Thursday, 7 November 2024

 Reflection for 32nd Sunday in Ordinary Time (10/11/2024) By Br. Oliver Munis



सामान्य काळातील बत्तीसावा रविवार

दिनांक: १०/११/२०२४

पहिले वाचन: १ राजे १७:१०-१६

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र ९:२४-२८

शुभवर्तमान: मार्क १२:३८-४४


प्रस्तावना

        आज देऊळमाता बत्तीसावा रविवार साजरा करत आहे. आजच्या वाचनांमधून आपण “अंत:करणातून देणे” या विषयावर लक्ष वेधणार आहोत. पहिल्या वाचनात गावातील एका विधवेविषयी बोलले आहे. तिच्याकडे फक्त थोडंसं पीठ आणि तेल उरलेले होते, पण जेव्हा एलिया संदेष्टा तिला थोडी भाकर बनवून देण्यास सांगतो, तेव्हा ती तिच्याकडे असलेलं थोडंही देण्यासाठी तयार होते. तिच्या या अंत:करणातून दिलेल्या कृतीला देव आशीर्वाद देतो, आणि चमत्काराने तिची गरज पूर्ण करतो.

        दुसऱ्या वाचनात, इब्रीच्या पत्रात आपण वाचतो, येशूने आपल्यासाठी प्रेमाने केलेल्या त्यागाचा उल्लेख आहे. त्याने आपले स्वतःचे जीवन आपल्या तारणासाठी दिले, त्याची ही अंत:करणातून आलेली देणगी प्रेमाचं खरं अर्थ समजावते.

        मार्कलिखित शुभवर्तमानात, आपल्याला अजून एक विधवा दिसते, जी मंदिराच्या खजिन्यात तिची शेवटची दोन नाणी ठेवते. येशू तिच्याकडे पाहतो आणि तिच्या ‘अंत:करणातून दिलेल्या देणगीचे’ कौतुक करतो, तिचे सर्व काही देणे, आपल्याला, हे लक्षात ठेवायला लावते की, जेव्हा आपण दान देतो तेव्हा आपली देणगी किती मोठी आहे यापेक्षा देव आपल्या ‘अंतकरणातून दिलेल्या प्रामाणिकपणाला’ अधिक महत्त्व देतो.

        आज, आपण या पवित्र मिस्साला सुरुवात करत असताना, स्वतःला विचारूया: आपणही या वाचनांतील उदाहरणांसारखे अंत:करणातून कसं देऊ शकतो? आपल्याला येशूच्या नि:स्वार्थी प्रेमाचे आणि अंत:करणातून दिले पाहिजे याचे अनुसरण करण्याची प्रेरणा मिळो म्हणून प्रार्थना करूया आणि या पवित्र मिस्साबलिदानात प्रवेश करूया.

मनन चिंतन

        आज देऊळमाता, आपल्याला ‘अंत:करणातून देण्याची’ काही प्रभावशाली उदाहरणे विचारविनिमय करण्यास भाग पाडतात. मार्कलिखीत शुभवर्तमानात, आपण त्या साध्या विधवेची गोष्ट पाहतो, जिने मंदिराच्या खजिन्यात दोन छोटे नाणे दिले. तिचे ते देणे दुसऱ्यांना लहान वाटले असले तरी, येशूने तिच्या देणगीची दखल घेतली आणि तिचे कौतुक केले, कारण तिने कुठलीही भीती न बाळगता, जे काही तिच्याकडे होतं ते सगळे दिले. येशू आपल्याला या शुभवर्तमानाद्वारे आपल्याला, खरे देणे,  हे किती दिलं त्यावर नाही तर अंतकरणातून दिलं आहे का, यावर आधारित असते. याची ओळख करून देत आहे.

        हीच " अंतकरणातून देण्याची" संकल्पना १ राजे अध्याय १७ मध्ये असलेल्या विधवेच्या कथेत देखील दिसून येते, जिच्याकडे फक्त थोडे पीठ आणि तेल शिल्लक होते, पण तरीही तिने तिचा शेवटचा घास संदेष्टा एलियाला देवून वाटून घेतला. या दोन्ही विधवांनी स्वतःच्या गरजा मागे ठेवून, इतरांसाठी त्याग केला. या उदाहरणांमधून, देव आपल्याला हे शिकवतो की आपण केवळ आपल्या श्रीमंतीतून नाही, तर आपल्या ‘अंत:करणातून’ दिले पाहिजे.

अंत:करणातून देणे म्हणजे "दुख होईपर्यंत देणे" पण असते.

        कोलकात्याच्या मदर तेरेजा या आपल्या काळातील “अंत:करणातून देणाऱ्या” ह्यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मदर तेरेजा यांना असे वाटत असे की, खरे देणे हे त्यागाचे असावे आणि आपल्याला देत असताना अस्वस्थता वाटणार असे असावे. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, “तुम्ही इतके कसे देऊ शकता?” तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, “दया, आणि दुःख होईपर्यंत दया.” याचा अर्थ म्हणजे त्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवनच इतरांसाठी अर्पण केले. त्यांची वेळ आणि प्रेम इतरांसाठी दिले. अशा प्रकारचे देणे कठीण असतं, पण तेच खऱ्या प्रेमाची, करुणेची ‘अंत:करणातून देणे’ याची ओळख असते.

        त्यांच्या या उदाहरणावरून आपणही उदारपणे देण्यासाठी प्रेरित व्हायला हवे, अगदी आपल्याला आव्हान किंवा अडचण वाटलं तरीही. “दुख होईपर्यंत देणे.”

आपण जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अंत:करणातून देवू शकतो.

        ‘अंत:करणातून देणे’ म्हणजे फक्त पैसे नाहीच देवू शकत तर आपण आपला वेळ दुसऱ्यांना आपल्या कौशल्याद्वारे देवू शकतो. प्रिय भाविकांनो, आपल्यापैकी प्रत्येक जण, कोणत्याही वयात किंवा जीवनाच्या कुटल्याही टप्प्यावर, इतरांना अंत:करणातून देऊ शकतो.

लहान बालक

        लहान बालकांनी त्यांच्या प्रेमळ कृतींनी इतरांशी प्रेम दयायला शिकले पाहिजे. ख्रिस्तसभा शिकवते की, अंत:करणातून दिलेले प्रेम म्हणजे इतरांना मदत करणे. जेव्हा लहान बालके त्यांच्या अंत:करणातून केलेल्या कृतींमध्ये प्रेम दाखवतात, तेव्हा ते देवाला आणि इतरांना आनंद देत असतात.

भारतातील लोकप्रिय कार्टून डोरेमोन, मुलांना ‘निःस्वार्थी देण्याची’ किंमत शिकवते. डोरेमोन नेहमीच त्याच्या मित्राला, नोबिताला, त्याच्या गॅजेट्स देऊन मदत करतो, जरी त्याला  स्वतःला त्रास झाला तरी डोरेमोन त्याच्या गॅजेट्सचा वापर मित्राच्या मदतीसाठी करतो. तशीच लहान बालकांनी देखील जे काही आपल्याकडे असते, ते शेअर करायला शिकायला पाहिजे. ते खेळणी असोत, वेळ असो किंवा दयाळूपणा. त्यासाठी काही उदाहरणे तुम्हाला सांगू इच्छीतो:

·   जर मित्राकडे खेळणी नसतील तर आपली आवडती खेळणी मित्रांसोबत दयायला हवी.

·         मित्रांना गृहपाठ किंवा घरातील कामात मदत करणे.

·   शाळेत सर्वांशी दयाळूपणे वागणे, विशेषतः ज्यांच्याकडे खूप मित्र नाहीत त्यांच्याशी.

या साध्या आणि अर्थपूर्ण गोष्टींमधून, लहान बाळके उदारतेचा आनंद अनुभवू शकतात आणि अंत:करणातून देण्याची सवय लावू शकतात.

युवक व युवती

        आपली ख्रिस्ती मूल्य युवक व युवतींना प्रेम व आदर अंत:करणातून दाखवून, देवाचे प्रेम व्यक्त करायला भाग पाडत आहे. ख्रिस्तसभा शिकवते की, अंत:करणातून दिलेले प्रेम म्हणजे इतरांना आधार देणे आणि त्यांच्यासोबत वेळ आणि आपुलकीने वागणे. जेव्हा युवक व युवती त्यांच्या कृतींमधून प्रेम व आदर व्यक्त करतात, तेव्हा ते देवाचे प्रेम दाखवतात.

        युवक व युवतींना, अंत:करणातून देणं म्हणजे इतरांच्या मदतीसाठी त्यागाची निवड करणे असणे आवश्यक आहे, केवळ स्वतःचाच विचार न करता सर्वांचा विचार केला पाहिजे. भारतातील एक लोकप्रिय वेब सीरीज  कोटा फॅक्टरीमध्ये आपण पाहतो की, विद्यार्थी एकमेकांना कठीण स्पर्धात्मक परीक्षांच्या वातावरणात मार्गदर्शन करतात. यातून युवक व युवती प्रेरणा घेऊ शकतात:

·         एखाद्या मित्राला त्याच्या गरजेत मदत करावी.

·         इतरांना कठीण परिस्थितीत आधार द्यावा.

·         इतरांना मदत करावी, ज्यांना अधिक गरज आहे त्यांना सहाय्य करावे.

त्यांच्या मित्रांना आदर आणि दयेने पाहून, युवक व युवतीने एकमेकांना आधार दिला पाहिजे आणि अंत:करणातून दया, आधार व मदत केली पाहिजे.

                                            विवाहित जोडपी

        विवाहित जोडप्यांसाठी, अंत:करणातून देणे म्हणजे त्यांच्या नात्यांमध्ये प्रेम आणि लक्ष पूर्णपणे अर्पण करणे. लग्न हे प्रेम, विश्वास आणि एकमेकांसाठी समर्पण यावर आधारलेले असते. आपली ख्रिस्तसभा शिकवते की, खरे प्रेम तेच असते, जे अंत:करणातून दिले जाते आणि त्यात परत काही मिळवण्याची अपेक्षा नसते. विवाहात खरे प्रेम हे रोज केलेले एक नवे वचन असते, जिथे प्रत्येक जोडीदार एकदुसऱ्यांना सन्मान आणि आधार देतो, आणि त्याद्वारे देवाच्या प्रेमाचे प्रतिबिंब दाखवतो.

·       पूर्ण अंत:करणातून ऐकणे: एकमेकांच्या आनंद, चिंता, स्वप्ने अंत:करणातून आणि शांतपणे ऐकण्यासाठी वेळ दिला पाहिजे.

·       प्रेमळ कृती: एकमेकांना छोट्या गोष्टींनी आश्चर्यचकित (surprize) करा, जसा आवडता पदार्थ बनवणे किंवा न विचारता घरातील एखादे काम करून देणे.

·       एकदुसऱ्यांना वेळ देणे: एकत्र शांत वेळ घालवा, प्रार्थना  करा, चालणे (walk) किंवा संवाद साधत जा आणि एकमेकांसाठी वेळ दिला पाहिजे.

·       प्रोत्साहनाचे शब्द: रोज एकमेकांचे कौतुक करणारे आणि प्रोत्साहक शब्द बोला, जेणेकरून तुमची नाती मजबूत होतील.

ही छोटी-छोटी कृती जर अंत:करणातून केल्याने, प्रेम व्यक्त करण्याचे सामर्थ्य वाढते आणि तुमच्या नात्यात विश्वास व प्रेमाची मजबुती येत असते.

वृद्ध लोक

वयोवृद्धांमध्ये असताना त्यांच्याकडे वेळ आणि ज्ञान असते, जे ते इतरांना देवू  शकतात. त्यांचे अंत:करणातून देणे हे पुढीलप्रमाणे असू शकते:

·         तरुण पिढीला मार्गदर्शन आणि आधार देणे.

·         त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसाठी प्रार्थना करणे.

·         त्यांच्या समाजात किंवा चर्चमध्ये स्वयंसेवा करणे.

अंत:करणातून दिलेले हे कार्य लोकांवर प्रभाव टाकण्याचा त्यांच्यासाठी एक शक्तिशाली मार्ग ठरू शकतो.

धार्मिक लोक

        जे लोक धार्मिक सेवा करण्यासाठी बोलावलेले जातात, त्यांना अंत:करणातून देणे म्हणजे त्यांच्या जीवनाचे इतरांसाठी आणि देवासाठी समर्पण करणे असते.

·       लोकांना शिकवणे आणि मार्गदर्शन करणे.

·       गरीब व आजारी लोकांची सेवा करणे.

·       प्रार्थना, त्याग आणि नम्रतेचं जीवन जगणे.


        शुभवर्तमानामध्ये, येशू आपल्याला त्या विधवेचे अनुकरण करण्यास सांगतो. तिचं हृदय देवावरील प्रेम आणि विश्वासाने भरलेलं होतं, ज्यामुळे तिने सर्वकाही दिलं. तिच्याप्रमाणे, आपणही अंत:करणातून देण्यासाठी बोलावलेले आहोत, हे ओळखून  आपल्याकडे असलेली प्रत्येक गोष्ट ही देवाची देणगी आहे हे लक्षात ठेवावे. येशू आपल्याला मुक्तपणे, उदारतेने देण्यासाठी, इतरांना स्वतःच्या पुढे ठेवण्यासाठी, आणि अंत:करणातून प्रेम करण्यासाठी आमंत्रित करत आहे.



श्रद्धावंतांच्या प्रार्थना

प्रतिसाद – हे देवा आम्हांला उदार हृदय दे.

१. आपले परमगुरुस्वामी पोप फ्रान्सिस, महागुरूस्वामी, सर्व धर्मगुरू, व्रतस्थ, प्रापंचिक आणि सर्व व्यक्ती ज्या ख्रिस्त सभेची धुरा वाहतात त्यांना प्रभू परमेश्वराचे उदार हृदय प्राप्त व्हावे व त्यांच्या कार्याद्वारे त्यांनी चांगले फळ द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपल्या सामाजिक राजकीय नेत्यांसाठी आपण प्रार्थना करूया. त्यांनी गोरगरिबांच्या, दिनदुबळ्याच्या, व असुरक्षित लोकांच्या गरजा पुरवाव्यात व त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. जे गरीबांचा छळ करतात व जे त्यांच्या मानवी प्रतिमेच्या सन्मानाला तडा देतात आणि मानवी तस्करी करतात त्यांनी आपला मार्ग बदलून पश्चाताप करून देवाकडे वळावे व मानवाला मानवाचा दर्जा द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. आपणा स्वतःसाठी आपण प्रार्थना करूया. आपला देवा बरोबर, आपल्या शेजाऱ्याबरोबर व आपणा स्वतःबरोबर समेट घडवून शांती व सुख आपल्या हृदयात, आपल्या घरात व आपल्या समाजात नांदावे व त्यासाठी आपण सतत झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. जे लोक आपल्या समाजात, राज्यात व देशात युद्ध घडवून आणतात, तसेच ताण तणाव व तंटे घडवून आणतात ज्यामुळे सर्व समाज जीवाला घाबरून बसला आहे, त्यांच्या हृदयाचे परमेश्वराने आपल्या सुज्ञपणाने परिवर्तन करावे व त्यांना सत्याच्या प्रकाशात बोलावून त्यांचा दयेने न्याय करावा व त्यांना शांती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. आपल्या घरात किंवा समाजात जे कोणी लोकं आजारी आहेत, खाटेला खिळले आहेत त्यांना परमेश्वरी कृपेचा व स्पर्शाचा लाभ व्हावा आणि परमेश्वराने त्याच्या इच्छे नुसार त्यांना आरोग्य द्यावे. तसेच आपल्या घरांतून जे कोणी देवाघरी गेले आहेत त्यांना स्वर्गीय नंदनवनात सार्वकालिक जीवन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

७. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या व्ययक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया. 


No comments:

Post a Comment