Friday 19 April 2024

Reflection for the Homily of 4th  Sunday Of Easter (21-04-2024) By Br  Rockson Dinis. 

पुनरुत्थान काळातील चौथा रविवार



दिनांक: २१/४/२०२४

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: ४: ८-१२

दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र: ३: १-२

शुभवर्तमान: योहान: १०: ११-१८

प्रस्तावना:

आज देऊळ माता पुनरुत्थान काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणा सर्वांस येशू ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे, यावर आपला विश्वास दृढ करण्यास आव्हान करीत आहे.

     आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की, संत पेत्राने कश्याप्रकारे पुनरुत्थित ख्रिस्ताच्या नावाने रोग्यास बरे केले व त्यांना चांगले आरोग्यदान दिले. तर संत योहान दुसऱ्या वाचनाद्वारे आपल्याला सांगत आहे की “जर आपण देवाच्या नावावर विश्वास ठेवला तर आपण सर्वजण देवाची लेकरे बनू”.

तसेच आजचे शुभवर्तमान आपल्याला प्रेरित करत आहे की, “येशू ख्रिस्त हा आपला उत्तम मेंढपाळ आहे”. ज्या प्रमाणे एखादा मेंढपाळ त्याच्या मेंढरावर प्रीती करतो, त्यांचा सांभाळ करतो व त्यांचा संकटापासून बचाव करतो त्याचं प्रमाणे येशू ख्रिस्त एक उत्तम मेंढपाळ असून आपल्या मेंढरावर म्हणजेच आपल्यावर प्रिती करतो,  आपला सांभाळ करतो व आपले  संरक्षण करतो.

     आज आपण सर्वजण येथे ह्या पवित्र मिस्साबलित सहभागी होत असताना, आपण आपल्या जीवनात उत्तम मेंढपाळाच्या सहवासातून भरकटून न जाता त्याच्या सहवासात राहावे व जे कोणी ख्रिस्ता पासून दूर गेले आहेत ते परत यावे म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

मनन चिंतन:

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिणीनो, आज ख्रिस्तसभा पुनरुत्थित काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला उत्तम मेंढपाळ” हा कोण आहे ह्याच्या विषयी सांगत आहे. प्रभू येशू म्हणतो मीच उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढराकरिता आपला प्राण देतो (योहान १०:११) प्रिय मित्रांनो आपण बायबल मध्ये पाहिलं तर आपल्याला कळून चुकते की इस्रायल लोक हे मेंढरे पाळणारे होते. ब्राहाज्याला विश्वासाचा पिता मानले जाते तो मेंढरे पाळणारा होता, व त्याची मुले इसहाक व याकोब हे सुद्धा मेंढरे चारत होते. तसेच इस्रायलाचा राजा दाविद,  हा राजा होण्यापूर्वी तो मेंढरे त्याच्या बालपणापासून चारत होता. मोशे सुद्धा एक मेंढपाळ होता. त्याच्या विषयी एक सुंदर काल्पनिक गोष्ट सांगितली जाते. एकदा मोशे त्याच्या सासरयाच्या मेंढ्या चारत असताना. एक लहान मेंढरू पळून गेले. मोशेने त्या लहान मेंढराचा पाठलाग केला, व त्याला ते मेंढरू नदीकाठी पाणी पीत असताना दिसले. मोशे त्या मेंढराला म्हणाला एवढ्या दूर धावत येऊन तु पाणी पिलास, म्हणून तू थकला असणार, आता मी तुला माझ्या खांद्यावर उचलून घरी घेऊन जातो. हे दृश्य पाहून देव मोशेला म्हणाला, आज तू त्या मेंढराला दया दाखवली व त्याला आपल्या खांद्यावर घेऊन तू घरी आलास म्हणून मी तुला माझा कळप, माझी निवडलेली इस्रायलाची प्रजा मी तुझ्या हाती सोपवितो.

आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मीच उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी त्याला ओळखतो  त्याच प्रकारे प्रभू येशू आपल्या सर्वांना ओळखतो म्हणूनच देव म्हणतो पहा मी तुला आपल्या तळ हातावर कोरून ठेवले आहे, (यशया ४९:१६) जसा मेंढपाल आपल्या प्रत्येक मेंराळा ओळखतो त्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना ओळखतो. आपण पाहतो की प्रभू येशूच्या काळी मेंढपाळ हा मेंढरांच्या पुढे असायचा. मेंढरे मागे आणि मेंढपाळ पुढे, अशाप्रकारे जायचे. तसेच मेंढपाळाच्या आवाजाने सर्व मेंढरे त्याच्या दिशेने जात असत. कारण त्या मेंढरांना माहिती असते की आम्हाला सुरक्षित जागी व संकट समई फक्त मेंढपाळ वाचवणार, व सर्व प्रथम मेंढपा आमच्या प्राणासाठी त्याचा प्राण धोक्यात घालणार आणि आम्हाला वाचवणार.

होय माझ्या प्रिय मित्रांनो ज्याप्रमाणे मेंढपाळ त्यांच्या मेंढराची काळजी घेतो त्याचप्रमाणे देव सुद्धा आपल्या सर्वांची काळजी घेतो त्याला आपल्या सर्व शारीरिक, मानसिक, भावनिक, नैतिक आणि आध्यात्मिक गरजांची काळजी असते. (स्तोत्रसंहिता: २३) मध्ये दाविदातचे स्तोत्र म्हणते, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो. तो मला संथ पाण्यावर नेतो. खरोखरच जेव्हा आपल्याबरोबर प्रभू असतो तेव्हा आपल्याला कसल्याच गोष्टीची उणीव पडणार नाही; व आपले आयुष्याचे सर्व दिवस आशीर्वादाने भरून आलेले दिसतील, आणि खऱ्या शांतीचा अनुभव आपल्याला प्राप्त होईल. आपल्या सर्वांसाठी ख्रिस्त हा तारणाचा दरवाजा आहे त्याच्या वाचून आपल्याला तारण नाही.   

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे, प्रभू तुझ्या लेकरांची वाणी ऐक.


1.ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व सर्व प्रापंचिक ह्या सर्वाना पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने चांगले आरोग्य द्यावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशिर्वाद राहावा, तसेच त्यांनी त्यांच्या मेंढरांची काळजी घ्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया

2.आपल्या कुटुंबातील गैरसमज दूरराखून आपण एकमेकांना प्रेमाने समजून घ्यावे व प्रत्येकाचा आदर राखावा व त्याद्वारे एका चांगल्या ख्रिस्ती कुटुंबाची साक्ष समाजाला द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

3.जे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी  मिळावी त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या कामा धंद्यावर प्रभूचा वरदहस्त असा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

4.जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत, तसेच देवाची वाणी न ऐकता दुसऱ्यांची वाणी ऐकतात अश्या सर्व लोकांना देवाचा दैवी कृपेचा स्पर्श होऊन त्यांनी देवाची प्रेमळ वाणी सतत ऐकावी व देवाच्या जवळ यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

5.आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरजांसाठी व हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment