Friday, 26 April 2024

  Reflection for the Homily of 5th  Sunday Of Easter (28-04-2024) By Brother.

पुनरुत्थान काळातील पाचवा रविवार


दिनांक: /४/२०२४

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: ९: २६ -३१

दुसरे वाचन: १ योहान: ३: १८-२४

शुभवर्तमान: योहान: १५: १-८


प्रस्तावना:

     ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो आज आपण पुनरुत्थान काळातील पाचवा रविवार साजरा करत आहोत आणि आजची उपासना आपणास फक्त एकच संदेश देत आहे आणि तो म्हणजे आपण ख्रिस्ताचे आहोत आणि नेहमी ख्रिस्तामध्ये राहिलो पाहिजे. आपले ध्येय व आपला केंद्रबिंदू फक्त ख्रिस्तच राहिला पाहिजे. आपण जर त्याच्यात राहिलो तरच आपणास सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.

     आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की शौल ह्यास दिमिष्का(Damascus) मध्ये येशूचे दर्शन झाले व तद्नंतर कसे त्याने पौल बनून धेर्याने येशू बद्दल भाषण केले व म्हणूनच त्यास शिष्यामध्ये गणण्यात आले.

     दुसऱ्या वाचनात संत योहान सांगतो की देवाने आपणास एक आज्ञा केली आहे. आपण सर्वांनी येशूवर विश्वास ठेवावा व एकमेकांवर प्रेम करावे. आपण येशू ख्रिस्तामध्ये राहिल्या शिवाय आपला बचाव होऊ शकत नाही.

     पुढे शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताने द्राक्षवेलीचा दाखला देत म्हटले आहे की, तो एक द्राक्षवेल आहे आणि आपण सर्व त्याच्या फांद्या आहोत आणि जर ह्या फांद्या तुटून गेल्या तर त्याचा नाश होतो. म्हणूनच येशूख्रिस्त सांगत आहे, तुम्ही मला चिटकून रहा, माझ्या बरोबर रहा, म्हणजे तुम्हास सार्वकालिक जीवन लाभेल.

बोधकथा:

   एकदा एक मनुष्य असाच जगलात फिरत असताना त्याला एक गरूडाचे अंड भेटले, तो ते अंड घेऊन घरी आला व त्याच्या घरी असलेल्या कोंबडी खाली उबत असलेल्या अंड्यात ठेवले. काही दिवसांनी त्या सर्व अंड्यातून पिल्ले बाहेर आली. तसेच ते गरुड पक्षी ही, छोट्या अवस्थेत सर्व पिल्लान सारखेच दिसत असल्या कारणाने त्यांच्यात काही बद्दल दिसत नव्हता. ते गरुड पक्षी कोंबडीच्या पिल्लाबरोबर त्या पिल्ला सारखेच वाढू लागले व कोंबडीच्या पिल्लासारखेच वागू लागले. जे अन्न कोंबडीचे पिल्ले खात असत तेच अन्न गरुड पक्षी ही खात असे. जेव्हा ते गरुडपक्षी वाढले तेव्हा त्याच्या शरीर रचनेत अनेक बद्दल झाला होता पण त्याने स्वतःला कधीच विचारून घेतले नाही की माझे खरे अस्तित्व काय आहे ते आणि संपूर्ण जीवन तसेच घालवले.

एक दिवस त्याने निळ्या आकाक्षात एक पक्षी त्याची सुंदर पंखे पसरवून भरारी घेत असताना पहिले. हे दृष्य पाहून त्याने एका दुसऱ्या कोंबडीला सांगितले की ते बघ किती सुंदर पक्षी आहे. तेव्हा ती कोंबडी त्यास म्हणाली की तो एक गरुडपक्षी आहे व आपण त्याच्या सारखे कधीच होऊ शकत नाही. अशा ह्या नकारत्मक उतराणे तो गरुडपक्षी जो कोंबडी बरोबर वाढला त्याने उडण्याचा कधीच प्रयत्न केला नाही आणि असेच कोंबडी सारखे जीवन जगून शेवटी मरण पावला.

 

मनन चिंतन:

आपले जीवन ही कधी त्या पक्षा सारखे असते. आपण कोण आहोत आपले अस्तित्व काय आहे, आपला परीचय काय हे सर्व प्रथम जाणून घेणे खूप गरजेचे आहे व महत्त्वाचे आहे. मनुष्य हा एक झाडाच्या फांद्या सारखा आहे आणि हे आपल्यावर अवलंबून असते की आपण कोणत्या झाडाच्या खोडाला चिकटलेले आहोत. काटेरी झाडाला काटे येतात, फुलांच्या झाडाला फुले व फळांच्या झाडाला फळे येतात. आपण कोणते झाड निवडतो?

येशू ख्रिस्त सांगत आहे की जसा मी माझ्या पित्यामध्ये आहे तसे तुम्हीही माझ्यामध्ये रहा, मला निवडा तेव्हाच तुम्ही फलद्रूप होऊ शकता, तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांना माझा अनुभव देऊ शकता. संत मदर तेरेजा म्हणतात, “तुमच्याकडे जेव्हा काही असेल तरच तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता, परंतु तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही काहीच देऊ शकत नाही.” जर तुमच्याकडे ख्रिस्त नसेल, ख्रिस्ताचा अनुभव नसेल तर दुसऱ्यांना ख्रिस्त कसा देणार? त्यामुळेच आपल्याला ख्रिस्तामध्ये राहणे फार गरजेचे आहे.

     येशूख्रिस्त सांगत आहे की मी खरा द्राक्षवेल आहे आणि खरा म्हणजे सत्य, अस्सल, वैध्य असा ही होतो. म्हणजे आपणासाठी येशू ख्रिस्तच सत्य अस्तित्व आहे. ज्याच्याविणा आपण शून्य आहोत. आपण ख्रिस्ताशी जुळण्याचा प्रयत्न खूप करतो परंतु काहीजण आपल्या जीवनात अशा व्यक्ती येतात ज्या आपणास ख्रिस्तापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. ह्या मुळे आपली परिस्थिती एखाद्या अशा फांदी सारखी होते जिथे आपण ख्रिस्ताशी जुळलेले आहोत पंरतू अशा नकारात्मक व्यक्तीमुळे फलद्रूप होत नाही. आपण दुसऱ्याच्या कामी पडत नाहीत.  दुसऱ्यांना ख्रिस्त देऊ शकत नाहीत. आपली स्थिती त्या कोंबडी बरोबर वावरलेल्या गरुड पक्षा सारखी होते. जर त्या पक्षाला प्रोत्साहित केले असते तर त्या पक्षाने आकाक्षात उंच भरारी मारली असती व त्याचे अस्तित्व जाणून घेतले असते. परंतु त्यास परावृत्त केल्याने ते मरण पावले. अशा ह्या पक्षा प्रमाणे आपणही मरून जातो व आपणास ख्रिस्ता पासून दूर केले जाते. अशा मुळे आपल्या जीवनाचा नाश होतो व आपले अस्तित्व नष्ट होते.

     या उलट जर आपण त्याच्याशी एक निष्ठ राहीलो, त्याला चिकटलेले राहीलो तर आपण फलद्रूप होऊ शकतो. आपली काळजी घेतली जावू शकते. आपल्याला नवजीवन मिळू शकते. आपणामध्ये ख्रिस्त वास करु शकतो व तो ख्रिस्त आपण दुसऱ्यांच्या  जीवनात देऊ शकतो, म्हणून आपण सर्वांनी ख्रिस्तामध्ये राहण्यासाठी शिकले पहिजे, त्याच्या सारखे जीवन जगलो पाहिजे म्हणजेच आपला नाश न होता आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आमेन.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू आम्हांला तुझे पुनरुत्थित दर्शन घडवून दे.

 

1. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशय, बिशप्स, सर्व धर्मगुरू, धर्म भगिनी व तसेच प्रापंचिक ह्यांना ख्रिस्त सभेने प्रभूची शुभवार्ता घोषवण्यासाठी जी जबाबदारी सोपवली आहे ती त्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पुढे चालू ठेवावी म्हणून आपण  प्रार्थना करूया.

2.  जे लोक देऊळमाते पासून दुरावलेले आहेत व पापांच्या अंधारात खितपत पडलेले आहेत अशा लोकांना प्रभूच्या जीवनदायी प्रकाशात येण्यास प्रभूकडून शक्ती व सामर्थ्य मिळावे आणि तसेच त्यांना त्याच्या अपराधांची जाणीव व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

3. जे लोक दुःखी आहेत, ज्यांना भविष्याची चिंता भेडसावत आहे, ज्याचा आत्मविश्वास ढासळत आहे अशांना पुनरुत्थित येशूचे दर्शन घडून त्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण व्हावे म्हणून प्रभूकडे आपण प्रार्थना करूया.

4.  जे कोणी आजारी आहेत, विविध आजारांनी त्रासलेले आहेत, खाटेला खिळलेले आहेत अशा सर्वांना पुनरुत्थित प्रभूचा स्पर्श व्हावा व त्यांना चागले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

5. आता थोडावेळ शांत राहून आपल्या कौटुंबिक, सामाजीक व व्यक्तीक गरजासाठी प्रार्थना करूया.    

Friday, 19 April 2024

Reflection for the Homily of 4th  Sunday Of Easter (21-04-2024) By Br  Rockson Dinis. 

पुनरुत्थान काळातील चौथा रविवार



दिनांक: २१/४/२०२४

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: ४: ८-१२

दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र: ३: १-२

शुभवर्तमान: योहान: १०: ११-१८

प्रस्तावना:

आज देऊळ माता पुनरुत्थान काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणा सर्वांस येशू ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे, यावर आपला विश्वास दृढ करण्यास आव्हान करीत आहे.

     आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की, संत पेत्राने कश्याप्रकारे पुनरुत्थित ख्रिस्ताच्या नावाने रोग्यास बरे केले व त्यांना चांगले आरोग्यदान दिले. तर संत योहान दुसऱ्या वाचनाद्वारे आपल्याला सांगत आहे की “जर आपण देवाच्या नावावर विश्वास ठेवला तर आपण सर्वजण देवाची लेकरे बनू”.

तसेच आजचे शुभवर्तमान आपल्याला प्रेरित करत आहे की, “येशू ख्रिस्त हा आपला उत्तम मेंढपाळ आहे”. ज्या प्रमाणे एखादा मेंढपाळ त्याच्या मेंढरावर प्रीती करतो, त्यांचा सांभाळ करतो व त्यांचा संकटापासून बचाव करतो त्याचं प्रमाणे येशू ख्रिस्त एक उत्तम मेंढपाळ असून आपल्या मेंढरावर म्हणजेच आपल्यावर प्रिती करतो,  आपला सांभाळ करतो व आपले  संरक्षण करतो.

     आज आपण सर्वजण येथे ह्या पवित्र मिस्साबलित सहभागी होत असताना, आपण आपल्या जीवनात उत्तम मेंढपाळाच्या सहवासातून भरकटून न जाता त्याच्या सहवासात राहावे व जे कोणी ख्रिस्ता पासून दूर गेले आहेत ते परत यावे म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

मनन चिंतन:

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिणीनो, आज ख्रिस्तसभा पुनरुत्थित काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला उत्तम मेंढपाळ” हा कोण आहे ह्याच्या विषयी सांगत आहे. प्रभू येशू म्हणतो मीच उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढराकरिता आपला प्राण देतो (योहान १०:११) प्रिय मित्रांनो आपण बायबल मध्ये पाहिलं तर आपल्याला कळून चुकते की इस्रायल लोक हे मेंढरे पाळणारे होते. ब्राहाज्याला विश्वासाचा पिता मानले जाते तो मेंढरे पाळणारा होता, व त्याची मुले इसहाक व याकोब हे सुद्धा मेंढरे चारत होते. तसेच इस्रायलाचा राजा दाविद,  हा राजा होण्यापूर्वी तो मेंढरे त्याच्या बालपणापासून चारत होता. मोशे सुद्धा एक मेंढपाळ होता. त्याच्या विषयी एक सुंदर काल्पनिक गोष्ट सांगितली जाते. एकदा मोशे त्याच्या सासरयाच्या मेंढ्या चारत असताना. एक लहान मेंढरू पळून गेले. मोशेने त्या लहान मेंढराचा पाठलाग केला, व त्याला ते मेंढरू नदीकाठी पाणी पीत असताना दिसले. मोशे त्या मेंढराला म्हणाला एवढ्या दूर धावत येऊन तु पाणी पिलास, म्हणून तू थकला असणार, आता मी तुला माझ्या खांद्यावर उचलून घरी घेऊन जातो. हे दृश्य पाहून देव मोशेला म्हणाला, आज तू त्या मेंढराला दया दाखवली व त्याला आपल्या खांद्यावर घेऊन तू घरी आलास म्हणून मी तुला माझा कळप, माझी निवडलेली इस्रायलाची प्रजा मी तुझ्या हाती सोपवितो.

आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मीच उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी त्याला ओळखतो  त्याच प्रकारे प्रभू येशू आपल्या सर्वांना ओळखतो म्हणूनच देव म्हणतो पहा मी तुला आपल्या तळ हातावर कोरून ठेवले आहे, (यशया ४९:१६) जसा मेंढपाल आपल्या प्रत्येक मेंराळा ओळखतो त्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना ओळखतो. आपण पाहतो की प्रभू येशूच्या काळी मेंढपाळ हा मेंढरांच्या पुढे असायचा. मेंढरे मागे आणि मेंढपाळ पुढे, अशाप्रकारे जायचे. तसेच मेंढपाळाच्या आवाजाने सर्व मेंढरे त्याच्या दिशेने जात असत. कारण त्या मेंढरांना माहिती असते की आम्हाला सुरक्षित जागी व संकट समई फक्त मेंढपाळ वाचवणार, व सर्व प्रथम मेंढपा आमच्या प्राणासाठी त्याचा प्राण धोक्यात घालणार आणि आम्हाला वाचवणार.

होय माझ्या प्रिय मित्रांनो ज्याप्रमाणे मेंढपाळ त्यांच्या मेंढराची काळजी घेतो त्याचप्रमाणे देव सुद्धा आपल्या सर्वांची काळजी घेतो त्याला आपल्या सर्व शारीरिक, मानसिक, भावनिक, नैतिक आणि आध्यात्मिक गरजांची काळजी असते. (स्तोत्रसंहिता: २३) मध्ये दाविदातचे स्तोत्र म्हणते, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो. तो मला संथ पाण्यावर नेतो. खरोखरच जेव्हा आपल्याबरोबर प्रभू असतो तेव्हा आपल्याला कसल्याच गोष्टीची उणीव पडणार नाही; व आपले आयुष्याचे सर्व दिवस आशीर्वादाने भरून आलेले दिसतील, आणि खऱ्या शांतीचा अनुभव आपल्याला प्राप्त होईल. आपल्या सर्वांसाठी ख्रिस्त हा तारणाचा दरवाजा आहे त्याच्या वाचून आपल्याला तारण नाही.   

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे, प्रभू तुझ्या लेकरांची वाणी ऐक.


1.ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व सर्व प्रापंचिक ह्या सर्वाना पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने चांगले आरोग्य द्यावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशिर्वाद राहावा, तसेच त्यांनी त्यांच्या मेंढरांची काळजी घ्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया

2.आपल्या कुटुंबातील गैरसमज दूरराखून आपण एकमेकांना प्रेमाने समजून घ्यावे व प्रत्येकाचा आदर राखावा व त्याद्वारे एका चांगल्या ख्रिस्ती कुटुंबाची साक्ष समाजाला द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

3.जे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी  मिळावी त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या कामा धंद्यावर प्रभूचा वरदहस्त असा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

4.जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत, तसेच देवाची वाणी न ऐकता दुसऱ्यांची वाणी ऐकतात अश्या सर्व लोकांना देवाचा दैवी कृपेचा स्पर्श होऊन त्यांनी देवाची प्रेमळ वाणी सतत ऐकावी व देवाच्या जवळ यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

5.आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरजांसाठी व हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.

Friday, 12 April 2024

  Reflection for the Third Sunday of Easter (14/04/2024) By Br. Jostin Parera


पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार

दिनांक: १४//२०२४

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: :१३-१५; १७-१९

दुसरे वाचन: १ योहान: :-

शुभवर्तमान: लुक: २४:३५-४८

प्रस्तावना:

प्रिय बंधू-भगिनीनों, आज ख्रिस्तसभा पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे. आजची तिन्ही वाचने आपल्याला देवाच्या करुणेची, त्याच्या शांतीची आणि प्रेमळ उपस्थितीचे वर्णन करून देत आहेत. देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने एकुलता एक पुत्र या जगात पाठवला आणि मृत्यूवर विजय मिळवून पुन्हा एकदा देवाचे आपल्यावर असलेले प्रेम येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानद्वारे आपणास अनुभवण्यास मिळाले.

प्रेषितांची कृत्ये यातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण पेत्राचे शलमोनाच्या देवडीवरील भाषणाविषयी ऐकतो. पवित्र आत्माने भरलेला पेत्र पुनरुत्थित प्रभू येशूची सुवार्ता पसरवितो. दुसऱ्या वाचनात योहान आपणास पापांपासून परावृत्त कसे व्हावे यासाठी सल्ला देतो. पुढे योहान म्हणतो की, जो कोणी देवाच्या वचनाप्रमाणे चालतो, त्यांच्यामध्ये देवाची प्रिती खरोखर पूर्णत्वास पावली आहे. शुभवर्तमानकार लुक आपल्याला येशूख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना दिलेल्या दर्शनाविषयीची घटना कथन करत आहे. येशू ख्रिस्त प्रथम त्यांना आपल्या शांतीचे वरदान देतोआणि तोच पुनरुत्थित ख्रिस्त आहेह्याची खात्री करून देतो व आपल्या शिष्यांना पश्चाताप व क्षमा घोषित करण्याचे कार्य सोपवितो.

आज जर का आपण समाजाकडे निरखून पाहिलं तर आपल्याला समजून येते की जगाला शांतीची, प्रभूयेशूच्या उपस्थितीची आणि क्षमेची नितांत गरज आहेह्या सर्व गोष्टी आपल्याला ख्रिस्ताच्या पुनरुत्थनाद्वारे भेटल्या आहेत. ह्या मिस्साबलीदानामध्ये सहभागी होत असताना आपल्याला प्रभूची शांती, त्याची उपस्थिती आणि त्याचे कार्य इतरांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष कृपाशक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करू या.


मनन चिंतन:

आजच्या शुभवर्तमानामध्ये येशूख्रिस्ताने दिलेल्या दर्शनाविषयी आपणास ऐकावयास मिळते. पुनरुत्थित झाल्यानंतर येशू खिस्ताने दिलेल्या प्रत्येक दर्शनानंतर प्रभूयेशू शिष्यांना आणि त्याच्या प्रेषितांना सांगतो की, तुम्ही इतरांना सुद्धा सांगा की, ‘प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला आहे. तो पुनरुत्थित झाला आहे. प्रभू येशू त्याच्या दुःखसहन आणि मृत्युद्वारे हादरलेल्या लोकांना एकत्र करीत आहे आणि त्यांच्या समक्ष पुनरुत्थानाच्या गुपित सत्याचा उलघडा करून देत आहे.

आजच्या शुभवर्तमानात रेखाटलेली प्रभूयेशू ख्रिस्ताची उपस्थिती आपल्यासमोर महत्वाचे वैशिष्ट निदर्शनात आणत आहे. हे वैशिष्टय प्रत्येक ख्रिस्ती समुदयात, ख्रिस्ती लोकांमध्ये जगाच्या अंतापर्यंत राहणार आहे आणि ते म्हणजे – ‘ख्रिस्ताची शांती, ख्रिस्ताची उपस्थिती आणि ख्रिस्ताचे विचार (हेतू) ह्या तिन्ही गोष्टी ख्रिस्ती समुद्यात वास करतील.

येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांना दर्शन दिले तेव्हा त्यांच्या मुखातून निघालेले पहिले शब्द होते, ‘तुम्हास शांती असो.प्रभू येशू त्यांना शांती देतो कारण त्याचे शिष्य गोंधळून गेले होते आणि यहुद्यांच्या भितीमुळे ते भयभीत झालेले होते. त्यांच्या हृदयात पापांची भावना निर्माण झालेली होती कारण त्यांनी येशूख्रिस्ताचा नकार केलेला होता. येशूख्रिस्ताने निवडलेल्या अनुयायांनी त्याला एकटे सोडले होते; जरी त्यांनी मोठ्या प्रखरतेने सांगितले होते की, त्याच्या बरोबर ते अखेरपर्यंत राहणार- त्यांनी मात्र वेगळेच केले. त्यांना समजले होते की, त्यांनी त्यांचा मालक येशू ख्रिस्त ह्याचा विश्वासघात केला होता. त्यांना त्यांच्या कृती बद्दल दुःख झाले होते. मात्र, आता त्यांना घड्याळाचे काटे परत मागे फिरवता येऊ शकत नव्हते. मात्र येशूख्रिस्ताला त्यांना झालेल्या पश्चातापाची कल्पना झाली होती. त्यामुळे तो त्यांना म्हणाला, “तुम्हास शांती असो.ज्यामुळे त्यांना समजेल की, त्यांच्या पापांची त्यांना क्षमा झालेली आहे. ह्या येशूच्या अपार दयेमुळे आणि करुणेमुळे त्यांची भीती नाहीशी झाली आणि त्यांच्या आनंदाला उधान आले.

हाच प्रभूयेशूचा शांतीचा व क्षमेचा संदेश आपल्याला प्रत्येक मिस्साबलिदानामध्ये अनुभवयास मिळतो; क्षमा आणि पश्चाताप ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत; त्यांना एकमेकांपासून वेगळे करता येऊ शकत नाही. ज्या प्रमाणे क्षमा आणि पश्चाताप ह्यंचा संगम एकनिष्ठ आहे. कारण आत्मा शरीराला जिवंत ठेवत असतो आणि शरीरामुळे आत्म्याची अनुभूती आपणास मिळत असते.

काही व्यक्ती पश्चातापावर विश्वास ठेवतात आणि वेळोवेळी पापकबुलीसाठी धर्मगुरूकडे जात असतात. मात्र खेदाची गोष्ट हीच की, त्यांना त्यांच्या पापांची पूर्णक्षमा झाली नाही, ह्याची त्यांच्या मनात चल-विचल होत राहते. कित्येकांना क्षमेची गरज असते पण त्यांना पश्चाताप करायला आवडत नाही. म्हणूनच जेव्हा आपण ह्या दोन्ही गोष्टी अनुभवतो तेव्हा आपणास पुनरुत्थानाच्या सत्याची चव कळून येते.

आपण ह्या भूतलावर/ पृथ्वीवर माणसे (मानव) आहोत. आपण स्वर्गातून उतरलेले दूत नाही. सर्व संत आणि पवित्र स्त्री-पुरुष ह्यांनी त्यांचे जीवन ह्या पृथ्वीवर घालवले आणि समाजात कार्य केले. त्यांना सुद्धा मोह झाले होते, काहीजण तर पापांच्या अंधारात असताना देवाच्या मदतीने पापांपासुन मुक्त झाले (संत अगस्टीन).  आपणसुद्धा मानव आहोत; आपल्या हातून सुद्धा कळत आणि नकळत कित्येक चुका झाल्या असतील. काहिक चुकांची तिव्रता प्रबल असेल आणि त्याचा परिणाम दुःखदायक असतो. आपण लहानाचे मोठे होत असताना कित्येक अनावश्यक गोष्टींच्या आहारी गेलो असाल; आपण काही दृष्ट कृत्ये केली असतील पण प्रकाशात काळोख नाहीसा होतो, आनंदात दुःख हरवून जाते आणि पाण्यात साखर विरघळून जाते त्याच प्रकारे पश्चातापामुळे आपल्याला नवीन पवित्र जीवन, आध्यात्मिक मुक्ती, क्षमा आणि शांतीचे वरदान मिळते आणि वाईट गोष्टी नाहीशा होत असतात.

योहान त्याच्या दुसऱ्या पत्रात आजच्या दुसऱ्या वाचनात सांगतो, ‘जर कोणी पाप केले तर नीतिमान असा तो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे. पेत्र आजच्या पहिल्या वाचनातून सांगत आहे की, ‘तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा आणि वळा’. पुनरुत्थानाची एक मौल्यवान भेट जी प्रभू येशूने आपल्या शिष्यांना आणि आपल्या सर्वांना दिली आहे, ती म्हणजे प्रभूची शांती आणि ही शांती आपल्याद्वारे येशूख्रिस्ताने दिलेल्या क्षमेमार्फत मिळत असते.

तद्नंतर येशूख्रिस्ताची उपस्थिती व प्रचिती आपल्याला आजच्या शुभवर्तमानातून मिळते. येशू आपल्या शिष्यांना म्हणतो, “तो मीच आहे”. खरोखरच, आज येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या रूपाने आपल्यामध्ये उपस्थित आहे. विश्वासात आपण जेव्हा एकत्रित येऊन प्रार्थना करतो तेव्हा येशूची उपस्थिती आपण अनुभवत असतो. येशू ख्रिस्ताची उपस्थिती प्रत्येक वेळी जेव्हा आपण ख्रिस्तयागासाठी एकत्र येतो तेव्हा होत असते. प्रभूयेशूची उपस्थिती सध्याच्या काळात फक्त आपल्याला त्याची आठवण म्हणून होत नाही, येशूख्रिस्त हा एक आदर्श व्यक्ती म्हणून होत नाही तर ज्याप्रमाणे येशूख्रिस्त त्याच्या शिष्यांबरोबर होता त्याच प्रमाणे त्याची उपस्थिती आपल्याला पवित्र मिस्साबलीदानामधून होत असते.

येशूख्रिस्ताची उपस्थिती ही अतिमौल्यवान भेट आहे. आपण ह्या रविवारच्या दिवशी एकत्रित जमलो असताना येथे उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती येशुख्रिस्त मरणातून जिवंत झाला आहे ह्याची कबुली देतात. आज आपण सर्वजण आपल्या गरजा, इच्छा-आकांक्षा घेऊन प्रभूकडे आलो आहोत. येशुख्रिस्त प्रत्येक ख्रिस्तयागात आपल्या विनंत्या, आपल्या गरजा जाणून घ्यायला आणि आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करायला येत असतो.

आपल्यामधील कित्येकांनी उपवास काळामध्ये काही निर्णय घेतले असतील, कोणत्या गोष्टींचा त्याग करावा, कोणत्या चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात- रोज मिस्साला जाणे, घरात रोजरीची प्रार्थना करणे, बायबल वाचन करणे, गरजवंताना मदत करणे अशा अनेक गोष्टी तुम्ही उपवास काळात केल्या असतील. प्रत्येक वर्षी उपवास काळात केल्या असतील. प्रत्येक वर्षी उपवास काळ येतो आणि उपवास काळ जातो, आपण चांगल्या व्यक्ती होण्याचा प्रयत्न करतो. तर उपवास काळाप्रमाणेच पुनरुत्थान काळातसुद्धा नवीन गोष्टी आत्मसात करण्याचा निर्णय घेऊ शकतो. ते म्हणजे येशूची शांती आणि त्याची उपस्थिती ह्याचा अनुभव दुसऱ्यांना सांगितला तर महत्त्वाचे ठरेल. सत्याचे बी पेरणे, दुसऱ्यांविषयी आपुलकी, प्रामाणिकपणाचे जीवन जगणे आणि समाजात इमानदाराचे जीवन जगणे ह्या गोष्टी आपल्याला इतरांच्या जवळ जाण्यास मदत करतील. ह्या पेरलेल्या बियांचे उद्या चांगल्या वृक्षामध्ये रुपांतर होऊन त्याची फळे, त्याची सावली आपण इतरांना देऊ शकतो.

येशूख्रिस्ताचे पुनरुत्थान हे त्याने दिलेले एक महत्त्वाचे चिन्ह आणि एक प्रकारची हमी (Guarantee) होती. ह्याच चिन्हाद्वारे ख्रिस्तसभा एखाद्या भाताच्या शेताप्रमाणे भरून जाईल. ही पिके आपल्याला क्षमा, शांती आणि प्रभूयेशुची उपस्थिती प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे आणि येशूख्रिस्ताचे मिशन इतरांना पोहोचविण्यासाठी आपल्याला कार्यक्षम करील.

पुनरुत्थानाची गोष्ट (story) येशूच्या स्वर्गरोहणाने संपलेली नाही तर आज प्रत्येक ख्रिस्ती बंधू-भगिनींनी पुनरुत्थानाची ही गोष्ट पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू, आम्हाला तुझ्या प्रकाशाची लेकरे बनव.

. आपले परमगुरु फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरु आणि प्रापंचिक ह्या सर्वांना ख्रिस्ताची तत्वे आणि त्याची शिकवण इतरांपर्यंत पोहचविण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

. आपल्या सर्व राज्यकर्त्यांनी आपला स्वार्थ, भ्रष्टाचार व इतर सर्व वाईट मार्ग बाजूला ठेवून लोकांची निस्वार्थीपणे सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

. आपल्या धर्मग्रामातील प्रत्येक कुटुंबामध्ये प्रेमाचे, शांतीचे व सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे; पुनरुत्थित ख्रिस्ताचा प्रकाश एकमेकांवर पसरावा व समाजात ख्रिस्ताची उपस्थिती निर्माण करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

. संपूर्ण जगात शांतीचे वातावरण निर्माण होऊन प्रत्येक व्यक्तीमध्ये देवाचे रूप पाहून इतरांना आदराने वागवण्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

. ह्या मिस्साबलीदानात जमलेल्या सर्व भाविकांना प्रभू येशूने चांगले आरोग्य द्यावे, त्यांच्या कामाधंद्यात भरभराट यावी आणि त्यांनी पुनरुत्थित येशु ख्रिस्ताचे अनुयायी व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

. थोडा वेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करू या.