Sunday, 25 March 2018


Reflection for the Homily of Maundy Thursday (29-03-2018) by Br. Jackson Nato.






आज्ञा गुरुवार



दिनांक: २९/३/२०१८ 
पहिले वाचन: गनणा १२:१-८, १२-१५
दुसरे वाचन: करिंथकरास पहिले पत्र ११:२८-३६
शुभवर्तमान: योहान १३:१-१५









प्रस्तावना:

     ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू-भगिनिंनो आज आपण “आज्ञा गुरुवार” साजरा करीत आहोत. आजची उपासना चार प्रमुख गोष्टींवर मनन चिंतन करण्यास बोलावत आहे; त्या म्हणजे वल्हांडण सण, पवित्र ख्रिस्त बलिदानाची स्थापना, याजकपद आणि ‘पायधुणी’. ह्या चार गोष्टी आपल्याला प्रेमाचा संदेश देतात.
     आजचे पहिले वाचन आपल्याला इस्रायल लोकांनी मिसर देशात केलेले वल्हांडणाचे भोजन व त्यानंतर देवाने त्यांची मिसरी लोकांच्या गुलामगिरीतून केलेली सुटका ह्याविषयी सांगत आहे. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल ख्रिस्ती जीवनात ख्रिस्त शरीर विधीला आपले कितपर्यंत महत्त्वाचे स्थान आहे ह्या बद्दल उद्देश करतो. आजचे शुभवर्तमान आपल्याला प्रेमाचा कित्ता घालून देत आहे. जसे येशूने आपल्यावर प्रेम केले त्याप्रमाणे आपणसुद्धा प्रेमाची साक्ष द्यावी; जेणेकरून खऱ्या ख्रिस्ती जीवनाची ओळख जगाला होईल. हे प्रेम जगाला देण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून ह्या मिस्सा बलिदानात आपण प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: गणना १२: १-८, १२-१५

     ह्या वाचनातून आपणास वल्हांडणाच्या सणाविषयी जाणून घेण्यास मिळते. परमेश्वराने मोशे व अहोरोनास सांगितले की हा महिना तुम्हास आरंभीचा महिना व्हावा ह्याचा अर्थ असा की परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी ह्या सणाद्वारे नवीन वर्ष चालू केले. इथे आपण पाहतो की परमेश्वराने वल्हांडणाच्या सणाद्वारे इस्रायल लोकांच्या नवीन वर्षाला सुरुवात केली कारण आतापर्यंत ते मिसरी लोकांच्या गुलामगीरीत होते पण आतापासून पुढे त्यांना स्वातंत्र्य मिळणार होते आणि ह्यानिमिताने त्यांनी एक निर्दोष कोकरू जे बरे आहे त्याचा वध करावा व ते भोजन खावे त्याचे रक्त दोन्ही दरवाज्यांना लावावे कारण हे रक्त पाहून परमेश्वर त्यांना सुखरूप ठेवील व त्यांचे तारण होईल कारण इस्रायल लोकांचा मिसर देशात शेवटचा दिवस होता आणि ह्या निमिताने परमेश्वराने त्यांच्याबरोबर करार केला. वल्हांडण म्हणजे परमेश्वर मिसर देशातून जाताना दारावर रक्त असलेल्या घरा समोरून ओलांडला व त्यांस स्वातंत्र्यास पात्र केले.

दुसरे वाचन: करिंथकरास पहिले पत्र ११:२८-३६

     ह्यावाचनात संत पौल आपल्याला ख्रिस्तबलिदानाचे महत्व पटवून देत आहे. ख्रिस्ताने भाकर घेतली व मोडून आपल्या शिष्यांना म्हटले की हे माझे शरीर आहे व नंतर द्राक्षरस घेऊन त्यांस दिला व म्हटले हे माझे रक्त आहे, असे म्हणून ते त्यांस दिले. त्या भाकर आणि द्राक्षरसाचे शिष्यांनी सेवन केले अशा प्रकारे ही प्रथा आजपर्यंत आपण मिस्साबलिदानाद्वारे आपण खऱ्या ख्रिस्ताच्या शरीराचे व रक्ताचे सेवन करतो. त्यासाठी आपले अंतकरण स्वच्छ ठेवले पाहिजे. मिस्साबलीदानात आपण फक्त येतो व ख्रिस्ताशी एकरूप होतो म्हणून आपले आपापसामधील वैर आपण मिटवले पाहिजे कारण मलीन अंत:करणाने जर आपण ख्रिस्तशरीरचे व रक्ताचे सेवन केले तर आपण त्याच्या बरोबर एकरूप होण्याऐवजी दंडास पात्र ठरू.  

शुभवर्तमान: योहान १३:१-१५

     आजचे शुभवर्तमान आपल्याला सेवेचा मंत्र देत आहे. येशू त्याच्या शिष्यांबरोबर भोजनास बसला असताना उठला व आपल्या शिष्याचे पाय धुऊ लागला. यहुदी परंपरेत घरी आलेल्या पाहुण्यांचे पाय धुण्याची प्रथा होती. पण पाय धुण्याचे काम चाकर करत. येशूच्या बाबतीत पाहिले तर स्वतः येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. स्वतः गुरुजी असून त्याने शिष्यांचे पाय धुतले व त्यास सेवेचा कित्ता घालून दिला. पाय धुणे म्हणजे येशूने त्याच्या शिष्यांची पापे धुतली. पाय जमिनीवर चालून मलीन होतात. त्याच्यावर धूळ जमा झालेली असते तशीच आपल्या आत्म्यावर पापांची धूळ बसते आपला आत्मा मलीन होतो. म्हणून येशू ख्रिस्ताने पायधुणीद्वारे त्यांची पापे धुतली. अजून महत्त्वाचा भाग म्हणजे येशू नम्र झाला. गुरूने शिष्यांच्या पायांना स्पर्श करणे म्हणजे झुकणे. येशूने तेच केले व त्यास नम्रतेचा धडा दिला. गुरूच्या अंगावर नम्रतेचा पोशाख शोभून दिसतो हे येशूने आपणा सर्वांस सांगितले आहे.

मनन चिंतन:

     चंदन हे मुळातून सुगंधी असते पण तोच सुगंध दुसऱ्या वस्तुत उतरविण्यासाठी चंदनाला झिजावे लागते. मेणबत्ती ही प्रकाश देण्यासाठी असते पण तोच प्रकाश दुसऱ्यांना देण्यासाठी तिला स्वतः जळावे लागते. मिठाचा वापर चवीसाठी केला जातो पण ती चव देण्यासाठी मिठाला स्वतःचे अस्तित्व गमवावे लागते. त्याच प्रमाणे दुसऱ्यांचे जीवन आनंदीत बनविण्यासाठी मनुष्याला स्वतःच्या आनंदाचा सौदा करावा लागतो कारण आनंद मिळविण्यासाठी किंवा आनंदी होण्यासाठी सर्वजण जगतात. पण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी खूप कमी जगतात. ह्या कमी लोकांमध्ये आपण सुद्धा गणले जावे म्हणून आज्ञा गुरुवारी येशू ख्रिस्त आपल्याला ‘सेवा व प्रेम’ करण्यास बोलावत आहे.
     आजचे शुभवर्तमान म्हणजे येशूच्या संपूर्ण शिकवणीचा सारांश. ‘सेवा व प्रेम’ हा आजच्या शुभवर्तमानाचा संदेश ओतप्रेम भरलेला आहे. भोजन झाल्यावर येशू आपली बाह्यवस्त्र काढून शिष्यांचे पाय धुवू लागला. ह्याद्वारे त्याने आपणास सेवेचा मंत्र दिला. एका गुरूने शिष्यांचे पाय धुवावे म्हणजे स्वतःस नम्र करावे. नम्रता हा सेवाकरण्यासाठी लागणारा मुलभूत गुण आहे. नम्रतेशिवाय खरी सेवा होणे अत्यंत कठीण असते. कारण सेवा करताना आपण कुठल्याप्रकारचा संकोच मनात व बाळगता स्वतःस पूर्णपणे झोकून द्यावे लागते.
     येशूने शिष्यांचे पाय धुतले. पाय हा शरीराचा तळभाग जो सतत जमिनीच्या सानिध्यात असतो. त्यामुळे त्यावर खूप धूळ जमते. पायाने लाथ मारणे किंवा कुठलाही गोष्टीस स्पर्श करणे ह्यास आपण मोठा अपमान समजतो म्हणून जेव्हा येशू पाय धुवू लागला तेव्हा शिष्यांना संकोच वाटला. त्यातल्या त्यात पेत्राने येशूला पायास स्पर्श करण्यास नकार दिला. कारण गुरूने त्यांचे पाय धुवावे ह्यास ते पात्र नव्हते. पण येशूचे हे कृत्ये त्यांना सांगते की मनुष्याची महानता ही त्यांच्या पदावर नव्हे तर त्यांच्या नम्रतेवर अवलंबून असते. झाड किती मजबूत आहे ह्याचा निष्कर्ष उंचीवर नव्हे तर त्याच्या खोलीवरून लावला जातो.
     आजच्या शुभवर्तमानाचा दुसरा भाग म्हणजे ‘प्रेम’. जेव्हा येशू भोजनास बसला तेव्हा त्याने भाकर घेतली व ती मोडली आणि शिष्यांना म्हणाला, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. पुढे प्याला घेऊन तो म्हणाला, “हे माझे रक्त आहे, हे तुमच्यासाठी सांडण्यात येईल.” एखादा मनुष्य आपल्या स्वकीयावर कितपर्यंत प्रेम करु शकतो ह्याचे जीवंत उदाहरण. एखादया मनुष्याने दुसऱ्या खेरीज स्वतःचे रक्त सांडणे ह्याशिवाय प्रेमाची व्याख्या अजून कुठली असू शकते? येशूने भाकर मोडणे व द्राक्षरस वाटणे हे त्याच्या शरीराचे व रक्ताचे प्रतिक होते जे त्याने क्रुसावर अर्पण केले. कुणासाठी तर दुसऱ्यांसाठी म्हणजे आपल्यासाठी. आपल्या पापांच्या गुलामगीरीतून सुटका व्हावी म्हणून तो आपल्यासाठी वल्हांडणाचे कोकरू बनला. त्याने स्वतःचा त्याग केला, कारण त्याने आपल्यावर प्रेम केले. प्रेमाची परीक्षा त्यागात होते. प्रेम करणारा त्याग करतो व त्यागास तो प्रेम पाहतो ही परीक्षा येशूने आपल्या मरणाने पास केली व तो अमर झाला.
     पायधुवून झाल्यानंतर येशू शिष्यांस कित्ता घालुन देतो की मी जसे तुम्हास केले तसे तुम्ही सुद्धा दुसऱ्यांस करावे. ह्याचा अर्थ असा की आपणसुद्धा आपले जीवन दुसऱ्यांच्या सेवेत अर्पण करावे. एकमेकांवर प्रेम करावे. कारण ख्रिस्ती म्हणून ‘प्रेम व सेवा’ ही आपली ओळख आहे ते करताना आपल्याला त्यागाचा मार्ग अवलंबावा लागेल. आणि हा मार्ग कितीही खडतर असला तरी तो चालण्यास आपली तयारी असली पाहिजे कारण जर आपण त्याग सोडून स्वत:साठी जगलो तर आपण मेलेल्यांत जमा होऊ, पण जर दुसऱ्यांसाठी जगलो तर आपण मेलो तरी जगणार. कारण सेवा व प्रेमाने आपण कित्येक लोकांच्या जीवनातील मेलेल्यांस पुर्नजीवन देतो आणि ह्यातच आपला आनंद आहे.
पवित्र याजकपद
     आजच्या दिवशी येशूने पवित्र याजकपद व ख्रिस्त शरीर विधीची स्थापना केली. येशू हा स्वत: याजक झाला व त्याच्या शिष्यांना याजक कसा असावा ह्याचे उदाहरण दिले. धर्मगुरु आपल्या ख्रिस्ती जीवनात महत्वाचा भाग आहे. त्याचे जीवन म्हणजे त्यागमय जीवन. ते आपल्या सर्व सुखाचा त्याग करून दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करतात. स्वत:चे सुख बाजूला सारून दुसऱ्यांच्या दु:खात समाधान करणे व त्यांस आनंदी करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य समजतात. प्रभूने भाकर मोडली व ती दुसऱ्यांना दिली ह्याच आज्ञाप्रमाणे ते स्वत:चे जीवन मोडतात व दुसऱ्यांबरोबर वाटतात व गरज पडली तर रक्त सांडण्यास स्वखुशीने तयार असतात. स्वकीयांनपासून ते परके होतात व परक्यांस आपलं करतात कारण पवित्र याजकपद त्यांस त्याग करण्यास बोलावते व पवित्र मिस्साद्वारे दुसऱ्यांना येशू ख्रिस्त देतात.
मिस्साबलिदानाची स्थापना
     पवित्र मिस्साबलिदान अर्पण करण्याचा अधिकार फक्त धर्मगुरूंना आहे. हे मिस्साबलिदान येशूने शेवटच्या भोजनावेळी स्थापित केला व आपणासाठी नवीन वल्हांडण झाला. शेवटचे भोजन व वल्हांडणामध्ये खूप जवळेचे साम्य आहे. वल्हांडण म्हणजे एका बाजूने दुसऱ्या बाजूला ओलांडण करणे. वल्हांडणाच्या दिवशी कोकराचा वध करावा व त्याचे रक्त घराच्या चौकटीवर शिंपडावे ही आज्ञा देवाने इब्री लोकांना दिली जेणेकरून जेव्हा देव त्यांच्या दारा समोरून जाईल तेव्हा त्या घराचे मरणापासून तारण होईल. त्याचप्रकारे शेवटच्या भोजनास स्वत: कोकरू होऊन त्याच्या रक्ताने आमचे तारण केले. देवाने इब्री लोकांची मिसरांच्या गुलामगिरीतून सुटका केली. त्याचप्रमाणे शेवटच्या भोजनाद्वारे आमचे पापांच्या गुलामगिरीतून तारण केले. आपण प्रत्येक मिस्साबलीदानाद्वारे त्या शेवटच्या भोजनात सहभागी होतो व आपणास तारण प्राप्त होते.
     येशूने हे सर्व आपणासाठी केले कारण त्याने आपल्यावर प्रेम केले. हाच प्रेमाचा व सेवेचा धडा आपल्या जीवनात गिरविण्यास कृपा मिळावी म्हणून आज आपण प्रार्थना करूया.     

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक व आम्हांला तुझ्या सारखे नम्र बनव.

१. ख्रिस्ताचा संदेश संपूर्ण जगात पोहचविणारे आपले पोप, बिशप्स, कार्डीनल्स, धर्मगुरु, व्रतस्थबंधू-भगिनी ह्या सर्वाना शारिरीक व मानसिक तन-मनाचे चांगले आरोग्य लाभावे व सेवेचा संदेश अंगीकारून तो जगाला देण्यास कृपा मिळावी म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया.
२. जगातील सर्व ख्रिस्ती पंथानी एकत्र यावे व खिस्त हा आपला एकच मेंढपाळ आहे ह्याची साक्ष द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जगातील सर्व लोकांनी आपापसातील मतभेद, द्वेष, हेवा विसरून एकत्र यावे आपण सर्व एकाच देवाची मुले आहोत ह्या नात्याने एक दुसऱ्यांची सेवा व प्रेम करण्यास पावले उचलावीत म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जगभर जी जी लोक गरिबांची, अनाथांची, रोगी व दिन दुबळ्यांची सेवा करत आहेत, हे कार्य पुढे नेण्यास त्यांना शक्ती मिळावी व अधिकाधिक लोकांनी अशा सेवाकार्यात सहभागी व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजीक हेतूसाठी प्रार्थना करूया. 



Thursday, 22 March 2018

Reflection for the Homily of Palm Sunday (25-03-2018) By Br. Rahul Rodrigues.







झावळ्यांचा रविवार


दिनांक: २५/३/२०१८
पहिले वाचन: यशया ५०:४-७
दुसरे वाचन: फिलीपकरांस पत्र २:६-११
शुभवर्तमान: मार्क १४:१,१५:४७





प्रस्तावना:

     आज अखिल ख्रिस्तसभा ‘झावळ्यांचा रविवार’ साजरा करीत आहे. ह्या आठवड्याला ‘येशूच्या दुःखसहनाचा’ किंवा ‘पवित्र आठवडा’ असे ही संबोधिले जाते. प्रभू येशूच्या येरुशलेमेत जयोत्स्वाने प्रवेश झाला, ह्या घटनेचे आपण विशेष स्मरण करीत आहोत. प्रभू येशूच्या येरुशलेमेतील प्रवेशाच्या वेळी लोकांनी आनंद साजरा केला व येशूच्या स्वागतासाठी खजुराच्या झाडाच्या झावळ्यांचा किंवा डहाळया रस्त्यावर पसरवल्या. ज्या लोकांनी यहूद्यांचा राजा तुझा जयजयकार असो अशी घोषणा केली; दुदैवाने, कालांतराने त्याच लोकांनी ह्याला क्रुसी खिळा, ह्याला क्रुसी खिळा अशी घोषणा केली.
     आजची तिन्ही वाचने आपणास येशूच्या दुःख सह्नाबाबत सांगत आहेत. पहिल्या वाचनात यशया प्रवक्ता आपल्या दुःखाद्वारे ख्रिस्ताच्या दुःखसहनाची शेकडो वर्षा आधी पूर्व तयारी करीतो आणि स्वतः येशू ख्रिस्ताचा यातनामय आवाज होतो. तर दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास सांगतो की, ख्रिस्ताने त्याच्या नम्र व आज्ञाधारकपणाने आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण आपल्या समोर ठेवले आहे. तसेच शुभवर्तमानामध्ये देवाने मानवाच्या तारणाकरीता रचलेला मार्ग म्हणजे येशू ख्रिस्ताचे दुःखसहन व क्रूसावरील मरण ह्यांचा सविस्तर वृतांत आपणास आज ऐकावयास मिळत आहे.
     ह्या पवित्र आठवड्यात देऊळ माता आपणा सर्वांना येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनात भक्तिभावाने सहभागी होण्यास, तसेच ख्रिस्ताच्या दुःख, मरण व पुनरुत्थानावर मनन चिंतन करण्यास पाचारण करत आहे. ह्यास्तव ह्या पवित्र यागात सहभागी होत असताना विशेष कृपा मागुया.

सम्यक विवरण:   

पहिले वाचन: यशया ५०:४-७

     यशयाच्या वाचनात आपल्याला येशूच्या दुःख सहनाची पूर्वकल्पना मिळत आहे. दुःखसहन करणारा सेवक हा येशुचीच प्रतिकृती आहे अशी आपली समजूत घातली आहे. यशयाचे हे तिसरे गीत म्ह्णून मानले जाते. ह्या गीतामध्ये यशया दुःखित व शोषित सेवकाचे वर्णन करीत आहे, परंतु हा सेवक कशाचीच भीती न बाळगता आपले सर्वस्व देवासाठी अपर्ण करतो व त्याचा देवावरील विश्वास अधिक बळकट करतो.

दुसरे वाचन: फिलीपकरांस पत्र २:६-११

     संत पौल फिलिप्पे येथील ख्रिस्ती लोकांनी नम्रपणे त्यांचा जीवनक्रम कसा चालवावा व खऱ्या सहभागीतेत ऐक्याने कसे राहावे, अशावर बोध करताना त्यांना ख्रिस्ताने घालून दिलेल्या आदर्शाचे स्मरण पुन्हा करून देत आहे. येशूने स्वतःला रिक्त केले म्हणजे त्याने स्वतःला ‘शुन्य’ केले. त्याने आपले देवत्वही बाजूस ठेवले. येशूने पराकोटीची मारहाणी सोसून आत्मसमर्पण केले. परिणामी, देवपित्याने त्याला सर्वा पेक्षा श्रेष्ठ असे नाव दिले.   पित्याने ख्रिस्ताला नेमून दिलेला मार्ग हा मान सन्मान, मोठेपणा मिळवण्याचा नव्हे तर स्वतःला नम्र करण्याचा होता. त्यात आपल्या पदाचा पुरेपूर लाभ उठवण्याचे नव्हे तर नम्रता, अर्पण, यज्ञार्पण आणि अपमान यांचे महत्व होते.

शुभवर्तमान: मार्क १४:१,१५:४७

     आजच्या शुभवर्तमानात संत मार्क आपणा सर्वांना येशूच्या दुःखसहनावर विशेष प्रकारे मनन चिंतन करण्यास बोलावत आहे.
     इब्री लोकांची जेव्हा सुटका झाली तेव्हा त्यांनी इजिप्त देशात जे शेवटचे भोजन घेतले होते त्या भोजनाची आठवण म्हणून प्रत्येक वर्ष येरुशलेमेत मोठ्याने वल्हांडणाचा सण साजरा केला जातो त्याचसाठी येशू प्रत्येक वर्षी आपल्या शिष्यांसह येरुशलेमेत येतो व तेथे लोक त्याचे स्वागत करतात.
     येशू ख्रिस्ताला त्याच्या दुःखसहनाची व मरणाची पूर्ण माहिती होती तरी सुद्धा येशूख्रिस्त ह्या सर्वांतून जातो. येशूचे दुःखसहन हे येरुशलेममध्ये शिरताच चालू झाले होते व त्याच येशूच्या दुःखात आपण आज पासून भाग घेत आहोत.
     आजचा दिनविशेष म्हणजे आज आपण सुध्दा झावळ्या घेऊन मिरवणूक काढतो व येशूला आपण उंचावतो कारण त्याने आपले त्याच्या दुःखसहनाने व मरणाने तारण केले आहे.  
  
बोधकथा:

     रविवार असल्या कारणाने सुट्टीचा दिवस होता.
     अचानक अपघात झालेल्या राहुलला त्याचे आई-वडील व नातेवाईक दवाखान्यात घेऊन येतात. राहुल अपघाताने रक्तबंबाळ झाल्या कारणाने व डोक्याला मार लागल्याने बेशुद्ध पडला होता. ते जेव्हा दवाखान्यात येतात तेव्हा त्यांना एकही डॉक्टर मिळत नाही कारण रविवार सुट्टीचा असल्याने सर्व डॉक्टर घरीच असतात. परंतु राहुलची व त्याच्या आईवडिलांची अवस्था पाहून व त्याच्या नातेवाईकांच्या आग्रहाने नर्स डॉक्टरांना फोन करते परंतु डॉक्टर फोन उचलत नाहीत. काही वेळा सतत प्रयत्न केल्याने डॉक्टर फोन उचलतात व नर्स त्यांना राहुलची सविस्तर पणे सर्व माहिती देते व डॉक्टर त्याला ऑपरेशन रूम मध्ये घेऊन जाण्यास सांगतात व थोड्याच वेळात आपण येणार असे सांगतात.
     राहुलला ओपरेशन रूम मध्ये घेऊन जातात व ओपरेशनची तयारी चालू करतात व थोड्याच वेळात डॉक्टर पोहोचतात. परंतु राहुलचे आई-वडील व नाते वाईक डॉक्टरांना खूप ओरडतात व म्हणतात तुम्ही ऐवढे निष्काळजीपणाने कसे वागता? जर का आमच्या मुलाला काही झाले तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. परंतु डॉक्टर त्यांना एकही शब्द न बोलता खाली मान घालून ओपरेशन रूम मध्ये जातात.
     काही वेळाने डॉक्टर बाहेर येतात व त्यांना सुटकेचा इशारा देतात व तुमचा मुलगा बरा आहे व उशीर झाल्यामुळे त्याची माफी मागून व लगेच निघून जातात. त्याच्या मागून नर्स त्यांच्या जवळ येते व ते नर्सला विचारतात की डॉक्टर पुन्हा कुठे निघून घेले व त्यांचे डोळे पाण्याने का भरले होते त्यावर नर्स त्यांना म्हणते, “ज्या डॉक्टरला तुम्ही ओरडला व त्यांच्या निष्काळजीपणाबद्दल बोलला; त्याचं डॉक्टरचा मुलगा सुध्दा आज सकाळी अपघातात मरण पावला व त्यांच्या मुलांचा अंत:संस्कार सोडून ते तुमच्या मुलाचा प्राण वाचवायला आले”. हे ऐकताच त्या सर्वांचे डोळे पाण्याने भरून आले.

मनन चिंतन:

‘प्रभुच्या नावाने येत आहे तो धन्य
होस्साना होस्साना होस्साना’
     ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या बंधू-भगिनिंनो आज आपण पाहतो की जखऱ्याने ५०० वर्षा अगोदर भाकीत केलेली सुवार्ता आज पूर्णत्वास येत आहे. तो म्हणतो, “सीयोन कन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेम कन्ये गजर कर; तुझा राजा  तुझकडे येत आहे; गाढवीच्या पिल्यावर म्हणजे शिंगारावर बसून येत आहे” (जखऱ्या ९:९).
     आपण आजवर बरेच असे राजे पाहिले आहेत जे घोड्यावर किंवा त्यांच्या राजेशाही पद्धतीने वावरत असत. परंतु आज आपण पाहतो की येशू ख्रिस्त हा राज्यांच्या तुलनेत आपल्याला जमीन-आसमानाचा फरक जाणून येतो. इतर राजे जन्माला येऊन मग लहानाचे मोठे होऊन राजे झाले, परंतु येशु ख्रिस्त जन्मताहाच राजा होता. राजे राजवाड्यात राहतात पण येशू ख्रिस्त गाईच्या गोठ्यात जन्मला, साध्या घरात राहिला. इतर राजे मोठा सोनेरी मुकुट घालून, अप्रतिम वस्त्रे परिधान करून थाटामाटात फिरतात; परंतु येशू ख्रिस्ताने काट्यांचा मुकुट घातला व लाज झाकेल एवढ्या छोट्या कपड्याने क्रुसी खिळला. इतर राजे अमाप पैसा, संपत्ती, धन-दोलत साठवतात व गरीबांना फार थोडे वाटून देतात तर येशू ख्रिस्ताने द्या, शांती, प्रीती, प्रेम व करुणा इतरांना वाटून देतो. राज्यांची सेवा करायला भरपूर असे नोकर-चाकर असतात परंतु येशू स्वतः दुसऱ्यांची सेवा करीत असे.
आपण थोडा वेळ विचार केला तर आपल्याला प्रश्न पडेल की येशूने गाढवाचाच (शिंगाराचा) वापर का केला असावा? तो घोड्यावर किंवा उंटावर येऊ शकला असता. गाढव म्हणताच आपल्या अंगाला शहार येतो कारण आपल्या समाज्यात गाढवाला काही स्थान नाही. गाढव म्हणजे सर्वांत मूर्ख प्राणी मानला जातो जो कुठल्याच चांगल्या कामाचा नसतो. परंतु त्या काळात गाढव त्यांचे स्थलांतराचे किंवा प्रवासाचे एक साधन होते. जास्त करून सामान वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर केला जात असे कारण आर्थिक दृष्ट्या पाहता त्याचा खर्च सुध्दा फार कमी असे.
घोड्यावर येणारा राजा हा युध्दाच्या नावे येत असे तर येशू ख्रिस्त गाढवावर शांतीच्या नावाने किंवा शांती पसरविण्यास आला. जो गाढव येशूने वापरला तो अजून शिंगार म्हणजे गाढवाचे पिल्लू होते, ते कामा जोगे किंवा वापरण्या जोगे नव्हते व त्यामुळेच ते बांधून ठेवले होते. परंतु आपण पाहतो की येशू त्याच्या शिष्यांना तेच गाढव आणावयास सांगतो.
जखऱ्याच्या सांगण्याप्रमाणे येशू न्यायी व यशस्वी आहे. येशू लीन आहे (जखऱ्या ९:९). तर गाढवाच्या प्रतिमेतून येशू आपला नम्रपणा दाखवितो. घोड्यावरून राजे युध्दास जातात परंतु येशू गाढवावरून शांतीचे प्रतिक आपल्याला दाखवतो. गाढव मात्र एक प्रतिमा आहे परंतु येशू या रूपाने लोकांशी समान व त्यांच्या सारखा साधारणपणा दाखवत आहे. तो राजा असून सुध्दा लोकांशी लोकांसारखा नम्र होतो व हे आज संत पौल सुध्दा आपल्याला आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये सांगत आहे की त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे स्वतःला शुन्य केले. त्याने त्याचे देवपण बाजूस सारून आत्मसमर्पण केले.
आपण ही असे करतो का? आपण सुध्दा अंगी नम्रपणा धारण करतो का? बऱ्याच वेळेस आपण असे काम करतो की ज्या मुळे आपल्याला मान-सन्मान, प्रसिद्धी मिळेल मग आपण स्वतःला ख्रिस्ताचे खरे अनुयायी कसे संबोधु शकतो?
आजच्या शुभवर्तमानात आपण असे ही पाहतो की ज्या लोकांनी ‘होस्साना होस्साना होस्साना’ बोलून येशूचे स्वागत केले त्याच लोकांनी मात्र काही दिवसांनी ह्याला क्रुसी खिळा, ह्याला क्रुसी खिळा अशी घोषणा केली. कारण पाहता ते त्यांच्या तारणाऱ्याची वाट पाहत होते जो त्यांना मुक्त करेल. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या तारणाऱ्याला ते एका राजेशाही रुपात शोधत होते. त्यांना वाटले त्यांचा राजा घोड्यावर राजेशाही पद्धतीने थाटामात, गाजत वाजत येईल परंतु येशू तर गाढवावर येतो व  त्यामुळे ते येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारत नाही. परंतु दुसऱ्या बाजूस आपण पाहतो की येशूचा धिक्कार करणारे रोमन शिपाई व पिलाताने सुध्दा येशूला यहूद्यांचा राजा म्हटले आहे. पिलाताच्या बायकोने येशूला चांगला माणूस म्हणून संबोधिले व क्रुसा खाली एका शिष्याने येशूला खऱ्या प्रकारे ओळखले. आज आपण येशूला खऱ्या प्रकारे ओळखतो का ? आजही आपल्या समाज्यात लोक आहेत जे येशूला स्वीकारत नाही व येशूचा धिक्कार करतात. आज ही आपली जबाबदारी आहे की आपण येशूला ओळखून दुसऱ्यांना येशूच्या प्रेमाची ओळख देणे गरजेचे आहे. तर आजपासून ह्या पवित्र आठवड्यात पदार्पण करीत असताना आपण प्रार्थना करूया की येशूने आपल्याला त्याच्या सारखे नम्र बनवावे व त्याची आपल्याला खरी ओळख करून द्यावी. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना :

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.

१. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे पोप महाशय, बिशप्स, कार्डीनल्स, सर्व धर्मगुरु व व्रतस्थ जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत आहेत,  ह्या सर्वाना परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा व त्यांनी देवाचे कार्य अखंडित चालू ठेऊन एक उत्तम जीवनाचा धडा लोकांपर्यंत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करुया.   
२. जे लोक देऊळ मातेपासून दुरावलेले आहेत, त्यांनी जगाची पापे दूर करणाऱ्या देवाच्या कोकराला ओळखावे व ख्रिस्ताच्या प्रकाशात त्यांचे मनपरिवर्तन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. हा पवित्र आठवडा चांगल्या रीतीने व्यतीत करावा व येशूच्या दुःखसहनात सहभागी होऊन दुसऱ्यांना येशूच्या जवळ बोलावून घ्यावे म्हणून प्रार्थना करूया.
४. जे लोक दुःखी, कष्टी व आजारी आहेत, त्यांना प्रभूच्या स्पर्शाने चांगले आरोग्य लाभावे व त्यांचे जीवन सुखी व समाधानी बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.



Wednesday, 14 March 2018










Reflection for the Homily of 5th Sunday of Lent Season (18-03-2018) By Br. Lipton Patil. 






प्रायश्चित काळातील पाचवा रविवार



दिनांक: १८-०३-२०१८
पहिले वाचन: यिर्मया ३१: ३१-३४
दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र ५: ७-९
 शुभवर्तमान: योहान १२: २०-३३











प्रस्तावना:

“जमिनीला भुसभुशीत होण्यासाठी नागर सहन करावा लागतो;
दगडाला मूर्ती होण्यासाठी फटकेसहन करावे लागतात;
सोन्याला शुध्द होण्यासाठी अग्नीतून जावे लागते;
बियांना अंकुरीत होण्यासाठी मातीत मरून जावे लागते.”
     अशाच प्रकारचे उदाहरण आज आपण आजच्या उपासनेत पाहत आहोत. यिर्मया संदेष्टा पहिल्या वाचनात इस्राएल व यहुदी लोकांना सांगतो की, देव तुमच्या बरोबर नवा करार करून तो करार तुमच्या हृद्यपटलावर लिहिण्यात येईल. ह्याद्वारे तो तुमचा देव होईल व आपण त्याची प्रजा होणार. इब्री लोकांस लिहिलेले पत्र आपल्याला सांगते की येशू देवाचा पुत्र असूनही त्याने दुखःसहन केले. योहानलिखित शुभवर्तमानात येशू ख्रिस्त स्वतःला गव्हाच्या दाण्याची उपमा देतो. ज्याप्रमाणे गव्हाचा दाणा जमिनीत पडून पीक देतो; त्याप्रमाणे येशू ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरून आपल्याला तारण देणार आहे, हे ह्या उताऱ्यातून स्पष्ट होते.
     ज्याप्रमाणे येशूने आपल्या जीवनाचा त्याग करून आपणा सर्वांना पापमुक्त केले, त्याप्रमाणे आपण सुद्धा सदैव इतरांसाठी जगावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यिर्मया ३१:३१-३४

     परमेश्वराने यिर्मयाला यहुदा प्रांतात संदेश देण्यासाठी पाचारण केले होते. परंतु तो राष्ट्रांचा संदेष्टा होता. त्याच्या काळात यहुदी प्रांतातील अंदाधुंदी कळसाला पोहोचली होती. राजकीय धुमाकूळ बराच वाढला होता. अशा परिस्थितीत यिर्मयाने आपले कार्य यहुदा प्रांतात सुरु केले.

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र ५:७-९

     प्रत्येक ख्रिस्ती माणूस खिस्ताचा प्रेषित व शिष्य आहे. त्याने आपले ख्रिस्ती जीवन कसे जगावे ह्याबाबतीत इब्री लोकांस पत्र ह्यामध्ये स्पष्ट केले. ख्रिस्त आज्ञाधारक झाला व मानवी रूप घेऊन धरतीवर येऊन दुःख सहन केले व मरण पावला व सर्वांचा सार्वकालिक तारणाचा कर्ता झाला.

शुभवर्तमान: योहान १२:२०-३३

     देवाचे माणसांना दर्शन घडले किंवा देवाने माणसांपुढे आपले रहस्य खुले करणे ह्यास प्रकटीकरण म्हणतात. देवाने स्वतःहून पुढाकार घेऊन स्वतःचे रहस्य मानवासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. देवाचे माणसांवर अतिशय प्रेम असल्याने तो त्यांना आपले जीवन दान करु इच्छितो.    

मनन चिंतन:

     माझ्या श्रध्दावंतांनो, हवाई येथील काइआई बेटावर घडलेली एक सत्य जीवनकथा. ८ फेब्रुवारी १९९० रोजी एका ख्रिस्ती कुटुंबामध्ये बेथनी मिलानी हॅमिल्टन नावाच्या मुलीचा जन्म झाला. ख्रिस्तावर अपाट प्रीती, विश्वास व आपुलकी बेथनीच्या मनात नेहमी होती. दु:खाना, संकटांना सामोरे जाण्याची जिद्द लहानपणापासूनच तिच्या मनात होती. बेथनी ८ वर्षाची असताच तिने लाटावरील स्वैर सफर करायला सुरुवात केली होती. ती जेव्हा तेरा वर्षाची होती व स्वैर सफर करीत होती, तेव्हा अचानक तिच्यावर शार्क माशाने हल्ला करून तीचा डावा हात खाल्ला. त्यावेळी बेथनीचे ६० टक्के रक्त गेले व तो दिवस होता ३१ ऑक्टोबर २००३. बेथनीवर हल्ला झाला तेव्हा तिच्या आई-वडिलांनी, नातेवाईकांनी व डॉक्टरांनी वाचवण्याची आशा सोडून दिली होती. परंतु ख्रिस्तावर अतूट प्रेम व श्रद्धा असल्याकारणाने ती वाचली. अपघात होऊन एक महिना झाल्यानंतर ती पुन्हा पाण्यात जाऊन, एक हात नसताना सुद्धा स्वैर सफर बनण्याचा निर्धार घेतला. ऐवढेच नव्हे तर २००४ च्या स्पर्धेत तीने पहिला क्रमांक पटकावला. तसेच २००५ च्या नॅशनल NSSA चॅम्पीयनशीप बहाल केले. तीने हे सर्व काही केले ते फक्त ख्रिस्तावर अवलंबून व त्याच्या वचनावर विश्वास ठेवून. ही कथा होती बेथनी, जिच्यावर शार्क माशाने हल्ला करून सुद्धा ती वाचली. तीने दु:खात ख्रिस्ताला हाक मारली व जेव्हा ती बरी झाली तेव्हा सुद्धा ख्रिस्तालाच हाक मारून जीवन जगली.
आजच्या पहिल्या वाचनात यिर्मया संदेष्टा सांगतो की, परमेश्वराने इस्राएल व यहुद्यांचा हात धरून इजिप्त देशातून बाहेर काढले. परंतु हे लोक परमेश्वराला विसरून गेले. लोक विसरून गेले परंतु परमेश्वर कधीच ह्या लोकांना विसरून गेला नाही. परमेश्वराला आपल्या लोकांचा नेहमी कळवला येतो. त्यामुळे परमेश्वराने त्यांच्याबरोबर करार करून त्यांना बंधनात न ठेवता त्यांना नवीन बनवून त्याचे अपराध मिटवतो; जेणेकरून हे लोक धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवतील, दुसऱ्या धर्माकडे जाणार नाहीत, परमेश्वराच्या नामाचा जप करून पाप, वाईट वासना यांच्यापासून दूर राहतील. तसेच शेजाऱ्यांना, बंधूंना परमेश्वराची ओळख करून देतील. अंधारात चालत असलेल्यांना देवाची करुणा, ममता व सौम्यता दाखवतील. जर दुसरे धर्मचारण केले असेल तर त्यांना क्षमा केली जाईल; अशामुळे ते पुन्हा पापात पडणार नाहीत.
  बेथनीचा जेव्हा डावा हात शार्क माशाने खाल्ला तेव्हा आई-वडिलांना खूप दु:ख सहन करावे लागले. बेथनीला सुद्धा असंख्य संकटांना तोंड द्यावे लागले. जीवनात पुढे जाणार नाही? एका हाताने काही करू शकणार नाही? दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागेल? इत्यादी गोष्टी सहन कराव्या लागल्या. परंतु ती दुसऱ्यांवर अवलंबून न राहता तीने जीवनात ज्या गोष्टी अशक्य होत्या, त्या शक्य करून दाखवल्या. इब्री लोकांस पत्रात आपण ऐकले की, येशूने सुद्धा यातना भोगल्या, अपमानाचे शब्द सहन केले. तरीसुद्धा आज्ञाधारक राहून आपल्यासाठी आज्ञाधारकपणाचे उदाहरण दिले. तो मानव होऊन आज्ञाधारकपणा शिकला व आपल्या पापांची खंडणी भरण्यासाठी स्वत:चा देह अर्पण केला. त्याच्या मरणाने आपले सर्वांचे तारण झाले आहे. परंतु आज आपण पाहतो, मुल-मुली आई-वडिलांचे ऐकत नाहीत. विद्यार्थी शिक्षकांना उलट उत्तर देऊन अपमान करतात. पती-पत्नीमध्ये संशय, भांडण होऊन दुसऱ्यांना मान देत नाही. आज कुणालाच दुसऱ्यांच्या आज्ञा पाळायला आवडत नाही. “माझे तेच खरे” ही कल्पना सर्वांच्या मनात रुजली आहे.
     बेथनीच्या जीवनाबद्दल सांगत असताना एक महत्वाचा मुद्दा म्हणजे, स्वैर सफर करणे तिच्यासाठी कठीण होते कारण स्वैर सफर हे पाण्यावर करीत असतात. ते सुद्धा पाणी खवलेला असतो. भयानक लाटा येतात. अशावेळी शरीराचा तोल सांभाळून खवलेल्या लाटांचा सामना करून किनाऱ्यावर यावे लागते. तीचा एक हात नसताना सुद्धा तीने तिच्या शरीराचा तोल पकडून तीने कितीतरी स्पर्धा जिंकून तीच्या आई-वडिलांचे, नातेवाईकांचे, मित्र-मैत्रिणींचे व अनेक लोकांची हृदये जिंकून घेतली. आजच्या शुभवर्तमानातून आपणाला समजते की येशू ख्रिस्त सुद्धा मरणार व आपल्याला तारण देणार. आजपासून आपण प्रायश्चित काळातील पाचव्या आठवड्यात पदार्पणात केले असताना पुढच्या रविवारपासून आपण येशूच्या दु:ख सहनावर सखोल विचार करणार आहोत. त्यासाठी येशूने आपल्या शुभवर्तमानात स्वत:ला गव्हाचा दाणा म्हटले आहे, गव्हाचा दाणा पुष्कळ पीक देते, तशाच हेतूने येशू मरणार व सर्वांना तारण देणार. देवाने आपल्या प्रीतीखातीर हे सर्व केले तर आपण सुद्धा हे सर्व केले पाहिजे. दुसऱ्यावर प्रीती केली पाहिजे. आज संपत्तीमुळे भांडण होऊन जीव घेतात, शेजाऱ्यांबरोबर भांडण झाल्यामुळे लहान मुला-मुलींना शेजाऱ्यांबरोबर बोलायला बंद करतात. गर्व, स्वार्थ व हेवा ह्या कारणाने आपण नम्र बनत नाहीत. तिरस्कार, द्वेष, मत्सर आपल्या अंतकरणात असल्याने आपल्याला दुसऱ्यांना क्षमा करायला आवडत नाही. जर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची साक्ष जर सर्व जगाला द्यायची असेल तर आपण आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे जगायला हवे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे परमेश्वरा दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१. ज्याप्रमाणे गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरून जातो व पुष्कळ पीक देतो; त्याप्रमाणे आपले पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरु-धर्मभगिनी व प्रापंचिक ह्यांनी सुद्धा गव्हाच्या दाण्याप्रमाणे झिजून जाऊन येशू ख्रिस्ताचे प्रेषितीय कार्य पुढे नेण्यास त्यांना कृपा, शक्ती व आशीर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे लोक व तरुणपिढी व्यसनाच्या आहारी जाऊन आपली नैतिक जबाबदारी पार पाडत नाहीत. अशा सर्व लोकांना परमेश्वराचा करुणामय स्पर्श व्हावा व त्यांची व्यसनातून मुक्तता व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे लोक पापांच्या अंधारात चालून वाईटाचे व क्रूरतेचे जीवन जगत आहेत, तसेच ज्यांचे वाईट संगतीमुळे जीवन अंधारमय झाले आहे. अशा सर्व लोकांना येशू ख्रिस्ताचा प्रकाश दिसावा व अंधारातून बाहेर पडून चांगले जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ज्या कुटुंबात भांडण, संशय, अशांतीचे वातारवण निर्माण झाले आहे व ज्यामुळे कुटुंबात प्रेम कमी होऊन एकमेकांमध्ये भेदभाव, तिरस्कार निर्माण झालेला आहे अशा कुटुंबावर येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद सदैव राहावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. जे लोक नोकरीच्या शोधात, नोकरी नसल्यामुळे उदास, दु:खी होऊन नैराश्याचे जीवन जगतात व जे कोणी आत्महत्येचा विचार करतात अशा लोकांना लवकरात लवकर नोकरी मिळून जीवनात आनंदी राहून जीवन जगण्यासाठी प्रभूने शक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.

Wednesday, 7 March 2018


 Reflection for the Homily of 4th Sunday of Lent (11-03-18) 
By Br. Godfrey Rodriques 





प्रायश्चित काळातील चौथा रविवार





दिनांक: ११-०३-२०१८
पहिले वाचन: २ इतिहास ३६:१४-१६,१९-२३
दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र २:४-१०
शुभवर्तमान: योहान ३:१४-२१


प्रस्तावना :

     आज आपण उपवासकाळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. प्रभू येशु हा विश्वाचा तारणकर्ता व विश्वासाचा दाता  आहे, हे आजच्या वाचनांतून स्पष्ट होते. विश्वास जरी परमेश्वराच्या कृपेमुळे येत असला तरी तो दृढ होण्यास मनुष्याच्या सहकार्याची गरज असते. म्हणूनच संत अगस्तीन म्हणतात की, ‘ज्या देवाने तुम्हाला तुमच्या वाचून निर्माण केले आहे, तो देव तुम्हाला तुमच्या शिवाय वाचवू शकणार नाही.’
येरुशलेमातील मुख्य याजकांनी अमंगळ राष्ट्रांचे अनुकरण केल्यामुळे परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर झाला परंतु देवाने परत एकदा प्रेमाखातर त्याच्या लोकांना गुलामगिरीतून बाहेर पडण्याची संधी दिल्याचे आपण पहिल्या वाचनात पाहतो. दुसऱ्या वाचनात संत पौल इफिसकरांस पाठवलेल्या पत्रात, ख्रिस्ताच्या कृपेने व विश्वासाद्वारे इफिसिकरांचे तारण झाले आहे आणि हे देवाचे दान आहे असे सांगतो. तर शुभवर्तमानात,  ‘देवाने मानवाच्या ताराणाकरिता आपल्या एकुलत्या एका पुत्रास या धरतीवर पाठविले आणि त्यावर जो विश्वास ठेवतो, त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त होईल’,असे आपण ऐकतो.
देवाची आपल्यावरील असलेल्या प्रीतीचा अनुभव आपल्याला येऊन आपला देवावरील विश्वास अधिकाधिक दृढ व्हावा व आपल्या विश्वासाची नौका अविश्वासाच्या लाटांवर डगमगुन न जाता, आपला विश्वास वाढावा व येशूला आपला तारणकर्ता म्हणून स्वीकारण्यास आपल्याला विशेष कृपा लाभावी म्हणून या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

पहिले वाचन: २ इतिहास: ३६:१४-१६,१९-२३

परमेश्वराची आपल्या लोकांवर करुणा होती,परंतु येरुशलेमातील लोकांनी अमंगळ कृत्याचे अनुकरण करून घोर पापे केली होती आणि जे मंदिर परमेश्वराने येरुसलेमेत पवित्र केले होते ते त्यांनी भ्रष्ट केले. ह्या कारणास्तव परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला आणि देवाने त्यांना सिदकीयाच्या कारकिर्दीत, गुलामगिरीत सत्तर वर्षे ठेवले. हे सर्व केवळ त्यांच्या अविश्वासामुळे घडले.

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र २:४-१०

ख्रिस्ती लोक ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात सहभागी झालेले आहेत, हे संत पौल ह्या पत्रातून स्पष्ट करतो. देव द्यासंपन्न आहे,सर्व कृपेचा देव आहे आणि तारण हे सर्वस्वी त्याच्या कृपेने आहे. कारण कृपेनेच इफिसिकरांचे तारण झाले आहे. ‘परमेश्वराची कृपा’आपल्याला येशूच्या तारणाचा स्वीकार करण्यास तयार करते. आपल्या तारणाचा आरंभ परमेश्वराच्या कृपेकडून होतो,कृपाच ते राखते व कृपाच ते पूर्ण करते म्हणूनच कृपेचा वर्षाव तितका तेज असतो जितका की आपला विश्वास मजबूत असतो.

शुभवर्तमान: योहान ३:१४-२१

     देवाने जगावर इतकी प्रीती केली की,त्याने आपला एकुलता एक पुत्र जगाच्या तारणासाठी दिला,अशासाठी की,जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये,तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रीती हा देवाचा स्वभाव आहे; हा एक सर्वात मोठा ख्रिस्ती सद्गुण आहे. त्यामुळे ‘प्रीती’ही ख्रिस्ती धर्माचे केंद्रस्थान बनली आहे.
येशूख्रिस्त बाह्यांगापेक्षा अंतरात्मा पाहतो, ह्यास्तव पापाचा परिणाम नष्ट करण्यासाठी व मानव जातीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी ख्रिस्त वधस्तंभावर खिळला गेला.जेणेकरूनजो पापी,सार्वकालिक जीवनासाठी ख्रिस्ताकडे येईल व त्याच्यावर विश्वास ठेवील त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल व त्याला नविन जन्म लाभेल  व हीच देवाच्या प्रितीची योजना आहे. यासाठी स्वत:ची गरज ओळखून,पश्चातापाने वविश्वासपूर्ण अंतकरणाने तारणासाठी देवाकडे धावा घेणे हे महत्वाचे आहे. प्रीती सत्याने व कृतीने करावी, प्रीती सरळ असावी त्यात ढोंगबाजी नसावी तर विश्वासपूर्ण असावी.

बोधकथा:

मुंबईच्या एका चाळीत एक जोडप त्यांचा सुखाचा संसार चालवीत होते. १२ वर्षा पर्यंत त्यांच्या त्या प्रेम वेलीवर फुल उगवले नव्हते व त्यांना त्यांच्या प्रेमाचे फळ मिळाल नव्हते. परंतु ते खचले नाही कारण त्यांचा देवावर पूर्ण विश्वास होता, की एक  दिवस आमच्या ह्या प्रेम वेलीवर प्रेमाचे फुल उगवेल. अश्या ह्या १२ वर्षाच्या खडतळ प्रवासानंतर त्यांचा विश्वास बघून जगाच्या निर्माणकर्त्याने त्यांना त्यांच्या प्रेमाचे व विश्वासाचे फळ दिले. आता मात्र तो खडतळ प्रवास संपलेला होता, सर्व ठिकाणी त्यांच्या जीवनात आनंदच आनंद होता. अश्या ह्या आनंदाच्या लहरीमध्ये पुन्हा एकदा त्यांच्या जीवनात दुःखाची जणू मालिकाच सुरु झाली. एका वर्षा नंतर त्यांना कळून चुकले की आपला हा मुलगा चालू शकणार नाही, धावू शकणार नाही, कारण त्याची हाडे कमकुवत आहेत व डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे औषधोपचार व्यर्थ ठरणार आहेत. त्या क्षणाला ते दोघेही थोडे खचले, परंतु हार मानून घेतली नाही. त्या क्षणाला त्यांनी एक-दुसऱ्यांना आलिंगन दिले आणि रडत एक-दुसऱ्यांना वचन देत म्हटले की आपण ह्याला चालायला शिकवणार, त्याचा आधार आपण होणार व एक दिवशी आपण त्याला चालताना बघणार. कारण १२ वर्षा नंतर ज्या देवाने आपल्याला बाळाची देणगी दिली तोच देव आपल्या बाळाला चालायला शक्ती ही देणार. शेवटी दोन वर्षा नंतर त्यांची मेहनत, दररोजचा सराव, धडपळ व विश्वास पाहून त्या आरोग्यदायी परमेश्वराने त्या बाळाला चलायला शक्ती दिली, तेवढेच नाही तर तो मुलगा शाळेत प्रत्येक वर्षी धावण्याच्या स्पर्धेत पहिला नंबर काढत असे व आज तो  मुलगा एक हाडांचा नामवंत डॉक्टर बनला आहे.
          
मनन चिंतन:

जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्याठायी सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. विश्वास म्हणजे केवळ ईश्वर भक्ती नव्हे तर प्रेम आणि मानव सेवा ही त्या विश्वासाचे अविभाज्य घटक आहेत. प्रभू परमेश्वराने मानवाच्या तारणाची योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या पुत्राचा बळी समर्पित केला. दुख:सहन व क्रूसावरील मरणाद्वारे येशूने आपल्या सर्वांचा देवाबरोबर समेट घडवून आणला आहे. प्रभू येशु ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळते. ख्रिस्त प्रभू आपल्या सर्वांच्या पापासाठी स्वत: ‘यज्ञबळी’बनला. आज आपणासाठी तारणाचा मार्ग वधस्तंभावरील प्रभू येशूच्या मृत्युद्वारे मोकळा झाला आहे. म्हणूनच प्रभू येशूने म्हटले आहे,‘जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वत:चा वधस्तंभ उचलून मला अनुसरावे(लूक:९:२३);कारण माझ्यावर विश्वास ठेवणारा मनुष्य कधीही मरण अनुभवणार नाही. प्रभू येशूवर विश्वास ठेऊन त्याला शरण येणाऱ्या श्रद्धावंतासाठी येशु चमत्कार व अदभूत कृत्ये करण्यास तयार असतो.
आज आपण प्रभू येशु बरोबर त्याच्या विश्वासात एकरूप झालो आहोत का?आज प्रभू येशु ख्रिस्ताने आपली निवड केली आहे,ख्रिस्ताठायी बाप्तिस्मा स्वीकारलेल्या प्रत्येकाला ख्रिस्ताची सुवार्ता अंधारातून प्रकाशाकडे पसरविण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. विश्वासाचा पाया,शरणगती,त्याग,समर्पण,प्रार्थना व उपवास ह्यावर उभारलेला आहे. आज आपण ह्या सर्व गोष्टींबद्दल चिंतन करू या. आपला विश्वास पडताळून पाहू या आणि मी देवावरील विश्वासास पात्र आहे का? ह्याचा विचार करु या. असे म्हणतात की: ‘जो विश्वासात (प्रकाशात) जगेल तो, स्वर्गीय नंदनवनास पात्र होईल व जो अविश्वासात (अंधारात) जगेल तो नरकाच्या अंधकारास पात्र होईल म्हणूनच येशूचा स्वीकार करणे म्हणजे खरे ख्रिस्ती जीवन जगणे होय. जो येशूचा मार्ग विश्वासात स्वीकारतो तो मृत्यूतून सार्वकालिक जीवनाकडे धाव घेत असतो.

श्रद्धावतांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: देवा, आमुची प्रार्थना ऐकून घे.

१. आज आपण ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करीत असणाऱ्यांना देवाचा वर्धस्त  आशीर्वाद लाभावा आणि त्यांच्याद्वारे ख्रिस्ताचा संदेश जगात स्विकारला जाऊन शांती प्रस्थापित व्हावी म्हणून प्रार्थना करूया.
२. देशाच्या कानाकोपऱ्यात कार्य करणाऱ्या मिशनरी धर्मगुरू, धर्मभगिनी व धर्मबंधू ह्यांच्यावर प्रभूचा आशीर्वाद सदा असावा तसेच ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या धर्मग्रामातील अनेक तरुण तरुणींना पुढे येण्यास प्रेरणा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.
३. संपूर्ण जगात गरिबांवर होणारे अत्याचार,अन्याय थांबून त्यांना माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे म्हणून प्रार्थना करूया.
४. विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशातील विविधतेतील ऐकता टिकून राहून जातीय वादाला आळा बसावा म्हणून प्रार्थना करूया.
५. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक,कौटुंबिक आणि सामाजिक गरजा प्रभूचरणी मांडूया.