Monday 12 February 2024

 


Reflection for the 1st Sunday in the Season of Lent (18/02/2024) by Fr. Glen Fernandes.




दिनांक: १८-०२-२०२४

पहिले वाचन: उत्पती ९:८-१५

दुसरे वाचन: १ पेत्र ३:११-२२

शुभवर्तमान: मार्क १:१२-१५


उपवास काळातील पहिला रविवार



प्रस्तावना:


ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनोआज पवित्र देळमाता उपवास काळातील पहिला रविवार साजरा करीत आहे. आजचे पहिले वाचन आपल्याला देवाने नोहाशी व त्याच्या मागे येणाऱ्या संततीशी तसेच तारवांतून बाहेर आलेले पक्षी, ग्रामपशु व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी ह्यांच्याशी केलेला करार या विषयी सांगत आहे.

 

आजच्या  दुसऱ्या वाचनात पेत्र म्हणतो की आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी, म्हणजेच पवित्र करण्यासाठी, ख्रिस्ताने  नीतिमान असून सुद्धा अनीतिमान लोकांकरिता मरण स्वीकारले. आजच्या मार्कलिखित शुभवर्तमानात आपण  येशूची अरण्यात झालेली परीक्षा व त्याच्या लौकिक कार्याचे प्रारंभ याविषयी ऐकतो. येशूच्या बाप्तिस्मा नंतर पवित्र आत्म्याने येशू ख्रिस्ताला त्याच्या कार्याला सुरुवात करण्या अगोदर प्रार्थना व उपवास करण्यासाठी अरण्यात नेले. ह्या चाळीस दिवसात त्याला सैतानाच्या मोहाला सामोरे जावे लागले.

आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला प्रत्येक पाऊलावर मोह येतात, येशू ख्रिस्ताच्या जीवनातसुद्धा मोह आले परंतु त्याने मोहांवर विजय मिळविला. आपल्या जीवनात येणा-या मोहांना सामोरे जाण्यास ख्रिस्त आपणाला देखील शक्ती आणि सामर्थ्य देतो. ह्या उपवास काळात आपण येशूच्या अधिकाधिक जवळ जाण्यास प्रयत्न करावे व त्यास लागणारी कृपा आपणास मिळावी म्हणून ह्या पवित्र मिस्साबलीदानात आपण प्रार्थना करूया.


मनन चिंतन:

आपल्या दररोजच्या व्यवहारात आणि संभाषणात काही आकडे आपण मोघमपणे वापरतो. जसे, “मी तुला दहा वेळा सांगितलं, पण तू ऐकलं नाहीस.” म्हणजे “मी तुला अनेकदा सांगितलं.” किंवा “मी छप्पन्न उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत.” म्हणजे “मी अनुभवी व्यक्ती आहे.” अथवा “एक-दोन दिवसांत काम होईल”, म्हणजे “काम लवकर होईल.”

पवित्र शास्त्रात चाळीस हा आकडा विविध संदर्भात आढळतो. चाळीस वर्षे, चाळीस दिवस, चाळीस रात्री, असे उल्लेख वारंवार येतात. पण चाळीस हा आकडा केवळ पवित्र शास्त्राच्या लेखकांनी नाही, तर परमेश्वराने स्वतः वापरलेला आहे. उदाहरणार्थ, परमेश्वर नोहाला म्हणाला होता, “मी पृथ्वीवर चाळीस दिवस व चाळीस रात्र पाऊस पाडीन.” (उत्पत्ती ७:४) म्हणून पवित्र शास्त्रातील चाळीस हा आकडा मोघम किंवा सांकेतिक नसून अंकगणितातील ती एक विशिष्ट संख्या असल्याचे आपण मानले पाहिजे.

प्रभू येशूने त्याचे पृथ्वीवरील सेवाकार्य सुरू करण्यापूर्वी अरण्यात राहून चाळीस दिवस व चाळीस रात्र उपवास केला होता. त्यावेळी सैतानाने त्याला हिणवले, “तू जर देवाचा पुत्र आहेस तर ह्या दगडाच्या भाकरी व्हाव्यात म्हणून आज्ञा कर.” आणि येशूने त्याला प्रत्युत्तर दिले, “मनुष्य केवळ भाकरीने नाही, पण देवाच्या मुखातून निघणार्‍या प्रत्येक शब्दाने वाचेल, असं लिहिलं आहे.” प्रभू येशूने सैतानाला ज्या शब्दांची आठवण करून दिली ते मुळात मोशेचे आहेत. (अनुवाद ८:३) मोशेनेही सलग चाळीस दिवस व चाळीस रात्र उपवास केला होता, आणि तोही एकदा नाही तर दोनदा. (अनुवाद ९:९, ९:१८)

आजच्या काळी सामान्य माणसाला लागोपाठ चाळीस दिवस अन्नावाचून राहणे शक्य आहे का? कदाचित नाही. पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, मोशे अन्नाशिवाय जगू शकला कारण तो देवाच्या निकट सान्निध्यात होता आणि देवाचे बोलणे तो स्वतः ऐकत होता. त्याचप्रमाणे प्रभू येशू निर्जन व निर्जल अरण्यात असताना देवाचा आत्मा त्याच्याबरोबर होता. म्हणून लेन्ट म्हणजे चाळीस दिवसांचा उपवासकाळ पाळताना देवाची प्रार्थना करणे आणि देवाचे वचन अभ्यासपूर्ण समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. लेन्टच्या चाळीस दिवसांच्या अवधीत उपवास करणे बंधनकारक असल्याचे पवित्र शास्त्रात कुठेही सांगितलेले नाही. तो केवळ परंपरेचा एक भाग आहे आणि परंपरा पाळायची झाली तर ती मनःपूर्वक आणि प्रामाणिकपणे पाळणे अगत्याचे आहे. प्रभूच्या सानिध्यात राहत असताना आपल्याला अनेक अशा मोहांना सामोरे जावे लागते.

आपण सर्वजण असंख्य वेळा प्रभूची प्रार्थना करीत असतो. आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना करीत असताना आपण नेहमी देवाला विनंती करतो की “आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव.”

आपण जेव्हा मोह किव्हा परीक्षा ह्यावर चिंतन करतो तेव्हा आपल्याला कळून चुकते की  मोहाचे विविध स्तर आहेत. काही मोह खूप शक्तिशाली आणि गंभीर असतात , इतर इतके शक्तिशाली आणि इतके गंभीर स्वरूपाचे नसतात. काही मोह हे देहाची असतात. काही मोह आत्म्याचे असतात. काहींमध्ये उत्कटता असते... इतरांमध्ये भावनाशून्यता असते.

मोहाचा दर्जा किंवा प्रकार कोणताही असो, कोणत्याही स्तरावर असो, तो नेहमीच चाचणीचा काळ असतो. समाज्यामध्ये आपलं जीवन जगत असताना, आपला संकल्प, आपल्या आध्यात्मिक जीवनाची चाचणी घेतली जात असते. आणि जर आपले चारित्र्य कोणत्याही आध्यात्मिक शक्ती आणि सामर्थ्याशिवाय आध्यात्मिकदृष्ट्या कमकुवत असेल तर आपण सैतानाला असुरक्षित होऊ आणि तो आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करेल.

प्रभू येशूला  देखील मोहाला आणि सैतानाच्या परीक्षेला सामोरे जावे लागले. त्यामळे मी सुरक्षित आहे किव्हा मला सैतान मोहात पाडू शकत असा विचार करणे म्हणजे निष्काळजीपणा ठरू शकतो .  आपले दैवी कार्य  सुरू होण्यापूर्वी  प्रभूला अरण्यात मोहात पडण्याचा प्रयत्न झाला. प्रभूने  अरण्यात एकटे राहण्याचा आणि  इतरांनी सोडून दिल्याचा अनुभव घेतला, केवळ त्याच्या स्वतःच्या संसाधनांवर तो अवलंबून राहिला. जेव्हा आपण एकटे असतो, आपल्यालाही मोहात पाडण्यासाठी सैतान प्रयत्न करतो. परंतु प्रभूला माहित होतं की सैतान हा खोटारडा आहे. तो सर्व खोटेपणाचा बाप आहे.म्हणून, आपण प्रार्थना करतो की देव मोहाच्या वेळी आमचे रक्षण करेल आणि आम्हाला संकटातून सोडवेल. आम्ही स्वतः,  सैतानाला सामोरे जाताना देवाला आमच्याबरोबर राहण्यास सांगत आहोत. कारण आपण स्वतः, आपल्या सर्व शक्तीनुसार, सैतानासमोर कमकुवत आहोत. आपल्याला भेडसावणारी समस्या अशी आहे की सैतान नेहमी आपल्या वेशात येतो… तो आपल्या भासवतो कि काहीतरी  चांगले आहे. जे चांगले आहे ते भ्रष्ट करणे हे सैतानाचे प्रमुख शस्त्र आहे. तो चांगुलपणा घेतो आणि नंतर त्याचे अवमूल्यन करतो, आणि  भ्रष्ट करतो. तुमच्याकडे असे व्यक्तिमत्त्व आहे की जे  इतरांना भुरळ पाडू शकते.  तुमच्याकडे असे व्यक्तिमत्त्व आहे जे लोकांना आनंदित करू शकेल? तुमची शब्दांवर व भाषेवर प्रभुत्व आहे का? तुम्ही चांगले शब्दकार आहात का? तुम्ही तुमची जीभ इतरांना भ्रष्ट करण्यासाठी वापरू शकता. तुमच्याकडे बुद्धिमत्तेची देणगी आहे का?  सैताना कडेही अशीच शक्ती असते! तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून सत्य भ्रष्ट करून ते खोटे बोलू शकता. बायबलमध्ये ल्युसिफरला दिलेल्या नावांपैकी एक म्हणजे “खोट्यांचा पिता”. आपण जागृत राहिले पाहिजे , जिथे आपण सर्वात बलवान असतो तिथे सैतान आपली शक्ती सिद्ध करण्यासाठी, आपल्या सामर्थ्याला आव्हान देण्यासाठी येत असतो.

आपण जेथे राहतो, आपल्या आजूबाजूच्या लोकांपैकी किती तरी जणांनी वाईटाला विकले आहे. आपले आत्मे सैतानाला विकले आहेत आणि आपला आत्मा दिला आहे. आपण नकळत अनेकदा त्यांची प्रशंसा करत असतो. ते अनेकदा, आजच्या माध्यमांमध्ये, देव आणि देवी म्हणून आपल्यासमोर सादर केले जातात. आपण त्यांच्यासारखे व्हावे असे आपल्याला भासवले जाते. 

पाप,  प्रिय मित्रानो,  खरोखर चांगुलपणाचा अपभ्रंश आहे. आणि खरी लढाई आपल्या अंतःकरणात, आपल्या स्वतःच्या अमर आत्म्यांमध्ये खोलवर चालू आहे. आणि म्हणून ख्रिस्त आपल्याला प्रार्थना करण्यास शिकवतो  की "...आम्हाला मोहात पाडू देऊ नकोस पण वाईटांपासून  सोडव. जीवनात जे काही आपण निर्णय घेतो ते देवासाठी असतात किंवा त्याच्या विरोधात असतात. आपण चिंतन करूया की मी जे काही करतो ते देवासाठी आहे कि देवाच्या विरोधात आहे. बऱ्याच वेळा, जेव्हा मी मृत्यूचा विचार करतो तेव्हा मला संत जॉन ऑफ द क्रॉसचे वाक्य आठवते जे मला खूप आवडते. ते म्हणतात,  "आयुष्याच्या संध्याकाळी, फक्त आपण केलेल्या प्रेमावर आपला न्याय केला जाईल."


बोधकथा: ह्याला मोह म्हणतात…...

एक रविवार, बायबल शिक्षणाचा वर्ग सुरु होता जेथे येशूच्या मोहाचा अभ्यास सुरु  होता. अरण्यातील  तिन्ही मोहाचा बारकाईने अभ्यास आणि स्पष्टीकरण केल्यावर, शिक्षकांनी एका तरुणाला विचारले,आज समाज्यात आपण कसे मोहात पडतो हे तू समजावून सांगू शकतो का?

एक तरुण सेल्समन होता. त्याने उत्तर देत म्हटले,  मोह म्हणजे जेव्हा तुमचा बॉस तुम्हाला ऑफिसमध्ये बोलावतो, ज्याप्रमाणे मला काल बोलावले होते, आणि बॉस  म्हणतो, मी तुला एक मोठी संधी  देणार आहे. एक मोठा  विक्री प्रदेश तुला देणार आहे. आमचा विश्वास आहे की तू त्या जागी जात आहेस. अफाट पैसे व संपत्ती तुला प्राप्त होईल. जीवनात तू वैभवशाली होशील.

तो तरुण सेल्समनने त्याच्या बॉसला म्हणाला, " सर मी आधीच आठवड्यातून चार रात्री घरापासून दूर आहे. माझ्या पत्नी आणि मुलीसाठी हे योग्य ठरणार नाही. मला  तो मोठा विक्री प्रदेश नको. जे आहे त्यात मी समाधानी आहे "

'बघ,' त्याच्या बॉसने उत्तर दिले, 'आम्ही तुला तुझ्या पत्नी आणि मुलीसाठी हे करण्यास सांगत आहोत. तुला चांगले वडील व्हायचे नाही का? आज कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पैसा लागतो. तुमची मुलगी आता लहान आहे. आता जास्त पैसे घेत नाही, परंतु भविष्याचा विचार कर. तिच्या गरजांचा विचार कर! शिक्षणाचा विचार कर. एकच मुलगी आहे, भविष्यात तिचा विवाह धुमधडाक्यात करण्याचा विचार कर. मी तुला  फक्त तिच्यासाठी हे करायला सांगतोय.

ते शिक्षक मध्येच म्हणले, "बरोबर म्हणतात तुझे बॉस."

तो तरुण वर्गाला म्हणाला, आता ह्याला मोह म्हणतात.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे रक्षण कर.


१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे परमाचार्य पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स व सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी ह्यांना देवाने त्यांच्या कार्यात मदत करावी व त्यांच्याद्वारे ह्या उपवासकाळात देऊळमातेचे आध्यात्मिक नुतनीकरण घडवून यावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. आपल्या देशाचा कारभार पाहण्यासाठी जे लोकप्रतिनिधी आपण निवडून दिले आहेतत्यांनी आपल्या विवेकबुध्दीला जागून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून जनतेचे प्रश्न सोडवावेत व सर्व जनतेच्या प्रगतीसाठी झटावेम्हणून आपण प्रार्थना करूया.

३. जे भाविक देवापासून दूर गेले आहेत, व्यसनाच्या आहारी गेले आहेत, एकाकी आहेत, मोह पाशात अडकलेले आहेत अशा सर्वांना परमेश्वराने धैर्य व शक्ती द्यावी व ह्या सर्वांतून बाहेर येण्यास मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. विविध कारणांमुळे जे बेरोजगार आहेत अशा गरजवंतांना चांगला रोजगार मिळावा व त्यांच्या रोजच्या गरजांची पूर्तता व्हावीम्हणून आपण प्रार्थना करूया.

. परमेश्वराची दया व क्षमा आपणास मिळावी व आपणा सर्वांना देवाच्या प्रेमाचा व शांतीचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या कौटुंबिक  वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment