्ट दर्जा प्राप्त करून देणाऱ्या ख्रिस्ती कृत्याचे
मूळ हे "प्रीती" मध्ये आहे. म्हणूनच ख्रिस्त हा संपूर्ण नियमशास्त्राचे
अंतिम धैर्य आहे. केवळ तोच आपल्याला देवाच्या न्यायीपणाविषयी शिकवू शकतो. आमेन...
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे दयाळू परमेश्वरा, तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.
१. आपले पोपमहाशयव सर्व धार्मिक
पुढार्यांना,देऊळमातेची व जागतिक समाजाची सेवा करण्यास, त्यांना परमेश्वरी आशीर्वाद
मिळावा व पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन तसेच अध्यात्मिक बाळ लाभावे म्हणून आपण
प्रार्थना करूया.
२. सर्व ख्रिस्ती लोकांची परमेश्वरी
कृपेत वाढ व्हावी व त्यांनी ख्रिस्ती मुल्ये अंगीकारावीत. त्यांच्या आचरणातून जगात
ख्रिस्ताचा संदेश त्यांनी पसरवा व एक आदर्श ख्रिस्ती जीवन जगण्यास त्यांना ख्रिस्ताची
कृपा लाभावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जगात युध्दाचे वातावरण मोठ्या
प्रमाणात वाढत आहे. हे विनाशकारी वातावरण बदलावे व जगात शांततेचे वातावरण प्रस्थापित
व्हावे व सर्वसामान्य लोकांच्या हिताकडे जागतिक पुढाऱ्यांनी त्यांचे लक्ष केंद्रित
करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. अलीकडे सिरीया व तुर्कीत झालेल्या नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्या लोकांना मदत मिळावी व त्यांचे पुनर्वसन लवकरात लवकर व्हावे तसेच त्यांना वैधकिय मदत मिळून ते लवकरात लवकर बरे व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या कुटुंबात ऐक्याचे, प्रेमाचे व जिव्हाळ्याचे वातावरण प्रस्थापित व्हावे व परमेश्वरी कृपेने आपला सर्व आजारांपासून बचाव व्हावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment