Reflection for the Homily of 4th Sunday of Lent (11-03-18)
By Br. Godfrey Rodriques
प्रायश्चित काळातील चौथा रविवार
दिनांक: ११-०३-२०१८
पहिले वाचन: २ इतिहास
३६:१४-१६,१९-२३
दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र
२:४-१०
शुभवर्तमान: योहान ३:१४-२१
प्रस्तावना :
आज आपण उपवासकाळातील चौथा
रविवार साजरा करीत आहोत. प्रभू येशु हा विश्वाचा तारणकर्ता व विश्वासाचा दाता आहे, हे आजच्या वाचनांतून स्पष्ट होते. विश्वास जरी
परमेश्वराच्या कृपेमुळे येत असला तरी तो दृढ होण्यास मनुष्याच्या सहकार्याची गरज
असते. म्हणूनच संत अगस्तीन म्हणतात की, ‘ज्या देवाने तुम्हाला तुमच्या वाचून
निर्माण केले आहे, तो देव तुम्हाला तुमच्या शिवाय वाचवू शकणार नाही.’
येरुशलेमातील मुख्य याजकांनी अमंगळ राष्ट्रांचे
अनुकरण केल्यामुळे परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर झाला परंतु देवाने परत एकदा
प्रेमाखातर त्याच्या लोकांना गुलामगिरीतून बाहेर पडण्याची संधी दिल्याचे आपण
पहिल्या वाचनात पाहतो. दुसऱ्या वाचनात संत पौल इफिसकरांस पाठवलेल्या पत्रात, ख्रिस्ताच्या कृपेने व विश्वासाद्वारे इफिसिकरांचे तारण झाले आहे आणि हे
देवाचे दान आहे असे सांगतो. तर शुभवर्तमानात, ‘देवाने मानवाच्या ताराणाकरिता आपल्या एकुलत्या
एका पुत्रास या धरतीवर पाठविले आणि त्यावर जो विश्वास ठेवतो, त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त होईल’,असे आपण ऐकतो.
देवाची आपल्यावरील असलेल्या प्रीतीचा अनुभव
आपल्याला येऊन आपला देवावरील विश्वास अधिकाधिक दृढ व्हावा व आपल्या विश्वासाची
नौका अविश्वासाच्या लाटांवर डगमगुन न जाता, आपला विश्वास वाढावा व येशूला आपला
तारणकर्ता म्हणून स्वीकारण्यास आपल्याला विशेष कृपा लाभावी म्हणून या
मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.
पहिले
वाचन: २ इतिहास: ३६:१४-१६,१९-२३
परमेश्वराची आपल्या लोकांवर करुणा होती,परंतु
येरुशलेमातील लोकांनी अमंगळ कृत्याचे अनुकरण करून घोर पापे केली होती आणि जे मंदिर
परमेश्वराने येरुसलेमेत पवित्र केले होते ते त्यांनी भ्रष्ट केले. ह्या कारणास्तव
परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला आणि देवाने त्यांना सिदकीयाच्या कारकिर्दीत,
गुलामगिरीत सत्तर वर्षे ठेवले. हे सर्व केवळ त्यांच्या अविश्वासामुळे घडले.
दुसरे
वाचन: इफिसकरांस पत्र २:४-१०
ख्रिस्ती लोक ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात सहभागी
झालेले आहेत, हे संत पौल ह्या पत्रातून स्पष्ट करतो. देव द्यासंपन्न आहे,सर्व
कृपेचा देव आहे आणि तारण हे सर्वस्वी त्याच्या कृपेने आहे. कारण कृपेनेच
इफिसिकरांचे तारण झाले आहे. ‘परमेश्वराची कृपा’आपल्याला येशूच्या तारणाचा स्वीकार
करण्यास तयार करते. आपल्या तारणाचा आरंभ परमेश्वराच्या कृपेकडून होतो,कृपाच ते
राखते व कृपाच ते पूर्ण करते म्हणूनच कृपेचा वर्षाव तितका तेज असतो जितका की आपला
विश्वास मजबूत असतो.
शुभवर्तमान:
योहान ३:१४-२१
देवाने जगावर इतकी प्रीती
केली की,त्याने आपला एकुलता एक पुत्र जगाच्या तारणासाठी दिला,अशासाठी की,जो कोणी
त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये,तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त
व्हावे. प्रीती हा देवाचा स्वभाव आहे; हा एक सर्वात मोठा ख्रिस्ती सद्गुण आहे.
त्यामुळे ‘प्रीती’ही ख्रिस्ती धर्माचे केंद्रस्थान बनली आहे.
येशूख्रिस्त बाह्यांगापेक्षा अंतरात्मा पाहतो,
ह्यास्तव पापाचा परिणाम नष्ट करण्यासाठी व मानव जातीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी
ख्रिस्त वधस्तंभावर खिळला गेला.जेणेकरूनजो पापी,सार्वकालिक जीवनासाठी ख्रिस्ताकडे
येईल व त्याच्यावर विश्वास ठेवील त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल व त्याला नविन
जन्म लाभेल व हीच देवाच्या प्रितीची योजना
आहे. यासाठी स्वत:ची गरज ओळखून,पश्चातापाने वविश्वासपूर्ण अंतकरणाने तारणासाठी
देवाकडे धावा घेणे हे महत्वाचे आहे. प्रीती सत्याने व कृतीने करावी, प्रीती सरळ
असावी त्यात ढोंगबाजी नसावी तर विश्वासपूर्ण असावी.
बोधकथा:
मुंबईच्या एका चाळीत एक जोडप त्यांचा सुखाचा
संसार चालवीत होते. १२ वर्षा पर्यंत त्यांच्या त्या प्रेम वेलीवर फुल उगवले नव्हते
व त्यांना त्यांच्या प्रेमाचे फळ मिळाल नव्हते. परंतु ते खचले नाही कारण त्यांचा
देवावर पूर्ण विश्वास होता, की एक दिवस
आमच्या ह्या प्रेम वेलीवर प्रेमाचे फुल उगवेल. अश्या ह्या १२ वर्षाच्या खडतळ
प्रवासानंतर त्यांचा विश्वास बघून जगाच्या निर्माणकर्त्याने त्यांना त्यांच्या
प्रेमाचे व विश्वासाचे फळ दिले. आता मात्र तो खडतळ प्रवास संपलेला होता, सर्व
ठिकाणी त्यांच्या जीवनात आनंदच आनंद होता. अश्या ह्या आनंदाच्या लहरीमध्ये पुन्हा
एकदा त्यांच्या जीवनात दुःखाची जणू मालिकाच सुरु झाली. एका वर्षा नंतर त्यांना
कळून चुकले की आपला हा मुलगा चालू शकणार नाही, धावू शकणार नाही, कारण त्याची हाडे
कमकुवत आहेत व डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे औषधोपचार व्यर्थ ठरणार आहेत. त्या
क्षणाला ते दोघेही थोडे खचले, परंतु हार मानून घेतली नाही. त्या क्षणाला त्यांनी
एक-दुसऱ्यांना आलिंगन दिले आणि रडत एक-दुसऱ्यांना वचन देत म्हटले की आपण ह्याला
चालायला शिकवणार, त्याचा आधार आपण होणार व एक दिवशी आपण त्याला चालताना बघणार.
कारण १२ वर्षा नंतर ज्या देवाने आपल्याला बाळाची देणगी दिली तोच देव आपल्या बाळाला
चालायला शक्ती ही देणार. शेवटी दोन वर्षा नंतर त्यांची मेहनत, दररोजचा सराव, धडपळ
व विश्वास पाहून त्या आरोग्यदायी परमेश्वराने त्या बाळाला चलायला शक्ती दिली,
तेवढेच नाही तर तो मुलगा शाळेत प्रत्येक वर्षी धावण्याच्या स्पर्धेत पहिला नंबर
काढत असे व आज तो मुलगा एक हाडांचा नामवंत
डॉक्टर बनला आहे.
मनन
चिंतन:
जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्याठायी
सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. विश्वास म्हणजे केवळ ईश्वर भक्ती नव्हे तर प्रेम
आणि मानव सेवा ही त्या विश्वासाचे अविभाज्य घटक आहेत. प्रभू परमेश्वराने मानवाच्या
तारणाची योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या पुत्राचा बळी समर्पित केला. दुख:सहन व
क्रूसावरील मरणाद्वारे येशूने आपल्या सर्वांचा देवाबरोबर समेट घडवून आणला आहे.
प्रभू येशु ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळते. ख्रिस्त
प्रभू आपल्या सर्वांच्या पापासाठी स्वत: ‘यज्ञबळी’बनला. आज आपणासाठी तारणाचा मार्ग
वधस्तंभावरील प्रभू येशूच्या मृत्युद्वारे मोकळा झाला आहे. म्हणूनच प्रभू येशूने
म्हटले आहे,‘जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज
स्वत:चा वधस्तंभ उचलून मला अनुसरावे(लूक:९:२३);कारण माझ्यावर विश्वास ठेवणारा
मनुष्य कधीही मरण अनुभवणार नाही. प्रभू येशूवर विश्वास ठेऊन त्याला शरण येणाऱ्या श्रद्धावंतासाठी
येशु चमत्कार व अदभूत कृत्ये करण्यास तयार असतो.
आज आपण प्रभू येशु बरोबर त्याच्या विश्वासात
एकरूप झालो आहोत का?आज प्रभू येशु ख्रिस्ताने आपली निवड केली आहे,ख्रिस्ताठायी
बाप्तिस्मा स्वीकारलेल्या प्रत्येकाला ख्रिस्ताची सुवार्ता अंधारातून प्रकाशाकडे
पसरविण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. विश्वासाचा पाया,शरणगती,त्याग,समर्पण,प्रार्थना
व उपवास ह्यावर उभारलेला आहे. आज आपण ह्या सर्व गोष्टींबद्दल चिंतन करू या. आपला
विश्वास पडताळून पाहू या आणि मी देवावरील विश्वासास पात्र आहे का? ह्याचा विचार
करु या. असे म्हणतात की: ‘जो विश्वासात (प्रकाशात) जगेल तो, स्वर्गीय नंदनवनास
पात्र होईल व जो अविश्वासात (अंधारात) जगेल तो नरकाच्या अंधकारास पात्र होईल
म्हणूनच येशूचा स्वीकार करणे म्हणजे खरे ख्रिस्ती जीवन जगणे होय. जो येशूचा मार्ग
विश्वासात स्वीकारतो तो मृत्यूतून सार्वकालिक जीवनाकडे धाव घेत असतो.
श्रद्धावतांच्या
प्रार्थना:
प्रतिसाद: देवा, आमुची प्रार्थना ऐकून घे.
१. आज आपण ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करीत
असणाऱ्यांना देवाचा वर्धस्त आशीर्वाद
लाभावा आणि त्यांच्याद्वारे ख्रिस्ताचा संदेश जगात स्विकारला जाऊन शांती
प्रस्थापित व्हावी म्हणून प्रार्थना करूया.
२. देशाच्या कानाकोपऱ्यात कार्य करणाऱ्या
मिशनरी धर्मगुरू, धर्मभगिनी व धर्मबंधू ह्यांच्यावर प्रभूचा आशीर्वाद सदा असावा
तसेच ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या धर्मग्रामातील अनेक तरुण
तरुणींना पुढे येण्यास प्रेरणा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.
३. संपूर्ण जगात गरिबांवर होणारे अत्याचार,अन्याय
थांबून त्यांना माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे म्हणून प्रार्थना करूया.
४. विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशातील
विविधतेतील ऐकता टिकून राहून जातीय वादाला आळा बसावा म्हणून प्रार्थना करूया.
५. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक,कौटुंबिक आणि सामाजिक
गरजा प्रभूचरणी मांडूया.
No comments:
Post a Comment