Wednesday, 24 September 2014

Reflections for the homily by Xavier Patil.












“तुम्ही पश्चाताप केला नाही व विश्वासही ठेवला नाही”

सामान्य काळातील सव्विसावा रविवार
यहेज्केल १८:२५-२८
फिलिप्पिकरांस पत्र २:१-११
मत्तय २१:२८-३२
दिनांक २८/९/२०१४

प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील सव्विसावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या भवर्तमानाचा विषय आहे “आज्ञाधारकपणा”, आज्ञा पाळणे म्हणजेच देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे. आजच्या पहिल्या वाचनात यहेज्केल सांगतो की, जर पापी लोकांनी दुष्कृत्ये सोडून सात्विकतेचे जीवन जगले तर त्यांचे तारण होईल व सात्विक लोकांनी सात्विकता सोडून दुष्कृत्ये करू लागले तर त्यांचा नाश होईल.
तसेच आजच्या दुस-या वाचनात संत पौल फिलिप्पिकरांस पाठवलेल्या पत्रामध्ये सांगतो की सर्वांनी एकमेकांवर प्रेम करून एकदिलाने व एकमनाने रहावे आणि ख्रिस्तासारखे जीवन जगावे.
तसेच आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त “दोन मुलांच्या” बोधकथेद्वारे आज्ञाधारकपणाचा संदेश आपणाला देत आहे.
जर आपण देवाच्या आज्ञेचे पालन केले नसेल तर पश्चातापी अंतकरणाने त्याची क्षमा मागूया व त्याच्या आज्ञेप्रमाणे चालण्यास त्याची कृपा व शक्ती लाभावी म्हणून ह्या मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यहेज्केल १८:२५-२८

लोकांना त्यांच्या आई-वडिलांच्या वा पूर्वजांच्या गुण दोषांची, अपराधांची शिक्षा भोगावी लागते ही यहूदी लोकांमध्ये असलेली गैरसमजूत कायमची काढून टाकणे व प्रत्येक व्यक्तीच्या तारणाची जबाबदारी स्वतःवरच अवलंबून असते, हा या वाचनाचा सरळ हेतू आहे, म्हणून एखाद्या दुष्टाने आपले पाप करणे सोडले व तो न्यायाने, सरळपणे वागू लागला तर तो जगेल आणि एखादा धार्मिक माणूस आपला सरळ मार्ग सोडून असत्याच्या मार्गावर चालू लागला व पापमय कृत्ये करू लागला तर तो मरणारच. प्रत्येकाने जे काही केले असेल ते लक्षात घेऊनच त्याचा न्याय केला जाईल, म्हणून पश्चाताप करा व देवाकडे वळा.

दुसरे वाचन: फिलिप्पिकरांस पत्र २:१-११
२:१-४ “वैयक्तिक नम्रतेद्वारे ऐक्य राखण्याची विनंती”: आवाहन केले आहे व येशूच्या प्रीतीचा आशीर्वाद आम्हांला मिळाला आहे म्हणून आम्हीही तशीच प्रीती कोणताच भेदभाव न करता इतरांना दिली पाहिजे.
२:५-११ “ख्रिस्ताचे आदर्श उदाहरण”: नम्रपणे जीवन जगण्यासाठी पौलाने ख्रिस्ताचा आदर्श उदाहरणाचे पुन्हा स्मरण केले आहे. येशूने स्वीकारलेली नम्रता, मानहानी आणि मग सर्वांचा प्रभू म्हणून उच्चपदी बसवणे हे स्पष्टपणे सांगितले आहे.

शुभवर्तमान: मत्तय २१:२८-३२
ह्या येशूच्या दाखल्याचा अर्थ एकदम स्पष्ट आहे. जे शास्त्री व परुशी होते त्यांनी देवाच्या आज्ञा काटेकोरपणे पाळण्याचे सांगुन त्या पाळल्याच नाहीत तर दुसरीकडे जे जकातदार व वेश्या ज्यांनी त्या काटेकोरपणे पाळण्याचे न सांगूनदेखील त्यांनी देवाच्या आज्ञा पाळल्या.
हा दाखला खरंतर कोणाचीच स्तुती करण्यासाठी वापरलेला नाही तर हा दाखला फक्त आपल्यासमोर दोन प्रकारच्या अर्धवट किंवा अपूर्ण असणा-या लोकांची प्रतिमा आपल्यासमोर दर्शविण्यासाठी ठेवण्यात आला आहे, ह्याचा अर्थ असा की एक गट दुस-यापेक्षा श्रेष्ठ नाही. दाखल्यामधील एकही मुलगा वडिलांना आनंद देण्यासारखा नव्हता, दोघेपण असमाधानकारक होते; परंतु शेवटी ज्याने पश्चाताप करून वडिलांच्या आज्ञेचे पालन केले तो अनिश्चितपणे दुस-यापेक्षा चांगला होता.
ज्या मुलाने वडिलांच्या आज्ञेचे पालन कोणताच प्रश्न न विचारता किंवा त्याचा मान राखून केला असता तर तो परिपूर्ण किंवा उत्कृष्ट मुलगा म्हणून संबोधण्यात आले असते. परंतु दाखल्यातील सत्य आपल्याला वेगळीच परिस्थिती दाखवते. ही दाखल्यातील स्थिती ह्या जगात दोन प्रकारचे लोक असल्याचे आपल्याला सांगते. एक गट असा जो धार्मिक प्रकारचा दिसतो परंतु जेव्हा ती धार्मिकता आपल्या जीवनाद्वारे दाखविण्याची वेळ येते तेव्हा हे त्या धर्मिकतेमध्ये मागे पडतात आणि दुसरा गट जो धार्मिक नसूनदेखील काही अनपेक्षित क्षणाला धार्मिक असल्याचे आपल्याला दिसून येते. कृतीची जागा कोणीही दिलेले वचन कधीच घेऊ शकत नाही असे हा दाखला स्पष्ट करतो, बोललेले चांगले शब्द कोणत्याही केलेल्या चांगल्या कृत्यांची जागा घेऊ शकत नाही. ख्रिस्ती जीवन हे शब्दांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्षात घडणा-या कृतीला जास्त प्राधान्य देते.  


बोध कथा:

एका वेळी नरकामध्ये असणारया सर्वांची सभा भरली होती आणि त्या सभेचा विषय होता कि कश्याप्रकारे आपण लोकांना नरकामध्ये येण्यास पात्र करायचे. त्या सभेतील एकाने म्हटले कि मी पृथ्वीवर जावून लोकांना सांगेन कि स्वर्ग नाही. म्हणून देवाच्या आज्ञेचे पालन करून काय लाभ? त्यापेक्षा खावून पिऊन मजा करूया. तेव्हा सभेतील जो अध्यक्ष होता त्याने उत्तर दिले की लोक तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत कारण सर्वांना माहित आहे की स्वर्ग आहे. नंतर दुस-याने सांगितले की मी जाऊन लोकांना सांगेन की नरक नाही म्हणून देवाच्या आज्ञा कश्याला पाळायच्या? घाबरायची काहीच काळजी नाही  खा-प्या आणि मजा करा. परत अध्यक्षाने म्हटले की तुझ्यावर देखील लोक विश्वास ठेवणार नाहीत कारण सर्वांना माहित आहे की नरक आहे. नंतर तिस-या व्यक्तीने सांगितले की मी जाऊन लोकांना सांगेन की देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी अजून खूप वेळ बाकी आहे. तोपर्यंत आपण स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगूया. अध्यक्ष आनंदित होऊन म्हणाला की तुला नक्कीच अनुयायी भेटतील.

मनन-चिंतन:
१. आजच्या युगामध्ये आपणाला अनेक अश्या व्यक्ती भेटतात की ज्या आपणाला वचन देतात परंतु त्यांचे पालन करीत नाही. अनेक प्रेमाच्या गोष्टीमध्ये अश्याप्रकारेच वचन तोडण्याचे वातावरण ऐकायला भेटते. तसेच निवडणुकीच्या अगोदर सर्व पक्षांचे उमेदवार लोकांना अनेक प्रकारची वचने देतात पण इलेक्शन संपताच ते सर्व विसरून जातात. अश्याप्रकारची माणसे आपणाला सर्व क्षेत्रांत दिसतात. हे लोक दुस-यांना मदत करण्याऐवजी स्वतःचेच खिशे भरतात. ते फक्त स्वतःच्याच भल्यासाठी जगतात. आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताने अश्या लोकांविषयीची तुलना, “एका माणसाचे दोन मुलगे” ह्या बोधकथेद्वारे केली आहे.
ह्या बोधकथेत दोन प्रकारच्या व्यक्ती प्रस्तूत केल्या आहेत. ह्या दृष्टांतामध्ये दोघा मुलांची मनोवृत्ती चांगली नव्हती परंतु जो धाकटा मुलगा असतो त्याला नंतर कळून चुकले की त्याने वडीलांच्या आज्ञेचा भंग केलेला आहे म्हणून तो पश्चाताप करतो आणि वडीलांची आज्ञा पाळतो.
इथे प्रभू येशू यहूदी लोक व जकातदार ह्यामध्ये असलेली तुलना दर्शवली आहे. यहूदी लोकांनी ईश्वराच्या नियमांचे पालन केले नाही म्हणून ते देवाच्या शिक्षेस पात्र ठरले आहेत परंतु जे पापी लोक होते त्यांनी त्यांच्या जीवनाचा कायापालट करून देवाच्या शिक्षेस मुकले आहेत. म्हणून आपण इतरांच्या वाईट कृत्यांकडे लक्ष न देता ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे चालावे आणि हाच मार्ग आहे सु:खदायी जीवन जगण्याचा.
जर आपण सत्याच्या म्हणजेच देवाच्या मार्गावर आहोत तर आपण दुस-यांचे ऐकू नये कारण ज्याप्रकारे चांगले शब्द आपणाला प्रेरणा देतात त्याचप्रमाणे वाईट शब्द व विचार आपला आत्मविश्वास कमजोर करतात. म्हणून आपण काय ऐकायचे व काय नाही ह्यावर आपण विचार केला पाहिजे म्हणूनच असे म्हणतात: “ऐकावे जनांचे पण करावे मनाचे”.
२. अनेकदा आपण देवालाच दोषी ठरवतो. जीवनामध्ये घडणा-या सर्व वाईट गोष्टी देवामुळेच घडतात असा आपला विचार असतो. पण आजच्या पहिल्या वाचनात यहेज्केल सांगतो की देवाचा न्याय सर्वांसाठी समान आहे. प्रत्येकाच्या दुष्कृत्यामुळे त्यांचा नाश होतो व सत्कृत्यामुळे तारण होते. म्हणून आपण पापमय जीवनाचा त्याग करून धार्मिकतेच्या मार्गावर चालले पाहिजे. अनेकदा आपण वाईट गोष्टी, विचार व कृत्ये सोडण्यास तयार होत नाही. कधी-कधी दुष्कृत्य सोडण्यास आपण जास्त वेळ लावतो तर कधी प्रयत्नच करीत नाही. आणि मग असा प्रसंग आपल्यासमोर उभा राहतो की आपल्याला बदलण्याची इच्छा असते परंतु वेळ मात्र निघून गेली असते.
जर आपण देवाची आज्ञा पाळून धार्मिकतेच्या मार्गावर चाललो तरच समाज्यामध्ये ऐकता, प्रेम,बंधूभाव, सेवा, नम्रता व लीनता दिसून येणार. दुस-या वाचनात संत पौल सांगतो की आपली जी मनोवृत्ती आहे ती ख्रिस्तासारखी असली पाहिजे. ख्रिस्तासारखे आपण देखील लीन झालो पाहिजे. कारण येशू ख्रिस्त हा ईश्वर असूनही आपणामध्ये जन्म घेऊन दासाचे रूप धारण केले व शेवटी क्रुसावर मरून आपणाला पापमुक्त केले.
जगामध्ये जे पहिले पाप आदाम व ऐवा ह्यांच्याकडून घडले ते म्हणजे आज्ञाभंग होय. त्यांनी देवाची आज्ञा पाळली नाही म्हणून पापांचे दुष्परिणाम त्यांच्या जीवनात एकामागोमग एक यायला लागले. आजच्या युगामध्ये देखील आज्ञाभंग होताना दिसून येते. प्रत्येक कुटुंबात, समाजात व देशात होणा-या लढाई, मारहाणी, भेदभाव ह्या सर्वांचे मूळ कारण आज्ञाभंग होय.
म्हणून आजच्या मिस्साबलीदानात सहभागी होत असताना येशूख्रिस्ताचे उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर ठेवून जीवनामध्ये विनम्रता, लीनता, सेवाभाव, क्षमा, प्रेम व त्यागाची वाट निवडून ख्रिस्ताच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया व ईश्वराचे प्रेम दुस-यापर्यंत पोहचवून आपले जीवन धन्य करावे म्हणून प्रार्थना करूया.   


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रेमळ पित्या, आमची प्रार्थना ऐक.
1.     ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्त बंधू-भगिनी ह्यांनी स्वतः सत्याच्या मार्गावर चालून इतरांना सत्याच्या मार्गावर चालण्यास मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
2.     सर्व ख्रिस्ती भाविकांनी स्वार्थाचे जीवन सोडून इतरांच्या अडचणीत त्यांना हातभार लावावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
3.     सर्व युवक-युवती व लहान मुलांनी त्यांच्या आईवडिलांच्या आज्ञेप्रमाणे वागावे व जीवनात चांगल्या गोष्टी आत्मसात करून वाईट गोष्टी टाळाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
4.     आपण सर्वांनी येशू ख्रिस्तासारखे सेवाभावी आणि विनम्र जीवन जगावे व देवाने दिलेल्या सर्व देणग्यांचा योग्य वापर करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
5.     थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजा ईश्वर चरणी समर्पित करूया.   
           
  













































































































































































































































































































































































































































No comments:

Post a Comment