Friday, 4 September 2026

Reflections for the Homily of 23th Sunday in Ordinary Time (06-09-2026) By Br. Saurav Patil

सामान्य काळातील तेविसावा रविवार

दिनांक: ०६/०९/२०२६
पहिले वाचन: यहेज्केल ३३:७-९
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १३:८-१०
शुभवर्तमान: मत्तय १८:१५-२०

प्रस्तावना:

प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या वचनातून आपल्याला प्रेम, जबाबदारी, क्षमा आणि बंधुभाव यांचा सुंदर संदेश मिळतो. यहेज्केलच्या वाचनात देव आपल्याला आपल्या भावंडांसाठी पहारेकरी होण्याचे आवाहन करतो. संत पौल सांगतो की प्रेम हे सर्व नियमशास्त्राची पूर्णता आहे, तर शुभवर्तमानात येशू आपल्याला भाऊ-बहिणींच्या चुका प्रेमाने समजावून सांगण्याचा आणि समेट साधण्याचा मार्ग दाखवतो. म्हणून आजच्या या वाचनांवर  मनन चिंतन करत असताना आपण आपल्या नात्यांकडे पाहूया आणि जिथे मतभेद, किंवा दुरावा आहे, तिथे प्रेम, क्षमा आणि संवादाचा मार्ग स्वीकारण्याची कृपा प्रभूकडे मागूया.

मनन चिंतन:

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजची तिन्ही वाचने आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा संदेश देतात आणि तो असा कि, आपल्या भाऊ-बहिणींची जबाबदारी आपली आहे. पहिल्या वाचनात परमेश्वर संदेष्टा यहेज्केलला म्हणतो, “मी तुला इस्राएलच्या घराण्यावर पहारेकरी नेमले आहे.” पहारेकरी स्वतःसाठी जागत नाही, तर इतरांच्या सुरक्षेसाठी जागत असतो. त्याचप्रमाणे देवाने आपल्यालाही आपल्या कुटुंबातील, समुदायातील आणि समाजातील लोकांसाठी जबाबदार म्हणून बनवले आहे. एखादा माणूस चुकीच्या मार्गावर जाताना दिसला, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही; प्रेमाने आणि नम्रतेने त्याला योग्य मार्ग दाखवणे ही आपली जबाबदारी आहे. आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला हे काम कसे करायचे हे शिकवतो. तो म्हणतो, “तुझ्या भावाने तुझ्याविरुद्ध अपराध केला तर जा आणि एकांतात त्याला त्याची चूक समजावून सांग.” येशूची पद्धत अतिशय सुंदर आहे. आज आपण एखाद्यामुळे दुखावलो गेलो की त्याच्याशी बोलण्याऐवजी इतरांशी बोलतो, ज्या व्यक्तीमुले दुखावलो गेलो आहोत त्या व्यक्ती विरुद्ध चर्चा करतो, त्याच्यावर टीका करतो; परंतु येशू म्हणतो, आधी त्या व्यक्तीकडे जा आणि प्रेमाने संवाद साध. कारण ख्रिस्ती शिकवण हि दुसऱ्याला लाजवणे किंवा खाली पाडणे हा असा नाही, तर त्याला पुन्हा मिळवणे अशी आहे. एखाद्याची चूक दाखवताना आपण स्वतःला विचारले पाहिजे “मी त्याचा न्याय करीत आहे की त्याला प्रेमाने सुधारण्यास मदत करीत आहे?” दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला सांगतो, “जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा,” कारण प्रेम हे नियमशास्त्राची पूर्णता आहे. आपण प्रार्थना करतो, चर्चमध्ये येतो, धार्मिक कार्य करतो; परंतु आपल्या जीवनात प्रेम नसेल तर आपल्या श्रद्धेचा खरा अर्थ काय? देवाला केवळ आपल्या ओठांवरील प्रार्थना नको आहे, तर आपल्या कृतीतून दिसणारे प्रेम हवे आहे. म्हणून आज आपण आपल्या घरापासून सुरुवात करूया. कदाचित आपल्या घरातच अशी व्यक्ती असेल जिच्याशी आपले बोलणे बंद आहे; कदाचित एखादा मित्र आपल्यामुळे दुखावला असेल; कदाचित आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची आणि समजुतीची गरज असेल. अशा वेळी आपण पुढाकार घेऊन संवाद साधूया. शेवटी येशू म्हणतो, “जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत, तेथे त्यांच्या मध्ये मी आहे.” जेव्हा दोन भाऊ भांडण सोडून समेट करतात, जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याला क्षमा करते, जेव्हा आपण दुःखी आणि गरजू व्यक्तीच्या जवळ उभे राहतो, तेव्हा ख्रिस्ताची उपस्थिती आपल्या जीवनात प्रकट होते. म्हणून आज आपण एक प्रश्न स्वतःला विचारूया “मी माझ्या भावासाठी आणि बहिणीसाठी पहारेकरी आहे का?” दुसऱ्याची चूक पाहताना त्याचा न्याय करण्याऐवजी प्रेमाने त्याला समजून घेऊया; सत्य बोलताना नम्रता ठेवूया आणि आपले ध्येय दुसऱ्याला हरवणे नसून त्याला पुन्हा प्रेमात जिंकणे हे असू द्य. कारण येशू आपल्याला न्याय करण्यासाठी नव्हे, तर प्रेम करण्यासाठी पाठवतो. आपल्या प्रत्येक नात्यात प्रेम, क्षमा, संवाद आणि समेट वाढू दे आणि आपल्या जीवनातून इतरांना ख्रिस्ताची उपस्थिती अनुभवता येऊ दे. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: : हे प्रभू आमचा विश्वास वाढव.

१. ख्रिस्तसभेचे धुरा वाहणारे पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू व भगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात त्यांचा विश्वास बळकट व्हावा व त्यांनी इतरांचा विश्वास बळकट करावा म्हणून प्रार्थना करूया.

२. कुटुंब हे विश्वासाचे जडण घडण करणारे ठीकाण आहे. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने विश्वास वाढवण्याची जबाबदारी पार पाडावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

३. आपल्या धर्माग्रामातील जी कुटुंबे विश्वासात डळमळले आहेत व चर्चला येत नाही अशा कुटुंबावर परमेश्वराचा पवित्र आत्मा यावा व त्यांच्या विश्वासात वाढ व्हावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

४. आपल्या ध्रामाग्रामातील जे लोक आजारी, दुःखी व कष्टी आहेत त्यांना प्रभूचा गुणकारी स्पर्श मिळावा म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

५.आपण शांतपणे आपल्या सामाजिक व व्यैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.