Thursday, 14 November 2024

Reflection for 33rd Sunday in Ordinary Time (17/11/2024) By Br. Criston B. Marvi


                    सामान्य काळातील तेहतिसावा रविवार

                             दिनांक: १७/११/२०२४

                       पहिले वाचन: दानिएल १२:१-३

                     दुसरे वाचन: इब्री. १०:११-१४, १८

                         शुभवर्तमान: मार्क १३:२४-३२

प्रस्तावना

        आज ख्रिस्त सभा सामान्य काळातील तेहतीसावा रविवार साजरा करत आहे. आजची उपासना ही येशूच्या येण्याचा काळ ह्या विषयी सांगत आहे. जो कोणी येशूच्या येण्याचा स्वीकार करणार, तयारीत राहणार व जागृत राहणार ती व्यक्ती त्याच्याबरोबर सर्वकाळ जीवन जगणार.

        कॅथलिक श्रद्धेनुसार शेवटची वेळ म्हणजे जगाचा शेवट नव्हे तर संपूर्ण विश्वाची नूतनीकरण. जेथे देवाला आपण समोरासमोर पाहणार. परंतु त्याच्यापुढे जाण्याची चांगल्या प्रकारे तयारी व्हावी व त्याचा स्वीकार करण्यास नेहमी जागृत असावे म्हणून प्रार्थना करूया.

बोधकथा

        एक राजा आपल्या प्रजेस भेटण्यासाठी वेशभूषा बदलून एका खेडे गावात फेर-फटका मारत होता. तेव्हा त्याच्या निदर्शनास असे आले कि, आपली प्रजा खूप गरीब आहे. हे पाहून त्याला खूप कळवळा आला. त्याने एका गरीब माणसाला खूप पैसे देऊन सांगितले कि तू ह्या शेतात पेरणी करून पिक उगव आणि मला दे. शेतकऱ्याने त्या गोष्टीचा फायदा घेतला व कमी प्रतीचे बियाणे पेरून राहिलेल्या पैशाचा उपयोग मौज-मजा करण्यासाठी केला.

        काही दिवसांनी राजा परत आला व त्या शेतकऱ्याला भेटून त्याने ते शेतातील सर्व पिक त्याला बक्षीस म्हणून घेण्यास सांगितले. तेव्हा त्यास आश्चर्याचा धक्का बसला. व तो विचार करू लागला कि जर हे पिक माझ्यासाठी होणार होते तर मग मी चांगल्या प्रतीचे बियाणे वापरले असते. अशाप्रकारे तो आपला हात डोक्याला लावून अश्रू गाळत बसला. अशाचप्रकारे येशूच्या पुनरागमनाची निश्चित वेळ आपणास ठाऊक नाही. जर आपण विश्वासू आणि नीतिमान असलो तर आपल्याला त्याचे फळ नक्कीच लाभेल.

मनन चिंतन

        ख्रिस्ताठायी प्रिय बंधू भगिनींनो आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकले की, ज्या लोकांची नावे पुस्तकात लिहिलेले आहेत अशा लोकांची सुटका करावयास एक मोठा अधिपती येणार आहे. आणि हा अधिपती कोण, ते आपल्याला आजच्या दुसऱ्या वाचनात सांगितले आहे. पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी जे काही यज्ञ वारंवार अर्पण करत होते ते समर्थ नव्हते, परंतु जेव्हा ख्रिस्त येशूने जे अर्पण केले ते सर्वकाळासाठी पुरेसे झाले आणि त्याच येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी आजचे शुभवर्तमान आपल्याला जागृत राहण्यास आमंत्रित करीत आहे.

        येशूने संपूर्ण मानवतेसाठी स्वतःला अर्पण केले. त्यांनी हे केले ते स्वतःसाठी काहीतरी मिळवण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीला मिळवण्यासाठी त्यांनी केले. प्रिय बंधू भगिनींनो जेव्हा देवाचा पुत्र येणार तेव्हा तो आपल्याला विखुरणार नाही तर आपणा सर्वांना एकत्र करणार. परंतु आपले कार्य, आपली कृती, आपला स्वभावच आपल्यासाठी ठरवणार की, आपण कोणत्या जगात असणार. एकत्र केलेल्या जगात की, विखुरलेल्या जगात. त्यामुळे एकत्र केलेल्या जगाचा किंवा दुसऱ्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपण कशाप्रकारे तयारी केली पाहिजे म्हणून आज, आणि आता, ह्याच क्षणाला आपण निर्णय घेण्यास आजची उपासना आपणास सांगत आहे.

        ह्या जगात आपली वेळ ही फक्त मर्यादित आहे. त्यामुळे हे जीवन जगत असताना देवाची योजना किंवा इच्छा माझ्यासाठी काय आहे, मी कशा प्रकारे तयार होऊ शकतो किंवा कशाप्रकारे तयारी करू शकतो याची जाणीव आपणा स्वतःला असली पाहिजे. त्यामुळे मला ह्या जगात काय करायचे आहे. कशाप्रकारे जीवन जगले पाहिजे हे उद्या किंवा परवा ठरवणार असे बोलून चालणार नाही तर आज आणि ह्या क्षणातच निर्णय घ्यायला हवा.

        म्हणून प्रिय बंधू-भगिनींनो राजांचा राजा जो येणार आहे त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. त्यासाठी आपण तयारीत व जागृत असणे गरजेचे आहे. त्याचा स्वीकार करण्यासाठी उद्या किंवा नंतर नव्हे तर आज आणि आता ह्या क्षणातच ठरवलं पाहिजे. निसर्गाकडे पाहून आपण नैसर्गिक गोष्टींचा किंवा हवामानाचा अंदाज लावू शकतो. परंतु देवाच्या पुत्राच्या येण्याचा अंदाज किंवा देवाचा पुत्र कधी येणार हे कुणालाच ठाऊक नाही, फक्त स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे. त्यामुळे त्याचा स्वीकार करण्यासाठी आपल्याला जागृत राहिला हवे.

        जेव्हा सर्व ठिकाणी गोंधळ, गडगडाट, अशांती असेल, तेव्हा सर्व शांतीचा राजा येईल. व सर्व काही शिस्तीत लावणार. आणि तो होणार प्रभूचा दिवस. त्याच दिवसाची तयारी करण्यास आपण जागृत असले पाहिजे.

        येशू ख्रिस्त जो स्वर्गीय पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, व जिवंताचा न्याय करण्यासाठी थांबलेला आहे, त्याच्यासमोर जाण्याची तयारी मी केलेली आहे का? त्यासाठी मी जागृत आहे का? हे आपण आपल्या मनन चिंतनासाठी विचारूया.


श्रद्धावंतांच्या प्रार्थना

प्रतिसाद – हे तारणदायी ख्रिस्ता आमची प्रार्थना ऐकून घे.

१) संपूर्ण जगभरात पसरलेली आपली ख्रिस्तसभा व तिचे सर्व पुढारी व सदस्य ह्यांना प्रभू सुवार्ता प्रचार करण्यासाठी लागणारी कृपाशक्ती व सामर्थ्य परमेश्वराने बहाल करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) प्रभू येशू जेव्हा नव्याने आमचे तारण करावयास आगमन करील तेव्हा त्याच्यासमोर आम्ही सर्वजण एक नीतिमान व धार्मिक व्यक्ती असे उभे असावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) बहुतेक धार्मिक स्थळे हे राजकारणाचे व्यासपीठ बनत चालले आहे, त्यातून धार्मिक मतभेत निर्माण केले जात आहेत. अश्या समाज विघातक विकृतींना आळा बसावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) आपल्या धर्मप्रांतावर, धर्मग्रामावर व प्रत्येक कुटुंबावर परमेश्वराचा कृपापूर्ण अशिर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment