Reflections for the Homily of 16th Sunday in Ordinary Time (19-07-2026) By Br. Saurav Patil
सामान्य काळातील सोळावा रविवार
दिनांक: १९/०७/२०२६
पहिले
वाचन: ज्ञान ग्रंथ १२:१३,१६-१९
आज आपण सामान्यकाळातील सोळावा रविवार साजरा करत आहोत. आजच्या वाचनातून प्रभू आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. आपल्या जीवनात चांगल्या आणि
वाईट अशा दोन्ही गोष्टी घडतात. अनेक वेळा आपण लगेच दुसऱ्यांचा न्याय करतो किंवा वाईट पाहून निराश होतो.
पण आज देवाचे वचन आपल्याला सांगते की, देव दयाळू आहे, संयमी आहे आणि प्रत्येकाला बदलण्याची संधी देतो. तसेच पवित्र आत्मा आपल्या
अशक्तपणात आपल्याला मदत करतो आणि योग्य मार्ग दाखवतो. या मिस्साबलिदानात भाग
घेताना, मोकळ्या मनाणे आणि विश्वासाने देवाचे वचन ऐकूया आणि ते आपल्या जीवनात जगण्याचा
प्रयत्न करूया.
मनन चिंतन:
प्रिय
ख्रिस्ती बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या तीनही वाचनांचा एकच मुख्य संदेश
आहे, देव दयाळू आहे, देव संयमी
आहे आणि देव प्रत्येकाला बदलण्याची संधी देतो.
मनुष्य
अनेकदा घाई करतो. एखाद्याने चूक केली की आपण लगेच त्याच्याबद्दल मत बनवतो.
"हा कधीच सुधारणार नाही", "याच्याकडून
काही चांगले होणार नाही", असे आपण सहज बोलून जातो. पण देव तसे करत
नाही. देव प्रत्येकाला वेळ देतो. तो प्रत्येकावर प्रेम करतो. तो प्रत्येकाला
पश्चात्ताप करण्याची आणि नवीन जीवन सुरू करण्याची संधी देतो.
आजच्या
पहिल्या वाचनात आपण ऐकले की, देव सर्वशक्तिमान आहे. पण देव आपल्या
शक्तीचा उपयोग लोकांना घाबरवण्यासाठी करत नाही. तो न्यायी आहे, पण
त्याचबरोबर दयाळूही आहे. तो माणसाच्या चुका पाहतो, पण त्याहून
अधिक त्याच्या बदलण्याची क्षमता पाहतो. म्हणूनच देव लगेच शिक्षा करत नाही. तो वाट
पाहतो. आपण आपल्या आयुष्यातही हे पाहतो. लहान मूल चालायला शिकत असते. ते पडते, पुन्हा उठते, पुन्हा
पडते. आई-वडील त्याला रागावत नाहीत. ते त्याला धीर देतात. कारण त्यांना माहीत असते
की एक दिवस हे मूल नीट चालायला लागेल. देवही आपल्याशी असाच वागतो. आपण अनेकदा पडतो, पाप करतो, चूक करतो; पण देव
म्हणतो, "पुन्हा उठ. मी तुझ्यासोबत आहे."
प्रिय
बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला
खूप मोठा दिलासा देतात. ते म्हणतात, आपल्याला
अनेक वेळा काय प्रार्थना करावी हेच समजत नाही. कधी दुःख असते, कधी आजार
असतो, कधी घरातील समस्या असतात, कधी नोकरीची
चिंता असते, कधी मुलांच्या भविष्याची काळजी असते. अशा
वेळी शब्दच सुचत नाहीत. पण संत पौल म्हणतात, काळजी करू
नका. पवित्र आत्मा आपल्या मदतीला येतो. आपण शांतपणे देवासमोर बसलो तरी चालेल.
आपल्या डोळ्यातून आलेले अश्रू, आपल्या मनातील वेदना आणि आपल्या हृदयातील
भावना देवापर्यंत पोहोचवण्याचे काम पवित्र आत्मा करतो. म्हणून प्रार्थना म्हणजे
फक्त मोठमोठे शब्द नाहीत. प्रार्थना म्हणजे देवावर विश्वास ठेवणे. "प्रभु, मला मार्ग
दाखव." एवढेही मनापासून म्हटले तरी देव ऐकतो.
येशू आज गहू आणि निदण यांचा दाखला सांगतो. एका शेतकऱ्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले. पण रात्री शत्रू आला आणि त्याने निदण पेरले. काही दिवसांनी गहू आणि निदण दोन्ही उगवले. नोकर म्हणाले, "मालक, आम्ही निदण उपटून टाकू का?" पण मालक म्हणाला, "नाही. निदण उपटताना गहूही उपटला जाईल. दोघांनाही वाढू द्या. कापणीच्या वेळी वेगळे करू." येशू या गोष्टीतून काय सांगू इच्छितो? पहिली गोष्ट म्हणजे या जगात चांगले आणि वाईट दोन्ही असणार आहेत. आपण कितीही प्रयत्न केला तरी जगात वाईट पूर्णपणे संपणार नाही. म्हणून वाईट पाहून निराश होऊ नका. देव सर्व काही पाहत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण दुसऱ्यांचा न्याय करण्याची घाई करू नये. आपल्याला दुसऱ्यांच्या आयुष्याचा फक्त एक भाग दिसतो. पण देवाला संपूर्ण जीवन दिसते. आज जो चुकीच्या मार्गावर आहे तो उद्या देवाकडे परत येऊ शकतो. बायबलमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. संत पौल पूर्वी ख्रिस्ती लोकांचा छळ करत होते. पण देवाच्या कृपेने तोच महान प्रेषित झाला. जर देवाने त्याला संधी दिली नसती, तर आज आपल्याला त्याची पत्रे वाचायला मिळाली असती का? म्हणून आपण कोणालाही कायमचा वाईट समजू नये. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाकडे पाहणे. येशू दुसऱ्यांच्या शेताबद्दल बोलत नाही. तो आपल्या मनाच्या शेताबद्दल बोलतो. आपल्या मनात कोणते गहू वाढत आहेत? प्रेम, क्षमा, नम्रता आणि प्रार्थना ह्या गोष्टींची वाढ होते का? की आपल्या मनात मत्सर, राग, अहंकार, द्वेष, खोटेपणा आणि स्वार्थाचे निंदण वाढत आहे?
आपण रोज
मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडियावर खूप वेळ
घालवतो. त्यातून कधी चांगल्या गोष्टी मिळतात, तर कधी वाईट
विचार मनात येतात. म्हणून आपण काय पाहतो, काय ऐकतो
आणि कोणासोबत राहतो याची काळजी घेतली पाहिजे. कारण जसे बी पेरू तसे पीक येईल.
प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो,
आपण अनेकदा
देवाला विचारतो, "वाईट लोक सुखात का आहेत?" "चांगल्या लोकांनाच दुःख का येते?" आजचे
शुभवर्तमान आपल्याला सांगते की, देवाचा न्याय योग्य वेळी होईल. आपल्याला
संयम ठेवायचा आहे. देव काहीच विसरत नाही. तो योग्य वेळी योग्य न्याय करतो. म्हणून
आपण दुसऱ्यांच कस वाईट होईल याचा विचार करू नये. दुसऱ्याचा बदला घेण्यापेक्षा
देवावर विश्वास ठेवावा. आपल्या कुटुंबातही हा संदेश खूप महत्त्वाचा आहे.
पती-पत्नीमध्ये, आई-वडील आणि मुलांमध्ये, भाऊ-बहिणींमध्ये
मतभेद होतात. पण जर प्रत्येक जण एकमेकांना बदलण्यासाठी थोडा वेळ, प्रेम आणि
क्षमा देईल तर अनेक नाती पुन्हा ऊजुळू शकतात. देव जसा आपल्याला संधी देतो, तशी संधी
आपणही दुसऱ्यांना दिली पाहिजे. आज आपण स्वतःला तीन प्रश्न विचारूया. पहिला प्रश्न:
मी दुसऱ्यांचा न्याय लवकर करतो का? दुसरा
प्रश्न: माझ्या मनात कोणते निंदण वाढत आहे, जे मला
देवापासून दूर नेत आहे? तिसरा प्रश्न: मी रोज देवाला माझ्या
जीवनात चांगुलपणाचे बी पेरू देतो का? जर आपण या
तीन प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधली, तर आजची
वाचन आपल्या जीवनात फळ देतील.
प्रिय
बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण देवाकडे एक विशेष कृपा मागूया.
प्रभु, मला तुझ्यासारखा संयमी बनव. दुसऱ्यांच्या
चुका पाहण्यापेक्षा स्वतःला सुधारण्याची बुद्धी दे. माझ्या मनातील राग, मत्सर, अहंकार आणि
स्वार्थ दूर कर. माझ्या जीवनात प्रेम, दया, क्षमा, नम्रता आणि
विश्वास यांचे चांगले पीक वाढू दे. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने मी दररोज
तुझ्या जवळ येऊ दे. आमेन.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.
१. विश्वव्यापी ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले
परमचार्य पोप लियो व सर्व कार्डिनल, बिशप्स, धर्मगुरु, धर्म-भगिनी यांना चांगले स्वास्थ्य
लाभावे व परमेश्वराचा शब्द लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व त्याद्वारे परमेश्वराचे
राज्य प्रस्थापित व्हावे म्हणून प्रार्थना करूया.
२. जे तरुण तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत, ज्यांना जगण्यात अर्थ
उरला नाही व जे इतर वाईट मार्गाला लागले आहेत अशांना परमेश्वराने चांगला मार्ग
दाखवावा व ते परमेश्वराकडे परत वळावे, म्हणून आपण प्रार्थना
करूया.
३. आपल्याला या वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस मिळावा व
आपल्या शेतकरी बांधवांना चांगले पीक मिळावे आणि आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण
व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे लोक बेघर आहेत अन्न-पाण्याविना जीवन जगत आहेत.
जे आजारी आहेत अशा सर्वांना योग्य वेळी मदत मिळावी व त्यांच्या ही गरज पूर्ण
व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक घरासाठी
प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment