Friday, 24 February 2023

 



Reflections for the homily of the First Sunday in The Season of Lent (26/02/2023) by Br. Justin Dhavade.



प्रायश्चित काळातील पहिला रविवार

दिनांक: २६/०२/२०२३

पहिले वाचन: उत्पती २:७-९; ३:१-७

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र: ५:१२-१९

शुभवर्तमान: मत्तय ४:१-११


“तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे” (स्तोत्र ११९:१०५).



प्रस्तावना:

प्रायश्चित काळ हा देवाजवळ येण्याचा काळ आहे. तसेच हा काळ आपल्याला पापापासून परावृत्त करून देवाकडे वळवण्याचा मंत्र देतो. संत पौल फी ६:१० मध्ये म्हणतो, प्रभुमध्ये व त्याच्या सामर्थ्यामध्ये बलवंत होत जा. सैतानाच्या डावपेचा तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. आजच्या युगात जगताना सैतान त्याच्या शब्दांद्वारे व विचाराने आम्हाला आमिष दाखवून मोहाला बळी पाडतो. पण जर आपल्या जवळ देवाच्या वचनाची शस्त्रसामग्री धारण केलेली असेल तर सैतानाचा प्रतिकार करण्यास आपणाला सामर्थ्य मिळते. देवाचें वचन पाळणारा मनुष्य कधीच विनाशाकडे जात नाही; तर त्याचे तारण होते व त्याला सर्वकालिक जीवनाचा आनंद मिळतो. परंतु देवाच्या वचनांनी आपण सक्षम नसू तर आपण देखील पदासाठी, पैशांसाठी, संपत्तीसाठी किंवा नावासाठी देवाला धिक्कारून सैतानाच्या अधीन होऊ शकतो. त्याच्या मोबदल्यात आपल्याला अशांती, असमाधान व दुख अशा प्रकारच्या नकारात्मक प्रसंगांना बळी पडावे लागते. म्हणून देवाची वचने आम्हामध्ये व आम्ही देवाबरोबर रहावे.

मनन चिंतन:

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधुंनो आणि भगिनींनो, आज आपण प्रायश्चित काळातील पहिला रविवार साजरा करीत आहोत आणि आजची उपासना आपणास, ‘देव शब्दाचे महत्व व त्याद्वारे होणारे फायदे व लाभ ह्याविषयी सांगत आहे.

      आपण आपल्या दैनंदिन जीवनात देवाचा शब्द ऐकतो; मग तो बायबल वाचून किंवा पवित्र मिस्साच्या वेळेला किंवा सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअप द्वारे असो. अशा अनेक माध्यमातून आज आपणास ईश्वरी शब्द उपलब्ध आहे. परंतु आपण ते वचन आपल्या हृदयात आत्मसात करतो का? किंवा त्याचे पालन करतो का?

      आजचे शुभवर्तमान आपण अनेक वेळा ऐकलं असेल किंवा वाचले असेल. आपण पाहतो कि, प्रभू येशूला तीन प्रकारे मोह झाले. पहिला मोह म्हणजे शारीरिक मोह. दुसरे म्हणजे सत्ता-संपत्तीचे मोह व तिसरे मोह म्हणजे वैभव आणि गौरव. आणि हेच आपण दरवर्षी आजच्या पहिल्या रविवारी आपण ऐकतो. आणि हे सर्व मोह आपल्याही दैनंदिन जीवनात आपण अनुभवत असतो. परंतु ह्या मोहांचा सामना कसा करावा? त्यावर विजय कसा मिळवावा? हे आपणा कित्येकांना कदाचित ठाऊक नसेल. आज ह्या प्रवचनाद्वारे मी तुम्हांला सध्या शब्दांत सांगणार आहे.

      ह्या मोहांवर विजय मिळविण्यासाठी एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे ‘प्रभू शब्द’. होय ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधुंनो आणि भगिनींनो, जर आपण प्रभू शब्दाला महत्व दिले, त्याचे पालन करून आचरणात आणले तर आपण कोणत्याही मोहाला बळी पडणार नाही.  

      आजच्या पहिल्या वाचनात आपण वाचतो कि, परमेश्वराने आदाम व एवेला निर्माण केले; ज्यांना आपण पहिले आई-वडील म्हणतो. त्यांना परमेश्वराने एदेन बागेत ठेवेले व सर्व चराचारावर अधिकार दिला. परंतु बागेच्या मध्यभागी असलेले फळ खाण्यास त्यांना मनाई केली. नंतर आपण वाचतो कि, सैतान सापाच्या रुपात येऊन त्यांना मोहात पाडले व म्हटले कि, जर तुम्ही ह्या झाडाचे फळ खाल्ले तर तुम्ही देवासारखे व्हाल.

      माझ्या प्रिय बंधुनो आणि भगिनींनो, हे होते वैभव आणि गौरवाचे मोह. त्यांना देवासारखे बनायचे होते म्हणून सैतानाने सांगितल्या प्रमाणे त्यांनी फळा खाल्ले व मोहाला बळी पडले. कारण त्यांनी तेथे प्रभू शब्दाचा वापर केला नाही. कदाचित तुमच्या मनात शंका किंवा प्रश्न निर्माण झाले असतील.कि, त्यावेळेला बायबल किंवा देव शब्द नव्हते परंतु माझ्या प्रिय बंधुंनो आणि भगिनींनो परमेश्वराने स्वतः त्यांना सांगितले होते जे आपण उत्पत्तीच्या पुस्तकात अध्याय २:१७ मध्ये वाचतो कि, परमेश्वराने त्यांना म्हटले बागेतील पाहिजे त्या झाडाचे फळ तुम्ही खा, परंतु बागेच्या मध्यभागी असलेल्या म्हणजे बऱ्या-वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ मात्र तुम्ही खाऊ नका. आणि जेव्हा सैतान त्यांना मोह घालण्यास आला तेव्हा जर त्यांनी देवाचा शब्द किंवा त्याची आज्ञा पाळली असती तर ते मोहाला बळी पडले नसते.  

      तसेच आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास सांगतो कि, एका माणसाच्या द्वारे जगात पाप शिरले आणि पपाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशाप्रकारे मरण शिरले.

      परंतु आजच्या शुभवर्तमानात आपण वाचतो कि, कशाप्रकारे प्रभू येशू ईश्वरी शब्दाद्वारे सैतानाच्या तिन्ही मोहांवर मात करतो किंवा विजय मिळवतो.

      जेव्हा सैतान येशूची परीक्षा पाहतो, त्याला मोहात पाडतो कि, जर तू खरोखर देवाचा पुत्र असशील तर ह्या दगडाच्या भाकरी कर. तेव्हा येशू अनुवाद ह्या पुस्तकातील ८: ३ मधील देव शब्दाचा वापर करून सैतानाला म्हणतो कि, “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल”.

      पुढे आपण वाचतो कि सैतान ही येशूची परीक्षा पाहण्या करिता स्तोत्रसंहिता ८:३ मधील वचनाचा आधार घेऊन येशूला दुसऱ्यांदा मोहात पडण्याचा प्रयत्न करतो कि, तू देवाचा पुत्र असशील तर उंचा वरून खाली उडी टाक, म्हणजे देव त्याच्या दूतांना आज्ञा करील व ते येऊन तुझा हातांवर झेलून धरतील व तुझा पाय धोंड्यावर आपटू देणार नाहीत. तेव्हा येशू त्याला प्रतिउत्तर म्हणून पुन्हा अनुवाद पुस्तकातील ६:१६ मधील ईश्वरी शब्द वापरतो कि, “परमेश्वर जो तुझा देव ह्याची परीक्षा पाहू नकोस”.

      इतपर्यंत सैतान थांबत नाही, तर तिसऱ्यांदा येशूला मोहात पाडण्यासाठी सैतान जगातील सर्व वैभव आणि गौरव त्याला दाखवतो व म्हणतो कि, जर तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होणार. तेव्हा पुन्हा येशू अनुवाद पुस्तकातील ६:१३ ह्या वचनाचा वापर करून सैतानाला तेथून चालते करतो कि, “अरे, सैताना चालता हो कारण परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना करा. आणि आपण पाहतो कि सैतान तेथून निघून जातो कारण त्याला ठाऊक होते कि आपल्याने काही होणार नाही कारण येशूकडे देव शब्द आहे. किंबहुना तोच ईश्वरी शब्द आहे. जर आपल्यामध्ये देव शब्द असेल; जर आपण देव शब्दाचे पालन करत असेल तर आपण जगातील कोणत्याही मोहावर मात करू शकतो; विजय मिळवू शकतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: “हे प्रभू आम्हाला तुझ्याशी एकनिष्ठ ठेव.”

१. ख्रिस्ताची शिकवण जगाला देऊन त्याद्वारे जगाला ख्रिस्ताशी एकनिष्ठ करण्यास आपले पोप महाशय, सर्व धर्मगुरू, धर्म भगिनी व प्रापंचिक सतत प्रयत्न करत असतात. हे कार्य चालू ठेवण्यास त्यांना चांगले आरोग्य व योग्य ती कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आज आपल्या देशात धर्माच्या नावाने कल्लोळ माजला आहे. सत्तेच्या नावाने हुकूमशाहीला जन्म घालण्याचा प्रयत्न चालू आहे. अशा ह्या घटनांना काढून लावून, समता व बंधुता या मूल्यांना प्राधान्य दिले जावे व त्याद्वारे देशाची सामाजिक,  शैक्षणिक व आर्थिक पातळीवर प्रगती व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. उपवास काळ हा परमेश्वराचे प्रेम सर्व गोष्टीहून महान आहे हे ओळखण्याचा काळ. ह्या काळात आपण पापा पासून दूर रहावे व देवाजवळ यावे हयासाठी लागणारी कृपा आपणास मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जे तरुण-तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत, त्यांना प्रभू प्रेमाचा स्पर्श होऊन येशू ख्रिस्त हाच खरा मार्ग, प्रकाश, व जीवन आहे हे सत्य त्यांनीस्वीकारावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिककौटुंबिकव वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करू या.

No comments:

Post a Comment