Monday, 3 April 2023

 




Reflection for the Homily of Maundy Thursday (06/04/2023) By Br. Roshan Nato.



आज्ञा गुरुवार

दिनांक: ०६/०४/२०२३

पहिले वाचन: निर्गम १२:१-८,११-१४

दुसरे वाचन: १ करिंथ.११:२३-२६

शुभवर्तमान: योहान १३:१-१५



प्रस्तावना:

आज देऊळमाता पवित्र आठवड्यातील पवित्र गुरुवार म्हणजे आज्ञा गुरुवार / पाय धुण्याचा गुरुवार साजरा करत आहे. आजच्या दिवसाची उपासना आपणा सर्वांना येशू ख्रिस्ताच्या नम्रता, प्रीति, आणि उदारता या तीन गुणांची ओळख करून देते. आजचा देव्शब्द आपणास सांगतो कि, ज्याप्रमाणें मी प्रभु व गुरू असूनही, जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीहि एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. अश्या सेवापार कृतीद्वारे, आज येशु ख्रिस्त आपणा सर्वांना एकमेकांवर प्रेम करून इतरांची सेवा करण्यास पाचारण करीत आहे.


मनन चिंतन:

आज पवित्र गुरुवार आणि आजच्या दिवसाचे महत्त्व म्हणजे आज येशु ख्रिस्ताने मिस्साबलिदान आणि गुरुदीक्षा किंवा याजकपद ह्या दोन संस्कारांची किंवा साक्रामेंतांची स्थापना केली. त्याने स्वतःला नम्र करून संपूर्ण जगाला एक गुरु म्हणून, एक उत्तम याजक म्हणून, प्रेमाची आणि सेवेची खरी ओळख प्राप्त करून दिली आहे.

येशू ख्रिस्ताने स्थापन केलेल्या पवित्र मिस्साबलिदानाच्या संस्कारद्वारे आज आपल्याला कळून चुकते की, येशू ख्रिस्त या जगात फक्त स्वतःसाठी जीवन जगला नाही तर त्याने आपले सर्वस्व स्वइच्छेने दुसर्यांसाठी समर्पिलें. ह्याचीच साक्ष आज आपण आजच्या दुसरा वाचनात ऐकली आहे ती म्हणजे, ज्या रात्री प्रभु येशूला धरुन देण्यात आले, त्या रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, हे माझ्या स्मरणार्थ करा. भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. ह्याचेच स्मरण आपण दररोजच्या मिस्साबलीदानात करत असतो.

येशू ख्रिस्ताने आपल्या स्वस्मरणाची/स्वबलिदानाची कृती फक्त त्या भोजनाच्या मेजापर्यंत सीमित ठेवली नाही, तर ती उत्तम शुक्रवारी कृतीतदेखील आपले शरीर क्रुसावर खिळून आणि आपले रक्त सांडून आपल्या पापाखातर क्रूसावरील मरण पत्कारून प्रत्यक्षात आणली. ज्याप्रमाणे जुन्या करारात यहुदी लोक आपली पापांचा बंधनातून मुक्तता होण्यासाठी, जनावरांचा बळी घेत असत. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी येशू ख्रिस्त संपूर्ण मानव जातीला त्यांच्या पापातून मुक्त करण्यासाठी आणि त्याच्या तारण प्राप्तीसाठी, क्रुसावरील वेदना आणि शेवटी मरण पत्करण्यास स्वतःची तयारी करतो. शेवटी क्रूसावरील मरण सहन करत असताना येशू ख्रिस्त सांगतो की, यापुढे कुठल्याच निर्दोष माणसाचा व प्राण्याचा बळी दिली जाणार नाही, कारण मी स्वतः तुमचा कल्याणासाठी माझे प्राण अर्पण केले आहे. याचीच आठवण पवित्र ख्रिस्तसभा तिचा केंद्रबिंदू असलेल्या आपल्या दररोजच्या मिस्साबलिदाना मध्ये करते.

जो पर्यंत आपण आपले पापी जीवन सोडत नाही व येशू ख्रिस्ताने दिलेल्या आज्ञा पाळत नाही, तोपर्यंत आपण येशू ख्रिस्ताला त्याच्या त्या क्रुसावरील अती दु:खात ठेवतो. त्याच्या वेदना पुष्कळ करतो. आजची उपासना आपणास पाप सोडून देवाकडे वळण्यास आणि ख्रिस्ताप्रमाणे इतरांसाठी जीवन जगण्यास प्रवृत्त करीत आहे. गुरुदीक्षा किंवा याजकपद या संस्कारद्वारे येशू ख्रिस्ताने आपणा समोर जनसेवेचा एक भला मोठा आदर्श उभा केला आहे. त्याचप्रमाणे आजच्या या उपासनेतून व येशू ख्रिस्ताने स्थापन केलेल्या पवित्र साक्रमेंतद्वारे आपल्याला संदेश भेटतो तो म्हणजे निस्वार्थ सेवा. ह्याच निस्वार्थी सेवेचे उदाहरण आजच्या शुभवर्तमानात नमूद करण्यात आलेला एक उत्तम वृतांत आहे. तो म्हणजे, ‘येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. मग त्याने गंगाळ्यात पाणी ओतून शिष्यांचे त्याने पाय धुवू लागला. ह्या उदाहरणाद्वारे आपणास समजून येत कि, येशू ख्रिस्ताचे याजागपद  हे सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर, सेवा करण्याचे होते. त्याचीच साक्ष खुद्द येशु ख्रिस्त आपल्याला मार्क लिखित शुभवर्तामानात सांगत आहे कि, मी सेवा करून घेण्यास नाही तर सेवा करण्यास आलो आहे आणि माझा जीव इतरांसाठी खंडणीस म्हणून अर्पण करण्यास आलो आहे” (मार्क १०:४५).

असं म्हटला जातं कि, ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’. ज्याप्रमाणें येशू ख्रिस्ताने आपल्या याजकपदाचा आणि मोठेपणाचा डंका संपूर्ण जगभर वाजवला नाही किंवा आपल्या शक्तीची फुशारकी कधी मारली नाही, तर तो स्वतः एक नम्रतेचे उदाहरण बनला. तीच शिकवण येशू ख्रिस्त आज आपणा सर्वाना देऊ इच्छित आहे कि, आपण सुद्धा आपल्या जीवनात कधीही आपल्या मोठेपणाची किंवा आपल्या उच्च दर्जाची फुशारकी न मारता येशु ख्रिस्ताप्रमाणे दर्जेदार व स्वार्थी जीवन जगणे सोडावे. एक नम्र व निस्वार्थी जीवन जगून जनसेवा करण्यास नेहमी तयार असावे, म्हणून आपण आजच्या दिवशी प्रार्थना करूया.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे ख्रिस्ता तुझ्याप्रमाणे चांगले सेवाकार्य करण्यासाठी आम्हांला तुझी प्रेरणा आणि शक्ती दे.”

१. आपल्या ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोपसर्व बिशप्स व सर्व धर्मगुरू आज धर्मगुरूपदाचा सोहळा साजरा करीत आहेत. प्रभू येशूप्रमाणे चांगले सेवाकार्य करण्याची प्रेरणा आणि शक्ती सर्व धर्मगुरूंना मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

२. पवित्र मिस्साबलिदानास आपल्या कुटुंबात महत्त्वाचे स्थान मिळावे व पवित्र ख्रिस्तशरीरात मिळणाऱ्या येशूच्या कृपेचा व शांतीचा अनुभव आपणास यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

३. आपल्या धर्मग्रामातील धर्मगुरूंना त्यांच्या धार्मिक कार्यात येशूची प्रेरणाकृपा आणि शक्ती मिळावीत्याचप्रमाणे जे धर्मगुरू आजारी व वयस्कर आहेत त्यांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

४. या प्रायश्चित काळातील शेवटच्या दिवसात आपण पूर्ण मनाने व अं:तकरणाने परमेश्वराकडे वळून आपल्या जीवनाद्वारे प्रेम व सेवा ही ख्रिस्ताची मुल्ये आपल्या कुटुंबातसमाजात पसरावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

५. जगात शांतीचे व प्रेमाचे वातावरण स्थापित ह्वावे, सर्वांनी सेवामय जीवन जागून इतरांच्या जीवनात आनंद आणावा म्हणून प्रार्थना करूया.

६. आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment