Reflections for the Homily of Third Sunday of Easter (23-04-2023) By Br. Pravin Bandya.
पुनरुत्थान
काळातील तिसरा रविवार
दिनांक: २३/०४/२०२३
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१४,२२-३३.
दुसरे वाचन: १ पेत्र १:१७-२१.
शुभवर्तमान: लुक २४:१३-३५.
प्रस्तावना:
आज अखिल ख्रिस्तसभा पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना
आपणास प्रभूचे साक्षीदार बनण्यास पाचारण करीत आहे. अनेक वेळा आपण सत्य लपवीण्याचा
प्रयत्न करतो किंवा सत्याकडून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु असं म्हणतात कि
आपण सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे नेहमी सत्यच राहत.
आजच्या शुभवर्तमानात आपण असेच काहीतरी
पाहतो. प्रभू येशूच्या मरणानंतर त्याचे दोन अनुयायी यहुद्यांच्या भीतीमुळे अम्माउसला
जात होते. जणूकाही ते सत्याकडून पळत होते किंवा सत्य उघडपणे जाहीर करण्यास रुजू नव्हते.
परंतु खुद्द येशू त्यांच्या मध्ये येतो आणि त्यांना जुन्या करारापासून ज्या गोष्टी
त्याच्याविषयी सांगण्यात आल्या होत्या त्या सर्वांचा खुलासा करतो व त्यांना सत्याची
ओळख पटवून देतो. म्हणून ते अनुयायी पुन्हा शिष्यांजवळ जातात व वाटेत जे काही घडलं
त्या विषयी ते त्यांना सांगतात व प्रभूच्या पुनरूत्थानाचे साक्षीदार बनतात.
आज ह्या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होत
असतात आपणही ख्रिस्ताच्या पुनरूत्थानाचे साक्षीदार बनावे म्हणून प्रार्थना करूया.
मनन चिंतन:
“जगाला संजीवनाची मानव नवजीवनाची सुवार्ता येशूची”.
सुप्रसिद्ध ब्रिटिश अँग्लिकन दैवी, भजनवादक आणि कवी, हेन्री
फ्रान्सिस लाइट ह्यांनी “Abide with me…” हे
भक्तीपर गीत रचले आहे. ह्या गीतामध्ये ते अम्माउसच्या वाटेने जाणाऱ्या येशूच्या
दोन अनुयायांविषयी सांगतात कि, कशाप्रकारे ते प्रभू येशूला (अनोळखी व्यक्तीला) विनंती
करतात कि आमच्या बरोबर रहा कारण, आता रात्र होत आली आहे. हे गीत हृदय स्पर्श
करणारे गीत आहे. गीतातील प्रत्येक शब्द हा मन शांत करणारा आहे. जेव्हा एखादी
व्यक्ती जीवनात सर्व काही हरवून बसते, जेव्हा त्याला कुठेच मार्ग सापडत नाही, जेव्हा
जीवन नकोस वाटतं, तेव्हा ह्या गीताचे बोल अशा लोकांना अशा देणारे ठरतात. “हे
प्रभू, माझ्या बरोबर राहा. मला सहाय्य करणारे सर्व पळून गेले आहेत; मला मदत कर. हे
प्रभू, माझ्या बरोबर राहा.
आजच्या पहिल्या वाचनात पेत्र उभा राहून सर्व
यहुदी लोकांससमोर कबुली देतो कि, ‘येशू जिवंत आहे, तो मसीहा आहे, तो देवाला मान्य असलेला
व देवाला संतोष देणारा आहे. येशूच्या अनेक सामर्थ्यशाली व अद्भुत गोष्टी तुमच्या
समोर केल्या. परंतु वडील मंडळीने त्याला दुःख भोगण्यास लावले व क्रुसी खिळले.
परंतु परमेश्वराने त्याला मरणातून उठवले. मरण त्याला बांधून ठेऊ शकले नाही;’ अशा
प्रकारे पेत्राने ख्रिस्ताविषयी साक्ष दिली.
तसेच दुसऱ्या वाचनात जेव्हा घाबरलेल्या
ख्रिस्ती यहूदी लोकांचा येशूवरील विश्वासामुळे छळ होत होता तेव्हा त्यांना उत्तेजन
आणि धीर देण्यासाठी पेत्र म्हणतो कि, ‘सोने देऊन नव्हे, तर ख्रिस्ताच्या
मौल्यवान रक्ताने तुम्ही व्यर्थ वागणुकीपासून मोकळे झाला आहात. कारण कसलाही डाग
किंवा दोष नसलेल्या कोकरासारख्या ख्रिस्ताच्या बहुमोल रक्ताने तुमची सुटका केली
आहे.’ पेत्राची ही साक्ष व येशू विषयीचा हा दिलासा यहुदी लोकांना प्रेरणादायक
ठरला.
आजच्या शुभवर्तमानात, ‘अम्माउसच्या वाटेवर
येशूच्या शिष्यांना येशूची भेट’ ह्या घटने विषयी आपण वाचतो. ही घटना एका साध्या
प्रसंगापेक्षा अधिक महत्वाची आहे. ही घटना आपल्याला येशूचे जीवन, मरण व पुनरुत्थानाविषयी
माहिती देते. ज्याप्रकारे भाकर मोडल्याने त्यांचे डोळे उघडले तसेच मिस्साबलिदानामध्ये
आपल्याला येशूचे पूर्ण अस्तित्व जाणवते. परंतु मिस्साबलिदान अथवा आपली उपासना ही
येशूला त्या पवित्र भाकारीद्वारे स्विकारल्याने पूर्ण होत नाही तर, जेव्हा आपण मिस्साबलिदानात
ख्रिस्ताला सेवन करतो तेव्हा आपण आपल्या प्रभुशी व शेजाऱ्यांशी एकरूप झाल्याची
भावना आपल्यात निर्माण झाली पाहिजे. तसेच ज्याप्रकारे शिष्यांना पुनरुत्थित
ख्रिस्ताची ओळख पडताच ते ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी येरुशलेमात परतले तसेच; प्रत्येक उपासनेत अथवा
मिस्साबलिदानात आपण अनुभवलेल्या ख्रिस्ताची सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचविण्यास आपण
प्रयत्न केला पाहिजे.
आपण स्वःतास प्रश्न विचारूया कि, आपण
ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची साक्ष इतरांना देतो का? दैनंदिन जीवनात ख्रिस्त मला
साक्षीदार होण्यासाठी बोलावत आहे. मी जे पाहिले, बोलले व केले त्याचा
साक्षीदार होतो का? पुनरुत्थानकाळ हा
ख्रिस्तासाठी साक्षीदार बनण्याचा काळ आहे. त्याचे खरेखुरे साक्षीदार होण्यासाठी
आपण आजच्या उपासना विधीत विशेष प्रार्थना करूया.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “करितो मी याचना ऐकावी प्रार्थना.”
१.
आज आपण आपल्या ख्रिस्त सभेसाठी प्रार्थना करूया की, देवाने
आपले परमगुरु फ्रान्सिस, कार्डिनल्स, महागुरू, धर्मगुरू, तसेच
सर्व श्रद्धावंतांना आशीर्वादित करून, सुखी-समाधानी व नीरोगी ठेवावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.
आपण आपल्या सार्वजनिक हितासाठी कार्य करणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करुया की, विशेष म्हणजे पोलीस अधिकारी, साफसफाई
करणारे कामगार, रोजचा आहार पुरवणारे सेवक-सेविका, इत्यादी ह्यांना परमेश्वर सदोदित त्यांच्या बरोबर
राहू दे, त्याचप्रमाणे आम्ही सर्वांनी
त्यांना सहकार्य करावे, उदार हस्ते मदत करण्याची सुबुद्धी
आम्हाला प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.
आपण आपल्या राजकीय पुढाऱ्यांसाठी प्रार्थना करूया की, त्यांनी
लोकहितासाठी निर्णय घेऊन जनतेच्या प्रगतीस अनुरूप अशी धोरणं बनवावीत व त्या मुळे गोरगरिबांचा
उद्धार होऊन, त्यांना आणि त्यांच्या
कुटुंबियांना सदोदित तुझ्या प्रेमाच्या मायेखाली ठेवावे म्हणून आपण प्रार्थना
करूया.
४.
हे प्रभू आम्ही सर्वजण राजनीतिक व आर्थिक महामारीत अडकलेलो आहोत. आमच्या मनात अनेक
शंका-कुशंका निर्माण होतात. आमच्या विश्वासाला तडा जाण्याची शंका नाकारता येत
नाही. तुझ्या अधिकाधिक जवळ येऊन तुझ्यावरच आमची श्रद्धा वाढव हा वरदहस्त आम्ही
तुझ्याकडे मागतो म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.
थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि व्ययक्तिक हेतूंसाठी
आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment