Wednesday, 14 March 2018










Reflection for the Homily of 5th Sunday of Lent Season (18-03-2018) By Br. Lipton Patil. 






प्रायश्चित काळातील पाचवा रविवार



दिनांक: १८-०३-२०१८
पहिले वाचन: यिर्मया ३१: ३१-३४
दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र ५: ७-९
 शुभवर्तमान: योहान १२: २०-३३











प्रस्तावना:

“जमिनीला भुसभुशीत होण्यासाठी नागर सहन करावा लागतो;
दगडाला मूर्ती होण्यासाठी फटकेसहन करावे लागतात;
सोन्याला शुध्द होण्यासाठी अग्नीतून जावे लागते;
बियांना अंकुरीत होण्यासाठी मातीत मरून जावे लागते.”
     अशाच प्रकारचे उदाहरण आज आपण आजच्या उपासनेत पाहत आहोत. यिर्मया संदेष्टा पहिल्या वाचनात इस्राएल व यहुदी लोकांना सांगतो की, देव तुमच्या बरोबर नवा करार करून तो करार तुमच्या हृद्यपटलावर लिहिण्यात येईल. ह्याद्वारे तो तुमचा देव होईल व आपण त्याची प्रजा होणार. इब्री लोकांस लिहिलेले पत्र आपल्याला सांगते की येशू देवाचा पुत्र असूनही त्याने दुखःसहन केले. योहानलिखित शुभवर्तमानात येशू ख्रिस्त स्वतःला गव्हाच्या दाण्याची उपमा देतो. ज्याप्रमाणे गव्हाचा दाणा जमिनीत पडून पीक देतो; त्याप्रमाणे येशू ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरून आपल्याला तारण देणार आहे, हे ह्या उताऱ्यातून स्पष्ट होते.
     ज्याप्रमाणे येशूने आपल्या जीवनाचा त्याग करून आपणा सर्वांना पापमुक्त केले, त्याप्रमाणे आपण सुद्धा सदैव इतरांसाठी जगावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यिर्मया ३१:३१-३४

     परमेश्वराने यिर्मयाला यहुदा प्रांतात संदेश देण्यासाठी पाचारण केले होते. परंतु तो राष्ट्रांचा संदेष्टा होता. त्याच्या काळात यहुदी प्रांतातील अंदाधुंदी कळसाला पोहोचली होती. राजकीय धुमाकूळ बराच वाढला होता. अशा परिस्थितीत यिर्मयाने आपले कार्य यहुदा प्रांतात सुरु केले.

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र ५:७-९

     प्रत्येक ख्रिस्ती माणूस खिस्ताचा प्रेषित व शिष्य आहे. त्याने आपले ख्रिस्ती जीवन कसे जगावे ह्याबाबतीत इब्री लोकांस पत्र ह्यामध्ये स्पष्ट केले. ख्रिस्त आज्ञाधारक झाला व मानवी रूप घेऊन धरतीवर येऊन दुःख सहन केले व मरण पावला व सर्वांचा सार्वकालिक तारणाचा कर्ता झाला.

शुभवर्तमान: योहान १२:२०-३३

     देवाचे माणसांना दर्शन घडले किंवा देवाने माणसांपुढे आपले रहस्य खुले करणे ह्यास प्रकटीकरण म्हणतात. देवाने स्वतःहून पुढाकार घेऊन स्वतःचे रहस्य मानवासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. देवाचे माणसांवर अतिशय प्रेम असल्याने तो त्यांना आपले जीवन दान करु इच्छितो.    

मनन चिंतन:

     माझ्या श्रध्दावंतांनो, हवाई येथील काइआई बेटावर घडलेली एक सत्य जीवनकथा. ८ फेब्रुवारी १९९० रोजी एका ख्रिस्ती कुटुंबामध्ये बेथनी मिलानी हॅमिल्टन नावाच्या मुलीचा जन्म झाला. ख्रिस्तावर अपाट प्रीती, विश्वास व आपुलकी बेथनीच्या मनात नेहमी होती. दु:खाना, संकटांना सामोरे जाण्याची जिद्द लहानपणापासूनच तिच्या मनात होती. बेथनी ८ वर्षाची असताच तिने लाटावरील स्वैर सफर करायला सुरुवात केली होती. ती जेव्हा तेरा वर्षाची होती व स्वैर सफर करीत होती, तेव्हा अचानक तिच्यावर शार्क माशाने हल्ला करून तीचा डावा हात खाल्ला. त्यावेळी बेथनीचे ६० टक्के रक्त गेले व तो दिवस होता ३१ ऑक्टोबर २००३. बेथनीवर हल्ला झाला तेव्हा तिच्या आई-वडिलांनी, नातेवाईकांनी व डॉक्टरांनी वाचवण्याची आशा सोडून दिली होती. परंतु ख्रिस्तावर अतूट प्रेम व श्रद्धा असल्याकारणाने ती वाचली. अपघात होऊन एक महिना झाल्यानंतर ती पुन्हा पाण्यात जाऊन, एक हात नसताना सुद्धा स्वैर सफर बनण्याचा निर्धार घेतला. ऐवढेच नव्हे तर २००४ च्या स्पर्धेत तीने पहिला क्रमांक पटकावला. तसेच २००५ च्या नॅशनल NSSA चॅम्पीयनशीप बहाल केले. तीने हे सर्व काही केले ते फक्त ख्रिस्तावर अवलंबून व त्याच्या वचनावर विश्वास ठेवून. ही कथा होती बेथनी, जिच्यावर शार्क माशाने हल्ला करून सुद्धा ती वाचली. तीने दु:खात ख्रिस्ताला हाक मारली व जेव्हा ती बरी झाली तेव्हा सुद्धा ख्रिस्तालाच हाक मारून जीवन जगली.
आजच्या पहिल्या वाचनात यिर्मया संदेष्टा सांगतो की, परमेश्वराने इस्राएल व यहुद्यांचा हात धरून इजिप्त देशातून बाहेर काढले. परंतु हे लोक परमेश्वराला विसरून गेले. लोक विसरून गेले परंतु परमेश्वर कधीच ह्या लोकांना विसरून गेला नाही. परमेश्वराला आपल्या लोकांचा नेहमी कळवला येतो. त्यामुळे परमेश्वराने त्यांच्याबरोबर करार करून त्यांना बंधनात न ठेवता त्यांना नवीन बनवून त्याचे अपराध मिटवतो; जेणेकरून हे लोक धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवतील, दुसऱ्या धर्माकडे जाणार नाहीत, परमेश्वराच्या नामाचा जप करून पाप, वाईट वासना यांच्यापासून दूर राहतील. तसेच शेजाऱ्यांना, बंधूंना परमेश्वराची ओळख करून देतील. अंधारात चालत असलेल्यांना देवाची करुणा, ममता व सौम्यता दाखवतील. जर दुसरे धर्मचारण केले असेल तर त्यांना क्षमा केली जाईल; अशामुळे ते पुन्हा पापात पडणार नाहीत.
  बेथनीचा जेव्हा डावा हात शार्क माशाने खाल्ला तेव्हा आई-वडिलांना खूप दु:ख सहन करावे लागले. बेथनीला सुद्धा असंख्य संकटांना तोंड द्यावे लागले. जीवनात पुढे जाणार नाही? एका हाताने काही करू शकणार नाही? दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागेल? इत्यादी गोष्टी सहन कराव्या लागल्या. परंतु ती दुसऱ्यांवर अवलंबून न राहता तीने जीवनात ज्या गोष्टी अशक्य होत्या, त्या शक्य करून दाखवल्या. इब्री लोकांस पत्रात आपण ऐकले की, येशूने सुद्धा यातना भोगल्या, अपमानाचे शब्द सहन केले. तरीसुद्धा आज्ञाधारक राहून आपल्यासाठी आज्ञाधारकपणाचे उदाहरण दिले. तो मानव होऊन आज्ञाधारकपणा शिकला व आपल्या पापांची खंडणी भरण्यासाठी स्वत:चा देह अर्पण केला. त्याच्या मरणाने आपले सर्वांचे तारण झाले आहे. परंतु आज आपण पाहतो, मुल-मुली आई-वडिलांचे ऐकत नाहीत. विद्यार्थी शिक्षकांना उलट उत्तर देऊन अपमान करतात. पती-पत्नीमध्ये संशय, भांडण होऊन दुसऱ्यांना मान देत नाही. आज कुणालाच दुसऱ्यांच्या आज्ञा पाळायला आवडत नाही. “माझे तेच खरे” ही कल्पना सर्वांच्या मनात रुजली आहे.
     बेथनीच्या जीवनाबद्दल सांगत असताना एक महत्वाचा मुद्दा म्हणजे, स्वैर सफर करणे तिच्यासाठी कठीण होते कारण स्वैर सफर हे पाण्यावर करीत असतात. ते सुद्धा पाणी खवलेला असतो. भयानक लाटा येतात. अशावेळी शरीराचा तोल सांभाळून खवलेल्या लाटांचा सामना करून किनाऱ्यावर यावे लागते. तीचा एक हात नसताना सुद्धा तीने तिच्या शरीराचा तोल पकडून तीने कितीतरी स्पर्धा जिंकून तीच्या आई-वडिलांचे, नातेवाईकांचे, मित्र-मैत्रिणींचे व अनेक लोकांची हृदये जिंकून घेतली. आजच्या शुभवर्तमानातून आपणाला समजते की येशू ख्रिस्त सुद्धा मरणार व आपल्याला तारण देणार. आजपासून आपण प्रायश्चित काळातील पाचव्या आठवड्यात पदार्पणात केले असताना पुढच्या रविवारपासून आपण येशूच्या दु:ख सहनावर सखोल विचार करणार आहोत. त्यासाठी येशूने आपल्या शुभवर्तमानात स्वत:ला गव्हाचा दाणा म्हटले आहे, गव्हाचा दाणा पुष्कळ पीक देते, तशाच हेतूने येशू मरणार व सर्वांना तारण देणार. देवाने आपल्या प्रीतीखातीर हे सर्व केले तर आपण सुद्धा हे सर्व केले पाहिजे. दुसऱ्यावर प्रीती केली पाहिजे. आज संपत्तीमुळे भांडण होऊन जीव घेतात, शेजाऱ्यांबरोबर भांडण झाल्यामुळे लहान मुला-मुलींना शेजाऱ्यांबरोबर बोलायला बंद करतात. गर्व, स्वार्थ व हेवा ह्या कारणाने आपण नम्र बनत नाहीत. तिरस्कार, द्वेष, मत्सर आपल्या अंतकरणात असल्याने आपल्याला दुसऱ्यांना क्षमा करायला आवडत नाही. जर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची साक्ष जर सर्व जगाला द्यायची असेल तर आपण आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे जगायला हवे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे परमेश्वरा दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१. ज्याप्रमाणे गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरून जातो व पुष्कळ पीक देतो; त्याप्रमाणे आपले पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरु-धर्मभगिनी व प्रापंचिक ह्यांनी सुद्धा गव्हाच्या दाण्याप्रमाणे झिजून जाऊन येशू ख्रिस्ताचे प्रेषितीय कार्य पुढे नेण्यास त्यांना कृपा, शक्ती व आशीर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे लोक व तरुणपिढी व्यसनाच्या आहारी जाऊन आपली नैतिक जबाबदारी पार पाडत नाहीत. अशा सर्व लोकांना परमेश्वराचा करुणामय स्पर्श व्हावा व त्यांची व्यसनातून मुक्तता व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे लोक पापांच्या अंधारात चालून वाईटाचे व क्रूरतेचे जीवन जगत आहेत, तसेच ज्यांचे वाईट संगतीमुळे जीवन अंधारमय झाले आहे. अशा सर्व लोकांना येशू ख्रिस्ताचा प्रकाश दिसावा व अंधारातून बाहेर पडून चांगले जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ज्या कुटुंबात भांडण, संशय, अशांतीचे वातारवण निर्माण झाले आहे व ज्यामुळे कुटुंबात प्रेम कमी होऊन एकमेकांमध्ये भेदभाव, तिरस्कार निर्माण झालेला आहे अशा कुटुंबावर येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद सदैव राहावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. जे लोक नोकरीच्या शोधात, नोकरी नसल्यामुळे उदास, दु:खी होऊन नैराश्याचे जीवन जगतात व जे कोणी आत्महत्येचा विचार करतात अशा लोकांना लवकरात लवकर नोकरी मिळून जीवनात आनंदी राहून जीवन जगण्यासाठी प्रभूने शक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment