Reflections for Homily By:- Malcom Dinis
देवमाता मरिया सोहळा
०१/०१/१०१४
गणना; ६: २२-२७.
गलतीकरांस पत्र; ४: ४-७.
लूक; २: १६-२१.
''मरियेने सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंत:करणात ठेवल्या.''
प्रस्तावना:
आज आपण नविन वर्षात पदार्पण करीत असताना वर्षाच्या पहिल्याच दिवशी ख्रिस्तसभा आपल्याला ''मरिया देवाची माता'' हा सोहळा साजरा करण्यासाठी बोलावत आहे. मरिया जरी साधी-भोळी स्त्री असली तरी ख्रिस्तसभेत तिचे महत्त्वाचे स्थान आहे. ''मरियेने सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंत:करणात ठेवल्या'' असे संत लूक आपल्याला सांगतो. तिचा आदर्श नजरेसमोर ठेवून नवीन वर्षात चांगले जीवन जगण्यासाठी
ह्या पवित्र मिस्साबलिदानात देवमातेचे साहाय्य मागू या.
पहिले वाचन:
आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वराच्या सांगण्यावरून आर्शिवादाची प्रार्थना अहरोन व त्याचे पुत्र लोकांना देतात. हीच प्रार्थना आज ख्रिस्तसभा आपल्या सर्वांना करण्यास प्रेरित करत आहे.
दुसरे वाचन:
संत पौल स्पष्ट करतो की, आपल्या सर्वांना नवजीवन मिळाले आहे. म्हणूनच आपण आतापासून गुलाम नाही, देवाचे नुसते पुत्र नाही तर देवाद्वारे वारस ही आहोत.
शुभवर्तमान:
आजच्या शुभवर्तामानामध्ये, देवदूताने पवित्र मरियेला कशाप्रकारे संदेश दिला व मेढपांळानी येशू ख्रिस्ताला कशी भेट दिली ह्याविषयी आपण ऐकतो. ह्या संपूर्ण उता-यामध्ये आपण विश्वासाचे अनेक पैलू पाहत आहोत, ज्यामध्ये पवित्र मरियेच्या विश्वासाला उत्तम स्थान प्राप्त होते, म्हणूनच आज ख्रिस्तसभेमध्ये पवित्र मरियेला उत्तम स्थान दिले आहे.
सम्यक विवरण:
- Ø ''मेंढपाळ घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळ ही त्यांना सापडली.''(२:१६):
संत लूकचे शुभवर्तमान हे गरिंबाचे शुभवर्तमान आहे. शुभवर्तमानाच्या अध्याय; १-२ मध्ये सुरूवातीलाच देवाच्या तारणाच्या महान कार्याच्या प्रकटीकरणाच्या प्रक्रियेत दैवी योजनेनुसार यहुदी समाजाच्या दृष्टीने अगदी सामान्य व क्षुल्लक अशा अलीशिबा, मरिया व मेढंपाळ या साध्या-सुध्या व्यक्तींची निवड केलेली दृष्टीस पडते.
मेंढपाळ गरिब, बुध्दीने मंद, समाजात त्यांना कमी दर्जा दिला जात असे. ते जरी गरीब, बुध्दीने मंद असले तरी विश्वासाने
भक्कम होते. जेव्हा देवदुताने त्यांना संदेश दिला तेव्हा आपल्याला जो देवदूत दिसला तो भास असेल किंवा आपली कोणीतरी फसवणूक करीत असेल अशी चिकित्सा ते करीत बसले नाहीत; तर ताबडतोब ते येशू ख्रिस्ताच्या भेटीसाठी निघाले. देवदूताच्या शब्दावर विश्वास ठेवून प्रभूच्या शोधार्थ निघालेल्या मेंढपाळाना खरोखरच प्रभू सापडला व बाळ येशूच्या दर्शनाने ते पावन झाले, पुनीत झाले व त्यांच्या बाळ येशूला पाहण्याच्या धडपडीमुळे व विश्वासामुळे बाळ येशूचे पहिले दर्शक ठरले.
- Ø मरियेने या सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंत:करणात ठेवल्या (२:१९):
गाब्रीएल दूताने मरियेला दिलेल्या संदेशानुसार आपल्या उदरी जन्माला येणारे बाळ येशू दाविदाच्या वंशात जन्माला येणारा मसिहा, देवाचा पुत्र असेल (लूक; १:२१-३६) हे तिला कळले होते. त्यानंतर अलीशिबेने पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन ''माझ्या प्रभूची माता''(१:४३) म्हणून तिला संबोधले. आता मेंढपाळामार्फत देवदूताने सांगितल्याप्रमाणे हे बाळ 'तारणारा ख्रिस्त व प्रभू आहे' (२:१०) हे तिला कळते. या सर्व गोष्टी ऐकून मरियेच्या मनात विचार आला असेल की, आपल्या उदरी जन्माला आलेले हे बाळ सर्व जगाचा प्रभू असूनही त्याने इतक्या सामान्य व गरीब परिस्थितीत जन्माला यावे यामागे ईश्वरीयोजना काय असावी? या व इतर सर्व प्रश्नांचे उत्तर मरियेच्या ''तुझ्या शब्दाप्रमाणे होवो'' या श्रध्दापूर्ण होकारातच सामावलेले आहे.
- Ø 'सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले' (२:२१):
योहानाची सुंता झाली तेव्हा त्याच्या भाविष्याविषयींचे भाकित केली होती. येशूला मंदिरात नेले तेव्हा त्याच्या बाबतीतही अशी भाकित करण्यात आले होते. येथे तीन लक्षणीय गोष्टीचा उल्लेख आहे तो आपण पाहु या.
अ) यहुदी नियमशास्त्रानुसार पुरूष मुलाच्या जन्मानंतर माता सात दिवस 'अशुध्द' मानली जाई आणि तिला आणखी तेहतीस दिवस घरीच राहावे लागे. त्यानंतर चाळीसाव्या दिवशी शुध्दीकरणाचे अर्पण समर्पित करणे आवश्यक असे (लेवीय; १२:१-८). हे अर्पण फक्त येरूशलेममध्येच करायचे असल्याने त्यासाठी तिकडे जाणे अगत्याचे होते (२४). लूक त्यांचे शुध्दीकरणाचे दिवस असा उल्लेख केला असला तरी मुलाला नव्हे तर फक्त मरियेलाच शुध्द होणे आवश्यक होते. मातेचे शुध्दीकरण आणि तिच्या मुलाला सोडवून घेणे या दोन्ही वेगळ्या बाबींचा उल्लेख लूकने एकत्रच केला आहे. हे अर्पण अगदी कमी खर्चाचे गोर-गरिबांनीच करायचे होते. ह्यातून योसेफ आणि मरिया ह्यांच्या 'दीन' अवस्थेचा जाणीवपूर्वक संदर्भ दिला आहे (१:४६-५५).
ब) नियमशास्त्रानुसार प्रथम जन्मलेल्या मुलाला 'भरपाई देऊन' सोडवून घेणे आवश्यक होते. प्रथम जन्मलेले सर्वच जीव देवाला समर्पित आहेत असे मानले जाई. यात प्रथम जन्मलेले पशूंचे होमार्पण करीत आणि पाच शेकेल द्रव्य भरून मुलांना सोडवून घेत. हा विधी ते एक महिन्याचे झाल्यावर करायचा असे (निर्गम; १३:१३, गणना; १८:१५,१६). यासाठी मुलाला मंदिरात नेलेच पाहिजे असा नियम नव्हता.
क) मरियेने आपल्या मुलाला खास करून देवाच्या सेवेसाठी अर्पण केले म्हणूनच येशू यावेळी तेथे होता. हन्नानेही पूर्वी याच प्रकारे शमुवेलाला निवासमंडपात समर्पित केले होते(१शमुवेल; १:११,२१-२२). अश्याप्रकारे नियमशास्त्रानुसार आवश्यक असलेल्या सर्व बाबी पूर्ण झाल्या (गलती; ४:४).
बोध कथा:
एकदा दहा मुले असलेल्या आईला एका माणसाने प्रश्न विचारला. तुम्ही कोणत्या मुलावर जास्त माया, प्रेम व आपुलकी दाखवाल? तेव्हा त्या आईने उत्तर दिले. जो पर्यंत आजारी पडलेला मुलगा बरा होत नाही आणि जो पर्यंत बाहेर गेलेला मुलगा घरात परत येत नाही तो पर्यंत त्या मुलावर माझी माया, प्रेम व आपुलकी जास्त असते.
मनन- चिंतन :
१. आज नववर्ष दिन, नव्या वर्षाची, तसेच नवीन सहस्त्रकाची सुरूवात, या शुभदिनी पवित्र मरिया आम्हाला आपल्या जीवनाद्वारे संदेश देत आहे. या वर्षात तसेच सहस्त्रकात जे घडेल ते शांतपणे कृतज्ञतापूर्वक स्वीकारण्याचा आणि परमेश्वरावर पूर्ण श्रध्दा ठेवून त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करू या.
आपण पवित्र मरियेच्या जीवनात आतापर्यंत ज्या गोष्टी घडल्या होत्या त्यांची तिला थोडीदेखील कल्पना नव्हती. ''पवित्र आत्म्याच्या योगाने तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल''(लूक; १:३१). हा देवदूताचा संदेश, नावनिशी लिहून देण्यासाठी बेथलेहेमास जावे लागणे, तेथे त्यांना राहण्यास जागा न मिळणे, गोठ्यात येशू बाळाचा जन्म होणे, मेंढपाळांनी त्याला वंदन करण्यास येणे आणि ऐकलेल्या गोष्टी त्यांना सांगणे या सर्व गोष्टी तिच्या कल्पने पलिकडच्या होत्या परंतू त्यामुळे ती भांबाळून गेली नाही की अवास्तव काळजी करीत बसली नाही. परंतू मरियेने ह्या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंत:करणात ठेविल्या (लूक; २:१९).
या नववर्षदिनी आमच्यासमोर सुध्दा काय ताट वाढून ठेवले आहे याची कल्पना नाही. परंतू आपणापैकी बरेच जण विचार करीत असतील या वर्षात काय काय घडणार याचा व चिंता करीत बसतील. येथे आपल्याला पवित्र मरियेचे अनुकरण करावयाचे आहे. यासाठी सर्वप्रथम आवश्यकता आहे ती विश्वासाची, श्रध्देची. परमेश्वर आमचा पिता आहे त्याने आम्हाला निर्माण केले, सर्व सृष्टीमध्ये तो भरून राहिला आहे, त्याला आमची काळजी आहे, आम्हांस तो काहीही कमी पडू देणार नाही आणि सर्व संकटांत, अडचणींत तो आम्हाला सहाय्य करील, आमचे सरंक्षण करील, एकदा का या विश्वासाने आमच्या हृदयात घर केले की मग आम्ही कशाची चिंता, काळजी करीत बसणार नाही त्या सर्व गोष्टी आमच्या हृदयात शांतचिताने मरियेप्रमाणे साठवून ठेवू आणि त्यावर मनन करू.
२. मरिया देवाची माता होण्यास पात्र ठरली:
'या दासीच्या निचत्वाला
प्रभूने उंचाविले किती
मन माझे आंनदे भरले
गाते प्रभूरायाची स्तुती.'
प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईला एक महत्वाचे स्थान असते. आईची माया व वात्सल्य वेगळ्या प्रकारची असते जी आपल्याला तिच्याकडे आकर्षित करते. दुस-यांची आई कितीतरी प्रेमाळू व सुंदर असली तरी प्रत्येकाला आपलीच आई ही सर्वश्रेष्ठ वाटते, कारण प्रत्येकाने आपल्या आईचा अनुभव घेतलेला असतो. येशू ख्रिस्ताने सुध्दा आपल्या आईमध्ये तिची माया व वात्सल्य अनुभवले होते.
देवपित्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला ह्या विश्वात पाठविण्यासाठी
एका कुमारिकेची नेमणूक विश्वाच्या सुरूवातीपासूनच करून ठेवली होती. तिच्या गर्भसंभवापासून देवपित्याने तिचा सांभाळ केला व तिला पवित्र ठेवले व जेव्हा तिची वेळ आली तेव्हा देवपित्याने तिच्या उदरी पुत्र वाढवला व तो तिच्याद्वारे ह्या भूतलावरती आला. म्हणूनच आज ख्रिस्त सभेमध्ये पवित्र मरियेला देवाच्या आईचा मान मिळाला आहे.
मरियेची नम्रता व श्रध्दा:
नम्रता व श्रध्दा या दोन गुणांची मनुष्याला सुखाच्या अनुभवासाठी अतिशय गरज आहे. मरियेच्या जीवनात अपार दु:खे होती, परंतू त्या दु:खाने ती खचून गेली नाही तर त्या दु:खाचा तिने श्रध्देने स्वीकार केला. 'गर्विष्ठ्यांची भव्य आसने पाडी खालती तो पुरती' असे मरियेने आपल्या स्त्रोतात म्हटले आहे. मरिया नम्र होती, हे तिच्या स्त्रोतातून प्रगट होते (लूक; १: ४६-५५). देवदूताला उत्तर देताना ती म्हणाली, ''मी प्रभूची दासी आहे'' हीच खरी नम्रता. दु:खाचा डोंगर कोसळला की मनुष्य खचून जातो, त्याचा विश्वास उडतो, मात्र मरियेची देवावर अपार श्रध्दा होती.
''श्रध्दा माझी अविचल प्रभूवर
सकल सुखाचा तू दातार
काय घडेल ते घडो दे शेवटी
लाभ आणि त्रास देव जाणे.''
आनंदाने ती बहकून गेली नाही, दु:खाने ती खचून गेली नाही म्हणून तिला गौरवाचा, स्वर्गाचा व देवाच्या आईचा मान सन्मान मिळाला.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर.
१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व बिशप, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू व भगिनी, जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात त्यांची श्रध्दा बळकट व्हावी व इतरांची श्रध्दा त्यांनी बळकट करावी म्हणून आपण मरिया मातेसह प्रभूकडे प्रार्थना करू या.
२. हे नवीन वर्ष २०१४ आपल्या सर्वांना सुखा-समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व चांगल्या आरोग्याचे जावो म्हणून आपण मरिया मातेसह प्रभूकडे प्रार्थना करू या.
३. यदांच्या वर्षी चांगले हवामान मिळावे व सर्व शेती-बागा पिकांनी व फळाफुलांनी बहरून याव्यात म्हणून आपण मरिया मातेसह प्रभूकडे प्रार्थना करू या.
४. सर्व स्थानिक कार्यकत्यांनी शातंता व न्यायासाठी एकत्र यावे तसेच संपूर्ण जगात शातंता पसरविण्यासाठी प्रयत्न करावे म्हणून आपण मरिया मातेसह प्रभूकडे प्रार्थना करू या.
५. आता, थोडा वेळ
शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभू चरणी ठेऊ या.