Reflection for Solemnity of Christ The King (24/11/2024) By Br. Oliver Munis
ख्रिस्तराजाचा सण
दिनांक: २४/११/२०२४
पहिले वाचन: दानियेल ७:१३-१४.
दुसरे वाचन: प्रकटीकरण १:५-८.
शुभवर्तमान: योहान १८:३३-३७.
प्रस्तावना
आज खिस्तसभा, “ख्रिस्तराजाचा” सण साजरा करते.
येशू हा इतर राजांसारखा नाही: तो सत्ता आणि श्रीमंतीच्या शोधात नाही, तर येशू हा
सेवक-राजा आहे, जो नम्रता, सत्य आणि प्रेमाने राज्य करतो. आजच्या वाचनांमधून आपण
त्याच्या अनोख्या राजेपणाचा अर्थ आणि आपल्याला त्याचे पालन व अनुकरण करण्याचे
निमंत्रण कसे मिळू शकते, ते शोधण्याचा प्रयत्न करूया.
दानिएल
संदेष्टा सहा हजार वर्षाअगोदरच येशूख्रिस्त राजा असल्याची सुवार्ता जाहीर करतो. तो
ख्रिस्ताला मानव पुत्राप्रमाणे मेघावरून गौरवाने येताना आणि वैभवशाली जीवनात
पाहतो. ख्रिस्तराजा पापरहित, अनंतकाळचा राजा आहे. म्हणूनच, सर्व लोक, राष्ट्रे आणि भाषा बोलणाऱ्यांनी त्याची सेवा करावी, कारण त्याला प्रभुत्व, वैभव, आणि राज्य दिले गेले आहे.
प्रकटीकरणाच्या
पुस्तकात, योहान ख्रिस्ताला राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, अधिपती अशा नावाने संबोधले गेले आहे. आपल्या
प्रजेसाठी रक्ताची आहुती दिली व सर्वांना पाप बंधनातून मुक्त करून घेतले आणि वैभवी
राज्यात प्रवेश दिला. तो ‘अल्फा’ व ‘ओमेगा’ आहे, म्हणजेच सुरुवात आणि शेवट. हे त्याच्या सेवेमध्ये
जगण्याचे उदाहरण दर्शवते.
शुभवर्तमानामध्ये
पिलाताला येशू विचारतो, “तू स्वतः म्हणतोस का, की मी राजा आहे, की दुसऱ्याने तुला सांगितले?” येशू स्पष्ट करतो की, त्याचे राज्य या जगाचे नाही, पण ते परमेश्वराकडून दिलेले आध्यात्मिक राज्य आहे, जे लोकांच्या अंतःकरणात सत्य आणि विश्वासाने वसते.
येशू तलवारीने नाही, तर देवाच्या सत्याने आणि सेवेमुळे
लोकांची मने जिंकतो.
आजच्या
वाचनांबद्दल मनन-चिंतन करत असताना, आपण येशूला आपला सेवक-राजा मानूया आणि त्याच्या नम्र
सेवकाच्या उदाहरणाचे अनुकरण व पालन करण्याचा प्रयत्न करूया.
मनन चिंतन
आपण
बहुताश विचार करतो कि, ख्रिस्त राजाचा सण म्हणजे सामाजिक उत्सव
(celebration):
जेथे येशू आपला राजा असल्याकारणाने आपला
आनंद आपण फटाके वाजवून, पांढऱ्या रंगाचे आकाश कंदील (sky lantern) उडवून व हवेत आतिशबाजी करून सणाचा आनंद
लुटत घेत असतो. परंतु जसे आपले लक्ष सामाजिक उस्तवावर असते, त्याचप्रमाणे आपण
कॅथोलिक व ख्रिस्ताचे अनुयायी असल्याकारणाने आपण आध्यात्मिक उत्सवाकडे लक्ष देण्यास
ख्रिस्तराजाचा सण आव्हान करत आहे.
आपल्याला
देऊळमाता सतत येशु ख्रिस्ताच्या वचनावर व शिकवणीवर मनन-चिंतन करण्यास सांगत असते.
परंतु आज प्रभू येशूवर मनन चिंतन करण्यास बोलावात आहे. विशेषकरून प्रभू येशू हा
सेवक-राजा आहे. तर आज आपण प्रभू येशू हा सेवक-राजा कसा आहे हे जाणुया, शिकूया व त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया.
सेवक-राजा कसा आहे हे जाणुया
येशू हा सेवक-राजा आहे, हे आपण एका कवितेद्वारे जाणून घेवूया.
या जगात असा एक महान राजा झाला आहे,
ज्याने ना सोन्याचा, ना चांदीचा, ना हिऱ्याचा मुकुट निवडला,
पण त्याने काट्यांचा मुकुट परिधान करण्याचा निर्णय घेतला.
या जगात असा एक महान राजा झाला आहे,
ज्याने प्राणाची आहुती देण्यासाठी आपले सैन्य पुढे
पाठवले नाही,
तर त्याने स्वतः पुढे जाऊन संपूर्ण जगासाठी आपले प्राण
अर्पण केले.
या जगात असा एक महान राजा आहे,
ज्याने कधीही कोणताही गुन्हा केला नाही,
परंतु संपूर्ण मानवजातीचे पाप स्वतःवर घेतले
आणि संपूर्ण जगाला पापाच्या महाकोपातून मुक्त केले
आणि तो आपल्यासाठी शापित झाला.
त्या महान राजाचे नाव प्रभु येशू ख्रिस्त आपला तारणहार
आहे.
सेवक-राजापासून आपण शिकूया
येशू
ख्रिस्तराजा आपल्याला नम्रता, सेवा आणि प्रेमाच्या माध्यमातून खऱ्या नेतृत्वाचा अर्थ शिकवतो. त्यानी
दाखवले की राजेपण वैभव व सत्तेत नाही, तर इतरांची सेवा करण्यात आहे. येशू सेवक-राजाकडून आपण
पाच महत्त्वाच्या आणि व्यावहारिक गोष्टी शिकू शकतो:
१. नम्रता असलेले नेतृत्व
येशू हा देवाचा पुत्र असूनही सामान्य
माणसासारखा जगला. तो गायीच्या गोठ्यात जन्मला, सुतारकाम केले, तो लोकांसोबत राहून, त्यांचे जीवन समजून घेतले.
यामुळे आपल्याला शिकायला मिळते की, खरे नेतृत्व हे नम्र असते आणि माणसाला
सत्तेपेक्षा जास्त महत्त्व देते.
२. लोकांमध्ये राहून त्यांना समजून घेणे
येशू लोकांसोबत चालला, त्यांच्यासोबत जेवला, बोलला, आणि त्यांचे दुःख-आनंद समजून घेतले. त्यांनी आपले
जीवन लोकांसोबत जोडले. यामुळे आपण शिकतो की लोकांच्या गरजा जाणून घेतल्याशिवाय
त्यांना खरी मदत करता येत नाही. आपल्यालाही त्यांच्या जीवनात उपस्थित राहून
त्यांना मदत करायला शिकायला हवे.
३. गरिबांची व गरजुंची मदत करणे
येशूने नेहमी गरिबांना, आजारी लोकांना आणि समाजाने नाकारलेल्या व्यक्तींना
मदत केली. त्यांनी त्यांना धीर दिला, त्यांचे आजार बरे केले आणि त्यांना सन्मान दिला. यामुळे आपल्याला समाजातील
दुर्लक्षित लोकांना सेवा करण्याची प्रेरणा मिळते आणि तेच सेवाकार्य, आपले जीवनशैली
(lifestyle) बनते.
४. सेवा करणे, सेवा घेणे नाही
येशू म्हणतात, “मनुष्यपुत्र सेवा घेण्यासाठी नव्हे तर सेवा
करण्यासाठी आला आहे.” त्यांनी शिष्यांचे पाय धुतले, उपाशी लोकांना खाऊ घातले आणि आजारी लोकांची सेवा केली. येशू आपल्याला शिकवतात
की निःस्वार्थीपणे इतरांची सेवा करणे हे खरे जीवन आहे.
५. सत्य आणि प्रेमाने जगणे
येशूने सत्यासाठी आणि देवाच्या
प्रेमासाठी साक्ष दिली. ते अन्यायाच्या विरोधात उभे राहिले आणि क्रूसावरूनही
आपल्या शत्रूंना माफ केले. येशू आपल्याला प्रामाणिक राहायला, न्यायासाठी उभे राहायला आणि निःस्वार्थ प्रेम करायला
शिकवतात.
सेवक-राजाची प्रेरणा घेऊन त्याप्रमाणे
वागूया
माझ्या
प्रिय बंधू व भगिनींनो आजच्या ख्रिस्तराजाच्या सणाच्या दिवशी आपल्याला देऊळमाता त्याच्या
जीवनशैलीतून प्रेरणा घेऊन आपल्याला त्याच्यासारखे वागण्यास बोलावत आहे आणि खालील
बाबी लक्षात घेऊन आपण आपले आयुष्य ख्रिस्ताच्या प्रेरणेने जगून, आत्मसात करण्याचा प्रयत्न व देवाचे राज्य प्रस्थापित
करण्याचा प्रयत्न करूया.
१. आपले ध्येय निश्चित करा
जीवनात ध्येय ठरवणं फार महत्त्वाचं आहे.
ध्येय हे आपल्या आयुष्याचं दिशादर्शक असतं. तुम्हाला काय साध्य करायचं आहे, तुमचे आवडते क्षेत्र कोणते आहेत, याचा विचार करा. ध्येय निश्चित केल्याने तुमच्या
आयुष्याला एक स्पष्ट दिशा मिळते.
२. सकारात्मक विचारसरणी ठेवा
सकारात्मक विचारसरणी ही यशस्वी आणि आनंदी
जीवनाचं गुपित आहे. नकारात्मक विचारांमुळे आपली ऊर्जाशक्ती कमी होते आणि आपले लक्ष
विचलित होते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याची सवय
लावा.
३. नात्यांचा सन्मान करा
जीवनात नाती खूप महत्त्वाची भूमिका
बजावतात. आपल्या कुटुंबातील, मित्रांच्या आणि सहकार्यांच्या नात्यांचा सन्मान करा. वेळोवेळी त्यांच्याशी
संवाद साधा आणि त्यांच्या आनंदात सहभागी व्हा.
४. स्वतःवर प्रेम करा
स्वतःला समजूत घेणं आणि स्वतःच्या
गुणांची आणि दोषांची जाणीव ठेवणं, हे आवश्यक आहे. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आपल्यातील चांगल्या आणि वाईट
बाजूंना स्वीकारण आणि त्यांच्यावर काम करणं.
५. दया आणि सहकार्यभाव ठेवा
इतरांना मदत करणे आणि दयाळूपणाने वागणे, हे आपल्याला अंतर्गत आनंद देऊ शकते. इतरांच्या गरजा
समजून घेऊन त्यांना मदत कर तुम्हाला आनंदी आणि समाधान देईल.
ख्रिस्तराजाच्या राज्याने आपल्या हृदयात त्याचे राज्य प्रस्थापित करावे आणि प्रेम व श्रद्धेने त्याचे राज्य बांधण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करावे म्हणून प्रार्थना करूया. सर्वांना ख्रिस्तराजाच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा
श्रद्धावंतांच्या प्रार्थना
प्रतिसाद – हे दयाळू ख्रिस्त राजा तुझ्या प्रजेची प्रार्थना ऐक.
१. प्रभूची सुवार्ता पसरविणारे आपले पोप फ्रान्सीस, बिशप्स, धर्मगुरू- धर्मभगिनी व प्रापंचिक ह्या सर्वाना ख्रिस्त राजाचा आशिर्वाद
मिळून ख्रिस्त राजाची सुवार्ता पसरविण्यास शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू
या.
२. आपल्या राजकीय नेत्यांनी ख्रिस्त राजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन
लोकांच्या कल्याणासाठी काम करून, योजलेले प्रकल्प पूर्ण करावेत व लोकांची उनत्ती करावी म्हणून राजकिय
नेत्यांना कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. ख्रिस्त राजा आपल्या कुटुंबाचा
राजा आहे. ख्रिस्त राजाची शिकवणूक आपल्या कुटुंबात यावी व नेहमी त्याला शरण जाऊन
त्याने आपल्या कुटुंबात राहून प्रत्येकाचा सांभाळ करावा म्हणून आपण प्रार्थना
करूया.
४. आजारी लोकांवर ख्रिस्त राजाचा
आशीर्वाद यावा व आजाराने ग्रासलेल्या लोकांची आजारातून सुटका व्हावी व ख्रिस्त
राजाच्या प्रेमाचा व सत्याचा खरा अनुभव त्यांना यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment