Reflection for the Homily of Palm Sunday (25-03-2018) By Br. Rahul Rodrigues.
झावळ्यांचा रविवार
दिनांक: २५/३/२०१८
पहिले वाचन: यशया ५०:४-७
दुसरे वाचन: फिलीपकरांस पत्र २:६-११
शुभवर्तमान: मार्क १४:१,१५:४७
प्रस्तावना:
आज अखिल ख्रिस्तसभा ‘झावळ्यांचा
रविवार’ साजरा करीत आहे. ह्या आठवड्याला ‘येशूच्या दुःखसहनाचा’ किंवा ‘पवित्र
आठवडा’ असे ही संबोधिले जाते. प्रभू येशूच्या येरुशलेमेत जयोत्स्वाने प्रवेश झाला,
ह्या घटनेचे आपण विशेष स्मरण करीत आहोत. प्रभू येशूच्या येरुशलेमेतील प्रवेशाच्या वेळी
लोकांनी आनंद साजरा केला व येशूच्या स्वागतासाठी खजुराच्या झाडाच्या झावळ्यांचा
किंवा डहाळया रस्त्यावर पसरवल्या. ज्या लोकांनी यहूद्यांचा राजा तुझा जयजयकार असो
अशी घोषणा केली; दुदैवाने, कालांतराने त्याच लोकांनी ह्याला क्रुसी खिळा, ह्याला
क्रुसी खिळा अशी घोषणा केली.
आजची तिन्ही वाचने आपणास येशूच्या दुःख
सह्नाबाबत सांगत आहेत. पहिल्या वाचनात यशया प्रवक्ता आपल्या दुःखाद्वारे
ख्रिस्ताच्या दुःखसहनाची शेकडो वर्षा आधी पूर्व तयारी करीतो आणि स्वतः येशू
ख्रिस्ताचा यातनामय आवाज होतो. तर दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास सांगतो की,
ख्रिस्ताने त्याच्या नम्र व आज्ञाधारकपणाने आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण
आपल्या समोर ठेवले आहे. तसेच शुभवर्तमानामध्ये देवाने मानवाच्या तारणाकरीता रचलेला
मार्ग म्हणजे येशू ख्रिस्ताचे दुःखसहन व क्रूसावरील मरण ह्यांचा सविस्तर वृतांत
आपणास आज ऐकावयास मिळत आहे.
ह्या पवित्र आठवड्यात देऊळ माता आपणा
सर्वांना येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनात भक्तिभावाने सहभागी होण्यास, तसेच
ख्रिस्ताच्या दुःख, मरण व पुनरुत्थानावर मनन चिंतन करण्यास पाचारण करत आहे.
ह्यास्तव ह्या पवित्र यागात सहभागी होत असताना विशेष कृपा मागुया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ५०:४-७
यशयाच्या वाचनात आपल्याला येशूच्या दुःख सहनाची पूर्वकल्पना मिळत आहे.
दुःखसहन करणारा सेवक हा येशुचीच प्रतिकृती आहे अशी आपली समजूत घातली आहे. यशयाचे
हे तिसरे गीत म्ह्णून मानले जाते. ह्या गीतामध्ये यशया दुःखित व शोषित सेवकाचे
वर्णन करीत आहे, परंतु हा सेवक कशाचीच भीती न बाळगता आपले सर्वस्व देवासाठी अपर्ण
करतो व त्याचा देवावरील विश्वास अधिक बळकट करतो.
दुसरे वाचन: फिलीपकरांस पत्र २:६-११
संत पौल फिलिप्पे येथील ख्रिस्ती लोकांनी
नम्रपणे त्यांचा जीवनक्रम कसा चालवावा व खऱ्या सहभागीतेत ऐक्याने कसे राहावे,
अशावर बोध करताना त्यांना ख्रिस्ताने घालून दिलेल्या आदर्शाचे स्मरण पुन्हा करून
देत आहे. येशूने स्वतःला रिक्त केले म्हणजे त्याने स्वतःला ‘शुन्य’ केले. त्याने
आपले देवत्वही बाजूस ठेवले. येशूने पराकोटीची मारहाणी सोसून आत्मसमर्पण केले.
परिणामी, देवपित्याने त्याला सर्वा पेक्षा
श्रेष्ठ असे नाव दिले. पित्याने
ख्रिस्ताला नेमून दिलेला मार्ग हा मान सन्मान, मोठेपणा मिळवण्याचा नव्हे तर
स्वतःला नम्र करण्याचा होता. त्यात आपल्या पदाचा पुरेपूर लाभ उठवण्याचे नव्हे तर नम्रता,
अर्पण, यज्ञार्पण आणि अपमान यांचे महत्व होते.
शुभवर्तमान: मार्क १४:१,१५:४७
आजच्या शुभवर्तमानात संत मार्क आपणा सर्वांना येशूच्या दुःखसहनावर
विशेष प्रकारे मनन चिंतन करण्यास बोलावत आहे.
इब्री लोकांची जेव्हा सुटका झाली तेव्हा
त्यांनी इजिप्त देशात जे शेवटचे भोजन घेतले होते त्या भोजनाची आठवण म्हणून
प्रत्येक वर्ष येरुशलेमेत मोठ्याने वल्हांडणाचा सण साजरा केला जातो त्याचसाठी येशू
प्रत्येक वर्षी आपल्या शिष्यांसह येरुशलेमेत येतो व तेथे लोक त्याचे स्वागत करतात.
येशू ख्रिस्ताला त्याच्या दुःखसहनाची व
मरणाची पूर्ण माहिती होती तरी सुद्धा येशूख्रिस्त ह्या सर्वांतून जातो. येशूचे
दुःखसहन हे येरुशलेममध्ये शिरताच चालू झाले होते व त्याच येशूच्या दुःखात आपण आज
पासून भाग घेत आहोत.
आजचा दिनविशेष म्हणजे आज आपण सुध्दा झावळ्या
घेऊन मिरवणूक काढतो व येशूला आपण उंचावतो कारण त्याने आपले त्याच्या दुःखसहनाने व
मरणाने तारण केले आहे.
बोधकथा:
रविवार असल्या कारणाने सुट्टीचा दिवस होता.
अचानक अपघात झालेल्या राहुलला त्याचे आई-वडील
व नातेवाईक दवाखान्यात घेऊन येतात. राहुल अपघाताने रक्तबंबाळ झाल्या कारणाने व
डोक्याला मार लागल्याने बेशुद्ध पडला होता. ते जेव्हा दवाखान्यात येतात तेव्हा
त्यांना एकही डॉक्टर मिळत नाही कारण रविवार सुट्टीचा असल्याने सर्व डॉक्टर घरीच
असतात. परंतु राहुलची व त्याच्या आईवडिलांची अवस्था पाहून व त्याच्या
नातेवाईकांच्या आग्रहाने नर्स डॉक्टरांना फोन करते परंतु डॉक्टर फोन उचलत नाहीत.
काही वेळा सतत प्रयत्न केल्याने डॉक्टर फोन उचलतात व नर्स त्यांना राहुलची सविस्तर
पणे सर्व माहिती देते व डॉक्टर त्याला ऑपरेशन रूम मध्ये घेऊन जाण्यास सांगतात व
थोड्याच वेळात आपण येणार असे सांगतात.
राहुलला ओपरेशन रूम मध्ये घेऊन जातात व ओपरेशनची
तयारी चालू करतात व थोड्याच वेळात डॉक्टर पोहोचतात. परंतु राहुलचे आई-वडील व नाते वाईक
डॉक्टरांना खूप ओरडतात व म्हणतात तुम्ही ऐवढे निष्काळजीपणाने कसे वागता? जर का
आमच्या मुलाला काही झाले तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. परंतु डॉक्टर त्यांना
एकही शब्द न बोलता खाली मान घालून ओपरेशन रूम मध्ये जातात.
काही वेळाने डॉक्टर बाहेर येतात व त्यांना
सुटकेचा इशारा देतात व तुमचा मुलगा बरा आहे व उशीर झाल्यामुळे त्याची माफी मागून व
लगेच निघून जातात. त्याच्या मागून नर्स त्यांच्या जवळ येते व ते नर्सला विचारतात
की डॉक्टर पुन्हा कुठे निघून घेले व त्यांचे डोळे पाण्याने का भरले होते त्यावर
नर्स त्यांना म्हणते, “ज्या डॉक्टरला तुम्ही ओरडला व त्यांच्या निष्काळजीपणाबद्दल
बोलला; त्याचं डॉक्टरचा मुलगा सुध्दा आज सकाळी अपघातात मरण पावला व त्यांच्या
मुलांचा अंत:संस्कार सोडून ते तुमच्या मुलाचा प्राण वाचवायला आले”. हे ऐकताच त्या
सर्वांचे डोळे पाण्याने भरून आले.
मनन चिंतन:
‘प्रभुच्या नावाने येत आहे तो धन्य
होस्साना होस्साना होस्साना’
ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या बंधू-भगिनिंनो आज
आपण पाहतो की जखऱ्याने ५०० वर्षा अगोदर भाकीत केलेली सुवार्ता आज पूर्णत्वास येत
आहे. तो म्हणतो, “सीयोन कन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेम कन्ये गजर कर; तुझा
राजा तुझकडे येत आहे; गाढवीच्या पिल्यावर
म्हणजे शिंगारावर बसून येत आहे” (जखऱ्या ९:९).
आपण आजवर बरेच असे राजे पाहिले आहेत जे
घोड्यावर किंवा त्यांच्या राजेशाही पद्धतीने वावरत असत. परंतु आज आपण पाहतो की
येशू ख्रिस्त हा राज्यांच्या तुलनेत आपल्याला जमीन-आसमानाचा फरक जाणून येतो. इतर
राजे जन्माला येऊन मग लहानाचे मोठे होऊन राजे झाले, परंतु येशु ख्रिस्त जन्मताहाच
राजा होता. राजे राजवाड्यात राहतात पण येशू ख्रिस्त गाईच्या गोठ्यात जन्मला,
साध्या घरात राहिला. इतर राजे मोठा सोनेरी मुकुट घालून, अप्रतिम वस्त्रे परिधान
करून थाटामाटात फिरतात; परंतु येशू ख्रिस्ताने काट्यांचा मुकुट घातला व लाज झाकेल
एवढ्या छोट्या कपड्याने क्रुसी खिळला. इतर राजे अमाप पैसा, संपत्ती, धन-दोलत
साठवतात व गरीबांना फार थोडे वाटून देतात तर येशू ख्रिस्ताने द्या, शांती, प्रीती,
प्रेम व करुणा इतरांना वाटून देतो. राज्यांची सेवा करायला भरपूर असे नोकर-चाकर
असतात परंतु येशू स्वतः दुसऱ्यांची सेवा करीत असे.
आपण
थोडा वेळ विचार केला तर आपल्याला प्रश्न पडेल की येशूने गाढवाचाच (शिंगाराचा) वापर
का केला असावा? तो घोड्यावर किंवा उंटावर येऊ शकला असता. गाढव म्हणताच आपल्या
अंगाला शहार येतो कारण आपल्या समाज्यात गाढवाला काही स्थान नाही. गाढव म्हणजे
सर्वांत मूर्ख प्राणी मानला जातो जो कुठल्याच चांगल्या कामाचा नसतो. परंतु त्या
काळात गाढव त्यांचे स्थलांतराचे किंवा प्रवासाचे एक साधन होते. जास्त करून सामान
वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर केला जात असे कारण आर्थिक दृष्ट्या पाहता त्याचा
खर्च सुध्दा फार कमी असे.
घोड्यावर
येणारा राजा हा युध्दाच्या नावे येत असे तर येशू ख्रिस्त गाढवावर शांतीच्या नावाने
किंवा शांती पसरविण्यास आला. जो गाढव येशूने वापरला तो अजून शिंगार म्हणजे गाढवाचे
पिल्लू होते, ते कामा जोगे किंवा वापरण्या जोगे नव्हते व त्यामुळेच ते बांधून
ठेवले होते. परंतु आपण पाहतो की येशू त्याच्या शिष्यांना तेच गाढव आणावयास सांगतो.
जखऱ्याच्या
सांगण्याप्रमाणे येशू न्यायी व यशस्वी आहे. येशू लीन आहे (जखऱ्या ९:९). तर गाढवाच्या
प्रतिमेतून येशू आपला नम्रपणा दाखवितो. घोड्यावरून राजे युध्दास जातात परंतु येशू
गाढवावरून शांतीचे प्रतिक आपल्याला दाखवतो. गाढव मात्र एक प्रतिमा आहे परंतु येशू
या रूपाने लोकांशी समान व त्यांच्या सारखा साधारणपणा दाखवत आहे. तो राजा असून
सुध्दा लोकांशी लोकांसारखा नम्र होतो व हे आज संत पौल सुध्दा आपल्याला आजच्या
दुसऱ्या वाचनामध्ये सांगत आहे की त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे स्वतःला शुन्य
केले. त्याने त्याचे देवपण बाजूस सारून आत्मसमर्पण केले.
आपण ही
असे करतो का? आपण सुध्दा अंगी नम्रपणा धारण करतो का? बऱ्याच वेळेस आपण असे काम
करतो की ज्या मुळे आपल्याला मान-सन्मान, प्रसिद्धी मिळेल मग आपण स्वतःला
ख्रिस्ताचे खरे अनुयायी कसे संबोधु शकतो?
आजच्या
शुभवर्तमानात आपण असे ही पाहतो की ज्या लोकांनी ‘होस्साना होस्साना होस्साना’ बोलून
येशूचे स्वागत केले त्याच लोकांनी मात्र काही दिवसांनी ह्याला क्रुसी खिळा, ह्याला
क्रुसी खिळा अशी घोषणा केली. कारण पाहता ते त्यांच्या तारणाऱ्याची वाट पाहत होते
जो त्यांना मुक्त करेल. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या तारणाऱ्याला ते एका
राजेशाही रुपात शोधत होते. त्यांना वाटले त्यांचा राजा घोड्यावर राजेशाही पद्धतीने
थाटामात, गाजत वाजत येईल परंतु येशू तर गाढवावर येतो व त्यामुळे ते येशूला आपला तारणारा म्हणून
स्वीकारत नाही. परंतु दुसऱ्या बाजूस आपण पाहतो की येशूचा धिक्कार करणारे रोमन
शिपाई व पिलाताने सुध्दा येशूला यहूद्यांचा राजा म्हटले आहे. पिलाताच्या बायकोने
येशूला चांगला माणूस म्हणून संबोधिले व क्रुसा खाली एका शिष्याने येशूला खऱ्या
प्रकारे ओळखले. आज आपण येशूला खऱ्या प्रकारे ओळखतो का ? आजही आपल्या समाज्यात लोक
आहेत जे येशूला स्वीकारत नाही व येशूचा धिक्कार करतात. आज ही आपली जबाबदारी आहे की
आपण येशूला ओळखून दुसऱ्यांना येशूच्या प्रेमाची ओळख देणे गरजेचे आहे. तर आजपासून
ह्या पवित्र आठवड्यात पदार्पण करीत असताना आपण प्रार्थना करूया की येशूने आपल्याला
त्याच्या सारखे नम्र बनवावे व त्याची आपल्याला खरी ओळख करून द्यावी. आमेन.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना :
प्रतिसाद: हे प्रभो
आमची प्रार्थना ऐक.
१. ख्रिस्त सभेची धुरा
वाहणारे पोप महाशय, बिशप्स, कार्डीनल्स, सर्व धर्मगुरु व व्रतस्थ जे
ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत आहेत, ह्या सर्वाना परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा व त्यांनी देवाचे कार्य
अखंडित चालू ठेऊन एक उत्तम जीवनाचा धडा लोकांपर्यंत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना
करुया.
२. जे लोक देऊळ मातेपासून
दुरावलेले आहेत, त्यांनी जगाची पापे दूर करणाऱ्या देवाच्या कोकराला ओळखावे व
ख्रिस्ताच्या प्रकाशात त्यांचे मनपरिवर्तन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. हा पवित्र आठवडा
चांगल्या रीतीने व्यतीत करावा व येशूच्या दुःखसहनात सहभागी होऊन दुसऱ्यांना येशूच्या
जवळ बोलावून घ्यावे म्हणून प्रार्थना करूया.
४. जे लोक दुःखी, कष्टी व आजारी आहेत, त्यांना प्रभूच्या स्पर्शाने चांगले आरोग्य
लाभावे व त्यांचे जीवन सुखी व समाधानी बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या वैयक्तिक व
कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment