Wednesday, 7 February 2024

 


Reflection for the 6th Sunday in Ordinary Time (11/02/2024) by Br. Roshan Nato.



दिनांक: ११/०२/२०२४

पहिले वाचन: लेवीय १३:१-२, ४५-४६

दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र १०:३१-११:१

शुभवर्तमान: मार्क १:४०-४५


सामान्य काळातील सहावा रविवार



प्रस्तावना:

आजच्या दिवसाची उपासना आपणाला नम्र होऊन देवाच्या इच्छेला प्रमाण मानण्यास पाचारण करत आहे. आजचे पहिले वाचन लेवीय या पुस्तकातून घेतले असून ते आपल्याला महारोग्याच्या वास्तव्याची व त्याच्या सामाजिक नीतिनियमांची व त्याच्या राहाणीमान याची ओळख करून देत आहे.

तसे आजच्या  दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथीकरास पाठवलेल्या पहिल्या पत्रातून आपणा सर्वाना स्वतःप्रमाणे ख्रिस्ताचे अनुकरण करून स्व:हित न पाहता सर्वांच्या हितासाठी जगण्यास मार्गदर्शन करत आहे. आजच्या शुभवर्तमानात कुष्ठरोग्याच्या दृष्टांताद्वारे, येशू ख्रिस्त आपणाला नम्र बनण्यास आणि देवाच्या इच्छेला आपल्या जीवनात प्रथम स्थान देण्यास बोलावत आहे. या दैवी पाचारणाला होकार देऊन एक नम्र जीवन जगून, जनहित जोपासून देवाच्या इच्छेला आपण जीवनात प्रथम स्थान देण्यास तत्पर असावे म्हणून प्रार्थना करूया.


मनन चिंतन:

आज देउळमाता सामान्य काळातील सहावा रविवार साजरा करीत आहे, आणि आजच्या दिवसाची उपासना आपणा सर्वांना येशु ख्रिस्ताची इच्छा प्रमाण मानून, त्याच्या आज्ञांचे उल्लंघन न करता, देवराज्याची घोषणा सर्व जगभर पसरवित असता, देवकार्यात कोणत्याही प्रकारची बाधा न आणण्यास पाचारण करीत आहे. आजचे शुभवर्तमान आपल्याला येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनात केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल, म्हणजेच चमत्कारांनबद्दल तसेच हे चमत्कार करत असताना त्यांच्यावर ओढून आलेल्या संकटाबद्दलची साक्ष देत आहे.

आज आपण पाहतो की, प्रभू येशू ख्रिस्त हा एका कुष्ठरोग्याला बरे किंवा शुद्ध करतो. शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे एक कुष्ठरोगी प्रभू येशूकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. कुष्ठरोग्याची ही विनंती ऐकून येशूला त्याचा कळवळा आला आणि लागलेच येशूने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श केला म्हणाला, माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो. त्याच वेळी त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला.

आपण जर ह्या शुभवर्तमानातील मजकूरावर चिंतन केले, तर आपल्याला कळून चुकते की हे फक्त, अबोल किंवा निर्जीव शब्द नव्हेत तर, एका समाजाने, कुटुंबाने व नातेवाईकाने वाळीत टाकलेल्या एका मनुष्याला संबोधून, एक नवीन जीवनाची आशा देणारे अशे हे येशू ख्रिस्ताचे उद्गार किंवा शब्द आहे.

ही नवीन जीवनाची आशा आपल्याला केव्हां मिळते?

ही नवीन जीवनाची आशा आपल्याला तेव्हाच मिळते जेव्हा आपण आपले सर्वस्व सोडून येशू ख्रिस्तापुढे नतमस्तक होतो. असें सांगतात कीं, “जेव्हा आपण आपले एक पाऊल देवळाकडे वळतो, तेव्हां देव १०० पावलांचा प्रवास तुडवत आपल्याला अलिंगन देऊन आपली सर्व दु:खे, अडचणी, चिंता, आजार दूर करण्यास आपल्या बरोबर किंवा आपल्यापुढे एका कधीही  धुळीस न मिळणाऱ्या बुरुजाप्रमाणे एकदम खंभीरपणे उभा राहतो. हीच साक्ष आपण आजच्या शुभवर्तमानात ऐकतो की, एका कुष्ठरोग्याने येशुकडे येऊन स्वतःला येशूच्या चरणी वाहिले आणि  तो येशू ख्रिस्ताकडून मिळणाऱ्या दैवी आधाराचा व आरोग्य दानाचा मानकरी झाला.

जेव्हा आपण आपल्या दौत अवस्थे अवस्थेत (दीन, दुबळे, गरजवंत) असतो तेव्हा आपल्यातला मीपणा सुद्धा मृदु होऊन जातो. आपल्या सर्व इच्छा आकांक्षाना जणू तिलांजली मिळते. परंतु आज येशु ख्रिस्त आपल्या जवळ आलेल्या कुष्ठरोग्याला, ज्याने आपल्या स्वतःच्या इच्छेचा विचार न करता येशू ख्रिस्ताच्या इच्छेला प्राधान्य दिले, त्याला बरे करताना. पुढे आपण ऐकतो की, येशू ख्रिस्ताने आपल्या निरागस प्रेमाने फळ म्हणून त्याला नवीन आरोग्याचं दान दिलं. यावरून आपल्याला शास्त्रात सांगितलेल्या, स्वतःला जो नम्र करतो तो उंचाविला जाईल, या वचनाची, तसेच जो देवाच्या इच्छेला आपल्या जीवनात प्रथम स्थान देतो, तो कधीही निराश होत नाही हि शिकवणूक शिकण्यास मिळते.

जेव्हा आपण सुद्धा, या कुष्ठरोग्याप्रमाणे आपल्या गुडघ्यावर जाऊन येशू ख्रिस्ताला शरण येतो, ज्यावेळी आपण सुद्धा आपली स्व:ईच्छा फेटाळून देवाच्या इच्छेला प्राधान्य देतो त्याचवेळी या कुष्ठरोग्याप्रमाणे आपण सुद्धा देवाच्या आरोग्यदायी, प्रेमळ आधाराचा अनुभव मिळत असतो, यात काही शंका नाही.

प्रभु ख्रिस्ताच्या नम्रतेची, त्याच्या प्रेमाची, दयेची, क्षमेची शिकवण सर्व जगभर पसरविण्यास तो आपणास आव्हानात्मक आमंत्रण करीत आहे. येशू ख्रिस्त आपल्याला या दृष्टांताद्वारे सांगू इच्छितो की, जे काही तुम्ही कराल ते सर्व अगदी उदारतेने व देवाच्या सामर्थ्याने, निस्वार्थी व आपल्या प्रसिद्धीची दाद न लावता करा,कारण जो मनुष्य आपल्या जीवनात देवाला दुसरे स्थान देऊन आपण केलेल्या कार्याची वाहवा किंवा प्रसिद्धी करतो तो धुळीस मिळतो.

त्याचप्रमाणे आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला कारंथीकरास पाठवलेल्या पहिल्या पत्रातून सांगू इच्छितो की, आपण जे काही करतो ते सर्व देवाच्या गौरवासाठी आणि कोणालाही न अडखळविणारे असावें. तसेच ते स्व:हिताचे नसून त्यात सामूहिक हित बाळगलेले असावे. शेवटी संत पौल आपल्याला स्वतः प्रमाणे ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास मार्गदर्शन करत आहे.

कुष्ठरोग्यांप्रमाणे आपणसुद्धा आज नम्र व्हावे व दैवी इच्छेला प्राधान्य देऊन येशू ख्रिस्ताच्या आरोग्यदायी स्पर्शाचा अनुभव घेऊन ख्रिस्ताची सुवार्ता सर्व जगभर कोणताही अडथळा न आणता पसरविण्यास सक्षम  व नेहमी व नेहमी तयार असावे म्हणून प्रार्थना करूया.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : “प्रभोआमची प्रार्थना ऐक.”

१. आपले पोप फ्रान्सिसबिशप्सधर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना आपल्या पाचारणाद्वारे ख्रिस्तसभेची निस्वार्थपणे सेवा करण्यास प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. आपले राजकीय नेते स्वत:च्या इच्छेचे गुलाम झालेले आहेत. लोकांची इच्छा न स्विकारता आपली इच्छायोजना व कृतीला फार महत्व देतात. ह्या कारणाने समाजाच्या विकासाला अडथळा निर्माण झाला आहे. परमेश्वराच्या कृपेने त्यांनी मीपणाअहंकारनावलौकीकता, इत्यादींचा त्याग करावा व लोकांच्या इच्छा समाजाच्या प्रगतीसाठी स्विकाराव्यात म्हणून परमेश्वर चरणी प्रार्थना करूया.

३. आज आपला समाज रागद्वेष व अशांतेने व्यापून गेलेला आहे म्हणून आम्ही सर्व ख्रिस्ती भाविकांनी येशूचे अनुकरण करून आपल्या समाजात प्रेमएकोपा व शांतीची ज्योत पेटवण्यासाठी सदैव तत्पर असावे म्हणून प्रभूकडे याचना करूया.

४. ज्या लोकांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे, विशेषकरून आजारीगरीबशोकांकीततुरुंगात अडकून पडलेले आणि व्यसनाधीन झालेले इत्यादी. ह्या सर्वांवर पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आनंदाचाकृपेचा आणि चांगल्या आरोग्याचा वर्षाव व्हावा म्हणून प्रभूकडे दयेची याचना करूया.

५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिककौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment