Wednesday, 5 April 2023

 




Reflection For the Homily of Easter Sunday (09/04/2023) By Fr. Benher Patil.



पास्काचा सण 

दिनांक: ०९-०४-२०२३.

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्यें १०:३४,३७-४३.

दुसरे वाचनः कलस्सैकरांस पत्र: ३:१-४.

शुभवर्तमान: योहान २०:१-९.

विषय: “तो उठला आहे.”



प्रस्तावना:

प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण इस्टर म्हणजेच ख्रिस्ताच्या पुंनरुत्थानाचा सोहळा साजरा करत आहोत. आजचा सण हा ख्रिस्ती धर्मातील सर्वात मोठा आणि महत्वाचा सण आहे. कारण आज ख्रिस्ताने आपल्या दु:ख आणि मरणाने मरणावर मात केली आहे, म्हणूनच आपण मोठ्या हर्षाने गातो: “ख्रिस्त आज विजयी झाला, मरणा जिंकुनिया उठला!” ख्रिस्ताच्या पास्काच रहष्य आपल्याला नविन आशेने, नविन उमेदीने आणि नव-चैत्यन्याने आपलं दैन्यंदिन जीवन जगण्यास प्रेरणादायी ठराव म्हणून आजच्या मिस्साबलीत विषेश अशी प्रार्थना करूया.


मनन चिंतन:

    मानवी जीवनात असे बरेच प्रसंग उद्भवतात जिथे आपल्याला “पुनरुत्थान,” “पुन्हा उठणे” अथवा “नव-जीवन” अश्याप्रकारचे शब्द वापरणे स्वाभाविकपणे येतात. उदाहरणार्थ, हल्लीच तुर्कीस्तांनमध्ये झालेल्या भीषण भूकंपात असंख्य व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्याखाली जिवंत पुरल्या गेल्या. त्यातील हजारो लोकांनी आपले प्राण गमावले. परंतु काहीजणांना खूप दिवसांनी सुखरूप बाहेर काढण्यात आल तेव्हा, त्यांच्या नातेवाहिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, आणी हर्षाने त्यांना लाभलेल्या “नविन जीवनाबद्दल” देवाचे आभार मानले. 

जेव्हा एखादी व्यक्ती गंभीर आजारातून गेली असते, किंवा गंभीर आजार होण्याच्या भीतीत असते, त्याने त्यावर मात केल्या नंतर, किंवा ती भीती निराधार सिद्ध झाल्या नंतर, आणि तीच व्यक्ती मित्रांसोबत व्यवस्थितपणे त्याच्या कामावर परतते, तेव्हा आम्ही म्हणतो: तो उठला आहे!. एखादा राजकारणी, व्यावसायिक, किंवा खेळाडू, यांना दारुण पराभवाला अथवा अपयशाला सामोरे जावे लागले आहे, तरीपण जिद्द नंसोडता मोठ्या आशेने पुढच्या संधीवर तो जबरदस्त यश मिळवतो, तेव्हा आम्ही त्याच्याबद्दल देखील असेच म्हणतो कि: तो उठला आहे!

      पास्काचा सण आणि आजची वाचने एकाच गोष्टीची घोषणा करतात: "तो उठला आहे!" “तो पुनरुत्थित झाला आहे”. इस्टरच्या सकाळी थडग्यात गेलेल्या स्त्रियांना देवदूत म्हणाला: "भिऊ नका, तुम्ही नासरेथच्या येशूला शोधत आहात, ज्याला वधस्तंभावर खिळले होते. तो उठला आहे!". देवदूताच्या मुखातून ती शुभवार्ता  ऐकल्यानंतर स्त्रिया घाईघाईने प्रेषितांकडे जातात आणि बोलायला सुरुवात करण्याआधीच, उपस्थित असलेल्या प्रत्येकाला त्यांचे चेहरे आणि त्यांचे डोळे पाहून समजते की, न ऐकलेले काहीतरी घडले आहे. त्या सर्व एकत्र ओरडू लागतात: "प्रभू, येशू उठला आहे, तो जिवंत झाला आहे! आणि कबर रिक्त आहे. उपस्थितांच्या संपूर्ण अंगातून थरकाप उडाला; अलौकिकतेच्या भावनेने अचानक खोली आणि प्रत्येकाचे हृदय भरून गेले. अशा प्रकारे पुनरुत्थानाच्या बातम्यांनी इतिहासात त्याची धावपळ सुरू झाली. एखाद्या शांत आणि भव्य लाटेसारखी तीला जगाच्या अंतापर्यंत काहीही आणि कोणीही थांबवू शकणार नाही.

हीच ध्वनीची लहर आता आपल्यापर्यंत पोहोचते. कदाचित आम्ही आज सकाळी वर्तमानपत्र विकत घेतला असेल, परंतु संध्याकाळपर्यंत त्या सर्व बातम्या आधीच जुन्या होतात. उद्या आणखी बातम्यांमुळे आजच्या बातम्या विसरल्या जातील. तशी ही बातमी नाही; वीस शतके उलटून गेली आहेत तरीही हि बातमी तितकीच स्पष्ट आणि ताजी आहे: येशू ख्रिस्त मेलेल्यांतून उठला आहे! पण येशू खरोखर उठला आहे का? हे खरोखर घडले आहे की नाही? हे सत्य आहे याची आम्हाला काय हमी आहे?

      देवाने येशूला मेलेल्यांतून उठवून सर्व माणसांना त्याच्याविषयी खात्रीपूर्वक पुरावा दिला” (प्रेषितांची कृत्ये १७:३१). देव हा या घटनेचा आणि या दिवसाचा नायक आहे. ही येशू ख्रिस्ताविषयी देवाची साक्ष आहे. आजच्या पहिल्या वाचनात, आम्ही पेत्राच्या ओठांवर ही संकल्पना ऐकली: "देवाने त्याला उठवले आणि आम्ही साक्षीदार आहोत". त्याचे पुनरुत्थान करून - तोच प्रेषित इतरत्र म्हणेल - देवाने "आमच्याबरोबर ख्रिस्ताला मान्यता दिली आहे" (प्रेषितांची कृत्ये २:२२), म्हणजेच त्याने आपल्या नजरेत त्याला कायदेशीर केले आहे. अधिक स्पष्टपणे, पौल अथेन्समधील अरेओपॅगस येथे त्याच्या प्रवचनात म्हणतो: "देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले, अशा प्रकारे प्रत्येकाला त्याच्याबद्दल हमी दिली" (प्रेषितांची कृत्ये, १७:३१).

      म्हणून ख्रिस्त उठला आहे: हा इस्टरचा महान संदेश आहे. संत अगुस्तीन म्हणतात "ख्रिस्ती लोकांचा विश्वास म्हणजे ख्रिस्ताचे पुनरुत्थान होय”. ज्याला पुनरुत्थानाची घोषणा मिळाली आहे तो ती स्वतःकडे ठेवू शकत नाही. देवाने त्याला उठवले आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत!”, ही प्रेषितांची साक्ष आपल्या ख्रिस्ती जीवनाद्वारे आपण जगाला घोषित करणे गरजेचे आहे. पुनरुत्थित ख्रिस्ताने आम्हाला गुलामगिरीतून स्वातंत्र्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे, मृत्यूपासून जीवनाकडे, आणि दुःखातून आनंदाकडे आणले आहे. आज पास्काचा सोहळा साजरा करत असतांना, ह्या नविन, आशादायी आणि पुनरुथित जीवनाचे आणि ख्रिस्ताचे खरे साक्षीदार होण्यास आपणास देवाची कृपा आणि शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करूया.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद:  हे पुनरुत्थित ख्रिस्ता आमची प्रार्थना ऐक.

. हे प्रभु, तुझे पुनरुत्थान तुझ्या शिष्यांच्या हृदयांना आणि आत्म्याना आशा, सांत्वन आणि आनंदाने भरते, आज तुझ्यावर विश्वास ठेवणार्‍या सर्वांना तुझ्या वैभवी पुनरुथानाची साक्ष जगाला देण्यास तू त्यांना अभिषिक्त करावे म्हणून आम्ही प्रार्थना करतो. 

. हे प्रभु, तुझ्या पुनरुत्थानाबद्दल तुझ्या अनेक शिष्यांना शंका आहे: त्यांना पुन्हा शांतता आणि खात्री मिळावी, तसेच त्यांचा तुझ्या पुनरुथावरील विश्वास दृढ व्हावा म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो.

. हे दयावंत परमेश्वरा, जे लोक वेगवेगळ्या कारणाने दु:खी आणि निराशित आहेत, अश्यांना आशीर्वादित कर. तू त्यांची शक्ती व त्यांचा आधारस्तंभ बनून त्याचं दुख दूर कर, तसेच त्यांच्या निराशेच रुपांतर आशेत करून त्यांची जीवने तुझ्या अलौकिक आनंदाने भर म्हणून तुझ्याकडे प्रार्थना करतो.  

. हे पवित्र प्रभु, ह्या जगातील अराजकता, अशांतता व अन्याय दूर कर, सर्वांनी एकामेकांबरोबर सौख्याने, एकीने, आणि प्रेम भावनेने जगावे, तसेच ह्या जगात शांतता नांदावी म्हणून तुझ्याकडे प्रार्थना करतो. 

५. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या कुटुंबातील सर्व मृत बंधू आणि भगिनीची, दया कर. त्यांची सर्व पापातून सुटका कर आणि तुझ्या अनंत आणि पुनरुथित जीवनात त्यांना सहभागी कर म्हणून आम्ही प्रार्थना करतो.


No comments:

Post a Comment