Reflections for Homily By: Allwyn Gonsalves
सामान्य काळातील पंचविसावा
रविवार
दिनांक: 21/09/2014
पहिले वाचन: यशया;
५५:६-९
दुसरे वाचन: फिलिप्पिकरांस
पत्र; १:२०-२४,२७
शुभवर्तमान: मत्तय;
२०:१-१६
“मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यांत सलते काय?”
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी जमलेल्या
माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आज पवित्र ख्रिस्तसभा सामान्य काळातील पंचविसावा रविवार
साजरा करीत आहे, तसेच आपणा सर्वांना जागतिक शांतीसाठी विशेष प्रार्थना करण्यासाठी
आवाहन करीत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात प्रवक्ता
यशया आपल्याला सांगतो की, आपण देवाजवळ गेले पाहिजे, म्हणजे तो आपल्याला क्षमा
करील. देवाच्या कल्पना ह्या आपल्या कल्पना नाहीत, त्याचे मार्ग हे आपले मार्ग
नाहीत. तर दुस-या वाचनात संत पौल फिलिप्पीकरांस लिहिलेल्या पत्रातून सांगतो की,
माझे जगणे किंवा मरणे हे फक्त ख्रिस्तासाठीच आहे. माझ्याद्वारे ख्रिस्ताचा महिमा
केला जाईल. तसेच ख्रिस्ताच्या सुवार्तेला शोभेल असे आचरण ठेवण्यास आपणा सर्वांना तो
आवाहन करत आहे.
संत मत्तयच्या
शुभवर्तमानातून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना दाखल्याद्वारे सांगतो की,
स्वर्गाच्या राज्यात सर्व लोक सारखे आहेत, कोणीही उच्च व निच्च नाही.
आजच्या ह्या पवित्र
मिस्साबलिदानात सहभागी होत असताना आपल्याला संत पौलाप्रमाणे जीवन जगता यावे तसेच व
जगात शांती नांदावी म्हणून प्रार्थना करुया.
पहिले वाचन (यशया; ५५:६-९):
प्रवक्ता यशया इस्त्राएली
जनतेला विनवणी करत सांगतो की, देवाचा शोध करा, देवाजवळ येण्याचा प्रयत्न करा. जर
आपल्याला देवाजवळ जायचे असेल तर पापी माणसाने त्याचे अनैतिकतेचे मार्ग बदलले
पाहिजेत. तसेच यशया सांगतो की, पापी माणसाने न घाबरता आपल्या पापांची क्षमा मागितली
तर प्रभू परमेश्वर क्षमा करतो, कारण प्रभू परमेश्वर हा त्याच्या क्षमेसाठी सदोदीत
तयार असतो. जरी देव अनंत (infinite) आणि श्रेष्ठ (transcendent) तसेच आपल्या आकलनाच्या पलीकडे
असला तरी तो आपल्या जवळ
येतो व आपला खरा मित्र म्हणून आपल्याबरोबर तो जगात वावरत असतो.
तो जवळ आहे तोच त्याचा धावा
करा: ह्या ओवीद्वारे
प्रवक्ता यशया सांगतो की, देव हा सदोदीत आपल्या सभोवताली असतो, परंतू आपले जीवन
ह्या भूतलावर मर्यादित आहे, त्यामूळे ह्या थोड्या वेळात देव एका पित्याप्रमाणे
किंवा एका मदतगारासारखा आपल्या जोडीला सदोदीत असतो. म्हणून ह्या थोड्या वेळात आपण
देखील देवाच्या सानिध्यात जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
दुर्जन आपला मार्ग सोडो: प्रवक्ता यशया इस्त्राएली
लोकांना सांगतो की, जर आपल्याला देवाजवळ जायचे असेल तर प्रत्येक पापी माणसाने त्याच्या
वाईट मार्गाचा त्याग केला पाहिजे. त्यांनी आपली वाईट वागणूक, वाईट विचार आणि वाईट ध्येय
बदलले पाहिजेत जेणेकरून आपण देवाच्या जवळ येऊ शकतो. जर पापी मनुष्य आपल्या
पापासाठी प्रायश्चित करण्यास तयार नसेल, तर देव त्याला त्याच्या पापांची क्षमा
करणार नाही. परंतु जर पापी मनुष्य आपल्या पापांची क्षमा मागत असेल तर देव आंनदाने
व उत्साहाने त्या माणसाला पापमुक्त करतो व त्याच्या जवळ येतो.
माझ्या कल्पना तुमच्या
कल्पना नव्हेत: पापी मनुष्य विचार करतो की, माझे पाप इतके वाईट आहे की प्रभू परमेश्वर देखील
मला माझ्या पापाची क्षमा करणार नाही. परंतू परमेश्वर म्हणतो, तुमच्या विचारांना,
प्रेमाला आणि मायेला अंत आहे, पण माझ्या विचारांना, प्रेमाला आणि मायेला अंत नाही.
कारण माझे विचार हे तुमच्या विचारांपेक्षा खूप वेगळे आहेत. त्याचप्रमाणे तुमचा
मार्ग हा माझ्या मार्गापेक्षा खूप निराळा व वेगळा आहे.
आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे
तसे माझे मार्ग व कल्पना तुमच्या मार्ग व कल्पनाहून उंच आहेत: ज्याप्रमाणे आकाश हे
पृथ्वीपेक्षा चांगले आहे व वरच्या दर्जाचे आहे, त्याचप्रमाणे माझा मार्ग व माझे
विचार हे तुझ्या मार्गापेक्षा व विचारापेक्षा श्रेष्ठ आहेत.
दुसरे वाचन (फिलिप्पिकरांस
पत्र; १:२०-२४,२७):
संत पौलाने ज्यावेळी फिलिप्पिकरांस
पत्र लिहिले त्यावेळी ते रोममध्ये कैदेत होते. संत पौलाचे फिलिप्पिकरांबरोबर नाते
फार चांगले होते, तेथील लोकांनी त्याला त्याच्या मिशनरी प्रवासासाठी खूप मदत केली
होती, त्यामुळे त्याने हे पत्र लिहिले होते. संत पौल आपल्या कामाविषयीची माहिती
फिलिप्पिकरास सांगतो. तसेच त्यांना उपदेश करतो की तुम्ही विश्वास बळकट करा व
नतमस्त जीवन जगा.
माझ्या शरीराने ख्रिस्ताचा
महिमा होईल: संत पौल फिलिप्पिकरांस सांगतो की, मला माहित नाही की माझे
मरण कैदेत होईल किंवा माझी सुटका केली जाईल. दोन्ही पर्यायामध्ये मी येशू
ख्रिस्ताचा गौरव व आदर करणे जरूरीचे मानतो. पुढे तो सांगतो की जर मला मरण यायचे
असेल तर मी त्याचा आदराने स्विकार करेन आणि जर माझी सुटका झाली तर येशू ख्रिस्ताचे
नाव व शुभर्वतमान जगाच्या कानाकोप-यात पसरविण्याचा प्रयत्न करेन.
जगणे हे ख्रिस्त आणि मरणे
हे लाभ आहे: संत पौल फिलिप्पिकरांस सांगतो, जर मी जगलो तर माझे जीवन
ख्रिस्तासाठी अर्पण करणार, आणि जर मला मरण आले तर त्याचा लाभ आहे.
कोणते निवडावे हे मला समजत
नाही: संत पौल फिलिप्पिकरांस सांगतो की मृत्युची मागणी करावी की ख्रिस्ताबरोबर जीवन
जगण्याची मागणी करावी ह्यामध्ये मी गोंधळलेलो आहे, परंतू देहात राहण्यापेक्षा मरणे
मला फार बरे होईल. तरी मी देहात राहणे हे तुम्हांकरिता अधिक आवश्यक आहे.
ख्रिस्ताच्या सुवार्तेला
शोभेल असे जीवन जगा: संत पौल पुढे सांगतो की, मला मरण येऊ दे किंवा जीवनदान मिळू
दे, ह्याचा विचार तुम्ही करू नका. परंतू तुम्ही तुमचे ख्रिस्ती जीवन
चांगल्याप्रकारे जगत राहा व खरे ख्रिस्ती असल्याचे तुम्ही सिद्ध करून दाखवा, हीच तुमच्याकडून
माझी एक अपेक्षा आहे.
शुभवर्तमान (मत्तय;
२०:१-१६):
दररोजच्या जीवनामध्ये
घडणा-या घडामोडीचे स्पष्टीकरण देण्यासाठी येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनात वेगवेगळ्या
दाखल्याचा वापर केला. आजच्या शुभवर्तमानातदेखील येशू ख्रिस्ताने एक दाखला दिला
आहे. जो येशू ख्रिस्ताने स्वर्गाचे राज्याचे वैशिष्ट पटवून देण्यासाठी आपल्या
शिष्यांना सांगितला आहे.
मोठ्या पहाटेस बाहेर गेला
आणि कामगारांची निवड केलीः त्यावेळेस अशी पध्दत होती की रोज सकाळी सर्व
कामगार शहराच्या आणि गावाच्या एका कोप-यात एकत्र जमा होत. त्यांनतर शेतकरी किंवा द्राक्षामळ्याचे
मालक येऊन, त्यांच्या कामासाठी काही माणसे गोळा करीत व त्यांच्या पगाराविषयी ठराव
करून त्यांना कामासाठी घेऊन जात.
कामगाराबरोबर पगाराचा ठराव
केलाः येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतो की, द्राक्षमळ्याचा मालक आला व त्याने काही
माणसाबरोबर संपूर्ण दिवसासाठी एक दिनारी इतका मोबदला देण्याचा ठराव केला.
जे योग्य ते मी तुम्हांला
देईनः पुढे येशू ख्रिस्त सांगतो की, वेगवेगळ्या वेळेला त्या मालकाने आणखी काही
कामगार आपल्या द्राक्षमळ्यात कामाला पाठवून दिले, परंतू त्यांच्या पगाराविषयीचा
ठराव केला नव्हता. त्यांना आश्वासन दिले होते की तुम्हाला तुमच्या कामाचा मोबदला
जरूर दिला जाईल.
शेवटले ते पहिले आणि पहिले
ते शेवटले होतीलः त्यानंतर मालकाने आपल्या चाकराला सांगून सर्व कामगारांना
त्यांचा पगार घेण्यास बोलावले. मालकाने कामावर जे सर्वात शेवटी रुजू झाले होते त्यांना
बोलावून त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून एक दिनारी दिली. त्याचप्रमाणे त्याने सर्व
कामगारांना एक दिनारी दिली, परंतु ज्या कामगारांनी संपूर्ण दिवस ऊन्हात राहून काम
केले, त्यांना फार वाईट वाटले. त्यामुळे त्यांनी मालकाला प्रश्न केला, ‘आमच्या
कामाचा मोबदला आणि जे कामगार उशिरा आले त्यांच्या कामाचा मोबदला सारखा कसा?,
तुम्ही आमच्याशी अन्याय करता’ त्यावर मालक त्यांना म्हणाला, ‘मी तुमच्यावर कोणताही
अन्याय करत नाही, कारण तुम्ही माझ्याबरोबर तुमच्या पगाराचा ठराव केला होता आणि तो
तुम्हाला मिळाला आहे. माझ्या औदा-र्याद्वारे जे कामगार उशिरा आले त्यांना देखील मी
तेवढाच पगार दिला आहे आणि मला तो देण्याचा पूर्ण हक्क आहे, तुम्ही तुमच्या कामाचा
मोबदला घेऊन निघून जा.’ त्यानंतर येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतो, ‘जे
शेवटचे ते पहिले आणि पहिले ते शेवटचे.’
बोध कथाः
एकदा एका श्रीमंत माणसाने एका उत्तम चित्रकाराला
शांतीचे प्रतीक म्हणून प्रसिध्द होईल असे चित्र काढण्यास सांगितले. चित्रकाराने
खूप विचार केल्यानंतर एक चित्र रंगवले त्यामध्ये त्याने एका गावाचे दृश्य दाखवले,
तसेच गाय, आकाशात उडणारे पक्षी व गावातील लहान घरे दाखवली. चित्रकाराने ते चित्र
त्या श्रीमंत माणसाला दिले, पंरतु तो माणूस उदास झाला व म्हणाला, हे चित्र शांतीचा
संदेश देत नाही म्हणून परत जाऊन नवीन चित्र काढ.
चित्रकाराने परत जाऊन शांतीचा संदेश देणा-या
चित्राविषयी विचार केला. तद्नंतर काही दिवसाने त्याने दुसरे एक चित्र काढले. त्या
चित्रात सुंदर बाई आपल्या लहान बालकाला झोपवत होती आणि आपल्या बाळाला पाहून हसत
होती. चित्रकाराला वाटले की हे शांतीचे एक उत्तम चित्र असू शकते पण जेव्हा ते
चित्र श्रींमत माणसाला पंसत पडले नाही व त्या माणसाने दुसरे एक चित्र काढण्यास
सांगितले त्या वेळेस मात्र चित्रकाराला खूप राग आला व त्याला आपल्या कला गुणांना
नाकारल्या सारखे वाटले.
काही महिन्यानंतर चित्रकाराने एक चित्र काढले,
आणि तो स्वतः विचार करू लागला की हे एक उत्तम शांतीचा संदेश देणारे चित्र असू शकते.
ते चित्र त्यांने त्या श्रीमंत माणसाला दाखवले, थोडा विचार केल्यानंतर त्याने त्या
चित्राचा स्वीकार केला. त्या चित्रात जोराचा वारा व पाऊस पडत होता. वीज व ढंगाचा
गडगडाट होत होता, समुद्राच्या लाटांना फार वेग आला होता. ह्या सर्व दृश्यामध्ये एक
छोटा पक्षी आपल्या घरट्यामध्ये शांतपणे झोपला होता.
मनन-चिंतनः
१)
देवाचे औदार्य: आजच्या पहिल्या वाचनात प्रवक्ता यशया, आपल्याला सांगतो की
देवाचा मार्ग हा आपल्या मार्गापेक्षा खूप निराळा आहे. कधी-कधी तो मार्ग आपल्या
विचाराप्रमाणे किंवा मनाप्रमाणे होत नसतो तर देवाच्या मनाप्रमाऩे होत असतो. आपले विचार मर्यादित, स्वार्थी असतात. आपले मार्ग अरुंद, काळोखी असतात. जेव्हा आपण स्वतः विचार
करून थकतो आणि आपला मार्ग चुकतो, तेव्हा आपल्या
समस्यांवर आपण देवाला विचार करू
द्यावा. कधी-कधी आपण देवाला
आपल्या कल्पनेप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपण विसरतो की देवाने आपल्याला
त्याच्या प्रतिमेसारखे व त्याच्या कल्पनेनुसार निर्माण केले आहे व आपल्याला देवासारखे
जीवन जगण्याचे आव्हान दिले आहे.
आजच्या शुभवर्तमानामध्ये
प्रभू येशू ख्रिस्त एका सुदंर उता-याचे वर्णन करताना सांगतो की, देवाचे औदार्य व
प्रेम अप्रतिम आहे. तसेच
देवाची दया, करूणा व प्रेम सर्व लोकांवर सारखेच आहे. तो कोणाचा भेदभाव करत नाही.
आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की, कामगार हे रागावले आहेत आणि आपल्या
मालकाबरोबर वाद घातला आहे, कारण जे कामगार उशिरा आले होते त्यांचा पगार व ज्यांनी
संपूर्ण दिवस काम केले त्यांना पगार सारखा दिल्याबद्दल त्यांनी वाद निर्माण केला
होता. त्यावेळी मालक त्यांना म्हणाला, मी तुमच्यावर कोणताही अन्याय करत नाही, कारण
तुमच्या ठरावाप्रमाणे तुम्हाला पगार दिला आहे. माझा पैसा मी कसा वापरावा व कोणाला
दयावा ह्याचे मला संपूर्ण हक्क आहे. त्यानंतर तो मालक म्हणाला माझ्या ह्या औदार्यदानामुळे
तुम्ही रागावले आहात का? देवाचे औदार्य हे मानवाच्या औदार्यापेक्षा कितीतरी पटीने
चांगले असते. मानवी मनाला देवाचे औदार्य समजण्यापलिकडे आहे. कारण देवाचा मार्ग हा
आपल्या मार्गापेक्षा निराळा आहे. आजच्या दाखल्याद्वारे आपल्याला कळून येते की,
स्वर्गाचे राज्य हे सर्वांसाठी खुले आहे. आपल्या सर्वांना स्वर्ग राज्यात वाटा
आहे, कारण देवाचे आपल्या सर्वांवर अपार प्रेम आहे. देवाच्या ह्या प्रेमाला कोणतीही
मर्यादा नाही.
ज्याप्रमाणे उशिरा आलेल्या
कामगारांना मालकाने विचारले की, तुम्ही संपूर्ण दिवस येथे का ऊभे आहात? ते म्हणाले
की त्यांना कोणीही कामासाठी बोलावले नाही. येशू ख्रिस्ताने कसलाही विचार न करता (विशेषता
त्यांचा काही उपयोग नव्हता, ते आळशी माणसे होती किंवा वेगळ्या जाती-जमातीचे होते) त्यांना
कामासाठी बोलाविले. ते द्राक्षमळ्यात काम करण्यास तयार झाले होते. त्यांनी किती
वेळ काम केले ह्यावर त्यांचा पगार आधारला नव्हता तर त्यांचे काम करण्याची क्षमता व
आतुरता आणि मालकाच्या हाकेला होकार देऊन काम करण्याची तयारी दाखवली त्याबद्दल त्यांना
मोबदला दिला जाईल ह्याची हमी मालकाने त्यांना दिली होती. अशाप्रकारे कामगार
द्राक्षमळ्याचे भाग बनले व देवाने त्याच्या राज्यात सर्वांचा सारखा न्याय-निवाडा
केला आहे. देव कोणत्याही मनुष्याला आपल्या स्वर्ग राज्याचे निमंत्रण कधीपण आणि
कोठेपण देत असतो. परंतु जेव्हा आपण त्या निमंत्रणाला होकार देतो, तेव्हा आपला
स्वर्ग राज्यात सामावेश केला जातो.
२)
जागतिक शांती दिन: आज देऊळ माता जागतिक शांती
दिन साजरा करत आहे. शांती पुष्कळ लोकांच्या ओठावर असते, पण अगदी थोड्या लोकांच्या
अंतःकरणात ती आढळते. सारे जग शांतीसाठी भुकेलेले आहे. आपण सर्वजण शांती
मिळविण्यासाठी खूप धडपडत असतो, कष्ट करीत असतो. संत आगुस्तीन म्हणतो, “हे प्रभो आमची अंतःकरणे तुझ्यासाठी निर्माण केली
आहेत. आणि तुझ्याकडे आल्यावाचून आमच्या अंतःकरणाला शांती मिळणार नाही.” खरी शांती परमेश्वराच्या सान्निध्यात,
परमेश्वराच्या सहवासात, परमेश्वराच्या शब्दांमध्ये आहे. म्हणूनच शांतीचा शोध आपण
शब्दात व सहवासात करायला हवा. माशाचे खरे सुख पाण्यात असते, त्याचप्रमाणे आपले सुख
परमेश्वराच्या सहवासात आहे. जसा मासा पाण्याबाहेर तडफडतो तसे आपण देखील देवापासून
दूर गेल्यानंतर तडफडत असतो.
मत्तयच्या शुभवर्तमानात अध्याय ५ मध्ये प्रभू ख्रिस्ताने आठ धन्यवाद दिले
आहेत. हे धन्यवाद वाचून त्यांच्यावर चिंतन करून ते आचरणात आणून अनेक लोकांना
मनःशांती प्राप्त झाली आहे. महात्मा गांधी ज्या वेळेला संकटात असत, निराश होत असत
त्यावेळेला हे धन्यवाद वाचून त्यांना मनःशांती प्राप्त होत असे.
आजच्या ह्या जागतिक शांतीदिनी आपल्या
राष्ट्रामध्ये, गावामध्ये, कुटुंबामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये शांती प्रस्थापित
व्हावी म्हणून आपण ह्या पवित्र मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करू या.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना
प्रतिसाद: हे शांतीदाता प्रभू आमची प्रार्थना ऐकून घे.
- आज आपण आपल्या पवित्र ख्रिस्तसभेसाठी विशेष प्रार्थना करूया. आपले पोप, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मभागिनी व धर्मबंधू यांना प्रभुची सुवार्ता पसरविण्यासाठी भरपूर असा आशिर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
- आपल्या धर्मग्रामातील सर्व लोकांवर ख्रिस्ताचा आशीर्वाद यावा व स्वतःला नाकारून जगातील आनंदापासून वंचित राहून जागतिक मोह-मायेचा त्याग करून आपण शुभवर्तमानाच्या मुल्यांप्रमाणे जगावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
- हे प्रभू परमेश्वरा, जी कुटूंबे तुझ्यापासून दुर गेली आहेत व तुझ्या शब्दाचा मान करत नाहीत, त्या सर्वांवर तुझा पवित्र आत्मा पाठव व तुझी कृपेने त्यांचे मनपरिवर्तन व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
- हे प्रभू परमेश्वरा, आज आम्ही काश्मीरमधील पूरग्रस्तांसाठी प्रार्थना करतो; ह्या आपत्तीतून बाहेर येऊन नवीन जीवन सुरु करण्यास तू त्यांना मदत कर तसेच नव्याने जीवन जगण्यास त्यांना भरगोस अशी मदत मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
- आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया
inspiring reflection, very good.
ReplyDelete